व्हिंटेज वॉर : मैत्रीपूर्ण वैर

फॉर्म्युला वन शर्यतींच्या प्रत्येक दशकात असे वैर जगासमोर आले ज्याने तत्कालीन काळ गाजवला.

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे

फॉर्म्युला वन शर्यतींच्या प्रत्येक दशकात असे वैर जगासमोर आले ज्याने तत्कालीन काळ गाजवला. १९८० आणि ९०च्या दशकात आयोर्तो सेना आणि एलेन प्रोस्ट आणि १९७०च्या दशकात निकी लाऊदा आणि जेम्स हंट या दोघांच्या वैराकडे फॉर्म्युला वन जगताचे लक्ष होते. असे म्हटले जाते की या दोघांच्या वैराला तत्कालीन प्रसारमाध्यमांनी जास्त खतपाणी घातले. परंतु रेसट्रॅकवर या दोघांना पाहिले असता त्यांच्यातील चढाओढीच्या गोष्टींमध्ये अतिशयोक्ती नसल्याचे दिसून यायचे.

जेम्स हंट आणि निकी लाऊदा यांच्या नात्याचे दोन भाग आहेत. रेसट्रॅकवर जरी हे एकमेकांविरोधात आक्रमक असले तरी ऑफ ट्रॅक त्यांचे संबंध ‘मैत्रीपूर्ण’ होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दोघांच्या मनात एकमेकांविषयी आदर होता. करियरच्या सुरुवातीला जेव्हा दोघे खालच्या श्रेणीतील फॉर्म्युला सीरिजमध्ये भाग घ्यायचे तेव्हा एकाच एकत्र राहत होते. रेसच्या सुरुवातीला किंवा रेस संपल्यानंतरची त्यांची मैत्री रेस ट्रॅकवर वेगळेच रूप घ्यायची. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच त्यांच्यात अग्रगण्य रेस ट्रॅकड्राइव्हर बनण्याची क्षमता असल्याचे म्हटले जायचे. फॉर्म्युला वनची लोकप्रियता जशी वाढत होती तशी या दोघांच्या वैराकडे लोकांचे लक्ष केंद्रित झाले. दोघांच्या परस्पर विरोधी शैलीमुळे त्यांच्या चाहत्यांचे गट झाले. आक्रमक वृत्तीचा चालक जेम्स हंट तर थंड डोक्याने परिस्थितीचे विश्लेषण करून खेळणारा निकी लाऊदा. त्यावेळी फॉर्म्युला वन शर्यतीबाबतच्या बातम्यांचे मथळे या दोघांच्या बाबतीत अधिक असत.

ब्राझील येथे झालेल्या हंगामातील पहिल्या शर्यतीत हंट रेसमधून बाद झाला आणि निकीने जेतेपद पटकावले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतही विजय निकीच्या नावावर नोंदवला गेला. शर्यतीत हंट निकीच्या मागेच राहिला. लॉन्ग बीचच्या शर्यतीत पुन्हा हंट बाद झाला. त्यानंतर स्पेनमध्ये झालेल्या शर्यतीत हंटने विजय मिळवला. स्वीडनमधील शर्यतीत निकी तिसऱ्या  स्थानावर होता तर हंट पाचव्या. फ्रान्समध्ये निकीच्या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हंटने शर्यत जिंकली.

निर्बुरगरिंग येथील शर्यतीत झालेल्या अपघातात निकीला जीव गमवावा लागला असता. या अपघातात त्याचा चेहऱ्याचा काही भाग भाजला. तरी थोडय़ाच काळात त्याने मंझा ग्रँड प्रिंक्समध्ये पुनरागमन केले. कॅनडा आणि अमेरिकेतील शर्यतीत हंटने विजय मिळवला, तर निकी या शर्यतींमध्ये अनुक्रमे आठव्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होता. हंगामाच्या शेवटची शर्यत ही सुझुका येथे होती, त्यात हंट तिसऱ्या स्थानावर आला  आणि वर्ल्ड चॅम्पिअनशिपचा खिताब मिळवला. या विजयावर हंट आणि निकी या दोघांनी केलेली विधाने त्यांच्या नात्याचे गमक उलगडतात, चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर हंटने म्हटले होते, माझ्याप्रमाणे निकीदेखील चॅम्पियनशिपच्या खिताबासाठी पात्र आहे. आम्हा दोघांनाही हा खिताब मिळायला हवा होता. तर निकी याने हंटने हा खिताब जिंकल्याचा मला जास्त आनंद आहे, आम्ही मित्र नाहीत पण आम्हाला एकमेकांविषयी आदर आणि सहानभूती आहे. १५ जून १९९३ रोजी वयाच्या ४५व्या  वर्षी जेम्स हंट याचे हृदयविकाराच्या धक्क्य़ाने निधन झाले. गेल्या काही वर्षांत या दोघांच्या वैराविषयी भरपूर लिहिले गेले आहे, त्यावर पुस्तके आली आहेत, एक चित्रपटदेखील बनवण्यात आला आहे. परंतु निकी आणि हंट यांच्यामध्ये मित्रत्वाचं नातं होतं. हंटच्या आठवणींबाबत बोलताना निकीने म्हटले होते की हंट शर्यतीत कितीही आक्रमक असला, तरी कधीच तो तुमचा जीव धोक्यात जाऊ  देणार नाही एवढा विश्वास आम्हाला एकमेकांवर होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article about vintage car war

ताज्या बातम्या