शनिवार

बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला ऐन श्रावणात जायलाच हवे! काळ्या पाषाणातले सध्याचे शिवमंदिर नानासाहेब पेशव्यांनी बांधले. चालायची हौस असेल तर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करावी. श्रावणात अनेक लोक अनवाणी ही यात्रा करतात. अन्यथा ब्रह्मगिरीतील गंगाद्वार आणि निवृत्तीनाथांची समाधी गुंफा पाहून यावी. तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. नंतर अंजनेरी इथे जावे. गावाच्या पाठीशी अंजनेरीचा किल्ला आहे. हे हनुमानाचे जन्मस्थान समजले जाते. अंजनीमातेचे मंदिर आहे. अंजनेरीची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च इन न्युमिस्मिटिक स्टडीज ही नाणकशास्त्राला वाहून घेतलेली संस्था आणि त्यांचे संग्रहालय पाहिलेच पाहिजे. अंजनेरी गावात काही प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. गिर्यारोहणाची आवड असेल तर त्र्यंबकेश्वरच्या पाठीशीच असलेले ब्रह्मगिरी-भंडारदुर्ग हे किल्ले पाहावेत. या किल्लय़ावर गोदावरीचा उगम आहे.

रविवार

त्र्यंबकेश्वरच्या दक्षिणेला ५५ कि.मी. वर असलेल्या त्रिंगलवाडी किल्लय़ाशी जावे. किल्ला चढायला सोपा आहे. पायथ्याशी असलेली जैन लेणी, र्तीथकरांची मूर्ती आणि तिच्या पायाशी कोरलेला शिलालेख अवश्य पाहावा. तिथून पूर्वेला २० कि.मी. असलेल्या कावनईला जावे. हे देखील एक तीर्थक्षेत्र आहे. कावनईला किल्ला तर आहेच शिवाय इथे असलेले कपिलधारा तीर्थ हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान समजले जाते. त्यामुळे नाशिकला आलेली साधूमंडळी कावनईलासुद्धा या कुंडात स्नान करण्यास येतात. कावनईचा किल्ला छोटेखानी आहे. वरून निसर्ग अप्रतिम दिसतो. इथून पुढे मुंबई किंवा नाशिककडे जावे.

ashutosh.treks@gmail.com