27 May 2020

News Flash

‘व्हर्टिगो’ची चक्कर

कारणमीमांसा-आपल्या कानाच्या सर्वात आतील भागामध्ये कॅल्शियमने बनलेले सूक्ष्म कण असतात.

आजारांचे कुतूहल : -डॉ. अविनाश भोंडवे

अचानक उठून बसताना किंवा झोपून उठताना एकाएकी तोल जाऊन पडतोय की काय असे कधी कधी एखाद्याला वाटते. भोवतालचे जग आपल्याभोवती गरगरा फिरतेय असे वाटते. विशेष म्हणजे हा त्रास प्रत्येक वेळेस झोपून उठताना किंवा मान वळवल्यावर होतो. सर्वसामान्य लोक याला गरगरणे किंवा चक्कर येणे म्हणतात. पण वैद्यकीय भाषेत याला ‘बीनाइन पोझिशनल पॅरॉक्सिझमल व्हर्टिगो’ (बीपीपीव्ही) किंवा नुसते व्हर्टिगो म्हणतात.

कारणमीमांसा-आपल्या कानाच्या सर्वात आतील भागामध्ये कॅल्शियमने बनलेले सूक्ष्म कण असतात. ते मेंदूकडे जाणाऱ्या संदेशवाहक मज्जातंतूंना जोडलेले असतात. आपल्या शरीराच्या निरनिराळ्या हालचालीत, ऊठबस करताना आपले डोके जेव्हा हलते, तेव्हा हे कण मेंदूला डोक्याची स्थिती कशी आहे हे कळवतात. त्यायोगे मेंदू शरीराच्या इतर भागाला त्याप्रमाणे आदेश देतो आणि आपल्या शरीराचा तोल सांभाळला जातो.

सामान्यत: हे कॅल्शियमचे कण आंतरकर्णात ठरावीक अंतराने आणि एका विशिष्ट पद्धतीने विखुरलेले असतात. वयोमानाप्रमाणे, डोक्याला मार लागल्यास किंवा अन्य काही कारणांनी हे कण आपली जागा सोडतात. एकमेकाला घट्ट चिकटून त्यांची गुठळी बनते. त्यामुळे डोके  हलले की मेंदूला चुकीचा संदेश जातो आणि तोल सांभाळण्याची विपरीत आज्ञा दिली जाते. यामुळेच चक्कर आल्यासारखी भावना होते.

निदान- यामध्ये रुग्णाला खुर्चीवर बसवून त्याला पटकन ४५ अंशात मान वळवायला सांगतात. असे करताना डॉक्टरांचे एक बोट रुग्णाच्या डोळ्यासमोर धरले जाते आणि वळतानासुद्धा नजर त्याच बोटावर पक्की ठेवायला सांगितले जाते. त्याचप्रमाणे खुर्चीच्या पाठीवर मान टाकून थोडीशी मागे लोंबती ठेवायला सांगितले जाते. आणि मान वळवली जाते. जेव्हा रुग्ण मान वळवतो, तेव्हा त्याला चक्कर तर येतेच पण त्याच्या डोळ्याची बुबुळे वेगाने कान आणि नाकाच्या दिशेने दोन्ही बाजूंना हलत राहतात. याला ‘डिक्स हॉलपाइक टेस्ट’ म्हणतात. याप्रमाणेच रुग्णाला बिछान्यावर उताणे झोपवून कुशीवर वळवून डोळ्यांची हालचाल बघितली जाते. याला साइड लाइंग किंवा सेमोन्ट मॅनुव्हर म्हणतात. व्हर्टिगोचे निदान या दोन्ही तपासण्यांत होते. चक्कर येण्यामागे इतर काही कारणे असल्याची शंका असल्यास, मेंदूचा सिटीस्कॅन किंवा एमआरआय, मेंदूतील विद्युतलहरींचा आलेख (ईईजी) आणि वेळ पडल्यास इलेक्ट्रोनिस्टॅग्मोग्राफ या तपासण्या केल्या जातात.

इतर कारणे- मेनायर्स डिसीजमध्येही अशीच चक्कर येते. यात आंतरकर्णामध्ये असलेल्या द्रव पदार्थाचा दाब नेहमीपेक्षा जास्त वाढलेला असतो. मात्र यात कानात ‘गुणगुण’ असा आवाज येतो आणि श्रवणशक्तीही कमी झालेली असते. याचप्रमाणे कानाच्या अंतर्भागातील शंखासारख्या भागाला सूज येणे, जंतुसंसर्ग होणे, अर्धशिशी, अर्धागवायू, मेंदूला मार लागणे, मेंदूतील टय़ुमर यातदेखील अशी चक्कर येते. पण त्याला बीपीपीव्ही म्हणत नाहीत.

उपचार

बहुसंख्य रुग्णात हा त्रास आपोआपच बरा होतो. काही रुग्णांमध्ये मेंदूरोगतज्ज्ञ आणि फिजियोथेरपीस्टच्या मार्गदर्शनाखाली मानेच्या काही विशिष्ट हालचाली केल्यास व्हर्टिगोचा त्रास पूर्ण कमी होऊ  शकतो. याला मॅनूव्हर म्हणतात. अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजीच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे काही ठरावीक मॅनूव्हर क्रमाक्रमाने केल्यास, आंतरकर्णामध्ये चिकटलेले कॅल्शियमचे कण विलग होऊन पुन्हा आपल्या जागी जातात. यामुळे बीपीपीव्हीचा त्रास कायमचा बरा होऊ  शकतो.

बीपीपीव्हीमध्ये औषधांचा फारसा उपयोग नसतो. रुग्णाला मळमळ होत असल्यास किंवा मेनायर्स डिसीज असल्यास त्यात काही औषधे, प्रतिजैविके द्यावी लागतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2019 2:45 am

Web Title: positional paroxysmal vertigo akp 94
Next Stories
1 ‘नॅनो’ एसयूव्ही!
2 बाजारात नवे काय?
3 वेगाचे वादळ
Just Now!
X