मानवाने चंद्रावर पन्नास वर्षांपूर्वी पहिले पाऊल ठेवले. मानवी इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांमध्ये या यशाचाही समावेश होतो, तर अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने तर ही अत्यंत महत्त्वाची घटना. अनेक देशांनी यापूर्वी चांद्रमोहिमा केल्या आहेत. या मोहिमांमध्ये चंद्राच्या वातावरणाची माहिती मिळवण्यासाठी विविध उपकरणांचा वापर केला जातो. यात समावेश होतो ‘रोव्हर’चा. चंद्रावर धावणारी ही वाहने चांद्रमोहिमांमध्ये पूर्वीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

लूनर रोव्हर किंवा मून रोव्हर हे अंतराळ संशोधनाच्या मोहिमांसाठी वापरण्यात येणारे एक वाहन आहे. या रोव्हरची रचना ही चंद्राच्या वातावरणात प्रवास करण्यासाठी केली असते. या रोव्हरचेदेखील काही प्रकार आहेत. काही रोव्हर हे स्पेसफ्लाइटमध्ये बसलेल्या अंतराळवीरांकडून नियंत्रित केले जाते, तर काही रोव्हर हे स्वयंचलित असतात.

लूनोखोड १

सोव्हिएत संघाकडून चंद्रावर पाठवण्यात आलेले हे पहिले रोव्हर होते. लूनोखोड मोहिमेअंतर्गत हे रोव्हर चंद्रावर उतरविण्यात आले होते. लूना १७ हे अंतराळ यान या रोव्हरला १९७० मध्ये चंद्रावर घेऊन गेले होते. या रोव्हरचा आकार हा एका टबासारखा होता. याला आठ चाके होती. या रोव्हरची लांबी ही २.३ मीटर इतकी होती. पृथ्वीव्यतिरिक्त इतर कोणत्याही खगोलीय पृष्ठभागावर चालणारे हे पहिले रिमोट नियंत्रित वाहन होते. या रोव्हरने चंद्रावर ३२१ दिवस काम केले आणि १०.५४ किमीचा प्रवास केला.  चंद्रावरची माती तपासण्यासाठी इतर उपकरणेदेखील होती. या रोव्हरला सोलर बॅटरीतून ऊर्जा मिळत असे लूनर डेदरम्यान ही बॅटरी चार्ज केली जात असे.

लूनर रोव्हिंग वेहिकल (एलआरव्ही)

लूनर रोव्हिंग वेहिकल हे बॅटरीवर चालणारे चारचाकी वाहन होते. १९७१ आणि १९७२ च्या दरम्यान अमेरिकेच्या (१५, १६ आणि १७) या अपोलो मोहिमांमध्ये या रोव्हरचा वापर करण्यात आला होता.  दोन अंतराळवीर प्रवास करू शकतील एवढी या रोव्हरची क्षमता होती. चंद्रावर मानवाला घेऊन प्रवास करणारे हे पहिले वाहन आहे. खगोल अभ्यासाच्या दृष्टीने आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने या वाहनाने अनेक पायंडे घातले. अंतराळवीरांच्या कमीत कमी साहाय्याने हे रोव्हर फोल्ड करून उघडता येऊ शकत होते. या रोव्हरची लांबी १० फूट २ इंच होती आणि रुंदी सहा फूट होती. या गाडीचा व्हीलबेस साडेसात फुटांचा होता. प्रत्येक चाकाला पाऊण हॉर्सपावरच्या मोटरमधून ऊर्जा मिळत होती. या गाडीचा सर्वाधिक वेग १३ किमी प्रतितास एवढा होता.

प्रज्ञान

भारताच्या चांद्रयान २ या मोहिमेअंतर्गत प्रज्ञान रोवर चंद्रावर उतरविण्यात येणार आहे. या रोव्हरचे वजन २७ किलो असून ते सौरऊर्जेवर चालणार आहे. रोव्हरला सहा चाके असून प्रत्येक सेकंदाला १ सेमी एवढा वेग त्याचा असणार आहे. हे रोव्हर तेथील रासायनिक विश्लेषणाची माहिती पाठवणार आहे. या रोव्हरवर ३डी कॅमेरा बसवला आहे. रोव्हरच्या सहा चाकांच्या स्वतंत्रपणे ऊर्जा प्रदान करणाऱ्या मोटर आहेत. हे रोव्हर चंद्रावर १४ दिवस कार्यरत राहण्यासाठी बनवले असून सौरऊर्जेच्या क्षमतेमुळे हे त्याहून अधिक काळ कार्यरत राहण्याची शक्यता आहे.

लूनोखोड २

लूनोखोड मोहिमेअंतर्गत चंद्रावर उतरवण्यात आलेले हे दुसरे रोव्हर होते. १५ जानेवारी १९७३ मध्ये हे रोव्हर चंद्रावर उतरले. चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र पाठवणे हे या रोव्हरचे मुख्य काम होते. या रोव्हरची उंची ४ फूट ५ इंच होती, तर वजन ८४० किलो होते. रोव्हरची लांबी पाच फूट सात इंच एवढी होती. या रोव्हरला आठ चाके होती आणि प्रत्येक चाकासाठी स्वतंत्र सस्पेन्शन, विद्युत मोटर आणि ब्रेक यंत्रणा होती. या गाडीला सोलर बॅटरीद्वारे ऊर्जा मिळत होती.

यूटू

यूटू हे रोबोटिक रोव्हर होते. चीनच्या चांग ई-३ या मोहिमेअंतर्गत १४ डिसेंबर २०१३ मध्ये हे चंद्रावर उतरले. चीनमधील पौराणिक कथांमध्ये चंद्र देवतेला चांग ई म्हटले जाते. या रोवरला काय नाव द्यावे यासाठी ऑनलाइन पोल घेण्यात आला होता. यात मिळालेल्या निकालांनुसार यूटू म्हणजे चंद्र ससा हे नाव ठरविण्यात आले. युटू हे चीनमधील पौराणिक कथांमधील चंद्र देवतेच्या पाळीव सशाचे नाव आहे. सोव्हिएत संघाच्या लूनोखोड २ नंतरचे चंद्रावर काम करणारे हे रोव्हर होते. केवळ तीन महिने कार्य करण्याची अपेक्षा असताना हे रोव्हर तब्बल ३१ महिने चंद्रावर कार्यरत होते.