भूषण प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉलेजमधील सोनेरी दिवसांच्या आठवणी प्रत्येक जण मनाच्या कुपीत आयुष्यभर जपून ठेवतो. मग कधी तरी एखादा प्रसंग नकळत या आठवणींना उजाळा देतो. कलाकार या बाबतीत नशीबवान. कारण भूमिकेच्या माध्यमातून त्यांना हे दिवस पुन्हा जगता येतात. आजवरच्या माझ्या कारकीर्दीत मीसुद्धा अनेक वयोगटांतील भूमिका साकारल्या. परंतु आता येत असलेल्या माझ्या ‘शिमगा’ या चित्रपटात मी साधारण सतरा-अठरा वर्षांच्या मुलाची भूमिका साकारत आहे आणि या भूमिकेच्या निमित्ताने मला माझे कॉलेजचे दिवस पुन्हा आठवले. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधून मी मार्केटिंग हा विषय घेऊन बी.कॉम. केले, त्यानंतर सह्याद्री इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून मार्केटिंग अँड अ‍ॅडव्हर्टायझिंगमधून एमबीए केले.

मला कॉलेजचा पहिला दिवस अजूनही लख्ख आठवतो. शाळेतल्या शिस्तीचा प्रभाव कायम असल्याने पहिल्या दिवशी मी अतिशय ‘गुड बॉय’ बनून कॉलेजात दाखल झालो. साधा टी शर्ट, पॅण्ट आणि सॅक असा माझा त्यावेळचा अवतार होता. तो पहिला दिवस आणि कॉलेजचा शेवटचा दिवस या कालावधीत माझ्या वेशभूषेतच नव्हे तर व्यक्तिमत्त्वातही प्रचंड बदल झाला. माझ्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक आज अनेकांकडून होते, याचे श्रेय माझ्या कॉलेजला जाते.

कॉलेजचा कट्टा म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व. एरवी कट्टय़ावर बसून आमची थट्टामस्करी चालायची; परंतु त्याचा कट्टय़ावर परीक्षेच्या दरम्यान आम्ही अभ्यासातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करायचो, एकमेकांना अभ्यासात मदत करायचो. कॉलेजमधील अनेक सुखद-दु:खद क्षण आम्ही या कट्टय़ावरच घालवले आहेत. त्यामुळे या कट्टय़ावर निर्माण झालेले हे भावनिक नाते माझ्या कायम स्मरणात राहणारे आहे. सिम्बॉयसिसचे कॅन्टीनसुद्धा मस्त आहे. कट्टय़ावर नसलो तर आम्ही कॅन्टीनमध्ये असायचो. कॉलेज दिवसांमध्ये पॉकेटमनी खूप काही मिळायचा नाही. त्यामुळे पैसे अतिशय जपून वापरून, आम्ही आमची खवय्येगिरी करायचो. मला विशेषकरून आमचे सिम्बॉयसिसचे कॅन्टीन आवडायचे. कधी कधी आम्ही एफ. सी. रोडला खाबूगिरीसाठी जायचो. तिथल्या वैशाली, रुपालीमध्ये तर आम्ही वेगवेगळ्या पदार्थावर ताव मारायचो. कॉलेजमध्ये सगळ्यात प्रिय होता, तो चहा. आता मी खूप जास्त कॉफीप्रेमी झालो आहे. पण कॉलेजला असताना मी चहाप्रेमी होतो. नाटय़ मंडळाशी संलग्न असल्यामुळे तालमीच्या दरम्यान भरपूर चहा व्हायचा.

कॉलेजमध्ये इतर मजामस्ती तर चालायचीच, त्याच्यासोबतच मराठी नाटय़ मंडळ, हिंदी नाटय़ मंडळ आणि इंग्रजी या तिन्ही ग्रुपशी मी संलग्न होतो. मराठी आणि हिंदीमध्ये माझा सहभाग जास्त असायचा. हिंदी ग्रुपमधून मी अनेक स्पर्धामध्ये सहभागी झालो, पथनाटय़े केली. मराठी नाटय़ मंडळाबरोबर पुरुषोत्तम करंडक केले. डिग्रीच्या दुसऱ्या वर्षांला असताना ‘दोन भागिले शून्य’ या एकांकिकेसाठी आम्हाला ‘जयराम हर्डीकर करंडक’ मिळाले होते. यात आम्हाला कॉलेजचे खूप सहकार्य लाभले. हा करंडक मिळाल्यानंतर आम्ही तो वाजतगाजत कॉलेजमध्ये आणला होता. कारण पुरुषोत्तम करंडकमध्ये सिम्बॉयसिस कॉलेज बऱ्याच वर्षांनी जिंकले होते आणि त्यातूनही सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेला मिळणारा ‘जयराम हर्डीकर करंडक’ हा मानाचा करंडक आम्हाला मिळाला होता.

आमचे मार्केटिंगचे प्रदर्शनही होत असे. ज्याच्यासाठी आम्हाला एक ब्रॅण्ड घेऊन त्या ब्रॅण्डसाठीची जाहिरात करायची असे. आम्ही एका नावाजलेल्या मोबाइल कंपनीसाठी एक प्लॅन केला होता आणि त्यासाठी आम्ही मार्केटिंगचे धोरणही तयार केले होते. कुठून तरी हा प्लॅन त्या मोबाइल ब्रॅण्डपर्यंत पोहोचला आणि त्यांची संपूर्ण टीम कॉलेजमध्ये आली. आमचा सहा जणांचा ग्रुप होता आणि आम्हा सर्वाना त्या क्षणी त्या कंपनीकडून नोकरीची संधी मिळाली. पदवी मिळवण्यापूर्वीच आमच्या हातात जॉब लेटर आले होते. कॉलेजमध्ये असताना मी एकदा मारामारीसुद्धा केली होती. तीसुद्धा अकरावीला. आमच्या वर्गशिक्षिकेने हजेरी घेण्याची जबाबदारी माझ्यावर दिली होती आणि मी खूप जास्त प्रामाणिकपणे हे काम करायचो. एकदा काही तरी हजेरी लावण्यात गडबड झाली. आणि मुळात त्या वेळी मी तिथे नव्हतो. एका मुलाची आदल्या दिवशी हजेरी लागली नाही म्हणून तो माझ्याशी हुज्जत घालू लागला. शिक्षकांशी बोलून मी त्यात बदल करीन, असे सांगितले पण ते त्याला मान्य नव्हते. त्यामुळे आमच्यात आधी शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर त्याचे रूपांतर मारामारीत झाले. दीड-दोन वर्षांपूर्वी कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. तो खूप अभिमानाचा क्षण होता माझ्यासाठी.

शब्दांकन –  मितेश जोशी

 

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College memories of bhushan pradhan
First published on: 06-02-2019 at 02:37 IST