प्रकाश लिमये

चित्रकलेचे कोणतेही शास्त्रोक्त शिक्षण न घेताही व्यावसायिक चित्रकारांच्या पंक्तीत बसण्याची आणि स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची किमया साधली आहे मीरा रोडच्या प्रिया पाटील यांनी. आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि हळूहळू लोप पावत असलेली कला जिवंत ठेवण्याची धडपड प्रिया पाटील करत आहेतच शिवाय आपल्यासारख्याच चित्रकलेचे कोणतेही शिक्षण न घेतलेल्या देशभरातील महिला चित्रकारांसाठी एक कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रिया पाटील यांचा प्रयत्न आहे.

जहांगीर आणि नेहरू सेंटर या ठिकाणी प्रिया पाटील यांची तीन स्वतंत्र प्रदर्शने भरविण्यात आली आहेत, तर आतापर्यंत देशाच्या विविध भागांत झालेल्या २३ समूह चित्रप्रदर्शनांत त्या सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या चित्रांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. भारतीय संस्कृती आणि कला हा त्यांच्या चित्रांचा पाया असून कलाकुसर आणि रंगसंगती ही त्यांच्या चित्रांची वैशिष्टय़े आहेत.

भारतीय संस्कृती ही नानाविध संस्कृतींचा एक सुरेख संगम आहे. भारतीय संस्कृतीच्या अनेक छटा माझ्यासारख्या चित्रकर्तीला आकर्षित आणि मोहित करतात. भारतीय संस्कृतीला चित्र माध्यमातून मांडण्याचा प्रयोग मी माझ्या चित्रप्रदर्शनातून केला आहे असे प्रिया पाटील सांगतात.

लहानपणी त्यांच्या घरात चित्रकलेला पोषक असे वातावरण नव्हते. मात्र त्यांचा आईला या कलेविषयीची आवड होती. त्या प्रिया यांना भरतकाम, वीणकामाचे साहित्य आणून द्यायच्या आणि ते करायला प्रोत्साहित करायच्या. यातूनच प्रिया यांना चित्रकलेचा छंद लागला. शाळेत चित्रकलेच्या सर्व परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या. मात्र त्या लहान असतानाच मातृप्रेमाला पारख्या झाल्या आणि घरातील वातावरणात बदल झाला. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांना चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी जे.जे. कला महाविद्यलयात प्रवेश घ्यायचा होता. मात्र शैक्षणिक शुल्क परवडणारे नसल्याने त्यांची इच्छा पूर्ण होऊ  शकली नाही. मात्र चित्रकलेचा एक प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. भरतकाम आणि वीणकाम सुरूच होते. या कामामुळे टेक्स्टाइलवर काम करणारी आणि कलाकुसरीचे काम करणारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली. टेक्स्टाइल डिझायनिंगचे त्यांनी सुमारे १८ वर्षे काम केले.

लग्नानंतर कॅमलीन आणि फेविक्रिल यांच्यासाठी त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले. भरतकाम आणि कशिदाकामाची अनेक शिबिरे, कार्यशाळा घेतल्या. याच दरम्यान त्यांनी चित्रकलेकडे लक्ष केंद्रित केले. जे.जे. महाविद्यलयात शिक्षण घेता आले नसले तरी चित्रकार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याच दरम्यान त्यांना एक अपघात झाला. या अपघातामुळे तब्बल एक वर्ष त्यांना अंथरुणात काढावे लागले. मात्र हा अपघातच त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी देणारा ठरला. या काळात प्रिया पाटील यांना इंटरनेटची खूपच मोठी मदत झाली. जगभरातल्या चित्रकारांच्या कलेचा, त्यांचा शैलीचा बारकाईने अभ्यास केला आणि मग प्रिया पाटील यांनी मागे वळून पाहिले नाही. चित्रकलेच्या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. पुणे आणि केरळ या ठिकाणी भरलेल्या समूह प्रदर्शनांत त्यांच्या चित्रांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या कमाची विचारणा सुरू झाली. यामुळे त्यांच्यात स्वत:बद्दल आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर देशात विविध ठिकाणी झालेल्या २३ समूह प्रदर्शनांत त्या सहभागी झाल्या.

प्रत्येक चित्रकाराचे स्वत:चे स्वतंत्र चित्रप्रदर्शन भरवणे हे एक स्वप्न असते. ते प्रिया पाटील यांनीदेखील पाहिले होते. ते सत्यात उतरविण्याचा निश्चय त्यांनी केला. आपल्या पहिल्यावहिल्या बोधी या प्रदर्शनासाठी गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान हा विषय निवडला. यासाठी त्यांनी तब्बल आठ महिने गौतम बुद्धांवरील साहित्याचा अभ्यास केला. कोणतेही चेहरे टाळून सिम्बॉलिक आर्ट हा अतिशय नावीन्यपूर्ण प्रकार त्यांनी या प्रदर्शनाद्वारे हाताळला. प्रदर्शनाच्या वेळी गौतम बुद्धाच्या साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांनी पाटील यांच्याशी मोठा वाददेखील घातला, मात्र अखेर त्यांनीच कौतुक करून त्यांना बंडखोर चित्रकार अशी बिरुदावलीदेखील दिली.

या चित्रप्रदर्शनाआधी प्रिया पाटील यांना एक प्रकारच्या उपेक्षेचा सामना करावा लागत होता. पाटील यांनी चित्रकलेचे कोणतेही अधिकृत शिक्षण घेतलेले नसल्याने चित्रकलेच्या दुनीयेतील एका समूहाकडून हेटाळणीची वागणूक दिली जात होती. प्रिया पाटील यांच्या संवेदनशील मनाला प्रचंड वेदना होत होत्या. मात्र बोधी चित्रप्रदर्शनाने वातावरणात मोठा बदल झाला. त्यांच्या कलाकृतीमुळे एक चित्रकार म्हणून त्यांचे अस्तित्व मान्य केले गेले. पाटील यांचा हा फार मोठा विजय होता.

मात्र या सर्व प्रकारामधून प्रिया पाटील यांना आपल्यासारख्याच चित्रकलेचे शिक्षण न घेतलेल्या महिला चित्रकारांची व्यथेची जाणीव झाली. या जाणिवेमधूनच त्यांनी चित्रांगना या व्यासपीठाची स्थापना केली. या व्यासपीठावरून भरविण्यात आलेल्या पहिल्या प्रदर्शनात देशभरातील ४० महिला चित्रकार सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या या चळवळीला नेहरू सेंटर या आघाडीच्या प्रदर्शन केंद्राने मोठाच हातभार लावला आहे. चित्रांगनाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनासाठी दर वर्षी ८ मार्चला केंद्र उपलब्ध करून दिले आहे. चित्रांगनाशी २०० महिला चित्रकार जोडल्या गेल्या आहेत.

प्रिया पाटील यांच्या दुसऱ्या प्रदर्शनाचा विषय होता संस्कृती. या प्रदर्शनात देशातील विविध ठिकाणच्या संस्कृती आपल्या चित्रांच्या माध्यमातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यात महाराष्ट्रातील रांगोळी – चैत्रांगण, राजस्थानमधील मांडणा, बंगालमधील अल्पना यांचा प्रामुख्याने समावेश होता. तर तिसऱ्या प्रदर्शनाचा विषय दक्षिणी असा असून यात दक्षिणेताली कळसूत्री हा प्रकार हाताळण्यात आला.

प्रिया पाटील यांच्या चित्रांना आतापर्यंत राजश्री बिर्ला फाऊंडेशनच्या बॉम्बे आर्ट सोसायटीचा भारतीय कला विभागासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार, पाँडेचरी कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार, वर्ल्ड वाइड आर्ट फोरमतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पहिले आंतरराष्ट्रीय चित्र म्हणून पुरस्कार आदी बहुमान प्राप्त झाले आहेत.

चित्रकलेच्या सोबतच सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातूनही प्रिया पाटील यांचे काम सुरू आहे. चित्रकलेचे शिक्षण न घेतलेल्या महिला चित्रकारांना वर्ल्ड वाइड आर्ट फोरमच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे काम त्या करत आहेत. वोखार्ट रुग्णालयाकडून सुरू करण्यात आलेल्या बेटी बचाओ मोहिमेमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत.

नावीन्याचा शोध घेत भारतीय संस्कृती आणि कला जिवंत ठेवण्याचा आपला प्रयत्न असून महिला चित्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भारतभर काम करणे आणि शासन स्तरावर पाठपुरावा करणे हे आपले उद्दिष्ट आहे, असा प्रिया पाटील यांचा मानस आहे.