|| पर्ल व्ही. पुरी, अभिनेता

महर्षी विद्यामंदिर पब्लिक स्कूल, छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी आग्रा येथील राजेंद्र स्वरूप पब्लिक स्कूलमध्ये दाखल झालो. त्यानंतर आग्रा येथेच सेंट जॉन्स कॉलेजमध्ये मी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. एमबीएपर्यंत शिकल्यावर अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबई गाठली. पण हे सगळं सोपं नव्हतं. त्यामागे बराच संघर्ष होता.

अभिनेता, मॉडेल, संगीतकार, गीतकार अशी बिरुदं मी आता मिरवत असलो तरी शिक्षण पूर्ण झाल्यावर माझ्या वडलांची त्यांच्या व्यवसायात हातभार लावावा अशी इच्छा होती. ते खूप कडक शिस्तीचे होते. माझी अभिनय आवड त्यांना पटलेली नव्हती. ते माझ्याशी यामुळे दोन वर्षे अजिबात बोलले नाहीत. परंतु मला अभिनयातच करिअर करायचं होतं. त्यामुळे मी आईला माझी मन:स्थिती सांगितली. तिने मला पाठिंबा दिला, त्या जोरावर मी घरचा सारा श्रीमंती थाट सोडून एकटा मुंबईला आलो. आणि त्यानंतर सर्वसामान्य मुलासारखाच माझा संघर्ष सुरू झाला.

मुंबईत आल्यावर माझी उंची, माझा बोलका चेहरा याच्या जोरावर आधी जाहिरातींसाठी ऑडिशन दिल्या. त्यानंतर काही जाहिरातींमध्ये कामं मिळाली. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मी अनुपम खेर यांच्या ‘अ‍ॅक्टर प्रिपेअर्स’ या अभिनयशाळेत अभिनयाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ‘स्टार प्लस’ वाहिनीच्या ‘फिर भी ना माने ये बत्तमीज दिल’ या मालिकेत अबीर मल्होत्रा नावाची मुख्य भूमिका मिळाली. या भूमिकेची चांगली गोष्ट ही होती की, यात गायन ही माझी आवड आणि करिअर दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे अभिनय आणि गायन या दोन्ही गोष्टी मला एकाच वेळेस मालिकेत करायला मिळाल्या. त्यामुळे मी खूप खूश झालो. या मालिकेत काम करत असताना माझ्या शाळा-महाविद्यालयातील गाणं आणि अभिनयाच्या स्पर्धेत भाग घ्यायचो, त्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. त्यानंतर मला पुढे एकेक संधी मिळत गेली. घरापासून दूर मी एकटा मुंबईत राहत होतो. त्यामुळे घराची आणि घरच्यांची खूप आठवण येत होती. एकदा ‘नागार्जुन : एक योद्धा’ या मालिकेच्या सेटवर चित्रीकरण करत असताना मनास सतत सुरू असलेल्या घरच्या विचारांनी मी अस्वस्थ होऊन कोसळलो होतो. त्यानंतर मी मला स्वत:ला सावरलं. शाळेतच पाहिलेलं अभिनयाचं स्वप्न आठवलं. मग मी भानावर आलो. आता मी माझं गाणं आणि अभिनय या दोन गोष्टींत इतका रमलोय की तेच माझं जग झालंय. ‘नागीन ३’ या मालिकेच्या दरम्यान माझी निर्माती एकता कपूर यांच्याशी मैत्री झाली. त्यांनी मला छान मार्गदर्शन केलं.

शाळेत असताना आठव्या वर्षांपासूनच गाण्यातील करिअरला सुरुवात झाली. पण व्यावसायिक अभिनय मुंबईत आल्यावर सुरू झाला. महाविद्यालयात अभिनयाशी निगडित मोजक्याच स्पर्धा व्हायच्या आणि मी त्यात आवर्जून भाग घ्यायचो. मी सातव्या इयत्तेत असल्यापासून गायक कैलाश खेर यांची गाणी ऐकायचो. त्यांचं संगीत ऐकून मला गीतलेखनाची प्रेरणा मिळाली. शाळेत असताना मी शाहरुख खानचा चाहता असल्याने आणि माझ्या एका जीवलग मैत्रिणीने मला अभिनय क्षेत्रात जा.. असं सांगितल्यामुळे मी अभिनय क्षेत्रात जायचे असे ठरवले होते. पण दुसऱ्या बाजूला संगीतही मला ओढ लावत होतं.

मी कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना खूप खूश असतो. मी अभिनयाला काम समजत नाही. मी कितीही थकलेलो का असेना, अ‍ॅक्शन म्हटल्यावर माझ्यामध्ये ऊर्जा येते. मला वाटतं प्रेरणा मिळण्यासाठी कुठल्या मोठय़ा व्यक्तिमत्त्वाची गरज नाही. एका छोटय़ा मुलाला हसताना पाहूनही तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. लहान मूल एका खेळण्याला पाहून खूश होते. आपण मोठी माणसं मात्र सुख शोधत राहतो. मला वाटतं आनंद शोधायचा नसतो, तो आपल्या आसपास असतो. सुखाच्या शोधात आपण जातो तेव्हा काहीतरी ध्येय ठेवतो. त्याच्यामागे पळत राहतो. आणि दु:खी होतो. त्यामुळे जास्त अपेक्षा न ठेवता आहे त्यात आनंद माना. वेळ घेऊन एकेक गोष्ट करा. आपली स्पर्धा आपल्याशीच असावी.

शब्दांकन : भक्ती परब