भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील नितांत रमणीय प्रदेश म्हणजे ओडिशा. मंदिरांचे राज्य म्हणूनही ते ओळखले जाते. वेळेच्या उपलब्धतेनुसार चार ते १२ दिवसांपर्यंतच्या कालावधीत येथील मंदिरांचे स्थापत्यसौंदर्य अनुभवता येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणार्क-पुरी

मंदिर स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना असलेले कोणार्कचे सूर्यमंदिर हे ओडिशाचे वैभव! मंदिर म्हणजे सूर्याचा रथ आहे, अशी कल्पना करून याची बांधणी करण्यात आली आहे. रथचक्रे, त्यावरील नाजूक नक्षीकाम, मंदिरावरील देखणे शिल्पकाम पाहण्यासाठी किमान अर्धा दिवस तरी दिलाच पाहिजे. कोणार्क आणि जगन्नाथपुरी एका दिवसात बघता येते.

कोणार्कपासून जगन्नाथपुरीचा रस्ता फारच सुंदर आहे. समुद्राच्या बाजूने जाणाऱ्या या रस्त्याने अवश्य प्रवास करावा. जगन्नाथपुरी हे भारतातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. इथे असलेल्या मूर्ती मात्र  लाकडाच्या आहेत. ओडिशामधे लाकडाला दारू म्हणून संबोधतात. ‘पद उंगली नाई हाथ, दारूब्रह्म जगन्नाथ’ असे इथे देवाचे वर्णन केले जाते. इथल्या मूर्ती, त्यांची दरवर्षी निघणारी रथयात्रा, दर १२ वर्षांनी त्या मूर्ती बदलण्याचा ‘नवकलेवर’ सोहळा आणि इथल्या मंदिराचे स्थापत्य या सगळ्याच गोष्टी गूढ-रम्य आहेत. मंदिराशी निगडित असलेल्या अनेक दंतकथांतून याचे एक विस्मयकारक चित्र उभे राहते.

जगन्नाथ पुरीपासून फक्त १० कि.मी.वर असलेल्या रघुराजपूर या कलाकारांच्या गावाला भेट दिलीच पाहिजे. गावात १२० घरे आहेत आणि ही सर्व कलाकारांची घरे आहेत. मूर्तिकार, पट्टचित्र कलाकार, चित्रकार, गायक, नर्तक असे सर्व कलाकार या गावात राहतात. ओडिशा सरकारने या गावाला ‘ऐतिहासिक वारसा गावा’चा दर्जा दिला आहे.  तसेच जवळच असलेली सुप्रसिद्ध ‘पिपली आर्ट’ वाटेत थांबून पाहता येते.

कोरापुट

देओमाली पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून ८७० मीटर/२८५० फूट उंचीवर वसलेले कोरापुट ही ओडिशाला लाभलेली निसर्गाची मोठी देणगी आहे. ओडिशाच्या पश्चिमेला असलेला हा आदिवासी जिल्हा. आदिवासींच्या परंपरा, त्यांची घरे, बाजार, पोशाख हे अगदी जवळून इथे पाहता येते. हिरव्यागार पर्वतरांगा, दुर्मीळ वनसंपदा आणि तेथील दुसरे जगन्नाथ मंदिर अगदी आवर्जून पाहण्याजोगे आहे. सबर श्रीक्षेत्र या नावाने प्रसिद्ध असलेले हे जगन्नाथाचे मंदिर हे एक वैशिष्टय़पूर्ण ठिकाण आहे.

तिथेच जवळ असलेले ट्रायबल म्यूझियम, मछकुंद नदीवरील डुडुमा धबधबा, नंदपूर, जेपोर ही ठिकाणे कोरापुटपासून जवळच आहेत. कोरापुटला मुक्काम करून ही ठिकाणे पाहता येतात. ओडिशातील आदिवासी संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर कोरापुट-जेपोर इथे मुक्काम करून परिसरात मनसोक्त भटकंती केली पाहिजे.

याचसोबत गुप्तेश्वर महादेव, जैन मॉनेस्ट्री, गुलीम टेकडय़ा, चित्रकुट धबधबे, मालीगुडा, कोलाब धाम, गुप्तगंगा अर्थात साबेरी नदी, हाथी खडक ही ठिकाणेसुद्धा प्रेक्षणीय आहेत. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टण इथून रेल्वेनी येणे सर्वात उत्तम पर्याय आहे. हा अत्यंत रमणीय रेल्वेमार्ग आहे. पूर्वघाट, अनेक पूल, ५३ बोगदे यामुळे हा प्रवास संस्मरणीय ठरतो. इथून पुढे भुवनेश्वरला जावे.

विशाखापट्टण ते कोरापुट रेल्वे ५८५०१ पॅसेंजर विशाखापट्टणवरून सकाळी ७.०५ ला निघते, कोरापुटला दुपारी ०१.४५ ला पोहोचते. कोरापुट ते भुवनेश्वर रेल्वे १८८४८ हिराखंड एक्स्प्रेस कोरापुटवरून संध्याकाळी ५.२५ निघते व भुवनेश्वरला सकाळी ८.२५ ला पोहोचते.

सियालिया

भुवनेश्वरपासून १३० किमी अंतरावर केंद्रपाडा या जिल्ह्य़ातील राजकणिका या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त ५ कि.मी.वर सियालिया या गावात एक आश्चर्य दडलेले आहे. तिथे ८० घरे असून कोणत्याही घराला दरवाजा नाही. अगदी आपल्या शनिशिंगणापूरसारखे. गावची देवता खोखराई ठकुरानीवर गावकऱ्यांची प्रचंड श्रद्धा आहे. ती घराच्या उंबरठय़ावर बसली असताना दार कसे लावणार, असा विश्वास आहे. या गावात कधीही चोरी होत नाही.

भुवनेश्वर

ओडिशाच्या राजधानीचे हे शहर प्रशस्त आणि ऐसपैस आहे. रुंद रस्ते, तुलनेने कमी रहदारी, नवे उड्डाणपूल, सरकारी कार्यालये, निवासस्थाने येथे आहेत. हा परिसर अगदी प्राचीन काळापासून मंदिरांचे शहर म्हणून ओळखला जातो. स्थापत्य शैलीतील संक्रमण दाखवणारी अनेक मजबूत आणि दिमाखदार मंदिरे इथे आहेत. लिंगराज मंदिर म्हणजे मेरुमणी! हे शहरात दूरवरूनही दिसते. अनंत वासुदेव मंदिर, केदारेश्वर मंदिर, राजाराणी मंदिर, वेताळ मंदिर, मुक्तेश्वर अशी विविध मंदिरे येथे आहेत. मंदिर स्थापत्यकलेच्या विकासाचे विविध टप्पे येथे पाहायला मिळतात. भुवनेश्वरमध्ये मुक्काम करून उदयगिरी-खंडगिरी ही जैन लेणी, नंदनकानन प्राणिसंग्रहालय, धौली येथील अशोककालीन स्तूप पाहता येतो.

ashutosh.treks@gmail.com

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha tourism east coast of india
First published on: 19-01-2018 at 01:15 IST