19 January 2021

News Flash

व्यवस्थापन

रोजच्या व्यवस्थापनाचं पुरेसं ज्ञान किंवा आवड नसली तर माणूस काही मरत नाही.

प्रतिनिधिक छायाचित्र

अनिल भागवत

लग्नानंतरच्या आयुष्यात मुलगा किंवा मुलगी काय काम करतात याची चौकशी नक्की होते. मुलग्यांच्या करिअरला फारच महत्त्व असतं. लग्न ठरवतानाही हा प्रश्न असतो. आपल्या करिअरमध्ये जे टप्पे असतात त्यातले फारच कमी आपण नियोजनपूर्वक आखलेले असतात. बऱ्याचशा गोष्टींच्या मनात योजना असतात, पण प्रत्यक्षात निराळ्याच गोष्टी घडत असतात. मग लोक मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी थांबून राहतात. अमुक गोष्ट होईपर्यंत इतर बरंच काहीतरी थांबवलेलं, अशा अवस्थेत दिवस, महिने, वर्ष निघून जातात. मुळात वय २५ ते ५० हा करिअरमधला महत्त्वाचा काळ असतो. त्यातली अशा थांबण्यात बरीच वर्ष गेली हे पन्नाशीच्या पुढे लक्षात येतं किंवा तेही राहून जातं. वैवाहिक जीवनाव्यतिरिक्त रोजच्या आयुष्यामध्ये जबाबदारीने वागण्याची जरूर नाही असा काळच नसतो आणि त्याची समज म्हणजेच व्यवस्थापनशास्त्र हे एकदा समजलं की पुढचा भाग पटणं सोपं होतं. त्यातले मुद्दे ओळीने सांगतो-

* जगात स्वतंत्र, मूलभूत विचार करू शकणाऱ्यांची संख्या अगदी कमी ०.०१ टक्के असते. तेच खरं म्हणजे जग चालवतात. बाकीच्यांनी यात वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. त्यांचीही खूप गरज असते.

* व्यवस्थापनशास्त्रला सगळ्या चांगल्या गुणांची कदर आहे, पण सर्वश्रेष्ठ गुण कुठचा? भरवशाचं माणूस असण्याचा. भरवशाचं माणूस असणं म्हणजेच सतत जबाबदारीने वागणं. याचा अर्थ म्हणजे स्वत:चा आणि दुसऱ्याचा विचार करून कृती करणं. हा अर्थ लोकांना समजत नाही म्हणून सगळी धडपड आहे. हा सगळा ‘क्वॉलिटी लाइफ’ या लोकप्रिय कल्पनेचा मार्ग आहे. तुम्ही अशी कल्पना करा की एखादी खूप हुशार, विद्वान व्यक्ती आहे. त्या व्यक्तीची फक्त एकच अडचण आहे. ती व्यक्ती ठरल्याप्रमाणे ठरल्या ठिकाणी हजर होईल का नाही, हे सांगता येत नाही. थोडक्यात, ती व्यक्ती भरवशाची नाही, त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीवर अवलंबून राहता येणार नाही. खरं म्हणजे तिचा काही उपयोग नाही, त्या व्यक्तीच्या ज्ञानाचा, हुशारीचा काही फायदा नाही.

* दिवस, वेळा ठरवताना विचार करूनच शब्द द्यावा. उदाहरणार्थ ५ तारखेला किंवा जास्तीत जास्त ७ तारखेपर्यंत, दुपारी ४ ते ४.१५ पर्यंत पोचतो वगैरे. जो माणूस वक्तशीर असतो त्याला एक गोष्ट जमलेली असते. त्याच्याकडे ‘माफ करा, पण मला आता निघालं पाहिजे’ असं म्हणण्याचं धाडस असतं. हे धाडस नसल्याने अनेक माणसं पुढच्या ठिकाणी ठरल्यापेक्षा उशिरा जातात. एक निराळीच गोष्ट सांगतो. मोबाइलमुळे आपण कोणालाही केव्हाही गाठू शकतो असा समज झाला. त्यामुळे ‘प्लानिंग’ नावाच्या कल्पनेला डच्चू मिळाला. प्रत्यक्षात ‘प्लानिंग’ न समजल्यामुळे विवाहानंतरच्या आयुष्यात ठिणग्या पडतात. आपण दुसऱ्याला शब्द दिलेला असेल तर तो पाळण्याचं प्रमाण १०० टक्के पाहिजे. त्यात बदल असला तर तो कळवण्याचं प्रमाण १०० टक्के पाहिजे. तरच स्वत:ला भरवशाची व्यक्ती म्हणता येईल. माणसाला कारणासकट शांतपणे दिलेला नकार चालतो, पण उलगडा मात्र लागतोच लागतो. व्यवस्थापनशास्त्राने एकच खात्रीचा उपाय सांगितलाय. तो म्हणजे कागदावर नोंद. म्हणजेच खिशातली डायरी आणि पेन. त्याने उत्तम प्लानिंग करता येतं. लोकांच्या मनातला आणखी एक प्रश्न मला माहिती आहे. डायरीवर खूप अवलंबून राहिल्यामुळे स्मरणशक्ती वापरायची सवय गेली म्हणजे? प्रत्यक्षात तसं होत नाही. लिहिल्यामुळे लक्षात ठेवायला जास्त मदत होते. त्याखेरीज दुसरं असं की, ज्या माणसाला फारसं महत्त्वाचं, लक्षात ठेवायलाच हवं असं फारसं काही नसेलच त्यांनी डायरी वापरावी असं आपण कुठे म्हणतो आहोत? कामं वाढली की डायरीची गरज असते. आणि तरी ज्याला आत्मसन्मान दुखावलेला चालत असेल, बोलणी खाल्लेली चालत असतील त्यांनी खुशाल अपमान ‘एन्जॉय’ करावा असंच आपण म्हणतोय.

* तोंडी सूचनेने वेळ वाचतो असं वाटतं, पण गैरसमज आणि विस्मरण या दोन शत्रूंचं काय? या दोन्हींमुळे अनेक पटीने वेळ वाया जातो. नोंदी करण्यामुळे आणि त्या बघण्याच्या सवयीमुळे वेळ पाळण्याच्या बाबतीतही माणूस पक्का होतो. एक गोष्ट नक्की आहे. शिस्त कमी पडली, रोजच्या व्यवस्थापनाचं पुरेसं ज्ञान किंवा आवड नसली तर माणूस काही मरत नाही. पण प्रश्न सन्मानाने जगण्याचा असतो. आणि तरी शेवटी एक म्हण इंग्रजीतून नेहमी लक्षात ठेवण्याजोगी सांगतो, ‘अ जर्नी ऑफ थाउझंड माइल्स स्टार्टस विथ अ सिंगल स्टेप’.

hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2018 1:01 am

Web Title: life after marriage responsibly after marriage planning after marriage
Next Stories
1 वैवाहिक आयुष्यातलं व्यवस्थापन
2 वैवाहिक आयुष्य आणि करिअर
3 पैशांबद्दलची मानसिकता
Just Now!
X