वैभव भाकरे vaibhavbhakare1689@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१६ मध्ये बीएमडब्लू या कंपनीने १०० वर्षे पूर्ण केली. अशा प्रकारे शतकाचा आकडा पार करणे ही कोणत्याही कंपनीसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. बीएमडब्लू आजही जगातील आघाडीच्या मोटार उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीला सर्वाधिक जास्त कुणी स्पर्धा दिली असेल, तर ती मर्सिडिज-बेन्झने.

बीएमडब्लूने जेव्हा शंभर वर्षे पूर्णे केली तेव्हा मर्सिडिज आणि पोर्शे या कंपन्यांनी अत्यंत आगळ्या पद्धतीने बीएमडब्लूला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांच्या जाहिरातींमध्ये या १०० वर्षांत तुमच्याशी स्पर्धा चांगली होती, आता पुढील १०० वर्षे अशाच स्पर्धेची आशा करूया. अशा प्रकारचा मजकूर होता. आपल्या प्रतिस्पर्धीला चांगल्या कामाची पावती देत शुभेच्छा देऊन या जर्मन मोटार कंपन्यांनी आपल्या खिलाडूवृत्तीचे दर्शन दिले. परंतु त्यातही मर्सिडिजने या १०० वर्षांत तुमच्याशी स्पर्धा चांगली होती, परंतु पहिली ३० वर्षे थोडी कंटाळवाणी होती, असे म्हणत चिमटाही काढला.

बीएमडब्ल्यूच्या जन्मापासूनच या दोन कंपन्यांमध्ये सर्वोत्तम ठरण्यासाठी चढाओढ सुरू आहे. तांत्रिकदृष्टय़ा आधुनिक आणि सर्वोत्तम गाडय़ा तयार करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांमध्ये युद्ध सुरू झाले. या दोन्ही कंपन्यांच्या स्पर्धेमुळेच मोटार क्षेत्रात मोठे बदल झालेले पहायला मिळाले.  १९५०च्या सुमारास जेव्हा मर्सिडिजने ‘३०० एसएल गुल्विंग’ तयार केली, तेव्हा या दोघांच्या वैराला खऱ्या अर्थाने चालना मिळायला सुरुवात झाली. फ्युल इंजेक्शन प्रणाली असणारी ही पहिली प्रोडक्शन कार होती. यानंतर बीएमडब्ल्यूने ५०७ रोडस्टर बाजारात आणली. अत्यंत सुंदर दिसणारी ही गाडी ग्राहकांसाठी खूप महागडी ठरली. त्यामुळे केवळ २५२ एवढय़ाच ५०७ रोडस्टर तयार करण्यात आल्या. अपेक्षित विक्री न झाल्यामुळे बीएमडब्ल्यूलाही मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे नेहमी स्पर्धेस तयार असणाऱ्या बीएमडब्ल्यूची काहीशी पीछेहाट झाली.

१९६० मध्ये बीएमडब्ल्यूने २००२ च्या रूपात छोटी स्पोर्ट्स सेडान बाजारात आणली. हीच गाडी पुढे यूरोपमधील टबरेचार्जिग यंत्रणा असलेली पहिली गाडी ठरली. १९७२ मध्ये बीएमडब्ल्यूने म्युनिक ओलंपिक दरम्यान जगातील पहिली इलेक्ट्रिक कार १६०२ ई सादर केली. यानंतर मर्सिडिज आणि बीएमडब्ल्यूमधील चढाओढ सुरूच राहिली. सर्वप्रथम मर्सिडिज-बेंझने त्यांच्या गाडय़ांमध्ये अ‍ॅण्टी लॉक ब्रेक लावण्यास सुरुवात केली. नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावून अधिकाधिक संशोधन करून वाहन अधिक प्रगत आणि ग्राहकोपयोगी करण्याकडे या दोन्ही कंपन्यांचा सुरुवातीपासूनच कल होता. हे करताना दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या दर्जाशी तडजोड केली नाही.

बाजार क्षेत्रात सुरू असणारे हे युद्ध रेसट्रॅकवर देखील सुरू राहिले. मर्सिडिज-बेन्झने १९०ई आणि बीएमडब्ल्यूने इ३०, एम३ या गाडय़ा शर्यतीत उतरवल्या. त्यांच्या स्पोर्ट्स सेडान गाडय़ांसाठी या दोन्ही कंपन्यांनी ऑल व्हील ड्राइव्ह यंत्रणा विकसित केली.

खरे पाहता ऑडीला स्पर्धा देण्यासाठी अशा प्रकारची यंत्रणा निर्माण करण्यात आली होती. जी एल क्लास ही पहिली लुक्सवरी एसयूव्ही मर्सिडिजने बाजारात आणली. बीएमडब्ल्यूने देखील त्यांनतर या क्षेत्रात पदार्पण केले. गाडय़ांमध्ये

सध्या आवश्यक समजल्या जाणाऱ्या इंफोटाइनमेंट प्रणालीही सुरुवात बीएमडब्लूने केली. या इंफोटाइनमेंटसह आयड्राइव्हची सुविधा देण्यात आली होती. जेव्हा ही प्रणाली सर्वप्रथम आली तेव्हा यावर भरपूर टीका करण्यात आली. मात्र आता याच यंत्रणेला सर्वोत्तम मानले जाते.

नेहमी प्रयोगशील राहणे आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा अट्टाहास असलेल्या या दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक गाडय़ा आणि स्वयंचलित गाडय़ा विकसित करण्याची चढाओढ सुरू आहे. मागील १०० वर्षांपासून या दोन मोठय़ा जर्मन कंपन्यांची स्पर्धा सुरू आहे. या दोघांच्या वैराचा सर्वाधिक फायदा कुणाला झाला असेल तर तो ऑटोमोबाइल क्षेत्राला. या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या संकल्पनांनी आणि तंत्रज्ञानानी मोटार क्षेत्राला नवी दिशा दिली.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmw and mercedes benz
First published on: 02-02-2019 at 03:14 IST