राजेंद्र श्रीकृष्ण भट

सर्व परदेशी वनस्पतींची ट्रेमध्ये रोपे तयार करून नंतर त्यांची पुर्नलागवड केली जाते. अल्प कालावधीत वाढणारी सर्व प्रकारची पाने कच्ची खाल्ली जातात. त्यांची गणना सॅलड प्रकारात होते. लेटय़ुसचे साधारण २५-३० प्रकार उपलब्ध आहेत. या सर्व प्रकारच्या लेटय़ुससाठी वातावरणात थोडाफार गारवा असणे आवश्यक आहे. त्यांची पुनर्लागवड करावी लागते. त्यांची वाढ साधारण ४५ ते ५० दिवसांत पूर्ण होते. त्यानंतर त्यांना फुले येण्यासाठी प्रक्रिया सुरू होते. या काळात पाने तोडल्यास त्यातून पांढरा चिक येतो आणि पाने कडवट होतात. त्यामुळे काढणी ४५ दिवसांतच करावी लागते.

पानांची वाढ आवश्यक असल्यामुळे नत्र जास्त प्रामाणात द्यावे लागते. जिवामृत अथवा १० लिटर पाण्यात पाव लिटर गोमूत्र घालून फवारणी करावी. तोडणी करताना गोमूत्राचा गंध येऊ नये म्हणून पहिले दहा आणि शेवटचे १५ दिवस फवारणी करू नये. गोमूत्राने पानांची वाढ तर होतेच शिवाय कीड आणि रोगही दूर राहतात. एखादी फवारणी सप्तधान्यांकुरांची केल्यास वाढ छान होते आणि रोपे कणखर होतात. सर्व प्रकारची कडधान्ये, गहू, अळीव प्रत्येकी एक चमचा घेऊन भिजवावे. मोड आल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यावे. गाळून रस वेगळा करावा. रस पाच लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सप्तधान्य किंवा गोमूत्राचे प्रमाण जास्त झाल्यास पाने जळतात. त्यामुळे ते प्रमाणातच घ्यावे.