हृषीकेश यादव

पावसाळ्यात डोंगरभटक्यांना निसर्ग साद घालू लागतो. केवळ पावसाळ्यातच ट्रेकला घेऊन जाणाऱ्या संस्थांची संख्या भुईछत्र्यांप्रमाणे वाढू लागते. लोहगड, राजमाची, पेठ, तुंग, तिकोनासारख्या मुंबई-पुण्याजवळील किल्लय़ांवर तर वाहतूककोंडी व्हावी इतकी गर्दी होऊ  लागते. ती वाढणे साहजिकच आहे. पांढरेशुभ्र ओढे, कोसळणारे धबधबे, हिरवीगार शेते या साऱ्यांची मोहिनी पडली नाही तरच नवल.. पण या काळात योग्य ती काळजीही तितकीच महत्त्वाची आहे!

पावसाळ्यात सर्वच डोंगरांवर, किल्लय़ांवर गवताचे रान माजलेले असते. त्यात जर नवख्या ठिकाणी जात असू तर वाट चुकण्याचा संभव अधिक असतो. काही ठिकाणी वाटा तुटलेल्या असतात. तेव्हा वाट चुकण्याची, अपघाताची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे नवीन वाटेवर जाताना पायथ्याच्या गावातून वाटाडय़ा न चुकता घ्यावा. माहितीच्या वाटेवर जात असलो तरी त्या वाटेची सद्य:स्थिती जाणून घ्यावी.

पावसाळी भटकंतीत कपडय़ांचा एक जास्तीचा जोड कायम सोबत असावा. सॅकमधील कपडे भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. दिवसभर भिजत असल्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणी कोरडे कपडे असणे गरजेचे आहे. सह्याद्रीत हिमालयाप्रमाणे हायपोथर्मियाचा (अतिथंडीने काकडून जिवावर बेतणे) धोका उद्भवत नसला तरी दिवसभर भिजण्याचा उद्योग करत असू तर थंडीपासून उद्भवणाऱ्या धोक्यांपासून सावध राहावे.

ओढे, नाले, धबधब्यांजवळ खूप काळजी घ्यावी. या ठिकाणी सारेचजण रमतात. पण एकतर डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा वेग अधिक असतो आणि त्यातच जर पाऊस पडायला लागला तर पाहता पाहता हा पाण्याचा प्रवाह वाढू लागतो. अशा वेळी जिवावर बेतण्याचे प्रसंग गुदरतात. अनोळखी ओढा तर स्थानिकांच्या मार्गदर्शनाशिवाय पार करूच नये. नदीत पोहायला उतरू नये. पाण्यातील वाढते प्रवाह आणि भोवरे यामुळे संकट ओढावू शकते. पाण्यातून आलेल्या गाळात पाय रुतून बसू शकतात. पावसात सतत भिजल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, त्यातच पोहताना शरीरातील शक्ती आणखीन कमी होते.

शहरी पर्यटकांना धबधब्याखाली हुंदडताना पायाखालील दगडांची माहिती नसते. लहान मोठय़ा दगडांवरून पाय घसरू शकतात, तसेच निसरडा भाग माहीत नसेल तर पडण्याचा संभव असतो. धबधबा जेथे कोसळतो तेथे तयार झालेल्या खड्डय़ात उतरू नये. कारण त्यात जोराने पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्यामुळे भोवरा तयार झालेला असतो. या भोवऱ्यामुळे त्या पाण्यातून बाहेर येणे पट्टीच्या पोहणाऱ्यालाही अशक्य होते. तेव्हा अशा ठिकाणापासून दहा हात लांब राहावे.

पावसाळ्यात डोंगरउतारावरील किंवा घळीतून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून लहान-मोठे दगड खाली येत असतात. अशा वाटेवरून मार्गक्रमण करताना वरील बाजूवर लक्ष ठेवावे. जर वरून दगड येताना दिसलाच तर सर्वाना सूचना देऊन योग्य जागी आश्रय घेऊन त्यापासून बचाव करावा. आहारात शक्यतो चहा, सूप यासारख्या गरम पदार्थाचे प्रमाण अधिक ठेवावे. पावसात शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका संभवतो. त्यामुळे जाणीवपूर्वक पाणी अधिक प्यावे.

पावसाळी भटकंतीत सर्व काळजी घेत असलो तरी कोणाच्या ना कोणाच्या चुकीमुळे अपघाताला सामोरे जावे लागू शकते. काळजी घेत असलो आणि  ग्रुपला जरी हा धोका नसला तरी डोंगरात अनेकजण असतात. अशा वेळी आपत्कालीन संपर्काचे क्रमांक सर्वाकडेच असणे गरजेचे आहे.

ग्रामपंचायत, पायथ्याच्या गावातील गावकरी, पोलीस ठाणे, सरकारी रुग्णालये आणि बचाव पथक यांचे संपर्क क्रमांक असावेतच. पूर्ण चार्ज असलेला एक तरी मोबाइल ग्रुप सोबत असावाच. योग्य दक्षता घेतली तरच निसर्गातील हा सारा आनंदठेवा चांगल्या प्रकारे लुटता येईल.

जबाबदारीचे भान

पावसाळी भटकंती ही आनंदासाठी असते. निसर्ग तुम्हाला सहस्र करांनी अनेक गोष्टी देत असतो. त्याचा आदर राखणे आवश्यक आहे. ट्रेकिंगला जाताना प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा, थर्माकोलची ताटे-वाटय़ा वाटेवर कुठेही टाकून देऊ नये. कचरा कमीत कमीच होईल, याची काळजी घ्यावी. कचरा भरण्यासाठी मोठी पिशवी सोबत न्यावी. मुक्कामच्या ठिकाणी किंवा ट्रेक संपल्यावर जिथे कचराकुंडी असेल, तिथे हा कचरा टाकावा. मद्यपान, धूम्रपान वगैरे बाबींचा आधार घेत आनंद लुटण्याची गरजच नाही. खुल्या निसर्गात साहसी उपक्रमांत सहभागी होताना अशा बाबी टाळलेल्याच चांगल्या. निसर्गाच्या सान्निध्यातील हा निखळ आनंद जसा आहे तसा लुटण्यासाठी आपण तेथे जात आहोत याचे भान राखावे.

hrishikeshyadav@hotmail.com