मानसोपचारतज्ज्ञ : डॉ. नीलेश मोहिते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जवळची एखादी व्यक्ती अचानक आत्महत्या करते, तेव्हा तिने असं का केले असा प्रश्न सतत सतावत राहतो. वेळेत तिच्या मनाचा थांगपत्ता लागला असता, तर आपण तिला वाचवू शकलो असतो, अशी चरफडही मनात सुरू होते. तेव्हा अशी संभाव्य व्यक्ती ओळखणे, तिला वेळेत मदत करणे आणि नैराश्य किंवा समस्येतून बाहेर काढण्यास खंबीर पाठिंबा देणे अलीकडे अधिक गरजेचे आहे. यावर्षीच्या १० ऑक्टोबर या जागतिक मानसिक आरोग्य दिवसाची ‘आत्महत्या प्रतिबंध’ ही संकल्पना आहे. त्यानिमित्ताने याचा आढावा घेऊया..

जागतिक स्तरावर आत्महत्या ही किती गंभीर समस्या आहे हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. हा संपूर्ण लेख वाचून होईल. तोपर्यंत दहा मिनिटांमध्ये साधारण १५ माणसे आत्महत्या करून आपला जीव गमावतील. १५० जण आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न करतील, १५०० जण पुढच्या एक तासांमध्ये आत्महत्या करायचा विचार करत असतील आणि पुढच्या चोवीस तासांमध्ये २ हजार २०० लोक आत्महत्या करून जग सोडून गेले असतील. यातल्या महिलांपैकी एकतृतीयांश महिला भारतामधील असतील. याहून पुढे म्हणजे येत्या २४ तासांत २४ विद्यार्थी आत्महत्या करतील.

आत्महत्या करण्यामागे बरीच कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे अतितीव्र मानसिक आजार. डिप्रेशन म्हणजेच उदासीनता या आजारांमध्ये आत्महत्येचा धोका सर्वाधिक असतो. बऱ्याच वेळा उदासीनता हा आजार ओळखणे घरच्यांना आणि रुग्णांना कठीण जाते. त्यामुळे वेळीच या आजारावरती उपाय केले जात नाहीत. उपचाराअभावी मग रुग्ण आत्महत्या हे टोकाचे पाऊल उचलतात. स्किझोफ्रेनिया या अतितीव्र मानसिक आजारांमध्ये रुग्णाला कानामध्ये आवाज येत असतात, भास होत असतात. कानामध्ये येणारे हे आवाज बऱ्याच वेळा रुग्णाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतात. इतर कमी तीव्र मानसिक आजारांमध्ये आत्महत्येचा धोका कमी असतो, पण शक्यता नाकारता येत नाही. आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमुळे जसे की परीक्षेमध्ये अयशस्वी होणे, नात्यांमध्ये गुंता, आर्थिक नुकसान किंवा न बरे होणारे शारीरिक आजार यांमध्ये ताण सहन न करू शकल्याने अनेकजण मृत्यूला कवटाळतात.

तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमुख कारण असते नाते आणि करिअर संबंधित समस्या तर मध्यमवयीन माणसांमध्ये कौटुंबिक समस्या. वयस्कर स्त्री-पुरुषांमध्ये एकटेपणा आणि शारीरिक आजार ही कारणे प्रामुख्याने असतात.

काही व्यक्ती त्यांच्या आयुष्यात अत्यंत आनंदी असल्याचे दिसत असते आणि अचानक एक दिवस त्याने किंवा तिने आत्महत्या केल्याची बातमी कानावर पडल्यावर धक्का बसतो. याला ‘स्माइलिंग डिप्रेशन’ असे म्हणतात. प्रत्येक रुग्ण आत्महत्या करण्याआधी त्याच्या वागण्या-बोलण्यातून संकेत देत असतो. हे संकेत वेळेत ओळखायला शिकलो तर आपण या आत्महत्या नक्कीच रोखू शकतो.

आत्महत्येपूर्वीची काही लक्षणे

  •   मन दु:खी असणे
  •   झोप व्यवस्थित न येणे
  •   कोणत्याही कामांमध्ये मन न लागणे
  •   निराशावादी वाटणे
  •   आत्महत्येचे विचार मनामध्ये येणे, प्रयत्न करणे
  •    समाज, मित्रमैत्रीण यांपासून दूर जाणे

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींमधील संकेत कसे ओळखावेत?

  • प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आत्महत्या करण्याबाबत वारंवार उल्लेख करणे
  • आत्महत्येचे काही अयशस्वी प्रयत्न करणे.
  • असहाय्य किंवा निरुपयोगी भावना मनात निर्माण होणे
  • भविष्य अंधारात असल्याची भावना वारंवार मनामध्ये येणे
  • जेव्हा आपल्या जवळच्या माणसाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसली तर मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असते. औषधे, समुपदेशन आणि कुटुंबाच्या मदतीने नैराश्यातून बाहेर पडणे शक्य आहे.

समाज म्हणून आपली जबाबदारी

शैक्षणिक आणि भौतिक यशाला असलेले अनावश्यक महत्त्व दूर करण्याची गरज आहे. कुटुंबातील व्यक्तींचा एकमेकांमधील संवाद वाढायला हवा. भावनांना, नातेसंबंधांना हाताळण्याचे शिक्षण मुलांना लहानपणापासूनच दिले पाहिजे. मानसिक आजाराविषयी समाजामध्ये असलेली अडी दूर करून जनजागृती करण्यावर भर देणे महत्त्वाचे आहे. नैराश्येतून बाहेर पडलेल्या व्यक्तींकडून नैराश्यावस्थेत असलेल्या व्यक्तींसाठी आशादायक चित्र उभे करण्यासाठी ‘माझे मानसिक आरोग्य’ (माय मेन्टल हेल्थ स्टोरी) नावाचे फेसबुक पान सुरू झाले असून अनेक रुग्णांनी आपले अनुभव येथे व्यक्त केलेले आहेत. अशा प्रकारचे उपक्रम राबवून आपल्या आजूबाजूच्या मानसिक रुग्णांना आधार देणे ही खरी आपली जबाबदारी आहे.

काय मदत कराल?

  • या व्यक्तींना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कोणतेही अवैज्ञानिक सल्ले देऊ नये.
  • त्याच्या वागणुकीविषयी किंवा स्थितीवरून थेट कोणतेही निर्णय घेऊ नये.
  • कोणत्याही कठीण परिस्थितीत तुम्ही त्यांच्या सोबत आहात हा विश्वास देणे
  • व्यक्तीला व्यक्त होण्याची संधी द्या. जेणेकरून तो त्याच्यातील नकारात्मक भावनांना वाट करून देईल.
  • रुग्णाला मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांची भेट घेण्यास प्रोत्साहन देणे
  • अनेकदा रुग्ण उपचार अर्धवट सोडून देतात. तेव्हा रुग्णांनी हे उपचार पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठिंबा देणे.
  • कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता आत्महत्या करण्याची भावना किंवा तसे विचार मनात येत आहेत का असे थेटपणे विचारा.
  • एखाद्या व्यक्तीवर नुकताच मानसिक आघात झाला असेल किंवा त्याने उदासीन वाटल्याची भावना व्यक्त केली असल्यास याची वेळीच दखल घ्या. अशा व्यक्तींसोबत शक्यतो २४ तास राहणे योग्य असते.
  • आत्महत्येसाठी वापर केला जाईल अशा वस्तू उदाहरणार्थ कोणतेही विष, धारदार वस्तू, रश्शी इत्यादी वस्तू घरात ठेवू नये.
  • उपचारानंतर नैराश्याची लक्षणे कमी झाल्यास रुग्णांना व्यायाम, योग, ध्यान, कला यांसारख्या सर्जनशील उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवल्यास आजारातून पूर्णपणे बाहेर पडण्यास मदत होते.
मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Save suicide victims akp
First published on: 08-10-2019 at 01:47 IST