अवघ्या दशकभरापूर्वी स्मार्टफोनने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. त्याआधी स्मार्टफोन भारतात येऊ लागले असले तरी, या बाजारपेठेला खरी बळकटी गेल्या दहा वर्षांत मिळाली. परवडणाऱ्या दरांत उपलब्ध झालेले स्मार्टफोन आणि मोबाइल इंटरनेटची सहज व स्वस्त उपलब्धता यामुळे स्मार्टफोन वापरणाऱ्यांत वाढ झाली आहे. आजघडीला भारत हा स्मार्टफोनची मोठी बाजारपेठ बनला आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागांतही मोबाइल इंटरनेट पोहोचले असल्यामुळे अगदी दुर्गम भागातही स्मार्टफोनचा वापरकर्ता दिसून येतो. स्मार्टफोनवरील भारतीयांचे प्रेम अधोरेखित करणारा एक आंतरराष्ट्रीय अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार मोबाइलवेडात भारताचा मलेशियानंतर जगात दुसरा क्रमांक लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिजिटला कंटेंट वितरणात जगातील प्रमुख कंपनी असलेल्या ‘लाइमलाइट नेटवर्क्‍स’ने ‘स्टेट ऑफ डिजिटल लाइफस्टाइल्स’ नावाचा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला. जगभरातील दहा देशांमधील निवडक स्मार्टफोन वापरकर्त्यांकडून माहिती घेऊन तयार करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार भारतातील ६६ टक्के सहभागी वापरकर्त्यांनी मोबाइल फोनशिवाय एक दिवसही राहणे कठीण असल्याचे म्हटले आहे.

दहा देशांमधील प्रतिवादींना ते डिजिटल मीडियासह कशा प्रकारे संवाद साधतात आणि त्यांच्या जीवनामधील तंत्रज्ञानाच्या प्रभावाबाबत विचारण्यात आले. मजेशीर बाब म्हणजे ते त्यांच्या आवडत्या डिजिटल उपकरणांपासून किती काळ दूर राहू शकतात, अशी विचारणा केली असता ६६ टक्के भारतीयांनी त्यांना मोबाइल फोनशिवाय राहणे कठीण असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे, मोबाइल फोन दूर ठेवण्याची तयारी नसलेल्या वापरकर्त्यांची जागतिक सरासरी ४८ टक्के इतकी आहे. याखेरीज लॅपटॉप आणि डेस्कटॉप कॉम्प्युटरशिवाय राहू न शकणाऱ्या भारतीयांचे प्रमाण ४५ टक्के आहे.

भारतीय वापरकर्ते या डिजिटल युगामध्ये अधिकाधिक हरवून जात आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ९३ टक्के भारतीयांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा आपल्या जगण्यावर सकारात्मक परिणाम झाल्याचे मान्य केले. तर हीच बाब मान्य करणाऱ्यांचे प्रमाण जपान आणि जर्मनीमध्ये अनुक्रमे ११ आणि २५ टक्के इतके आहे.

अहवालातील ठळक निष्कर्ष

* ‘ऑनलाइन डिजिटल कंटेंट’च्या वापरात भारतीयांचा सहभाग सर्वाधिक आहे. सहभागी झालेल्यांपैकी ७८ टक्के भारतीय आठवडय़ातून किमान एकदा गाणी डाऊनलोड किंवा ऑनलाइन स्ट्रिमिंग करतात. अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. चित्रपट डाऊनलोड करून पाहणाऱ्यांतही भारतीयांची संख्या जास्त आहे.

* सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३५ टक्के भारतीयांनी शारीरिक तंदुरुस्ती व आरोग्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करत असल्याचे म्हटले. हे भारतीय फिटनेस गॅझेट किंवा अ‍ॅपल वॉचसारख्या उपकरणांना प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, आणखी ३३ टक्के भारतीयांनी अशाच उपकरणांची नजीकच्या काळात खरेदी करण्याची इच्छा दर्शवली आहे.

* एकीकडे इंटरनेटचा वापर करण्यात भारतीय आघाडीवर असले तरी ऑनलाइन सुरक्षितता आणि गोपनीयता याबाबत साशंक असलेल्या भारतीयांची संख्या (३६ टक्के) अन्य देशांच्या तुलनेत कमी आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीच्या जागतिक सरासरीनुसार ४५ टक्के ग्राहकांना आपल्या खासगी माहितीच्या गोपनीयतेबाबत चिंता वाटते तर ४२ टक्के ग्राहकांना उपकरणांतील डेटा हॅक होण्याची धास्ती आहे.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Survey on digital lifestyles two third indians are addicted to their phones
First published on: 12-07-2018 at 01:02 IST