प्रतिनिधी : एप्रिल-मे महिन्यात सुट्टय़ांच्या काळात परदेश भटकंतीसाठी दक्षिण अफ्रिका हा उत्तम पर्याय होऊ शकतो. अफ्रिकेतील इतर जंगलांच्या तुलनेत मर्यादित जंगलं येथे असली तरी त्यांचे स्वत:चे वैशिष्टय़ आहे. तर त्याचबरोबर सोन्याची खाण, केप ऑफ गुड होप, प्रचंड मोठी अशी टेबललॅण्ड आणि ४५० किमीचा गार्डन रुट अशी सातआठ दिवसांची उत्तम भटकंती होऊ शकते. इतर अफ्रिकन देशांच्या तुलनेत हा देश संपन्न तर आहेच, पण यातील शहरांची रचना बरीचशी युरोपशी साधर्म्य दर्शविणारी आहे.

दक्षिण अफ्रिकेला संपन्न करण्यात महत्त्वाचा वाटा हा तेथील सोन्यांच्या खाणींचा आहे. अशीच एक सोन्याची खाण आपल्याला जोहान्सबर्ग येथे पाहता येते. जमिनीखाली जाऊन खाण पाहण्याची संधी येथे मिळते. जोहान्सबर्ग येथील महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांचे स्मारक आवर्जून पाहावे असे आहे. शहराजवळचे क्रूगर अभयारण्य तसे इतर अफ्रिकन अभयारण्याच्या तुलनेत छोटे आहे. पण केपटाऊन येथील प्रचंड मोठय़ा विस्ताराची टेबललॅण्ड

हीदेखील राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर केले आहे. तिथून अफ्रिकेचे टोक म्हणजे केप ऑफ गुड होपला जाता येते. येथे सील्स, पेंग्विन्सदेखील पाहता येतात. केपटाऊन ते न्यान्सा येथे जाण्यासाठी

तब्बल ४५० किलोमीटर लांबीचा रस्ता गार्डन रुट म्हणून ओळखला जातो. संपूर्ण रस्त्यावर नैसर्गिक उद्यान आहे. न्यान्सा येथे नैसर्गिक लाइमस्टोन गुहा आहे. गुहेजवळच वाइल्डलाइफ रान्चमध्ये शहामृगांचा अधिवास असल्याने तेथे शहामृगांच्या आयुष्यातील सर्व टप्पे पाहता येतात.