दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होत असून याचा सुयोग्य फायदा अनेकजण व्यवसायासाठी करत आहेत. कल्पक संकल्पनेला समाजमाध्यमांची जोड देऊन अनेकांनी विविध उत्पादने बाजारात आणली. अवघ्या काही दिवसांमध्ये ‘सव्‍‌र्हिस इंडस्ट्री’ ही मोठी झाली आणि याचा प्रत्येक ग्राहक हा पाईक झाला. यामध्ये मोठा बदल झाला तो आरोग्य सेवेमध्ये. याच वेगाने वाढणाऱ्या ‘सव्‍‌र्हिस इंडस्ट्री’तला एक महत्त्वाचा आणि सध्या अधिक चर्चिला जाणारा विषय म्हणजे ऑनलाइन डॉक्टर. अनेकदा वयोवृद्ध व्यक्तींना घराच्या बाहेर जाऊन डॉक्टरांकडून उपचार घेणे शक्य होत नाही. अशा वेळेस हे ऑनलाइन डॉक्टर कामी येतात. तसेच सर्व आजारांवरचे उपचार, माहिती, सल्ले आणि औषधे हे एकाच ठिकाणी मिळतात. सध्या घरपोच औषधे देणाऱ्या, घरी येऊन रक्त, मधुमेह यांसारख्या विविध वैद्यकीय चाचण्या करणाऱ्या, घरबसल्या ऑनलाइन अमुक एखाद्या आजाराविषयी माहिती आणि त्यावरील उपायांची माहिती देणाऱ्या विविध मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्सविषयी जाणून घेऊयात ‘अ‍ॅप’ ला डॉक्टरमधून..

एमफाइन

विविध आजारांवर भारतातील उत्कृष्ट रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या ६०० डॉक्टरांचा सल्ला या अ‍ॅल्पिकेशनवर वापरकर्त्यांना घेता येतो. साधारणत: ३९९ रुपयांपासून वैद्यकीय आरोग्य तपासणीसाठीची नोंदणी या अ‍ॅल्पिकेशनवर वापरकर्त्यांना करता येते. देशातील साधारणत: ९०० शहरांमध्ये या अ‍ॅल्पिकेशनच्या माध्यमातून उपचार उपलब्ध असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. या अ‍ॅल्पिकेशनवरील डॉक्टरांचा सल्ला हा सशुल्क आहे. तसेच उपचाराचा मोफत पाठपुरावा करण्याची सुविधाही या अ‍ॅल्पिकेशनवर देण्यात आली आहे. हे अ‍ॅल्पिकेशन अ‍ॅन्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ठिकाणी मोफत उपलब्ध आहे.

प्रॅक्टो

जगप्रसिद्ध असणारे प्रॅक्टो हे अ‍ॅप्लिकेशन अनेकांच्या पसंतीस आहे. वेगवेगळ्या आजारांविषयी परिपूर्ण माहिती आणि त्यावरील निदान यासाठी मोबाइल वापरकर्ते प्रॅक्टो अ‍ॅप्लिकेशनला प्राधान्य देतात. घरपोच औषध सेवा, विविध विशेषज्ञ डॉक्टरांकडून वेगवेगळ्या आजारांवर सल्ले, डॉक्टरांसोबत एखादा आजाराविषयी लाइव्ह चॅट, घरी येऊन वैद्यकीय चाचणी यांसारख्या इतर अनेक विविध सेवा या अ‍ॅप्लिकेशनवर पाहायला मिळतात. ६० सेकंदांमध्ये संबंधित डॉक्टरांकडून कोणत्याही आजाराविषयी विस्तृत आणि खात्रीपूर्वक माहिती मिळत असल्याचे या अ‍ॅप्लिकेशनवरील प्रतिक्रियांमधून लक्षात येते. रुग्णाचे वैद्यकीय अहवालदेखील या अ‍ॅप्लिकेशनवर संग्रहित ठेवता येतात. कॅन्सरसारख्या दुर्धम्य आजारापासून ते ताप, सर्दी आणि खोकल्यापर्यंतच्या सर्व आजारांची खात्रीपूर्वक आणि सुयोग्य माहिती विशेष डॉक्टरांकडून लाइव्ह चॅटद्वारे मिळते. मात्र त्यासाठी अ‍ॅप्लिकेशन चालकांकडून शुल्क आकारणी करण्यात येते. आयओएस आणि प्ले स्टोअर या दोन्ही ठिकाणी प्रॅक्टो अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहे.

आस्क अपोलो

‘आस्क अपोलो’ हे अ‍ॅप्लिकेशन रुग्णांसाठी अधिक सोयीचे बनविण्यात आले आहे. कोणत्याही आजारावर उपचारासाठी डॉक्टरांच्या भेटीची पूर्वनोंदणी या अ‍ॅपच्या माध्यमातून करता येते. त्याचबरोबर या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला कोणत्याही वेळी व्हिडीओकॉल, फोनकॉल आणि मेलवर घेता येतो. तसेच रक्त, लघवी आणि इतर चाचण्यांची तपासणी घरातूनच करता यावी यासाठी नोंद करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधेही घरबसल्या एका क्लिकवर मागवता येतात. हे अ‍ॅप आयओएस आणि प्लेस्टोर या दोन्ही ठिकाणी मोफत उपलब्ध आहे. या अ‍ॅपवरील डॉक्टरांचा सल्ला हा सशुल्क आहे.

डॉक्सअ‍ॅप

डॉक्सअ‍ॅपच्या माध्यमातून कोणत्याही आजाराबाबत आणि त्यावरील उपचाराबद्दल अ‍ॅप्लिकेशन वापरकर्त्यांना लाइव्ह चॅटद्वारे विशेषज्ञ डॉक्टरांसोबत संवाद साधता येतो. या अ‍ॅपवर ५००० हजार डॉक्टर हे २४ तास ऑनलाइन असतात. या अ‍ॅपवर डॉक्टरांचा सल्ला घेताना रुग्णांना त्यांचे रक्त गटाचे अहवाल आणि शरीराच्या क्ष किरणांचे अहवाल अपलोड करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मराठी, हिंदी, गुजराती आणि बंगाली अशा विविध भाषेत रुग्णांना डॉक्टरांसोबत संवाद साधता येतो. त्याचबरोबर विविध रक्त चाचण्यांसाठी ऑनलाइन बुकिंग करता येते. हे अ‍ॅप्लिकेशन आयओएस आणि प्लेस्टोर या दोन्ही ठिकाणी मोफत उपलब्ध आहे. या अ‍ॅपवरील डॉक्टरांचा सल्ला हा सशुल्क आहे.

फार्मइझी

फार्मइझी हे अ‍ॅप्लिकेशन घरपोच औषधांची सेवा पुरवण्यासाठी उत्तम असे अ‍ॅप्लिकेशन आहे. आयओएस आणि प्ले स्टोअर या दोन्ही ठिकाणी फार्मइझी अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहे. दोन्ही ठिकाणी हे अ‍ॅप्लीकेशन मोफत असल्याने मोबाइल वापरकर्ते वैद्यकीय अ‍ॅप्स डाऊनलोड करताना फार्मइझी अ‍ॅप्लिकेशनला अधिक प्राधान्य देतात. १ लाखाहून विविध औषधांची उत्पादने फार्मइझी अप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा तपशील या अ‍ॅप्लिकेशनमध्ये टाकल्यानंतर नमूद केलेल्या पत्त्यावर योग्य औषधे संबंधित कंपनीची सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्याद्वारे पोहचती होतात. तसेच या अ‍ॅप्लिकेशनमध्ये कोणत्या आजारासाठी, रोगासाठी औषध चांगले आहे अशीदेखील माहिती तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे वाचायला मिळते. एखाद्या रुग्णाची विशिष्ट माहिती अ‍ॅप्लिकेशनमध्ये नमूद केल्यानंतर योग्य औषधांचा सल्लाही या अ‍ॅप्लिकेशनद्वारे मिळतो. तसेच विविध औषधांवर सूटही मिळत असल्याने ग्राहक घरपोच औषधे खरेदीसाठी हे अ‍ॅप्लिकेशन वापरतात.