29 February 2020

News Flash

व्हिंटेज वॉर : फोक्सवॅगन बीटल : मूर्ती लहान..

१९३०च्या दशकात सामान्यांची मोटार निर्माण करण्याच्या प्रयत्नातून बीटलचा जन्म झाला.

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे

नेहमी मोठी स्वप्ने पाहा. भव्यदिव्य स्वप्ने, अटकेपार झेंडे रोवण्याचा निर्धारच तुम्हाला यश देतात आणि इतिहास तुमची नोंद घेतो. मात्र या संदेशाच्या उलट ‘थिंक स्माल’ असा वेगळाच मूलमंत्र देणाऱ्या बीटलने मोटार विश्वच बदलून दिले. आकाराने लहान आणि खिशाला परवडणारी असलेली ही बीटल दिसायला एखाद्या किटकाप्रमाणे होती. बीटलने जगभरातील तिच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. इंग्रजी भाषिक देशांमध्ये या गाडीला ‘बग’ या लाडाच्या नावाने संबोधले जाते.

१९३०च्या दशकात सामान्यांची मोटार निर्माण करण्याच्या प्रयत्नातून बीटलचा जन्म झाला. फर्डिनांड पोर्शे यांनी ही गाडी डिझाईन केली होती. गाडीचे डिझाईन हे कर्वाकार होते. खिशाला परवडणारी आणि कामाला विश्वासार्ह असणारी बीटल तुफान लोकप्रिय झाली. दोन कोटी गाडय़ांच्या विक्रीचा विक्रम करणारी बीटल ही पहिली गाडी होती.

१९६०च्या दशकात रस्ता व्यापून टाकणाऱ्या मोठमोठय़ा गाडय़ांची बाजारात मक्तेदारी असताना ही गाडी ‘स्मॉल इज ब्युटिफुल’ हे बिरुद लावून मिरवत होती. १९७० च्या उत्तरार्धात जर्मनीने बीटलचे उत्पादन थांबवले; परंतु १९९८ मध्ये फोक्सवॅगनने नवी बीटल बाजारात सादर केली. या बीटलचे डिझाईन मूळ बीटल म्हणजेच ‘टाइप १’वर आधारित होते. याचे अजून एक संस्करण २०१२ मध्ये बाजारात दाखल झाले; परंतु विक्रीचा विक्रम करणारी ही गाडी २१व्या शतकातील ग्राहकांवर भुरळ पाडण्यास अपयशी ठरत होती. गाडीच्या विक्रीत सातत्याने घट होत गेली. २०१२ मध्ये ४३,००० गाडय़ांची विक्री होती तो आकडा २०१३ मध्ये १५,००० वर आला.

सामान्यांना परवडणारी गाडी तयार करण्याचे काम जर्मनीचा हुकूमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलर याने फर्डिनांड पोर्शे यांच्यावर सोपवले होते. या गाडीला टाइप १ म्हणून ओळखले जाऊ  लागले. या गाडीत मागे बसवलेले एअर कूल्ड इंजिन होते. या गाडीचे डिझाईनदेखील पोर्शेच्या गाडीवर (टाइप-१२) आणि झेकोस्लाव्हाकियाची मोटार कंपनी ‘तात्रा’च्या गाडय़ांवर आधारित होते. १९३८ मे महिन्यात हिटलरने वुल्फसबर्ग जर्मनीमध्ये फोक्सवॅगन कंपनीचा पाया रोवला. यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सामन्यांसाठीच्या गाडय़ांचे उत्पादन थांबवण्यात आले; परंतु लष्करी अधिकाऱ्यांसाठी काही गाडय़ांचे उत्पादन सुरू ठेवण्यात आले. या कंपनीतून निघालेली पहिली कन्वर्टेबल हिटलरला देण्यात आली. दुसरे महायुद्ध संपल्यावर १९४६ मध्ये ही कंपनी ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली आली. १९४६ या सालात दहा हजारांहून अधिक गाडय़ांचे उत्पादन करण्यात आले आणि पुढील दहा वर्षांत दहा लाख गाडय़ांची विक्री करण्यात आली.

१९५९ मध्ये न्यूयॉर्कमधील एका जाहिरात कंपनी ‘डीडीडी वर्ल्डवाइड’ या कंपनीला बीटलच्या जाहिरातीचे काम देण्यात आले. या छोटय़ा गाडीची जाहिरात करण्यासाठी त्यांनी वेगळीच शक्कल लावली. गाडीचा लहान आकार ही उणीव नसून महत्त्वाचा पैलू असल्याचे त्यांनी लोकांना पटवून दिले आणि ‘थिंक स्माल’ ही जाहिरात मोहीम राबवली. चाळीस वर्षांनंतर ‘अ‍ॅड एज’ने या जाहिरातीला २० व्या शतकातील सर्वोत्तम जाहिरात म्हणून गौरवले. १९६८ मध्ये टाइप-१ला अधिकृतरीत्या बीटल हे नाव देण्यात आले. याच वर्षी डिस्नेने ‘हर्बी द लव बग’ हा सिनेमा प्रदर्शित केला. यात १९६३च्या एन्थ्रोपोमोर्फिक (मानवी संवेदना असलेल्या) बीटल गाडीची कहाणी होती. या चित्रपटामुळे या गाडीच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली. १९७१ मध्ये फोक्सवॅगनने ‘सुपर बीटल’ नावाचा बीटलचा महागडा पर्याय बाजारात दाखल केला. गाडीला पुढच्या चाकांना नवे सस्पेन्शन दिले होते. गाडीमध्ये डीकीची क्षमता किंवा बूटस्पेसही वाढवण्यात आली. फेब्रुवारी १७, १९७२ रोजी बीटलने फोर्डच्या ‘मॉडल टी’ने केलेला सर्वाधिक गाडय़ांच्या उत्पादन करण्याचा विक्रम मोडला आणि चाळीस वर्षांनंतर बीटल ही जगातील सर्वाधिक विकली जाणारी गाडी बनली. २०१३ पासून बीटलच्या विक्रीत सातत्याने घट होत होती. त्यानंतर फोक्सवॅगनने बीटलच्या प्रवासाची सांगता करणार असल्याचे जाहीर केले. मेक्सिकोतील प्युब्ला येथे शेवटची बीटल कंपनीतून बाहेर पडली. या पिटुकल्या गाडीचा प्रवास ८१ वर्षांनंतर संपला आहे. या शेवटच्या गाडीची विक्री होणार नसून मेक्सिकोतील स्थानिक संग्रहालयात ती प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहे. मात्र, प्रवाहाच्या विरुद्ध विचार देणाऱ्या या लाडक्या ‘बग’चा प्रवास जगरातील लोकांच्या मनात सुरूच राहणार आहे.

First Published on July 20, 2019 12:13 am

Web Title: vintage war volkswagen beetle abn 97
Next Stories
1 धबाबा तोय आदळे!
2 जालन्यातील गुळपापडी
3 टेस्टी टिफिन : रताळ्याचे पॅनकेक
X
Just Now!
X