डॉ. वैशाली जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त असतात. ही समस्या खरेतर आपल्या बदललेल्या जीवनशैलीने निर्माण झालेली आहे. फास्टफुड खाद्यसंस्कृती, व्यायामाचा अभाव, खिशाला सहज परवडणारे जंक फुड, घरी स्वयंपाक करण्याला फाटा देऊन बोकाळलेली हॉटेलमधील पार्टी संस्कृती यांमुळे ही समस्या निर्माण होते.

आता जिथे समस्या निर्माण होतात तिथे उपायही निघतात. मग वजन कमी करण्यासाठी अनेक डाएट प्लान अवतीर्ण झाले. कुणी म्हणते खाण्यात चरबीयुक्त पदार्थ कमी करा, नत्रयुक्त पदार्थ म्हणजे प्रथिने जास्त घ्या, कुणी म्हणते कबरेदके कमी करा. कुणी म्हणते फक्त शाकाहारी घ्या. बरोबर सॅलेड तर कोणी म्हणते गोड खाणे बंद करा.

काही आहारतज्ज्ञ सांगतात की दिवसातून केवळ दोनदा जेवण घ्या, तर काही जण सांगतात दर दोन तासांनी थोडे थोडे खा. यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निमार्ण झाला आहे. कोणाचे ऐकावे आणि कोणते आहारसूत्र अवलंबावे. दर दोन तासांनी थोडेथोडे खाल्ल्याने रक्तात सतत साखर उपलब्ध राहते आणि ज्यामुळे मेंदूला सतत साखरेचा पुरवठा होत राहतो. जो अतिशय आवश्यक आहे. यामुळे मेंदू तल्लख राहतो. शिवाय शरीरात चरबी वाढण्याची शक्यता नसल्याने स्थूलपणा येत नाही, असा दावा काही आजारतज्ज्ञ करतात. याउलट काही आहारतज्ज्ञ सांगतात, सपाटून भूक लागेल अशा दोन वेळा शोधूनच प्रत्येकाने खावे. इतर वेळी शरीराला लागणारी ऊर्जा साठलेल्या चरबीतून येईल आणि स्थूलपणा चरबीचे थर कमी होतील हा त्यांचा सिद्धांत आहे. प्रत्येक खाण्यानंतर स्वादुिपड रक्तात इन्सुलिन सोडते आणि हे अनेकदा घडले तर पुढे जाऊन शरीरात इन्सुलिनला प्रतिरोध निर्माण होतो. त्यामुळे मधुमेह निर्माण होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे.

वरील दोन्ही आहार आराखडे एकमेकांना छेद देणारे आहेत. एकमेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की कोणाचं ऐकायचं? कोणाला खरं मानायचं? असे प्रश्न उपस्थित होतात. तसे बघितले तर दोन्ही आराखडे आपापल्या जागेवर योग्य आहेत. दोन्हींचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. जे मनाला पटेल ते करायला हरकत नाही. खरे सांगायचे तर अनेकदा व्यक्ती आहार आराखडा (डाएट प्लान) सुरू करतात. परंतु त्यातील केवळ ३० ते ४० टक्केच बाबी पूर्णपणे अवलंबतात. त्यामुळे आराखडय़ाचे फायदे कसे मिळतील.

आहाराच्या पायाभूत तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.आहारातले गोड, स्निग्ध पदार्थ कमी करावेत आणि कबरेदके माफक प्रमाणात तसेच प्रथिने अधिक प्रमाणात घ्यावीत.याच्या जोडीला रोजच्या रोज व्यायाम करावा आणि मदानी खेळ खेळावेत. रोज एक तास चालावे. दोन जेवणांमध्ये खाणे टाळावे.

रात्रीचे जेवण लवकर घ्यावे. त्यामुळे त्याचे पचनही चांगले होते आणि स्थूलपणा कमी होण्यास मदत होते.प्रत्येकाने ही तत्त्वे नेटाने, नित्यनेमाने पाळली तर स्थूलपणा कमी होण्यास मदत होईल आणि चरबीचे थर निघून जातील. तसेच शरीर हलके होईल. त्यामुळे मन प्रसन्न, आनंदी राहील. स्थूलपणा हा बदललेल्या जीवनशैलीचा दुष्परिणाम आहे. घरी बनवलेले रूचकर, सात्त्विक जेवण ज्यात वरण, भात, चपाती वा भाकरी, भाजी, कोिशबीर, दही, उसळ या सर्वाचा समावेश असेल, तर स्थूलपणाला सहज रामराम ठोकणे शक्य आहे.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food confusion dietary confusion diet myths
First published on: 05-02-2019 at 00:08 IST