स्कोडा ‘कोडियाक’ला पहिल्यांदा बर्लिनमध्ये सादर करण्यात आले. त्यानंतर कंपनीच्या निर्मात्यांनी आपली पहिलीच ७ आसनी एसयूव्ही भारतात दाखल केली. ‘कोडियाक’ नावाप्रमाणेच अतिशय ‘सिंपली क्लेव्हर’ असून, अतिशय आरामदायी, दमदार न् सुरक्षित प्रवासाची हमी ती देते. तिच्याविषयीचा थोडक्यात आढावा.

स्कोडाने कोडियाकचे नाव कोडीक अस्वलावरून ठेवले आहे. हे अस्वल दक्षिण-पश्चिम अलास्कामधील एका बेटांच्या समूहावर आढळून येते. कोडियाक भारतात दाखल करण्यात आल्यानंतर ती टोयोटा फॉर्च्यूनर आणि फोर्ड एंडेव्हरला टक्कर देताना दिसून येते आहे.

अंतर्गत रचना

कोडियाकच्या आतमध्ये बसल्यावर आरामदायी प्रवासाची अनुभूती येण्यास सुरुवात होते. गाडीमधील आकर्षक रंग योजना आपल्याला आकर्षित करून घेते. गाडीचे केबिन आकाराने मोठे आहे. गाडीचे डॅशबोर्डही उत्तम आहे. गाडीतील लाइटनिंगची सुविधा उत्तम आहे. पुढील आसने अतिशय आरामदायक असून, दूरवरील प्रवासादरम्यान प्रवासात कोणताही त्रास होताना दिसून येत नाही. चालकाचे आसन चांगले असून, गाडी चालवताना त्याला कोणताही त्रास होत नाही. सर्वात मागील आसने मात्र फक्त मुलांसाठी योग्य आहेत. जर या ठिकाणी कोणी वृद्ध व्यक्ती बसली तर त्याच्या गुडघ्यांना प्रवासात त्रास होऊ शकतो. त्यामुळे वृद्ध व्यक्तींना पहिल्या अथवा दुसऱ्या आसनांवर बसवणे योग्य ठरू शकते.

बारचना

पहिल्यांदा पाहिल्यास स्कोडा कोडियाक रचनेत कॉम्पॅक्टसारखी दिसून येते. मात्र, कोडियाक आपल्या मोठय़ा आकारामुळे (कोडियाक ४,६९७ मिमी लांब, १,८८२ मिमी रुंद, १,६६५ मिमी उंच) ती जास्त भारदस्त दिसते. एक मोठी एसयूव्ही असल्यासारखी वाटते. कोडियाकचे डिझाइन अतिशय सुंदर बनवण्यात आले आहे. कोणतीही कसर स्कोडा कंपनीने कोडियाक बनवताना ठेवलेली नाही. कोडियाकचे समोरील भागातील सिग्नेचर ग्रिल, क्रोम अधिक मोठा आणि व्यापक आहे. दोन्ही बाजूंनी ग्रिली फ्लेंकिंग पूर्ण एलईडी चेक क्रिस्टल हेडलँप आहे. ते दिवसा गाडी चालवताना एलईडी लाइट निर्माण करते आणि अतिशय शार्प दिसते. बम्परवरील हेडलाइटच्या खाली एलईडी लॅम्प आहेत. बोनेटच्या मध्यावर एक नवीन डिझाइन देण्यात आले आहे, ते नवीन ऑक्टेव्हियासारखे आहे. कोडियाकमध्ये देण्यात आलेले टायर अतिशय भक्कम असून, मागील बाजूस देण्यात आलेली सी आकारातील एलईडी टेल लॅम्प अतिशय सुंदर दिसते. एकंदर विचार करता कोडियाकची बाह्यरचना अतिशय देखणी आणि नावीन्यपूर्ण अशी आहे.

इतर वैशिष्टय़े

कोडियाकमध्ये ८.० इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट प्रणाली देण्यात आली आहे. इन्फोटेन्मेंट प्रणालीमध्ये १२ स्पीकर ७५० केंटन ऑडियोसह जोडले  गेले आहेत. त्यामुळे गाणी एकताना एक प्रकारे वेगळाच आनंद घेता येतो. गाडीमध्ये सनरूफ देण्यात आले असून, त्यामुळे गाडी दिसायला आणखीन सुंदर दिसते. कोडियाकने उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर केला आहे. गाडीत चार्जिग पॉइंट, यूएसबी आणि ऑक्स कनेक्टिव्हिटीसह इतर १० सुविधा देण्यात आल्या आहेत. गाडीत प्लास्टिक विंडो बम्परसह इतर अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यासह एअरकंडिशनिंग, क्रूझ कंट्रोल, पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर, ऑटोमॅटिक फ्रन्ट वायपर प्रणालीसह रेन सेन्सर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स आणि स्वयंचलित पार्किंग प्रणालीही आली आहे.

सुरक्षा

स्कोडाने कोडियाकमध्ये ९ एअरबॅग्ज, अंटीलॉक ब्रेकिंग प्रणाली, ईबीडी, एमबीए, एचबीए, एमकेबी, प्रेफील, इलेक्ट्रॉनिक नियंत्रण, ट्रॅक्शन कंट्रोल, ऑटो होल्ड फक्शनसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि मल्टी ब्रेकिंग सिस्टीमसह सुरक्षिततेसाठी इतर अनेक वैशिष्टय़े दिली आहेत. यात मुलांच्या आसनांसाठी सुविधा देण्यात आली आहे. खडबडीत रस्त्यावर त्रास होऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेण्यात आली आहे. मात्र ती स्पर्धक कारच्या तुलनेत अपुरी दिसून येतात. कोडियाक चालवताना चालकाकडून स्टेअरिंगची हालचाल जास्त होऊ लागली तर स्टेअरिंगमधील ‘सेन्सर’ चालक गाडी योग्य चालवत नसल्याचे निर्दशनास आणते. अशा वेळेस चालकाला थोडी विo्रांती घेण्याचा सल्ला कोडियाक देते.

का घ्यावी

स्कोडा कोडियाक एक हायड्राइव्ह सेडानसारखी वाटते. मात्र तिचा मोठा आकार, आतील सुंदर रचना आणि रस्त्यावरची तिची भक्कम पकड यामुळे ती संपूर्ण एसयूव्हीचा आनंद मिळवून देते. ती थोडी महाग असली तिची शार्प डिझाइन आणि लक्झरी प्रवास यामुळे ती आपल्याला हवीहवीशी वाटते. कोडियाकमध्ये मोठय़ा प्रमाणात सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत, त्यामुळेच ती स्पर्धकांच्या तुलनेत उजवी ठरते.

इंजिन

स्कोडा कोडियाकमध्ये २.० लिटर टबरेचाज्र्ड डिझेल देण्यात आले असून, ते ३,५००-४५०० आरपीएमला १४८ बीएचपी आणि ३४० एनएम टॉर्कसह १,७५०-३००० आरपीएम ऊर्जा निर्माण करते. कोडियाकमध्ये १,९६८ सीसीचे इंजिन देण्यात आले असून, डिक्यू ५०० सात स्पीड डीएसजी गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. कोडियाक १७ किमी प्रति लिटरचे मायलेज देते. स्कोडा कोडियाकमध्ये अनेक ड्राइव्हिंग मोड देण्यात आले असून, यामध्ये इको, नॉर्मल, स्पोर्ट, इंडिव्हिज्युअल आणि स्नो सहभागी आहे. कोडियाकला स्पोर्ट मोडमध्ये बदलल्यास स्टेअरिंग आणि गिअरबॉक्समध्ये बदल घडून येतो, आणि गाडी आपल्याला हवी तशी वेग घ्यायला सुरुवात करते. स्कोडा कोडियाक दिसायला दणकट, मजबूत गाडी असून, कोणत्याही अडथळ्याला अथवा प्रवासाला सहज पार करते.

आमचा अनुभव

स्कोडा कोडियाकची मुंबई-नाशिक महामार्गावर टेस्ट ड्राइव्ह घेण्यात आली. तिचा अनुभव अतिशय सुंदर होता. स्कोडाच्या अन्य गाडय़ांप्रमाणेच कोडियाकमध्ये बसल्यावर आरामदायक वाटते. स्टेअरिंग अतिशय मुलायम आहे. हाताच्या बोटावर सर्व काही उपलब्ध असल्याने गाडी चालवताना इतरत्र लक्ष वळवण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्या वेळी गाडी वेग घेते त्या वेळीही तिचे इंजिन आवाज करत नाही. वाढत्या वेगामध्येही ती आपली रस्त्यावरील पकड कायम ठेवते.

चंद्रकांत दडस

chandrakantdadas@gmail.com