कॉलेज आठवणींचा कोलाज : अश्विनी कासार, अभिनेत्री

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी माटुंग्याच्या रुईया महाविद्यलयातून पदवी श्मिी माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केलं. कला शाखेकडे वळायचं हे पहिल्यापासून मनात पक्कं होतं. मी अर्थशास्त्र स्टॅटिस्टिक या विषयात पदवी घेतली. कॉलजेचा पहिला दिवस धाकधुकीचा होता. बदलापूरसारख्या गावातून मी आले होते. तेव्हा ते आतासारखं प्रगतशील नव्हतं. त्यामुळे रुईयाचा ग्लॅम मला सहन होईल का, मी रुळेन का असे नाना प्रश्न डोक्यात होते. पण मी नंतर रुळले.

आताचा रुईया नाका हा आमचा कट्टा होता. आम्ही सर्व गँग पहिल्यांदा तिकडे भेटायचो व नंतर कॉलेजमध्ये एकत्र एन्ट्री घाययचो. या कट्टय़ावर आयुष्यातले छोटेमोठे निर्णय मी घेतले आहेत. परीक्षेला जाण्याअगोदरचा सराव आम्ही एकत्र केला आहे. तो जर मी तिथे बसून केला नाही तर मला पेपर खरच अवघड जायचा. अनेक मुलांना तिकडे बसवून चिडवलंय. तात्पर्य काय रुईयाचा कट्टा म्हणजे माझ्यासाठी सकारात्मक वास्तू होती.

रुईयाचा नाटय़विभाग हा ‘रुईया नाटय़वलय’ या नावाने प्रसिद्ध आहे. मीसुद्धा या विभागाचा एक भाग झाले. नशिबात असलेल्या गोष्टी कितीही चकवण्याचा प्रयत्न करा. त्या तुमच्यापाशी दत्त म्हणून हजर होतातच. तसच माझ काहीसं झालं. ‘अनन्या’, ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’, ‘ग म भ न’, ‘मुक्तिधाम’ या एकांकिका मी केल्या. मी बदलापूरला राहते. रुईयात असताना बदलापूर ते दादर असा प्रवास मला करायला साधारण दीड तास लागायचे.

सकाळी साडेचार वाजता माझा दिवस चालू व्हायचा. साडेपाचची लोकल आणि सकाळी सातच पहिलं लेक्चर माझी वाट पाहायचं. कॉलेज संपल्यानंतरचा वेळ मी नाटय़वलयात घालवायचे. त्यामुळे रात्री साडेदहाची परतीची लोकल माझी असायची. रात्री साडेबाराला मी घरी पोहोचायचे. आणि सकाळी पुन्हा साडेचारला उठून निघायचे. मी बॅक स्टेज खूप काम केलंय. त्यामुळे मी रुईयात असताना चोख बॅकस्टेज शिकले. बऱ्याचदा आमच्या तालमी रात्री उशिरा संपायच्या. मला बदलापूरला जायला रात्री जास्तच उशीर होणार असेल तर मग कधी कधी मी स्पृहा जोशी, ऋतुजा बागवे, मीना बर्वे या माझ्या खास मैत्रिणींकडे रात्री राहायचे.

कॉलेजने मला बरंच काही दिलं. वर म्हटल्याप्रमाणे जस बॅकस्टेज शिकवलं तसंच बौद्धिक समृद्धी दिली. आम्हा लेखक-कवींचा एक चमू होता. आम्ही लिहिलेलं एकमेकांना वाचून दाखवायचो. तास संपल्यावर कोणी काय नवीन लिहिलयं  यावरसुद्धा आमच्या वेगळ्या गप्पा रंगायच्या. मी पुस्तकी किडा. मला वाचनाची भयंकर आवड! प्रवासाचा माझा साथीदार म्हणजे पुस्तक. मी ‘मित्रांना हे पुस्तक वाच, भारी आहे. तुला आवडेल,’ असं कित्येकदा सजेस्ट करायची. माझ्या वाचनात भरही कॉलेजच्या भव्य ग्रंथालयामुळे पडली.

मला शिस्त लावण्यातसुद्धा कॉलेजचा हात आहे. एका ओळीत चप्पल काढणं, आपल्या विभागाची, रंगमंचाची स्वच्छता ठेवणं अशा चांगल्या सवयी मला कॉलेजने लावल्या. कॉलेजने काही प्रसंग आयुष्यात असे दाखवले ज्यामुळे मी कानाला खडा लावला. त्याचं झालं असं, आमचा नाटकाचा प्रयोग होता. आणि मी नाटकातले काही कपडे घरी विसरले होते. लोकल काही कारणास्तव बंद होत्या. मला नेमकं कारण आता आठवत नाही.

अशा परिस्थितीत माझा मित्र बदलापूर ते दादर बाईकवर आला. त्याच्यासोबतच रात्री उशिरा मी बाईकवरून घर गाठलं. मी सुरक्षित घरी आलेले बघून आईबाबांना धक्का बसला. लोकल तर बंद आहेत, मग तू कशी आलीस? असा प्रश्नांचा भडिमार चालू झाला. मी उडवाउडवीची उत्तर दिली. कारण आईबाबांना टेन्शन येईल असा प्रसंगच मला उभा करायचा नव्हता. पण माझ्याकडून शेवटी न राहून खरं बाहेर निघालं व माझी त्यांनी तेव्हा चांगलीच शाळा घेतली. हा झाला एक प्रसंग. दुसरा प्रसंग असा आम्हा मुलींना ग्रीन रूम अचानक रिकामी करायला सांगितली व मुलींनी लवकर व पहिलं घरी जाण्याची तंबी दिली. रात्र फार झाली होती व दुसऱ्या दिवशी अर्थशास्त्राचा पेपर होता म्हणून स्पृहाच्या घरी राहायला गेलो. घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं की, माझं अर्थशास्त्रचं पुस्तक ग्रीनरूममध्येच राहिलंय. तेव्हा मैत्रिणींनी अक्षरश: काही पुस्तकांची पानं फाडून मला अभ्यासाला मदत केली. तेव्हापासून कानाला खडा, घराच्या बाहेर निघताना आपल्याला कोणतं सामान सोबत घेऊन जायचं आहे, त्याची मनात यादी तयार करणं. आणि ते सामान घेऊन जाणं.

रुईयाच्या कॅण्टीनमध्ये खूप खाबूगिरी केली आहे. आजूबाजूच्या सर्वच हॉटेल, कॅफेमध्ये मी जायचे. डीपीसची पावभाजी व तवापुलाव मला फार आवडायचा. आम्हाला रात्री स्पर्धा उरकून व्हायला उशीर व्हायचा  तेव्हा आम्ही डीपीसमध्येच जेवायला जायचो व मालकही आमची वाट पाहत वेळ निघून गेली असली तरीही डीपीस उघडं ठेवायचा. कॉलेजचा शेवटचा दिवस एकमेकांना मिठी मारून रडण्यातच गेला. पाच र्वष एकमेकांची सोबत होती. प्रत्येकाची एकच वाट होती. जी आता वेगळी होणार होती. परत ते दिवस येणार नव्हते. या भावनेने आम्ही रडलो.

शब्दांकन : मितेश रतिश जोशी

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College days college memories akp
First published on: 16-10-2019 at 02:47 IST