आणीबाणी आंदोलनात सर्व विरोधी पक्षीय आणि संघटनांच्या स्त्री कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य स्त्रियांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता. बुलेटिन्स वाटणे, भित्तिपत्रके चिकटवणे, आंदोलन साहित्याचे वाटप करणे, प्रत्यक्ष सत्याग्रह करून तुरुंगात जाणे, भूमिगत कार्यकर्त्यांना घरात गुप्तपणे ठेवून घेणे अशा विविध कामांमध्ये स्त्रियांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला.

२६ जून १९७५. बरोबर चाळीस वर्षांपूर्वी या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली आणि लोकांच्या लोकशाही हक्कांवर गदा आणली.. संसद, न्यायालय, विरोधी पक्ष आणि वृत्तपत्रे या लोकशाहीच्या चारही स्तंभांना या काळात मूक बनवले गेले. विरोध करणाऱ्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांबरोबरच लाखभर कार्यकर्त्यांना अटक करून तब्बल एकोणीस महिने तुरुंगात डांबण्यात आले. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला.
या काळात संपूर्ण देशात कुणी ब्र देखील काढू नये अशी आटोकाट तजवीज करण्यात आली होती; तरीसुद्धा सर्व पक्षीय नेते आणि संघटनांनी आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह करून लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम केले, भारतातील लोकशाही इतकी लेचीपेची नसल्याचा संदेश पोहोचवला. वर्तमानपत्रांनी अग्रलेखाची जागा कोरी सोडून निषेध नोंदविला. ‘साधना’सारखी नियतकालिके निडरपणे काम करीत राहिली. या काळात सत्याग्रहांमुळे देशातील सर्व तुरुंग भरून गेले होते. महत्त्वाची बाब म्हणजे या आंदोलनात सर्व विरोधी पक्षीय आणि संघटनांच्या स्त्री कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य स्त्रियांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता. बुलेटिन्स वाटणे, भित्तिपत्रके चिकटवणे, आंदोलन साहित्याचे वाटप करणे, प्रत्यक्ष सत्याग्रह करून तुरुंगात जाणे, भूमिगत कार्यकर्त्यांना घरात गुप्तपणे ठेवून घेणे, त्यांच्या वास्तव्याबाबतच्या गुप्ततेची काळजी घेणे आणि तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना पैसे, जीवनावश्यक वस्तू आणि धीर पुरवणे अशा विविध कामांमध्ये स्त्रियांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला.
आणीबाणीपूर्व दोन वर्षे देशात अस्वस्थता होती. गुजरात आणि बिहारमध्ये जयप्रकाशजींचे ‘नवनिर्माण आंदोलन’ सुरू होते. १९७१च्या निवडणुकांमध्ये इंदिराजींनी प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप करून राजनारायण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला भरला होता. त्यात न्यायालयाने त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले. २५ जून १९७५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सभागृहाच्या कामकाजात आणि मतदानात भाग घेता येणार नाही असा निर्णय दिला. त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी जोर धरू लागली. इंदिरा गांधींच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष आणि संघटना एकवटल्या. जयप्रकाशजींनी पोलीस आणि सेनादले यांना चुकीच्या आज्ञा न पाळण्याचे आवाहन केले. यामुळे इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५ रोजी आणीबाणी घोषित केली. ती तब्बल एकोणीस महिने अमलात होती.
या काळामध्ये स्वातंत्र्याचा संकोच म्हणजे काय याचा प्रत्यय जनता, सरकारी नोकर, लेखक, कवी, पत्रकार, कलावंत आणि बुद्धिवादी यांना आला. या संपूर्ण काळात ‘मिसा’ आणि डी.आय.आर.खाली एकूण एक लाख लोक तुरुंगात होते. एस.एम. यांनी या लढय़ाला ‘दुसरा स्वातंत्र्यलढा’ असे संबोधले आहे. या संदर्भात उषा मेहता यांनी लिहिलेल्या ‘आणीबाणी आणि आम्ही’ या पुस्तकात या अद्वितीय लढय़ाच्या अनेक कहाण्या सापडतात.
सुरुवातीच्या ‘धक्क्या’मधून बाहेर पडल्यावर विरोधी पक्ष आणि संघटनांनी आणीबाणी विरोधात आंदोलन सुरू केले. त्यात समाजवादी, संघटना काँग्रेस, जनसंघ, युक्रांद, भारतीय क्रांती दल इत्यादी होते. त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना ‘मिसा’खाली राजबंदी बनविण्यात आले. त्याच दिवशी हुतात्मा चौकात सभा आयोजिली होती. आणीबाणी जाहीर झाली तरीदेखील, भर पावसात सभा झाली त्यात आचार्य कृपलानी,
स. का. पाटील, मृणाल गोरे, जयवंतीबेन मेहता यांनी भाषणे केली.
मृणाल गोरे नंतर भूमिगत झाल्या. बाहेर राहून त्या वेशांतर करीत, सतत मुक्काम बदलत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, पत्रलेखन यातून जे जाणीव जागृतीचं काम मृणालताई धडाडीने करत होत्या ते पाहून आपण विस्मित होतो. तब्बल सहा महिने त्या पोलिसांना हुलकावणी देत होत्या. या काळात त्यांनी भूमिगत चळवळीची भक्कम पायाभरणी केली. नंतर त्यांना अटक झाली. त्याकाळी स्त्रियांसाठी स्वतंत्र कोठडी नव्हती. मनोरुग्ण स्त्रियांच्या बरोबर ठेवून त्यांना मानसिक त्रासही देण्यात आला. प्रमिला दंडवते,
मंगल पारीख, कुसुम पारीख यांनी आझाद मैदानावरील केलेल्या सत्याग्रहात मिसा लागला. आणीबाणी विरोधात महिलांचा पहिला सत्याग्रह झाला, त्यात सुधाताई वर्दे, झेलम (वर्दे) परांजपे, विद्युत पंडित इत्यादी नऊजणी होत्या. काही ठिकाणी राजबंद्यांचा छळ केला गेला. पुणे-मुंबई सोडले तर त्यातून स्त्रियाही सुटल्या नाहीत. जयपूरच्या गायत्रीदेवींना कोठडीत डांबलं गेलं. गर्भवती स्त्रियांना खाटांना बांधून ठेवण्याचे भयंकर प्रकारही घडले. स्नेहलता रेड्डी तुरुंगातून सुटल्या पण लगेचच त्याचं निधन झालं. या आंदोलनाची माहिती देताना अंजली देशपांडे म्हणाल्या, ‘‘येरवडय़ाला तीनशे महिला सत्याग्रही होत्या. त्यात अहिल्या रांगणेकर, जयवंतीबेन मेहता, हंसाबेन राजदा, उषाबेन राजदा, नागपूरच्या सुमतीबाई सुकळीकर, कमल देसाई, कालिंदी फाटक, कृष्णाबाई निंबकर, वत्सला साठे या प्रथम वर्गात तर माझ्यासह शैला फडके, भारती पाटणकर, ज्योती दाते, रंजना कुलकर्णी, भारती ठाकूर या अभाविपच्या तरुण कार्यकर्त्यां होत्या.’’ अरुणा ढेरे स्वतंत्रपणे होत्या. अरुणाताईंनी लिहिलेल्या संहितेवर तुरुंगात विविध कार्यक्रम होत. प्रथम वर्गातील ज्येष्ठ नेत्या तसेच बाहेर असणारे द. मा. मिरासदार इत्यादी खाऊ देत. तुरुंगात मकरसंक्रांतीला कार्यकर्त्यांनी गुळाच्या पोळ्या आणून दिल्या होत्या. तुरुंगात अभ्यासवर्ग चालत. प्रा. पुष्पा भावे या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी या विषयावर बोलत. त्यातून शांताराम पंदेरे, राज कानिटकर, सेवादलातील मुलींनी पत्रके, ‘निर्भय बनो’चे बिल्ले लावणे सुरू केले. नंतर स्मिता वेल्हे, पद्माकर ओझे इत्यादींनी सत्याग्रह केला. गुजरातमधून अंजली बक्षी, पंजाबच्या विनय कपूर, बिहारच्या किरण घई, कर्नाटकातल्या इंदिराबाई या स्त्रिया विविध तुरुंगांमध्ये होत्या.
कुमुद करकरे ‘जनवाणी’ या साप्ताहिकाचे संपादन करीत. त्यांनी आणीबाणीच्या निषेधार्थ अनेक रोखठोक लेख लिहिले. नंतरही माधव साठे, नंदू धनेश्वर यांच्यासह विमलताई परांजपे यांनी ते काम सुरू ठेवले. ‘लोकसंघर्ष’मधून कार्यकर्त्यांच्या हालचालींविषयी माहिती असायची. हे अंक सुरक्षित ठेवण्यासाठी गृहिणींनी ते धान्याच्या डब्यात, कचराटोपलीच्या तळाशी ठेवणे अशा क्लृप्त्या केल्या. त्यातच एक अंक वीणा खुराणा यांच्या दवाखान्यात सापडला. त्यांना चार महिने तुरुंगवास भोगावा लागला. लीला वर्टी, शुभांगी जोशी, नलिनी पारकर, सुंदर नवलकर, ‘युक्रांद’च्या अश्विनी मरकडेय अशा अनेकजणी त्या वेळी तुरुंगात होत्या.
दुसरीकडे, तुरुंगात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या बायकांनी ज्या धैर्याने प्रसंगाला तोंड दिले, तेदेखील या आंदोलनातील त्यांचे योगदानच आहे. उषा मेहतांच्या पुस्तकात संजीवनी आंग्रे, स्नेहलता जाधव अशा गृहिणींची मनोगते आहेत. संजीवनी आंग्रे यांनी तर पतीला ‘‘तुम्ही तुमचे काम बाहेर सुरू ठेवा, मी जाते तुरुंगात,’’ असे म्हणून सत्याग्रहात भाग घेतला. स्नेहलता यांच्या मुलीने रात्री कॉलेज आणि दिवसा नोकरी करून घर चालविले. तसेच, मीना वैद्य या राजबंद्यांना पुस्तके, दिवाळीची भेटकार्डे देणे असा उपक्रम करत. मुंबई विद्यापीठात डॉ. हर्षदा पंडित, ताराबेन आणि रोहिणी गवाणकर हिंदी, मराठी आणि गुजराथी पत्रके वाटत. तसेच सत्याग्रहांसाठी पैसे जमवत. डॉ कुमार सप्तर्षी यांना वेशांतर करून गुजरातमध्ये जाण्यासाठी विजया देव यांनी त्यांची नवविवाहित पत्नी असल्यासारखा वेश करून साथ देण्याचे धाडस दाखवले. पुरुष तुरुंगात गेल्यावर बाहेरची आघाडी स्त्रियांनी मोठय़ा हिरिरीने लढवली. पैशांचे व्यवहार, पत्रकं पोहोचवणे, भूमिगत कार्यकर्त्यांना घरात धाडसाने लपवून ठेवणे, सीआयडीच्या चौकशीला धैर्याने तोंड देणे, अशी कामे त्यांनी केली. पोलीस घरात आले असले की बाहेर लाल रंगाची साडी वाळत घालायची, तोपर्यंत त्याने घरात यायचे नाही, अशा क्लृप्त्या महिलांनी केल्या. उल्लेख केलेल्या नावांशिवायही हजारो स्त्रियांनी या लढय़ाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोलाचे योगदान दिले.
साहित्यिकांमधील दुर्गा भागवत यांनी कऱ्हाडच्या साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत आणीबाणीचा प्रतीकात्मक निषेध केला. प्रेक्षकांमधून इंदुताई केळकर यांनी आणीबाणीच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. मनाई असूनही इंदुताईंनी पुण्यात गांधीजींच्या चित्रांचे प्रदर्शन लावले. त्याचे उद्घाटन एस. एम. जोशी यांनी केले होते. या लढय़ासंदर्भात भाई वैद्य यांचे उद्गार महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात, ‘‘आणीबाणीविरोधी लढय़ातून लोकशाहीचा एक पक्का धडा समाजाला मिळाला. समाजातला असंतोष जेवढा दडपला जातो, तेवढाच त्याचा उद्रेक तीव्रतेनं होत असतो, ही बाब सत्ताधाऱ्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे.’’ जनता पक्षाने
नंतर आणीबाणी लादण्यासंबंधीच्या तरतुदीत सुधारणाही केल्या.स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने दिलेल्या या अभूतपूर्व लढय़ाची वेगळी नोंद इतिहासाने घ्यायला हवी.
anjalikulkarni1810@gmail.com

sassoon hospital marathi news
ऑपरेशन ‘ससून’! अधिष्ठात्यांना डावलून थेट आयुक्तांनी हाती घेतली सूत्रे
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
shivpal yadav
समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; बदायूमधून कोणाला मिळणार उमेदवारी?