डॉ. वाणी कुल्हाळी

डिसेंबरचा शेवटचा आठवडा आला की विचार सुरू होतो, नवीन वर्षांच्या स्वागताचा. यात हल्ली पार्टी तर ठरलेलीच असते आणि त्यासोबत आता ‘संकल्प’ करण्याकडेही कल वाढत आहे. यात मग काही व्यक्ती व्यायाम आणि आहारावर भर देत वजन कमी करण्याचे लक्ष्य ठरवतात. तर काहीजण दारू, सिगारेट, चहावर नियंत्रण आणणे यांसारख्या अनेक गोष्टी करण्याचा मनाशी चंग बांधतात. मात्र त्याही पुढे जात आपले आणि इतरांचे मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी कोणता संकल्प तुम्ही केला आहे का? नसेल तर जरूर करा. कारण धकाधकीच्या आणि बदललेल्या जीवनशैलीच्या युगात शरीराइतकेच मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

‘रिंग आउट द ओल्ड रिंग इन द न्यू’च्या भावनेने जुन्या त्रासदायी सवयी सोडून नवीन जीवनाकडे वाटचाल करण्याच्या उद्देशातून संकल्प केला जातो. नवीन वर्षांच्या उत्साहामध्ये काही नवीन आणि कदाचित जे अशक्य वाटत होते, असे करून दाखवण्याचे धाडस म्हणूनही अनेक जण संकल्प करतात. काही वेळेस संपर्कातील इतर व्यक्तींनी केला म्हणूनही संकल्प मनाशी करतात. यामध्ये मग का संकल्प करावा, याचा विचार केला जातोच असे नाही. काही वेळा तर मनमोहक जाहिरातींना भुलून किंवा आकर्षित होऊन संकल्प केले जातात.

वर्षभरात काही तरी बदल आणण्यासाठी लक्ष्य ठरवणे आणि ते गाठणे म्हणजे ‘संकल्प’.  प्रत्यक्ष हा शब्द वापरला जात नसला तरी असे संकल्प करण्याची इतर देशांमध्ये प्रचलित असलेली पद्धत आपल्याकडेही हळूहळू रुजत आहे. नवीन वर्षांचा पहिला पंधरवडा उलटताच ९०% जणांचा संकल्प पूर्ण करण्यामागचा उत्साह मावळताना दिसतो आणि पुढील काही दिवसांत तो नाहीसा होतो. यासाठी ठरविलेले लक्ष्य अगदी स्वप्नमय नसावे. एक किंवा दोनपेक्षा अधिक संकल्प करू नयेत. कारण प्रत्यक्षात ते पूर्ण करणे शक्य नसते. आपण केलेला संकल्प अगदी जाहीर नाही, परंतु मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबामध्ये सांगणे कधी कधी फायदेशीर असते. संकल्पाचा विसर पडत असेल किंवा आपला उत्साह कमी होत असेल तर या जवळच्या लोकांमधून तो गाठण्यास पाठबळ मिळते, वारंवार आठवण केली जाते. संकल्प पूर्ण करण्यासाठी बाहेरील तयारीसह थोडी मेहनत करण्यासाठी मनाची तयारीही रोज करावी.

मनाचे आरोग्य

आपले मन हाच निरोगी आरोग्याचा आरसा आहे. तेव्हा त्याच्यासाठी किमान काही वेळ राखून ठेवण्याचे लक्ष्यही ठरवायला हरकत नाही. मानसिक  आरोग्य आपल्या संवेदना, वागणूक  आणि सवयींवरून समजते. सर्व भावना खुलेपणाने अनुभवणे, साधारणपणे समाधानी असणे, योग्य आहार-विहार घेणे आणि आरामदायी झोप येणे ही निरोगी मानसिक  आरोग्याची लक्षणे आहेत. शारीरिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे समतोल आहार आणि व्यायामाची आवश्यकता असते. त्याप्रमाणे मनाच्या म्हणजेच मेंदूच्या आरोग्यासाठी ध्यान, योग यासारख्या व्यायामांची गरज असते. मेंदूला नियमित काम असेल तर मानसिक आरोग्यही ताजेतवाने राहते. या कामाचा ताण वाढणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक असते.

मनाच्या आरोग्यासाठी पुढील प्रकारचे काही संकल्प आपल्याला करणे सहज शक्य आहे.

* रात्री उशिरापर्यंत काम शक्यतो करणार नाही.

* मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉप रात्री उशिरापर्यंत पाहणार नाही.

* दिवसभरात किमान आठ तास झोप घेईन.

* रात्री लवकर झोपेन आणि सकाळी लवकर उठेन.

* राग अनावर होणार नाही यासाठी प्रयत्न करेन.

* खूप जास्त ताण वाटल्यास तो हलका करण्याच्या पद्धतीचा उपयोग करेन.

* कामाच्या ठिकाणी किंवा घरी आनंदी वातावरण राहील यासाठी काही बदल करेन.

* अधिक काळ सलग काम करायचे असल्यास अधूनमधून थोडा ब्रेक घेईन.

* दिवसात काही वेळ डोळे मिटून शांत बसेन.

* स्वत:ची आवड जपण्यासाठी दिवसभरात काही तरी उपक्रम करेन.

* समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याला प्राधान्य देण्यापेक्षा जवळचे मित्र किंवा कुटुंबातील व्यक्तीशी मोकळेपणाने संवाद साधेन.

* दररोज घरातील एका व्यक्तीला त्याने दिवसभरात काय केले याची आर्वजून चौकशी करेन.

मानसिक आरोग्य जपा!

* जसे स्वत:चे मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, तसे दुसऱ्याचेही जपण्यासाठी खबरदारी, काळजीपूर्वक वागणेही महत्त्वाचे आहे. ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीला विनाकारण ओरडून बोलणे, तिच्यातील व्यंग, आजार, स्वभावातील एखादी बाब याबाबत जाहीरपणे बोलून तिचा हिरमोड करू नये. अगदी आवश्यक असल्यास खासगीमध्ये ती दुखावली जाणार नाही अशा पद्धतीने संवाद साधावा. कामाच्या ठिकाणी किंवा जवळच्या नातेवाईकांमध्ये कोणाला मानसिक आजार असल्याचे समजल्यास त्या व्यक्तीला हेरून पाहणे टाळावे. शक्यतो इतर व्यक्तींप्रमाणेच तिच्याशी वागण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून त्या व्यक्तीलाही मानसिक आजारातून बाहेर पडण्यास मदत होते.

* आपल्या मानसिक स्थितीचा स्वत:च्या शरीरावरच नव्हे तर कुटुंब किंवा समाजावरही परिणाम होत असतो. तेव्हा मानसिक आरोग्य निरोगी राखू या आणि इतरांना निरोगी ठेवण्यास मदत करू या, हेच नव्या वर्षांचे लक्ष्य..