पावसाचे पूर्वानुमान कसे दिले जाते?

ज्या ठिकाणचे पूर्वानुमान द्यायचे त्याठिकाणी गेल्या २४ ते ४८ तासांत किती पाऊस पडला हे माहिती असायला हवे. वाऱ्यांची स्थिती दर्शविणाऱ्या हवामानाच्या नकाशांची गरज असते. उपग्रह आणि रडार यांच्या माध्यमातून कमी दाबाचे क्षेत्र समजते. रडारमुळे ते दोन तीन-तास आधी कळते, उपग्रहामुळे ते काही तास आधी. पण खूप आधी जर त्याची सूचना हवी असेल तर ‘सिनॉप्टिक चार्ट’ महत्त्वाचे असतात. हवेचा दाब, तापमान, आद्र्रता, गती, दिशा अशी हवामानाची सर्व निरीक्षणे दर तीन तासांनी घेतली जातात. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सिनॉप्टिक चार्टवर हे सर्व मांडले जाते. या नकाशांच्या विश्लेषणातून दोन दिवस आधी आपल्याला हवामानाचा अंदाज येतो. पण पंधरा दिवसाचा अंदाज हवा असेल तर ‘न्यूमरिकल वेदर प्रेडिक्शन मॉडेल’ची मदत घ्यावी लागते. आज हवामानाची जी परिस्थिती आहे, त्यावर पुढील पंधरा दिवसांचे गणित मांडता येते. हे गणित त्या त्या दिवसाच्या हवामानाच्या परिस्थितीनुसार बदलते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परिस्थिती बदलली तर पुढील पंधरा दिवसाचे गणितदेखील बदलते. हे पूर्णत: गणितावर अवलंबून आहे. आणि यामध्ये मानवी हस्तक्षेप नसतो. संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित असते. अशा माध्यमातून एक महिना, १५ दिवस, एक आठवडा अशा पद्धतीने पूर्वानुमान वर्तवले जाते.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे यासाठी सुपर कॉम्प्युटर प्रणाली आहे. देशात गाझियाबाद आणि पुणे येथे ही यंत्रणा आहे. त्याचा वापर देशभरातील अनेक यंत्रणा करतात. दर पंधरा मिनिटे, तीन तास, सहा तास, बारा तास असा प्रचंड माहितीचा ओघ या सुपर कॉम्प्युटरकडे येत असतो. त्याचे विश्लेषण करून हवामानाचे अनेक नकाशे तयार केले जातात.

कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे काय?

बंगालचा उपसागर हे मान्सूनचे पंपिंग स्टेशन म्हणता येईल. अरबी समुद्रावरून येणारा पाऊस हा कोकण, गुजरात, केरळ या भागासाठी महत्त्वाचा असतो. महाराष्ट्राच्या आतील भागात पाऊस हवा असेल तर बंगालच्या उपसागरातून येणारा पाऊस महत्त्वाचा आहे. मान्सूनच्या दोन शाखा आहेत. अरबी समुद्रावरून येणारी शाखा पश्चिम किनारपट्टीवर थडकते. दुसरी दक्षिणेकडे खालून जात बंगालच्या उपसागरावर जाते. तिला ‘पूर्वय्या’ म्हणतात. बिहार वगैरे सर्व भागात जो पाऊस येतो तो पूर्वय्या. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. ते तीव्र होत वायव्येकडे सरकू लागते तेव्हा मध्य प्रदेश, रायपूर विदर्भात पाऊस पडतो. हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रातील वाऱ्यांना गती देतो. त्यामुळे मग किनारपट्टीवर, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाऊस दिसतो. सर्वसाधारणपणे मान्सून चांगला हवा असेल तर कमी दाबाचे पट्टे तयार व्हायला हवेत. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरातही हे टप्प्याटप्प्याने होणे गरजेचे आहे.

डॉप्लर रडार काय करते?

ढग हा स्थिर नसतो. त्याच्या आतमध्ये खूप विलक्षण घडामोडी होत असतात. रडारच्या सूक्ष्म तरंग लहरी (मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीस) ढगात जातात आणि पुन्हा रडारकडे परावर्तित होतात. त्याद्वारे ढगाचा वेग, पाण्याचे प्रमाण, दिशा या सर्वाचे विश्लेषण केले जाते. डॉप्लर रडारने जास्तीतजास्त चार तासांचे पूर्वानुमान देता येते. तीव्र किंवा मुसळधार पाऊस होणार असेल तर रडारचा उपयोग होतो. डॉप्लर रडारच्या पूर्वानुमानाचा २४ किंवा ४८ तासाशी संबंध नाही. तो केवळ चार तासांचे पूर्वानुमान म्हणजे ‘नाऊकास्ट’साठी आहे. शहरांमध्ये येणाऱ्या पुरासाठी डॉप्लर रडारचा खूप उपयोग होतो.

पावसामध्ये काही बदल झाले आहेत का?

गेल्या शंभर वर्षांतील नोंदी आपल्याकडे आहेत, त्यात फारसे बदल नाही, मात्र काही वर्षांत झालेले बदल प्रकर्षांने जाणवणारे आहेत. पावसाचे वितरण बदलले आहे. मुंबईत यावर्षी पावसाने ४५ दिवसांतच सरासरी गाठली. जुलै आणि ऑगस्ट या काळात मंद आणि मध्यम स्वरूपाचा लागून राहिलेला पाऊस न दिसता बऱ्याचदा अतिवृष्टी होऊन ही सरासरी गाठली जाते. हवामानाच्या तीव्र बदलाचे दिवस गेल्या दोनतीन वर्षांत जाणवत आहेत. यासाठी विशेष उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी वेगळी यंत्रणा उभी करावी लागेल. येणाऱ्या काळात पाऊस वाढेल, पण पावसाळ्याचे दिवस कमी होतील. त्यामुळे शहरातील पुराचे प्रमाण वाढणार आहे. भविष्यात या आपत्तीला तोंड देण्यासाठी आपण हवामान विभागाच्या मदतीने तयार राहणे आवश्यक आहे.

पावसाची सरासरी म्हणजे काय?

तीस वर्षांतील पावसाच्या आकडेवारीवर सरासरी काढली जाते. १९८१ ते २०१० या काळातील पावसाच्या नोंदीचा संदर्भ यासाठी सध्या घेतला जातो. प्रत्येक दिवसाची, आठवडय़ाची, महिन्याची आणि मोसमाची सरासरीच्या नोंदी हवामान विभागाकडे आहेत.

विमानसेवांना पुरवली जाणारी  माहिती काय असते?

हवामान विभागाची ही स्वतंत्र शाखा असून दर अर्ध्या तासाने पूर्वानुमान दिले जाते. एखादे विमान मुंबईतून लंडनला जाणार असेल, तर उड्डाण केल्यापासून ते लंडनला पोहचेपर्यंत हवामानाची संपूर्ण परिस्थिती त्यामध्ये दिलेली असते. उंच ढगामुळे अडथळा (टर्बुलन्स) होणार का, ज्वालामुखीची राख आहे का, वाऱ्याची दिशा, वेग, दाब असे त्या संपूर्ण भागाचे पूर्वानुमान त्यात असते. ही माहिती इतर देशांच्या यंत्रणांशी जोडलेली असते.