या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋषिकेश मुळे

शहरातील मैदाने किंवा मोकळी ठिकाणे काहीशी सामसूम दिसत आहेत. वार्षिक परिक्षेचा काळ असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी घरी आणि शिकवणी वर्गामध्ये अभ्यास करण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे काळ इतका टेक्नोसॅव्ही झाला असताना दुसरीकडे अभ्यासही कसा पाठीमागे राहील. शैक्षणिक अभ्यासही आता टेक्नोसॅव्ही झाला आहे. सध्या विद्यार्थी पुस्तकांऐवजी विविध विषयांच्या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून अभ्यास करण्यास पसंती दर्शवत आहेत. हे अ‍ॅप्लीकेशनही विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अधिक सोयीस्कर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे दप्तराचे ओझे अशी बोंब असताना याला पर्याय म्हणून एकाच मोबाईमध्ये सर्व विषयांचा अभ्यास होत असल्याने विद्यार्थी अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून अभ्यास करण्यास अधिक पसंती दर्शवत आहेत. चला तर जाणून घेऊयात विद्यार्थ्यांचे परिक्षेच्या काळातील सद्या प्रसिध्द असणारे अ‍ॅपसोबती..

इंडियन हिस्ट्री इन इंग्लिश

शालेय आणि पदवी अभ्यासक्रमात अनेकांचा आवडता विषय असणाऱ्या इतिहासाच विषयावरील अनेक पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहेत. विविध नकाशांच्याही माध्यमातून विद्यार्थी इतिहास हा विषय शिकत असतात. मात्र इंडियन हिस्ट्री इन इंग्लिश या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून इतिहास शिकणे सोप होत असल्याचे विद्यार्थी सांगतात. इंडियन हिस्ट्री इन इंग्लिश हे अ‍ॅप्लीकेशन अँड्रॉईड मोफत उपलब्ध आहेत. भारतीय प्राचीन संस्कृती, स्वातंत्र्य काळातील संग्राम, पहिले आणि दुसरे महायुध्द, भारतातील थोर पुरुष, स्वातंत्र्य सेनानी यासारखी इतिहास विषयाशी निगडीत विविध माहिती या अ‍ॅप्लीकेशनद्वारे मिळते. १ ली १० वीपर्यंतचा इतिहासाच्या पाठय़पुस्तकातील धडेही या अ‍ॅप्लीकेशनमध्ये उपलब्ध आहेत. सोप्या भाषेत असणाऱ्या या अ‍ॅप्लीकेशनमध्ये शब्दकोशाचाही पर्याय पाहायला मिळतो. आयएसओवर ‘इंडियन हिस्ट्री इंग्लीश अ‍ॅन्ड हिंदी’ हे अ‍ॅप्लीकेशन इतिहास विषय शिकण्यासाठी उपयुक्त आहे.

‘लर्न बायोलॉजी बेसीक कम्प्लिट’

जीवशास्त्र शिकण्यासाठी अतिशय उत्तम असणाऱ्या लर्न बायोलॉजी बेसीक कंप्लीट अ‍ॅप्लीकेशनची विज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच प्रसिध्दी आहे. जीवाणूंचे विविध प्रकारचे आकार,  जीवांची उत्पत्ती, वाढ, विभागणी, याची माहिती देण्यात आली आहे. वनस्पतीशास्त्राविषयीही या अ‍ॅप्लीकेशनमध्ये माहिती देण्यात आली आहे. विविध प्राण्यांच्या शरीरातील गुणधर्म त्यांची शास्त्रीयदृष्टय़ा सखोल माहिती अ‍ॅप्लीकेशमध्ये पाहायला मिळते. जैवरोगांची कारणे आणि परिणामही या अ‍ॅप्लीकेशनद्वारे विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात. अनेकदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जैव शास्त्राच्या आकृत्या पुस्तकाद्वारे समजू घेणे कठीण जाते. मात्र लर्न बायोलॉजी बेसीक कंप्लीट या अ‍ॅप्लीकेशनच्याद्वारे या आकृत्या लवकर समजण्यास मदत होत असल्याचे वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. अँड्रॉईड वर हे अ‍ॅप्लीकेशन उपलब्ध आहे.

फिजीक्स इज ब्युटीफूल

भौतीकशास्त्र हा विषय समजण्यास किचकट असला तरी बहुतांश विद्यार्थ्यांचा हा आवडीचा विषय आहे. न्यूटनचे सिध्दांत, भौतिकशास्त्रातील विविध सिध्दांत यांची उकल विविध उदाहरणांसह फिजीक्स इज ब्युटीफूल या अ‍ॅप्लीकेशनमध्ये करण्यात आली आहे. भौतीकशास्त्रातील आकृत्याही विविध आकडेमोडीसह या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून वापरकर्त्यांला शिकता येतात. सांख्यिकी आलेखही फिजीक्स इज ब्युटीफूल अ‍ॅप्लेकशनमध्ये

शिकता येतात. भौतीकशास्त्रातील काही आकृत्या हाताने काढण्याची सोय या अ‍ॅप्लीकेशनमध्ये आहे. या अ‍ॅप्लीकेशनमध्ये भौतिकशास्त्रातील विविध सूत्रे, एकके उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आली आहेत. अँड्रॉईड आणि आयएसओ या दोन्हींवर हे अ‍ॅप्लीकेशन मोफत उपलब्ध आहेत. स्पर्धा परिक्षांसाठी अतिशय उपयुक्त अ‍ॅप्लीकेशन असल्याचे वापरकर्त्यांंनी सांगितले.

बायजूज

बहुतांश विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कारकिर्दीतील गणित हा विषय सर्वात नावडता असतो. गणिताचा पेपर असल्यावर पोटात गोळा येतो असे अनेकांकडून ऐकायला मिळते. मात्र आता गणित शिकणे बायजूज या सुप्रसिध्द अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून सोपे झाल्याचे गणित विषयाची भीती गेलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. बायजूज अ‍ॅप्लीकेशन हे स्पर्धा परिक्षा तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणित शिकण्यासाठी उपयुक्त आहे. अँड्रॉईड आणि आयएसओवर हे अ‍ॅप्लीकेशन उपलब्ध आहे. ४ ते १२ वी इयत्तापर्यंतच्या गणित विषयाचा अभ्यासक्रम बायजूज अ‍ॅप्लीकेशनमध्ये देण्यात आला आहे. गणिताची सूत्रे, व्याख्या आणि सिध्दांत याची माहिती उदारणांसह अ‍ॅप्लीकेशनमध्ये आहे. तर गणितीय सूत्रांनुसार आकडेमोड ही विविध टप्प्यांद्वारे अ‍ॅप्लीकेशन वापकर्त्यांला शिकता येते. गणित विषयाच्या सरावासाठी बायजूज अ‍ॅप्लकेशन उत्तम असल्याचे वापरकर्त्यांनी सांगितले.

हॅलो इंग्लिश

सर्व विषयांमध्ये वेगळे स्थान भूषवणाऱ्या इंग्रजी भाषा विषयाची बात काही औरच आहे. इंग्रजी यायलाच पाहिजे असा हट्ट प्रत्येक पालक धरतो आणि यात काही गैरही नाही. इंग्रजी शिकण्यासाठी विविध शिकवण्या बाजारात उपलब्ध आहेत. विविध पुस्तकेही विद्यार्थी इंग्रजी विषय चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी विकत घेतात. मात्र या सर्वामध्ये हॅलो इंग्लिश हे अ‍ॅप्लीकेशन सद्या फार उपयुक्त ठरत आहे. प्रत्येक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी अगदी सहजरीत्या इंग्रजी शिकू शकेल अशाप्रकारे या अ‍ॅप्लीकेशनची निर्मीती करण्यात आली आहे. या अ‍ॅप्लीकेशनद्वारे इंग्रजी भाषा आणि त्यातील व्याकरण हे मराठी, गुजराती, कन्नड, मल्याळम, चायनीज, आसामी, इंडोनेशियन, तुर्कीश, अरबी यासारख्या विविध भाषांमधून शिकता येते. या अ‍ॅप्लीकेशनमध्ये विविध टप्प्यात इंग्रजी वापरकर्त्यांला शिकवता येते. विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गेमच्या माध्यमातून इंग्रजी शिकण्याचा पर्याय या अ‍ॅप्लीकेशनमध्ये देण्यात आला आहे. अ‍ॅप्लीकेशनमध्ये असणाऱ्या चॅट पर्यायाद्वारे इंग्रजीमध्ये संवादही साधण्याची सोय या अ‍ॅप्लीकेशनमध्ये आहे. अँड्रॉईड आणि आयएसओ या दोन्हींवर हे अ‍ॅप्लीकेशन मोफत उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on educational app
First published on: 11-04-2019 at 00:11 IST