तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असताना नवीन काय याची उत्सुकता साऱ्यांनाच वाटत असते. त्यामुळे नवीन वर्ष सुरू होताच तंत्रजगताला या वर्षीच्या नवीन उत्पादनांचे वेध लागले आहेत. कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटिलीजन्स) तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे गॅजेट आणखी स्मार्ट होऊ लागली आहेत. अशा गॅजेटमुळे वापरकर्त्यांचे दैनंदिन कामकाज अधिक सोपे आणि सुरळीत होणार आहे. चालू वर्षांत येऊ घातलेल्या अशाच काही वैशिष्टय़पूर्ण उपकरणांविषयी..ह्ण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो ६

‘मायक्रोसॉफ्ट’ची ‘सरफेस प्रो’ ही टॅब्लेट श्रेणी गेल्या काही वर्षांपासून वापरकर्त्यांची पसंती मिळवत आहे. या श्रेणीत १२.३ इंची डिस्प्ले असलेला ‘प्रो ६’ दाखल झाला आहे. विंडोज १० हायब्रीडवर आधारित या टॅब्लेटचे वजनही कमी आहे. विंडोज इंक कम्पॅटिबिलिटीमुळे या टॅब्लेटचा उपयोग नोंदी करण्यासाठी, रेखाटण्यासाठी करता येतो. स्वतंत्र कीबोर्डसह या टॅब्लेटचे लॅपटॉपमध्ये रूपांतरही करता येते.

आयरोबोट रूम्बा ई ५

घरातली लादी स्वच्छ करण्यासाठी ‘आयरोबोट’ची उपकरणे उपयुक्त ठरत आहेत. यात या वर्षी ‘रूम्बा ई ५’ची भर पडणार आहे. या उपकरणात खास रचनेचा ‘एज स्वीपिंग’ ब्रश पुरवण्यात आला असून तो घराच्या कानाकोपऱ्यात साचलेली धूळ सहज साफ करतो. ‘स्मार्ट नेव्हिगेशन’ आणि ‘डस्ट डिटेक्शन’ तंत्रज्ञानाच्या समन्वयातून हे उपकरण जेथे जास्त धूळ असते तेथे स्वत:हूनच अधिक वेळ सफाई करतो. ‘रूम्बा ई ५’मध्ये बाहेर काढून धुता येतील, अशा बिन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे उपकरण स्वच्छ करणे सुलभ होते. तसेच यातील रोबोटिक तंत्रज्ञानामुळे हे उपकरण सुरू करण्याची किंवा ते पुन्हा त्याच्या जागी नेऊन ठेवण्याचे कष्टही घ्यावे लागत नाही. ‘रूम्बा ई ५’ आपल्या निश्चित जागी येऊन थांबतो व आवश्यक असेल तेव्हा रीचार्जही होतो.

अ‍ॅमेझॉन अलेक्सा

‘अलेक्सा’ने आधीपासूनच तंत्रजगतात आपला दबदबा निर्माण केला आहे. या उपकरणाच्या साह्याने तुमच्या घरातील सर्व स्मार्ट उपकरणे नियंत्रित करता येतात तसेच तुम्ही या उपकरणाच्या मदतीने अलार्म नोंदवणे, बातम्या वाचणे, गाणी लावणे, व्हिडीओ पाहण्यासाठीच्या सूचना देणे अशी असंख्य कामे करू शकाल. एसीचे तापमान कमी-अधिक करण्यासाठी सूचना तुम्ही अलेक्सामार्फत देऊ शकता. तुम्ही अ‍ॅमेझॉन एको डिव्हायसेसमार्फत अलेक्सा घरी आणू शकता. भारतात अ‍ॅमेझॉन एको चार प्रकारांत उपलब्ध आहे : एको, एको डॉट, एको प्लस आणि अलीकडेच लॉन्च झालेले एको स्पॉट.

अ‍ॅपलचा आयपॅड

अ‍ॅपलचा आयपॅड हा टॅब्लेट श्रेणीतील उच्चतम वैशिष्टय़े असलेला टॅब आहे. आयपॅडचा नवा अवतार या वर्षी बाजारात येईल, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी अ‍ॅपलने बाजारात आणलेल्या आयपॅडची दृश्यात्मकता वाखाणण्याजोगी होती. त्याही पुढे जाऊन अ‍ॅपल या वर्षी आयपॅडमध्ये अधिक आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करेल, अशी चर्चा आहे.

वन प्लस टीव्ही

‘वन प्लस’ या कंपनीचा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारीत टीव्ही बाजारात येऊ घातला आहे. गुगल होम आणि अ‍ॅमेझॉन एको या ‘व्हॉइस असिस्टंट’शी संलग्न करण्याची सुविधा या टीव्हीमध्ये असेल, असे सांगण्यात येत आहे. त्याखेरीज या टीव्हीची रचना आणि त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही वैशिष्टय़पूर्ण असेल, अशी चर्चा आहे. गेल्या वर्षी ‘शाओमि’ने ‘एमआय टीव्ही’ भारतीय बाजारात आणला होता. त्या टीव्हीला टक्कर देणारा वन प्लसचा टीव्ही असेल अशी शक्यता आहे.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about upcoming attractions if gadgets
First published on: 24-01-2019 at 00:45 IST