स्मार्टवॉच किंवा फिटनेस गॅजेट यांचा वापर वाढत चालला आहे. त्याचबरोबर या उत्पादनांच्या बाजारात कंपन्यांची स्पर्धाही वाढू लागली आहे. अशा वेळी ग्राहकांना कमी किमतीत चांगली वैशिष्टय़े असलेले गॅजेट उपलब्ध झाले आहेत. ‘पेबल कॉर्डिओ’ हे असेच एक स्मार्टवॉच आहे.

सध्या फिटनेस अर्थात तंदुरुस्तीवर जास्त भर दिला जातो. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे जडणाऱ्या आजारांपासून सुटका करून घ्यायची असल्यास तब्येतीवर लक्ष देणे आवश्यकच असते. त्यात नियमित व्यायाम, संतुलित आहार, भरपूर चालणे आणि पुरेशी झोप या गोष्टी आल्याच. पूर्वी या गोष्टींचे मोजमाप हे अंदाजाने वेळेच्या गणिताने किंवा खाण्याच्या प्रमाणानुसार व्हायचे. परंतु आता स्मार्टवॉच किंवा फिटनेस गॅजेटनी या गोष्टींची अचूक आणि शास्त्रीय नोंद करता येईल, अशी सुविधा मिळवून दिली आहे. त्यामुळेच ‘फिटनेस’बाबत सजग असलेली मंडळी विशेषत: तरुणवर्ग या गॅजेटना अधिकाधिक पसंती देत आहे. साहजिकच त्यामुळे बाजारात अशा गॅजेटची मागणीही वाढू लागली आहे.

सध्या बाजारात अगदी हजार रुपयांपासून ३० हजारांपर्यंतच्या किंमत श्रेणीतील स्मार्टवॉच आणि फिटनेस गॅजेट उपलब्ध आहेत. आकार, रूप, वैशिष्टय़े आणि ब्रॅण्ड यानुसार त्यांच्या किमती ठरतात. परंतु  सर्वसामान्यांना महागडे स्मार्टवॉच म्हणजे उधळपट्टी वाटते. अशा मंडळींसाठी स्वस्त दरात चांगले फिटनेस गॅजेट उपलब्ध होत आहेत. ‘पेबल’ या ब्रॅण्डच्या ‘कार्डिओ’ फिटनेस ट्रॅकरचे नाव या वर्गात खात्रीने घेता येईल.

‘कार्डिओ’ हे पूर्णपणे फिटनेसशी संबंधित बाबींना वाहिलेले गॅजेट आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी ते अगदी एखाद्या घडय़ाळाच्या पट्टय़ासारखे दिसते. काळ्या रंगाचा पट्टा आणि त्यावर बसवण्यात आलेली छोटीशी स्क्रीन एवढेच या ‘ट्रॅकर’चे स्वरूप आहे. त्यामुळे तुम्हाला स्मार्टवॉचसारखा अनुभव घ्यायचा असेल तर हे गॅजेट तुमच्या पसंतीस पडणार नाही. ‘कार्डिओ’च्या पट्टय़ाच्या एका बाजूच्या खोबणीत त्याच्या चार्जिगची सुविधा देण्यात आली आहे. यूएसबी चार्जिग प्लगशी जोडून तुम्ही हे गॅजेट चार्जिग करू शकता. याचे चार्जिग होण्यास विलंब लागत असला तरी, एकदा चार्ज केल्यानंतर ‘कार्डिओ’ बराच काळ काम करतो.

कार्डिओमध्ये फिटनेसशी संबंधित सर्व वैशिष्टय़े आहेत. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी ‘हार्ट रेट’ मॉनिटर, पावलांची संख्या मोजण्यासाठी ‘स्टेप पेडोमीटर’, चालण्यातून किंवा हालचालींतून तुम्ही किती कॅलरी खर्च केली, त्याची नोंद करणारी यंत्रणा आणि झोपेबाबत सूचना देणारी यंत्रणा ही या गॅजेटची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. ही सर्व वैशिष्टय़े अतिशय व्यवस्थितपणे काम करतात. मात्र त्यासाठी तुम्हाला ‘योहो’ नावाचे अ‍ॅप तुमच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे लागते. हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर ब्लूटुथद्वारे तुम्ही ते जोडू शकता. एकदा या अ‍ॅपशी जोडल्यानंतर हे अ‍ॅप तुमच्या फिटनेसशी संबंधित सर्व नोंदी ठेवते.

फिटनेस ट्रॅकरच्या माध्यमातून तुम्हाला मोबाइलवरील नोटिफिकेशन पाहता येतात. यात प्रामुख्याने येणारे कॉल, मेसेज आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशांचा समावेश आहे. या गॅजेटचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, याच्या स्क्रीनवर फिंगर प्रिंट सेन्सर बसवण्यात आला असल्याने तुमच्या ट्रॅकरची सुरक्षितता अबाधित राहते.