स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’शी जुळले आहे. प्रसंग कोणताही असो, ठिकाण कुठलेही असो आपल्या मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्याची ‘लेन्स’ तो क्षण/ठिकाण आपल्यासकट ‘कॅप्चर’ करण्यासाठी सदैव तत्पर असते. तरुणवर्गात तर विनाकारण ‘सेल्फी’ काढण्याची हौस दिसून येते. मात्र, आता तुमच्या ‘सेल्फी’ काढण्याला आम्ही एक कारण देत आहोत. सत्कारण. रोजच्या दिनक्रमादरम्यान कोणतेही चांगले काम करताना तुमचा ‘सेल्फी’ काढा आणि selfie.loksatta@gmail.com या इमेल आयडीवर आम्हाला पाठवा. तुम्ही करत असलेले काम थोरच असावे, असे काही नाही. पण त्यातून तुमची सामाजिक बांधिलकी नक्कीच दिसावी. ‘सेल्फी’ पाठवताना त्याबाबत १०० शब्दांत माहितीही पाठवा. कदाचित तुमच्या सेल्फीचे हे ‘कारण’ उद्या आणखी काहींसाठी प्रेरणा ठरेल.

माणसाच्याच रक्ताची, पण स्त्री वा पुरुष या समाजचौकटीत न बसणारी व्यक्ती. अर्थात त्याला लोक तृतीयपंथी म्हणतात. माणसानेच बाहेर फेकलेला एक माणूस जवळ करण्याचा प्रयत्न नांदेड जिल्ह्य़ातील सांगवीमधील आकांक्षा आळणे हिने तिच्या मित्रांसोबत केला. निमित्त होते तिच्या वाढदिवसाचे.