वैभव भाकरे

मर्सिडीझ-बेंझने नुकतीच त्यांची बहुउद्देशीय मोटार (एमपीव्ही) व्ही क्लास एलिट भारतात दाखल केली आहे. ‘लक्झरी मल्टीपर्पज वेहिकल’ (एमपीव्ही) व्ही क्लास ही या वर्षांच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल करण्यात आलेल्या व्ही क्लासवर आधारित आहे. एलिट पर्यायात अधिक व्हीलबेस देण्यात आला असून यात सहा प्रवासी बसू शकतात.

नव्या व्ही एलिटच्या शैलीमध्येही बदल करण्यात आले आहेत. समोरच्या बाजूला असणारे बम्पर आधीपेक्षा निराळे आहे. गाडीच्या समोर मोठे एअर डॅम असून यात क्रोमचा वापर करण्यात आला आहे. फ्रंट ग्रिलच्या डिजाइनमध्ये बदल केला असून एलईडी हेडलाइटसुद्धा बदलण्यात आले आहेत. बदलांचे किंवा नाविन्याचे हे सत्र गाडीच्या बाह्य़ रूपापर्यंतच मर्यादित आहे. गाडीच्या इंटेरिअरमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले नाहीत. परंतु काही अंशी बदल नक्कीच आढळतो. नवे डॅशबोर्ड ट्रिम, टर्बाइनची शैली असणारे वातानुकूलन यंत्रणेचे वेन्ट दिले आहेत. इंफोटेन्मेंट यंत्रणेसाठी मोठा डिस्पले गाडीत आहे. मागच्या सीटना स्वचालित यंत्रणा असून त्यांची उंची प्रवेशाच्या गरजेनुसार कमी जास्त करता येते. या सीट ४५ डिग्री अंशांपर्यंत झुकतात. गाडीच्या सीटमध्ये स्वतंत्र व्हेंटिलेशन आणि मसाज यंत्रणा दिली आहे.

व्ही क्लास एलिटमध्ये सर्वाधिक आराम, सुविधा, सर्वोत्तम सुरक्षितता आणि उपयुक्तता यांचा मिलाप आहे. मर्सिडीझ बेंझ कारची ही सर्व वैशिष्टय़े नवीन व्ही क्लास एलिटमध्ये आहेत, असे या मोटारींबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मर्सिडीझ बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेन्क यांनी सांगितले. पुढच्या वर्षी आम्ही दर महिन्याला एक गाडी दाखल करण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी या वेळी म्हटले.

गाडीचे डॅशबोर्ड आणि सीट्ससाठी लेदरचा वापर करण्यात आला आहे. वातानुकूलित यंत्रणा वेगवेगळे तापमान ठेवून वापरण्यात येऊ  शकते.

मर्सिडीझ बेंझने आपल्या परंपरागत मूल्यांना धक्का न देता, एक आरामदायी बहुउद्देशीय मोटार बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘लक्झरी’ कार या आपल्या विशेषणाला साजेसा दिमाख मोटारीच्या अंतर्भागातून दिसून येतो. प्रवाशांच्या मनोरंजनाची आणि विशेषत: संगीत प्रेमींची व्ही क्लास एलिटमध्ये विशेष काळजी घेण्यात आली आहे. मोटारीत  ६४० वॅटची क्षमता असलेली संगीतप्रणाली देण्यात आली असून यात तब्बल १५ स्पीकर आहेत.

मोटारीला रिअर पार्किंग कॅमेरा आहे. त्याचप्रमाणे मोटारीला सनरूफचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या गाडीत सहा एअर बॅग, एबीएस, ईबीडी (इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन) देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अटेन्शन असिस्ट आणि एक्टिव्ह पार्किंग असिस्ट यंत्रणा देण्यात आली आहे.

एलिटमध्ये ‘बी एस ६’शी सुसंगत असणारे चार सिलेंडर असणारे २ लिटरचे टबरे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनमधून १६३ हॉर्स पवार आणि ३८० एनएम टॉर्कएवढी ऊर्जा निर्माण होते. व्ही क्लास एलीटमध्ये ९ स्पीड ऑटोमॅटिक गेअरबॉक्स आहे. ही गाडी ०-१०० किमी हा वेग केवळ ११ सेकंदांमध्ये गाठते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

मर्सिडीझ बेंझने या वर्षी जानेवारीमध्ये भारतात व्ही क्लास दाखल केली होती. यात दोन पर्याय असून यांची किंमत ६८.४० लाखांपासून आहे. हे दोन्ही पर्याय विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. मोठा व्हीलबेस असलेल्या व्हीच्या पर्यायांची प्रवासी क्षमता सात आहे, तर लहान व्हालीबेसची प्रवासी क्षमता सहा आसनांची आहे. मर्सिडीझ-बेंझ व्ही क्लासच्या पूर्ण शृंखलेला टोयोटाच्या येऊ  घातलेल्या वेलिफायर एमपीव्हीकडून स्पर्धा मिळणार आहे.

वैशिष्टय़े

* सहा आसनी रुंद व्हीलबेस असलेली मोटार

*  २ लिटर क्षमतेचे ‘बीएस ६’ ला अनुरूप ओएम ६५४ डिझेल इंजिन

* १९५० सीसी, १२० केडब्ल्यू, ३८० एनएम आणि ९जी- ट्रॉनिकमध्ये ११. १ एस ०-१०० किमी/तास

* मसाजिंग फंक्शन आणि क्लायमेट कंट्रोल सुविधा असलेली आसने , १५ स्पीकर्स

*  एक्स-शोरूम किंमत १.१० कोटी रुपयांपासून पुढे (एक्स-शोरूम, भारत)

इंजिन आणि ट्रान्समिशन

१२० केडब्ल्यू / १६३ हॉर्सपावर , ३८० एनएम टॉर्क,

११.१ एस मध्ये ०-१००, १९५० सीसीचे डिझेल इंजिन

सुरक्षा वैशिष्टय़े

सहा एअरबॅग्स, अटेन्शन असिस्ट, अ‍ॅक्टिव्ह पार्क असिस्टसोबत ३६० अंशात फिरू शकेल असा कॅमेरा

रंगांचे पर्याय

निळा, राखाडी, काळ, पांढरा, चंदेरी, स्टील ब्ल्यू, सेलेन्टाइन ग्रे, ग्रॅफाइट ग्रे ऑब्सिडियन ब्लॅक मेटॅलिक, कॅव्हन्सीट ब्ल्यू मेटॅलिक, रॉक क्रिस्टल व्हाइट मेटॅलिक, ब्रिलियंट सिल्वर मेटॅलिक

vaibhavbhakare1689@gmail.com