डॉ. अविनाश सुपे

पूर्वी पंगतीमध्ये जेवताना यजमान मंडळी सांगत, ‘सावकाश होऊ द्या!’ लहान मुले खेळू घरी आली तरी आई त्यांना सांगत असे, ‘सावकाश जेवा!’ त्या वेळी जेवणात तर चार-पाचच पदार्थ असत. भात, वरण, भाजी, चपाती व तूप! निवांतपणे एक घास बत्तीस वेळा चावून खाल्ल्यामुळे त्यात लाळ मिसळून नक्कीच अन्नपचनास मदत होते. या ‘सावकाश होऊ द्या’चा अर्थ कळेपर्यंत आपल्या आयुष्यात इतके बदल झाले की आज आपण फास्ट फूडच्या जमान्यात आलो. रस्त्यावर मिळणारा वडापाव/ पाणीपुरी किंवा तीस मिनिटांत येणारा पिझ्झा आपल्या आयुष्यात आले. हे अन्न आपण चालता चालता किंवा काम करत असताना खायला लागलो. कदाचित काळाच्या गरजेनुसार ते ठीक असेल पण शरीलाला तर नक्कीच आरोग्यदायी नाही.

आजच्या जलद जीवनात आपण रोज नवनवीन आकांक्षा पूर्ण करण्यास झटत आसतो. अशा वेळी आपल्याला जेवणसाठी वेळ नसतो. आपल्या धकाधकीच्या व सुपर फास्ट आयुष्यात आपण केवळ जेवणासाठी किती वेळ बाजूला ठेवतो, याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा. सकाळी निघण्यापूर्वी घरातली कामे उरकणे, लोकल पकडणे, लवकर कार्यालय गाठणे, कार्यालयातील कामाच्या कालमर्यादा सांभाळणे या सर्वामध्ये नाश्त्यासाठी २० ते २५ मिनिटे वेळ कुठून आणायचा? मग घाईघाईत काही तरी तोंडात कोंबून आपण निघतो किंवा नाष्टय़ाला वेळ नाही म्हणून तसेच निघतो आणि रस्त्यात गाडीवर जे मिळेल ते (रुचकर, तेलकट परंतु शरीराला अपायकारक) खात जातो, म्हणजे आरोग्याची ऐशीतशीच! याऐवजी थोडा वेळ काढून व्यवस्थित बसून सावकाश खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

काही वर्षांपूर्वी जेवण सुरू करण्यापूर्वी ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे ..’ हा श्लोक म्हणला जात असे. त्यात अन्नग्रहण करणे हे एक यज्ञकर्मासारखे पवित्र असल्याचे सांगितले आहे. मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण हे सारे विसरून गेलो आहोत. थोडासा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक किंवा इतर समाजमाध्यमांवरील वेळ कमी केला तर वेळेचे गणित जमणे सहज शक्य आहे. जेवायला बसताना शांतपणे मांडी घासून बसावे. मनात चिडचिड, कुणाबद्दलचा राग, असमाधान नसावे. सध्या आपल्याकडे अशी पद्धत अली आहे की, हातात जेवायचे ताट घेऊन टीव्हीच्या समोर बसायचे आणि सासू-सुनांच्या मालिकांमध्ये गुंगून जायचे. काय जेवतो आहे, कसे जेवतो आहे याचे भान नाही. प्रवासात सर्व जण मोबाइलला चिकटून असतात. लहान मुलांनाही मोबाइल व टीव्हीची सवय असते. या सगळ्याला फाटा द्यायला हवा. जेवताना पूर्ण लक्ष जेवणावरच केंद्रित व्हावे. हातातला फोन बंद ठेवावा.

जेवणाचा आनंद घेत जेवावे. त्याची चव चाखावी. स्वाद अनुभवावे. लहानच घास असावा आणि प्रत्येक घास व्यवस्थित चावून चावून खावा. जेणेकरून त्यात तोंडातील लाळ मिसळून पचनाला सुरुवात होईल. लाळेतील आद्र्रतेमुळे घास गिळणे हे सुलभ होते. तोंडातील एक घास संपल्याशिवाय पुढील अन्नाचा घास घेऊ नये.

जेवणाच्या आधी वा नंतर भरपूर पाणी पिऊ नये, कारण त्यामुळे उदराग्नी मंद होतो. दोन घासांमध्ये थोडे थोडे पाणी प्यावे. जेवणानंतर थोडय़ा वेळाने आवश्यक तेवढे पाणी प्यावे. पाण्यामुळे त्वचेची आद्र्रता राखली जाते. शरीरातील द्रव्ये संतुलनात ठेवली जातात. किडनी व आतडी जास्त चांगले काम करू लागतात. सावकाश जेवल्यामुळे पाणी जास्त प्रमाणात प्यायले जाते, असे संशोधन  सांगते.

कसे जेवावे?

*      टीव्ही, मोबाइल बंद करूनच जेवायला बसावे.

*      जेवणात भरपूर रफेज (चोथा) असलेले अन्न (भाकरी, हातसडीचे तांदूळ, कोंडा न काढून केलेली पोळी, पालेभाज्या, फळे) यांचा समावेश असावा. हे अन्न आरोग्यदायी तर असतेच पण चावून चावून खाण्यास वेळी लागतो.

*      कुटुंबातील इतरांशी / मित्र-मत्रिणीबरोबर गप्पा मारत किंवा नर्मविनोद करत जेवणाचा आनंद घ्यावा.

*      सवय करायची असल्यास हळू जेवणाऱ्या व्यक्तीबरोबर जेवायला बसावे. थांबून थांबून खावे.

*      जेवणासाठी २५ ते ३० मिनिटांचा वेळ राखून ठेवावा.

*      दुपारच्या जेवणानंतर थोडी विश्रांती घ्यावी तर रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावी.