संगणकावरील अनेक सॉफ्टवेअर तुम्हाला फुकटात मिळत असली तर भविष्यात त्यामुळे मोठे नुकसान होऊ  शकते. तुमच्या संगणकाचा संपूर्ण अ‍ॅक्सेस, व्हायरसला वाव, सायबर हल्लेखोरांची घुसखोरी हे धोके अशा मोफत सॉफ्टवेअरमुळे तुमच्यासमोर उभे राहू शकतात.

फुकट ते पौष्टिक असा एक रूढ समज आहे. संगणकाचा वापर करतानाही आपल्यातले अनेक जण हेच तत्त्व पाळत असतात. नवीन लॅपटॉप वा संगणकावर विण्डोजची अधिकृत ऑपरेटिंग सिस्टीम टाकण्याऐवजी अनेक जण त्याच्या पायरेटेड आवृत्त्या इन्स्टॉल करतात. ही पायरेटेड आवृत्ती मूळ आवृत्तीसारखीच काम करते. त्यामुळे काही हजार रुपये वाचवल्याचं समाधान आपल्याला वाटतं. असं असलं तरी, यामागचे धोके आपल्या लक्षात येत नाहीत. अनेकदा अशा पायरेटेड आवृत्त्यांची सुरुवातच ‘क्रॅक कोड’ने होते. हे ‘कॅ्रक कोड’ तुमच्या संगणकातील अनेक प्रोग्रॅमिंगचा ताबा घेण्याची क्षमता राखून असतात. त्यामुळे काही पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या संगणकाच्या कार्यप्रणालीशीच तडजोड करतो.

जी गोष्ट ऑपरेटिंग सिस्टीमची तीच सॉफ्टवेअरची. बहुतांश सॉफ्टवेअरच्या पायरेटेड आवृत्त्या संकेतस्थळांवर उपलब्ध असतात. मोफत मिळणारे ऑनलाइन सॉफ्टवेअर वापरायला सोपे असतात यात वादच नाही, कारण यात अनेक वैशिष्टय़े असतात. पण ही सॉफ्टवेअर आता तुम्हाला फुकटात मिळत असली तर भविष्यात त्यामुळे मोठे नुकसान होऊ  शकते. यातून तुम्ही तुमच्या उपकरणाचा संपूर्ण अ‍ॅक्सेस देत असता. शिवाय वायरस अ‍ॅटॅक/ मालवेअरसाठीही मोकळा मार्ग उपलब्ध करून देता. तुम्ही एखाद्या साइटवर जाता तेव्हा अचानकच ‘डाऊनलोड’ शब्द असणारी एखादी विण्डो समोर येते. हे काय असतं? हेच मालवेअर असतं. थोडक्यात सांगायचं तर फ्री ऑनलाइन सॉफ्टवेअर धोकादायक ठरू शकतात आणि आम्ही तुम्हाला याची कारणं सांगू.

वापरकर्ता सुरुवातीला अ‍ॅडवेअरला मोकळा मार्ग देतो. हेसुद्धा एक प्रकारचं मालवेअर आहे. यातून समोरच्या व्यक्तीवर नको असलेल्या जाहिरातींचा मारा केला जातो आणि फ्री डाऊनलोडचं गाजर दाखवलं जातं. हे विविध प्रकारे केलं जातं. यातून नकोशा पॉप-अप जाहिराती येतात. अनेकदा, यात पोनरेग्राफीसारख्या असभ्य वेबसाइट्स असतात. किंवा काही वेळेला ‘स्केअरवेअर’ही असते. स्केअरवेअर म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये वायरस किंवा इतर इन्फेक्शन आहे अशी भीती घालणारी खोटी जाहिरात. यातून नंतर समोरच्या व्यक्तीला न चालणारे, बोगस सॉफ्टवेअर विकले जाते किंवा कॉम्प्युटरवर आणखी मालवेअर डाऊनलोड करण्यास उद्युक्त केले जाते.

दुसरा मुद्दा म्हणजे ‘थ्रेट्स’ अर्थात धोकादायक घटकांना मुक्त प्रवेश लाभतो. रूटकिट्स, बॉट्स, की लॉगर्स, हॅकर्स, फिशिंग स्कॅम आणि इन्फेक्टेड वेबसाइट्स यांसारखे थ्रेट्स मोफतच्या ऑनलाइन सॉफ्टवेअरमधून अगदी मुक्तपणे संचार करतात. हे थ्रेट्स म्हणजे वायरसपेक्षाही मोठा धोका. यामुळे हार्ड ड्राइव्ह क्रॅश होते, सिस्टीम फेल्युअर होतो किंवा अगदी आयडेंटिटी थेफ्टचाही धोका असतो.

कमीतकमी प्रतिकार असलेल्या मार्गाना सायबर गुन्हेगारही प्राधान्य देतात, याकडेही आपण लक्ष द्यायला हवे. थर्ड पार्टी एण्ट्री पॉइंट्सच्या माध्यमातून मोठे नेटवर्क अ‍ॅटॅक करणं हा यातील मुख्य उद्देश असतो. यामुळे तुमची वैयक्तिक माहितीही धोक्यात येते. हे सॉफ्टवेअर तुमच्या बँक अकाऊंटपर्यंत पोहोचले तर तुमची आर्थिक ओळखही चोरली जाऊ  शकते.

कशात पैसे खर्च करावे, असा प्रश्न असेल तर कोणतेही सॉफ्टवेअर खरेदी करण्यापूर्वी तुम्ही चाचणी घेऊ  शकता. नावाजलेल्या पेड ऑनलाइन सॉफ्टवेअरची चाचणी घेण्यासाठी १४ ते ३० दिवसांचा अवधी पुरेसा असतो. सुरक्षित राहा!

 जाकीर हुसैन

(लेखक बीडी सॉफ्टवेअर डिस्ट्रिब्युशन प्रा. लि.चे संचालक आहेत.)