डॉ. बिपीनचंद्र भामरे, : कार्डिओ-थोरॅसिक सर्जन

हृदंतस्तरशोथ

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

हृदयाच्या अस्तराच्या सर्वात आतील स्तराचा तसेच हृदयातील झडपांना सूज येण्याच्या अवस्थेला हृदंतस्तरशोथ (एण्डोकार्डिटिस) असे म्हटले जाते. रुग्णाच्या शरीराच्या अन्य कोणत्या भागातून म्हणजे घसा, दात किंवा मूत्रमार्गात झालेल्या प्रादुर्भावातून जिवाणू, बुरशी किंवा अन्य जंतू रक्तप्रवाहात मिसळून हृदयाच्या एखाद्या भागात शिरल्यामुळे हा आजार होतो.

एण्डोकार्डिटिसचे इन्फेक्टिव एण्डोकार्डिटिस (आयई), बॅक्टेरियल (जिवाणूजन्य) एण्डोकार्डिटिस (बीई), इन्फेक्शिअस एण्डोकार्डिटिस आणि फंगल एण्डोकार्डिटिस असे प्रकार आहेत. या आजारावर वेळीच उपचार झाले नाहीत, तर यामुळे तुमच्या हृदयाच्या झडपांची हानी होऊ  शकते किंवा त्यांच्या कामात बिघाड होऊ  शकतो आणि यातून प्राणघातक गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.

लक्षणे :

एखाद्या व्यक्तीला एण्डोकार्डिटिस अचानक होतो किंवा हळूहळू होत जातो. तो कोणत्या प्रकारच्या जिवाणूंमुळे होतो यावर हे अवलंबून आहे. त्याचप्रमाणे रुग्णाला कोणते सुप्त  हृदयविकार आहेत यावरही हे अवलंबून आहे. काही जणांना आधीपासूनच हृदयाचे स्नायू आकुंचन पावण्याचा किंवा झडपांतून गळतीचा विकार अगदी सौम्य किंवा मध्यम स्वरूपात असतो. त्यांना एण्डोकार्डिटिस होण्याची शक्यता अधिक असते. याची लक्षणे म्हणजे ताप, थंडी भरणे, थकवा येणे, रात्रीच्या वेळी घाम येणे, श्वास घेण्यात अडचण येणे, स्नायू व सांधे दुखणे, श्वास घेताना छाती दुखणे, पावले-पाय किंवा पोटाला सूज येणे. शिवाय ही लक्षणेही व्यक्तीनुरूप बदलतात. केवळ एवढेच नाही तर, कारणाशिवाय वजन कमी होणे, लघवीतून रक्त जाणे, प्लिहांमध्ये नरमपणा जाणवणे आणि ऑस्लर्स नोड्स (यामध्ये हातापायाच्या बोटांच्या त्वचेखाली लाल, रंगाचे मऊसर डाग दिसतात) ही लक्षणेही जाणवतात. तेव्हा ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कारणे

  • हुळहुळ्या त्वचेसारख्या एखाद्या प्रादुर्भाव झालेल्या भागातून जिवाणू पसरू शकतात. याशिवाय हिरडय़ांचे विकार, लैंगिक संबंधांतून वहन झालेला प्रादुर्भाव किंवा इनफ्लेमेटरी बॉवेल डिसीजसारख्या आतडय़ांच्या विकारामुळे जिवाणू रुग्णाच्या रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात.
  • टॅटूइंग किंवा बॉडी पिअर्सिगसाठी वापरलेल्या सुईमार्फत एण्डाकार्डिटिसला कारणीभूत ठरणारे जिवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात.
  • दूषित सुई व सिरिंजमुळेही हा विकार होऊ शकतो. हेरॉइन किंवा कोकेन यांसारखे बेकायदा अमली पदार्थ घेण्यासाठी इंट्राव्हेन्युअस अर्थात आयव्ही वापरणाऱ्यांना याचा अधिक धोका असतो. अशा प्रकारचे अमली पदार्थ घेणाऱ्यांना सहसा स्वच्छ, न वापरलेल्या सुई किंवा सिरिंज उपलब्ध होत नाहीत.
  • काही दंतवैद्यकीय प्रक्रियांमध्ये हिरडय़ांना छेद दिला जातो. यामुळे जिवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात.

उपचार

एण्डोकार्डिटिसवरील उपचार रुग्णाची वैद्यकीय परिस्थिती, प्रादुर्भावाची तीव्रता, हृदयातील झडपांना झालेली जखम आदी घटकांवर अवलंबून असतात. हृदयरोगतज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक असते. निदान निश्चित करण्यासाठी टू एकोकार्डिओग्राफी, ब्लड कल्चर चाचणी अशा चाचण्या कराव्या लागतात. बहुतेकदा रुग्णाला रुग्णालयात दाखल व्हावे लागते. एण्डोकार्डिटिसच्या रुग्णांना प्रतिजैविके दिली जातात. ही प्रतिजैविके इंट्राव्हेनस मार्गाने अर्थात ड्रिपद्वारे दिली जातात. प्रतिजैवक उपचार दीर्घकाळ चालतात. रुग्णांना घरी सोडल्यानंतरही त्यांना न चुकता प्रतिजैविके घ्यावी लागतात. याशिवाय रुग्णाला डॉक्टरांकडे नियमित पाठपुरावा करावा लागतो आणि रोगमुक्तीच्या प्रक्रियेबद्दल सजग राहावे लागते. त्यामुळे पूर्वपदावर येण्यासाठी रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याचे कसून पालन करावे. डॉक्टरांना कल्पना न देता स्वत:हून औषधे घेणे किंवा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे घेणे पूर्णपणे टाळले पाहिजे.

एवढेच नाही, तर एण्डोकार्डिटिसमुळे हृदयाचे नुकसान झालेले असेल, तर रुग्णावर ओपन हार्ट सर्जरी करून एण्डोकार्डिटिसमुळे झडपेत झालेला बिघाड दुरुस्त करावा लागतो. हृदयाच्या झडपेचे ती पुरेशी घट्ट बंद होणार नाही इतके नुकसान झाले असेल आणि त्यामुळे रक्ताचा प्रवाह उलटय़ा दिशेने जात असेल, तर शस्त्रक्रियेखेरीज पर्याय उरत नाही. एखाद्याला सातत्याने प्रादुर्भाव होत असेल आणि तो प्रतिजैविकेकिंवा बुरशीनाशक औषधांना प्रतिसाद देत नसेल, जिवाणू आणि पेशींचा मोठा गुंता तयार झाला असेल किंवा हृदयाच्या झडपेला लागून काही वाढ (व्हेजिटेशन) झाली असेल तरीही शस्त्रक्रिया आवश्यक ठरते. थोडक्यात, हृदयाला झालेली हानी दुरुस्त करण्यासाठी किंवा नुकसान झालेल्या हृदयाच्या झडपा दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया हा पर्याय ठरतो.

इन्फेक्टिव एण्डोकार्डिटिसचे एकंदर निदान तो कोणत्या प्रकारच्या जिवाणूंमुळे झाला आहे, हृदयाच्या कोणत्या झडपांना प्रादुर्भाव झाला आहे, शरीराची प्रतिजैविकांप्रति असलेली संवेदनशीलता आणि रुग्ण प्रतिजैविकांना देत असलेला प्रतिसाद यांवर अवलंबून आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

एण्डोकार्डिटिसच्या खुणा व लक्षणांची माहिती असणे आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही खुणा किंवा लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेषत: न उतरणारा ताप, तापामुळे पुन:पुन्हा दवाखान्यात दाखल व्हावे लागणे, कारणाशिवाय थकवा येणे, त्वचेला झालेला प्रादुर्भाव, बऱ्या न होणाऱ्या उघडय़ा जखमा किंवा छेद. त्वचेला प्रादुर्भाव ओढवण्याचा धोका असलेल्या बॉडी पीअर्सिग किंवा टॅटू काढण्यासारख्या बाबी टाळाव्यात. आयव्हीद्वारे औषधे अतिप्रमाणात घेऊ  नका. यामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाचा उजव्या झडपेचा एण्डोकार्डिटिस होऊ  शकतो. हा बहुतेकदा बुरशीमुळे झालेला असू शकतो.