वैभव भाकरे

जगभरात इलेक्ट्रिक गाडय़ा वापरणाऱ्यांची संख्या वाढली असून भारतातही या गाडय़ांना पसंती मिळत आहे. भारतात इलेक्ट्रिक गाडय़ांना जम बसवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागला. दरम्यान हायब्रीड गाडय़ांनी बाजारात प्रवेश केला आणि त्या काही प्रमाणात यशस्वीदेखील झाल्या. सध्या अनेक कार कंपन्या भारतात इलेक्ट्रिक वाहने दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या इतर देशांच्या तुलनेने कमी आहे. कार उत्पादक कंपन्या भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाडय़ा दाखल करण्याबाबत सांशक होत्या. इलेक्ट्रिक गाडय़ांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव हे त्यामागील कारणांपैकी एक कारण आहे, कार चार्ज करण्यासाठी आवश्यक असणारी डॉकेट्स सर्वत्र उपलब्ध नसल्यामुळे इलेक्ट्रॉनिक गाडय़ांच्या विक्रीला पर्यायाने उत्पादनाला मर्यादा येतात. चार्जिग डॉकेट्स म्हणजे असे ठिकाण जेथून इलेक्ट्रॉनिक वाहन चार्ज करता येते. अशा प्रकारे चार्जिगची सुविधा नसल्याने इलेक्ट्रिक गाडी वापरणे अव्यावहारिक होऊन जाते. ही समस्या जगभरातील इलेक्ट्रिक कार उत्पदकांना भेडसावत आहे. म्हणून यातून उपाय आला तो हायब्रीड गाडय़ांचा. हायब्रीड कार दोन प्रकारच्या इंधनांचा वापर करते. हे दोन प्रकार म्हणजे पेट्रोल आणि इलेक्ट्रिक किंवा डिझेल आणि इलेक्ट्रिक, किंवा पेट्रोल सीएनजी, डिझेल आणि बायो डिझेल. अशा प्रकारे दोन प्रकारचे इंधन वापरणारी गाडी म्हणजे हायब्रीड. परंतु गाडय़ांमध्ये पेट्रोल किंवा डिझेलसोबत इलेक्ट्रिकचा पर्याय असतो तेव्हाच त्याला हायब्रीड म्हटले जाते. म्हणूनच पेट्रोल आणि इलेक्ट्रिक किंवा डिझेल आणि इलेक्ट्रिक गाडय़ांचा हायब्रीड म्हणून उल्लेख केला जातो. हायब्रीड गाडय़ा या सुरू इलेक्ट्रिक इंजिनवरच होतात आणि प्रवासदेखील इलेक्ट्रिक इंजिनवर करतात. मात्र गाडीला जेव्हा जास्त ऊर्जेची गरज लागते तेव्हा ही गाडी पेट्रोल इंजिनमधून ताकद घेते. होंडा अकार्ड, टोयोटा कॅमेरी या भारतातील लोकप्रिय हायब्रीड गाडय़ांपैकी एक आहे. बाजारात मायक्रो हायब्रीड नावाचा प्रकारदेखील प्रचलित आहे. यामध्ये इंधनाची बचत होण्यासाठी गाडी थांबवल्यावर गाडीचे इंजिन बंद होऊन जाते; परंतु यात इलेक्ट्रिक मोटरवर गाडी चालत नाही. याला ‘स्टार्ट अ‍ॅण्ड स्टॉप टेकनॉलॉजी’देखील म्हटले जाते. त्यानंतर अजून एक हायब्रीडचा प्रकार म्हणजे प्लग इन हायब्रीड यात गाडी चालताना तुमची बॅटरी चार्ज होतेच परंतु या गाडीला तुम्ही बाहेरील विजेच्या स्रोतांचा वापर करून चार्ज करू शकता. गाडी इलेक्ट्रिक मोटरवर चालते आणि आवश्यक असल्यास पेट्रोल किंवा डिझेल इंजिनमधून ताकद घेते. अशा प्रकारच्या गाडय़ा शहरी भागात किंवा ट्रॅफिक जास्त असणाऱ्या भागात चांगल्या प्रकारे  काम करू शकतात.

भारतात इलेक्ट्रिक गाडय़ांच्या बाजारासाठी चांगले दिवस येणार असल्याचे दिसत आहे. आता बऱ्याच मोठय़ा कंपन्यांनी येत्या वर्षांमध्ये इलेक्ट्रिक गाडय़ा बाजारात असणार असल्याचे जाहीर केले आहे.

निस्सानचा नोट कन्सेप्ट हा लोकांना परिचयाचा आहेच. त्याचप्रमाणे निस्सानची लीफ ही अमेरिकेतील सार्वधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. पण ई पॉवर ही संकल्पना नवीन आहे. निसान नोट ई पॉवर ही एक हायब्रीड कार आहे. यात १२००सीसीची मोटार आहे. गाडीची मुख्य मोटार ही इलेट्रॉनिक मोटार आहे. एका चार्जिगमध्ये हि गाडी ४० किमीपर्यंत जाऊ  शकते असा कंपनीचा दावा आहे. बॅटरी संपल्यावर १००० सीसीची पेट्रोल मोटार इलेक्ट्रॉनिक मोटरला चालताना चार्ज करेल. या गाडीची किंमत २० लाख रुपये असणार आहे.

भारतात इलेक्ट्रिक गाडय़ांच्या उत्पादनासाठी प्रयत्न होताना दिसत असून टाटा निओ ही इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. दिसायला टाटा नॅनोप्रमाणेच असणारी निओ शहरात प्रवास करण्याच्या उद्देशाने तयार केली आहे. त्यानंतर टाटा टीगोरचे इलेक्ट्रिक संस्करण बाजारात दाखल होणार आहे. ह्युंदाईची आयोनिक ही तीन प्रकारांमध्ये उपलब्ध होणार आहे. एक इलेक्ट्रिक दुसरी, हायब्रीड आणि तिसरी प्लग इन हायब्रीड. अशा पर्यायांमध्ये येणाऱ्या या गाडीची विक्री भारतात पुढील वर्षीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकी टोयोटासह इलेक्ट्रिक गाडी दाखल करणार आहे. ती म्हणजे भारतीय ग्राहकांची लाडकी वॅगन आर. नाव वॅगन आर जरी असले तरी ही भारतात मिळणारी वॅगन आर नसून जपानमध्ये विकली जाणारी वॅगन आर असणार  आहे. सध्या या गाडीच्या भारतभर चाचण्या सुरू आहेत. ही गाडी २०२० मध्ये बाजारात दाखल केली जाणार असल्याची माहिती मारुती सुझुकीकडून देण्यात आली आहे. गाडीत १४ वॉट बॅटरी असण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत भारत मागे असण्याला मुख्य कारण म्हणजे या गाडय़ांच्या किमती. हायब्रीड किंवा इलेक्ट्रिक गाडय़ांच्या किमती सामान्य गाडय़ांच्या तुलनेने जास्त असतात. त्यामुळे सामान्य ग्राहक इच्छा असूनही या वाहनांकडे कमीच वळतो. म्हणूनच जगभरात मोठय़ा प्रमाणात विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक गाडय़ा भारतीय बाजारात दाखल करण्यास कार कंपन्या सांशक असतात. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतातील इलेक्ट्रिक बाजाराचे भवितव्य हे सरकारी धोरणांवर अवलंबून आहे. सरकारने आता या इलेक्ट्रिक वाहन तयार करणाऱ्या कंपन्यांना अधिक सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. म्हणूनच येत्या वर्षांमध्ये भारतीय बाजारानुरूप इलेक्ट्रिक गाडय़ा दाखल करण्याकडे कार कंपन्यांचा कल राहणार आहे.

ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक

कोणाचे एसयूव्ही मॉडेल भारतात दखल होणार असून इलेक्ट्रिक पॉवर मॉडेलदेखील पुढील वर्षी येणार आहे. या गाडीची प्रवास क्षमता ३९० किमी असणार असून हे गाडीचे मुख्य वैशिष्टय़ मानले जाते.

* किमत : २२ लाख

निस्सान लीफ

लीफचे सध्याचे मॉडेल दोन बॅटरीच्या ताकदीने २२८ किमीचा प्रवास करते. नवीन मॉडेल यामध्ये या बॅटरीची क्षमता वाढवली जाण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारासाठी या गाडीत बदल केले जाण्याची शक्यता  आहे.

* किंमत : २० लाख

टाटा टिगोर

टाटा टिगोर ई व्ही ही २१६ ए एच १६ व्ही बॅटरी आणि ३ फेज एसी इंडक्शनसह  येणार असून ३९.९५ हॉर्स पॉवरची क्षमता असणार आहे. ही गाडी १३० किमीपर्यंत प्रवास करू शकणार असून उच्चतम वेग हा १०० किमी एवढा असणार असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

* किंमत : १०-११ लाख

vaibhavbhakare1689@gmail.com