|| यशोधन जोशी

मुंबईच्या वडापावाला अगदी तोडीस तोड उत्तर म्हणजे जर्मनीतील न्यूरेंबर्ग भागात मिळणारा ‘द्राय इम वेक्ला’. अगदी शब्दश: भाषांतर करायचे तर ‘एका पावात तीन’. अंगठय़ाएवढे जाड पण अंगठय़ापेक्षा थोडे लांब असे तीन सॉसेज तव्यावरून गरमागरम फ्राय होऊन येतात. बाहेरून खुसखुशीत पण आतून मऊ  असे हे सॉसेज पावात घालून तुम्हाला दिले जातात. हीच ती प्रसिद्ध न्यूरेंबर्गर सॉसेजेस. ही सॉसेजेस पाश्चात्त्य पदार्थ मिळमिळीत असतात हा समज खोटा ठरवतात. आपल्याकडे सगळं तिखटमिठाचं असतं, पण या सॉसेजमध्ये सामान्यपणे मिरपूड अधिक प्रभावी असते. त्यावर मोहरीचा पिवळसर सॉस घातल्यामुळे झणका वाढतो.

आपल्याकडे सिझलर्सबरोबर देतात तोच हा मोहरीचा सॉस, पण एक खास जर्मन चव त्याला असते. वडापाव जसा मुंबईत कुठेही मिळतो तसेच न्यूरेंबर्गमध्ये द्राय इम वेक्ला कुठेही मिळतं. जुनं न्यूरेंबर्ग, शॉपिंग एरिया अशा ठिकाणी तर अक्षरश: कोपऱ्याकोपऱ्यावर छोटी दुकानं असतात. ती फक्त हा एकच पदार्थ विकतात. फार तर कोल्ड ड्रिंक्ससाठी एक कोपरा असतो. वीकएंडला तर याचा खप प्रचंड असतो. हा रेस्टॉरंटमध्ये बसून खायचा पदार्थ नव्हेच. त्या प्रांतातल्या इतर छोटय़ा शहरांतही हा पदार्थ मिळतो. फक्त तिथे सॉसेजला न्यूरेंबर्गर म्हणणार नाहीत. ‘ब्राट वूर्स्ट’ म्हणतील, प्रकार तोच!