13 December 2017

News Flash

.. होंगे कामयाब

आईबापांनी नाकारणं हे समलैंगिक माणसांचं सर्वात मोठं दु:ख आहे

चित्रा पालेकर | Updated: August 5, 2017 2:04 AM

दरवर्षी जानेवारीमध्ये मुंबईत ‘एलजीबीटीक्यू’ची ‘प्राइड परेड’ होते. (छायाचित्र ‘क्युग्राफी’ कडून साभार)

समलैंगिकतेविषयी समाज मुंगीच्या पावलानं का होईना बदलत चाललाय.. निदान पुण्या-मुंबईसारख्या शहरात !
दरवर्षी जानेवारीमध्ये मुंबईत ‘एलजीबीटीक्यू’ची ‘प्राइड परेड’ होते. या अभिमान-मिरवणुकीसाठी केवळ इतर शहरांतलेच नाही तर दूरदूरच्या छोटय़ा गावांतूनदेखील समलैंगिक माणसं येतात.. मुखवटय़ांमागे चेहरे न लपवता, अभिमानाने रस्त्यावरून चालतात. ‘प्राइड परेड’ व ‘काशिश’ अनुभवताना माझ्या मनात एकच गाणं घुमत राहतं.. हम होंगे कामयाब एक दिन.. ‘एलजीबीटीक्यू’ या विषयावरचा हा चौथा व अंतिम लेख..

दिल्ली उच्च न्यायालयाने २००९ मध्ये कलम ३७७ मध्ये बदल करून समलैंगिकांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आनंदोत्सवाला उधाण आलं. विरोधक या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतरदेखील उत्साहावर सावट आलं नाही. या निकालावर सर्वोच्च न्यायालय शिक्कामोर्तब करेल, असं माझ्यासकट सर्वानी गृहीत धरलं होतं. मात्र, ‘एलजीबीटीक्यू’ चळवळीतले कार्यकर्ते आत्मसंतुष्ट होऊन स्वस्थ बसले नाहीत. ‘आपल्यावरील अन्यायाचं मूळ जसं कलम ३७७ मध्ये आहे, तसंच ते धर्म व समाज यातल्या पूर्वग्रहामध्येदेखील आहे. जोवर समाजाची मानसिकता बदलत नाही तोवर केवळ कायदा बदलून काय उपयोग? समाजाने आपल्याला स्वीकारल्याशिवाय आपल्या दैनंदिन आयुष्यात फरक पडायचा नाही’- अशा विचाराने, (कायदेशीर झगडा सुरू असतानाच) समाजाची मानसिकता बदलण्यासाठी अनेक योजना त्यांनी आखल्या. यात ‘हमसफर ट्रस्ट’चा पुढाकार होता.

वास्तविक, ‘हमसफर’ने समलैंगिक पुरुषांना लैंगिकता व लैंगिकसुरक्षा याबद्दल समुपदेश करण्याचं काम मुंबईत ९०च्या दशकापासूनच सुरू केलं होतं. पुढे ते छोटय़ा गावांपर्यंतही नेलं. शिवाय, कामाचा परीघ वाढवत ‘एलजीबीटीक्यू’तल्या सर्वच घटकांना समुपदेश व मानसिक पाठिंबा मिळण्याची सोय त्यांनी केली. २०१०मध्ये, समलैंगिकांचा ज्या क्षेत्रांशी वा यंत्रणांशी सातत्याने संबंध येतो, त्यातल्या कर्मचाऱ्यांना अधिक संवेदनशील कसं बनवता येईल यावर विचारविनिमय करण्यासाठी ‘हमसफर’ने एक चर्चासत्र आयोजित केलं, ज्याला मी हजर होते. या चर्चासत्रात वरिष्ठ पोलीस अधिकारी, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, वकील, पत्रकार इत्यादींचा सहभाग होता. समलैंगिकांनी त्यांना आपले कटू अनुभव सांगितले व सर्वानी मिळून त्यावर चर्चा केली.

देशी भाषांतल्या कित्येक वर्तमानपत्रांत समलैंगिकांविषयी चुकीचं रिपोर्ताज केलं जातं; गलिच्छ, अपमानास्पद भाषा वापरली जाते, यावर मार्ग काढण्याच्या उद्देशाने एक कार्यशाळा घेतली गेली. त्यात सामील होण्यासाठी ‘एलजीबीटीक्यू’बद्दल सहनुभूती बाळगणारे पत्रकार केवळ मुंबईतून नाही तर देशातल्या इतर भागांतूनही आले होते. छापून आलेले बरेच मजकूर तिथे उदाहरणादखल वाचण्यात आले, तेव्हा समलैंगिकांविषयीचा द्वेष निरनिराळ्या देशी भाषांतल्या शिव्यांमधून कानात शिरला व मला अक्षरश: भाजून गेला. अशा खासगी स्वरूपाच्या कार्यक्रमांतून त्या ‘वेगळ्या’ विश्वाच्या ज्या विविध बाजू मी पाहिल्या, त्या एरवी दिसणं कठीण होतं.

२००९ च्या निकालानंतर थोडय़ाच दिवसांनी माझ्या मुलीची मैत्रीण शोभना कुमार मला एका ‘सेलिब्रेशन’ पार्टीला घेऊन गेली. पालकांच्या शपथपत्रिकेवर मी नुकतीच सही केली होती. ही ओळख ऐकताच अनेक समलैंगिक तरुण-तरुणींनी मला अक्षरश: मिठी मारली. एकजण म्हणाला, ‘‘माझ्या आईबापांनी मला धिक्कारलं.. पण तू माझ्या बाजूने उभी राहिलीस.’’ तो गोड हसला. माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं. असे वेगवेगळे अनुभव घेतल्यावर, यापुढे चळवळीला केवळ नैतिक नाही तर सक्रिय पाठिंबा देण्याचा मी निर्धार केला. नाटक-चित्रपटांतल्या कामामुळे वर्तमानपत्रांना व टीव्ही वाहिन्यांना मुलाखती देणं माझ्यासाठी कठीण नव्हतं. पण त्यात काही ठरावीक प्रश्नच विचारले गेल्याने बऱ्याच गोष्टी राहून जात. तेवढय़ात एका मैत्रिणीने ‘रोटरी क्लब’मध्ये बोलण्याची विनंती केली. तिथे समोर निरनिराळ्या क्षेत्रांत नावाजलेले लोक पाहिल्यावर क्षणभर पोटात गोळा आला. पण सुरुवातीलाच मी सांगितलं की मी तज्ज्ञ म्हणून नाही, आई म्हणून स्वत:चे अनुभव सांगणार आहे. चाळीस मिनिटांनी मी बोलायची थांबले, तेव्हा प्रेक्षकांत सुन्न शांतता पसरली होती. काही क्षणांनंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. माझं म्हणणं श्रोत्यांपर्यंत पोहोचल्याची ती ग्वाही होती. त्यानंतर छान प्रश्नोत्तरं झाली. श्रोत्यांपैकीच एका डॉक्टरांनी तर ‘समलैंगिकते’ला पाठिंबा देणारी वैज्ञानिक माहिती इतरांना दिली. तिथून पुढे मी अनेक संस्थांची आमंत्रणं स्वीकारली. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. मुख्यत: आई म्हणूनच बोलत असले तरी इतर माहिती देत, चुकीच्या कल्पना खोडून काढत, पूर्वग्रह दूर करण्याचे प्रयत्न करू लागले.. अजूनही करते.

आईबापांनी नाकारणं हे समलैंगिक माणसांचं सर्वात मोठं दु:ख आहे, हे मी पूर्वीपासून जाणत होते. ‘‘तुमचे लेख वाचून, तुम्हाला टीव्हीवर ऐकून माझ्या आईवडिलांचा विरोध बराच कमी झाला. पण त्यांच्या मनात अजूनही खूप शंका आहेत. भीतीदेखील आहे.’’ असं एकाने म्हटल्यावर मला वाटलं, अशा आईबापांशी प्रत्यक्ष बोलून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न मी का करू नये? ही कल्पना मी, शोभनाने  ‘हमसफर’च्या विवेक आनंदसमोर मांडल्यावर त्यांनी समजावलं, ‘‘हे काम अतिशय संवेदनशील असून त्यात प्रचंड गुप्तता राखावी लागते. त्याशिवाय, मुलांनी आपण समलैंगिक असल्याचं आईबापांशी स्वत:हून उघड करणं फार महत्त्वाचं. तसं होण्यापूर्वी पालकांशी बोलणं चुकीचंच नाही तर घातकदेखील ठरू शकतं. तेव्हा या कामासाठी व्यावसायिक समुपदेशक असणं आवश्यक आहे.’’ हे ऐकल्यावर मी काहीशी निराश झाले. पण यातून अखेरीस शोभनानेच मार्ग काढला.

शोभनाची ‘क्वीर-इंक’ नावाची कंपनी आहे. ‘एलजीबीटीक्यू’ लेखकांचं साहित्य तसंच इतरांनी या माणसांविषयी केलेलं लिखाण प्रकाशित करणं, त्यावर चर्चा घडवणं, समलिंगी व विषमलिंगी साहित्यिकांना एकत्र आणणं हे या कंपनीचं मुख्य उद्दिष्ट होतं. तिने सुचवलं की, parents@queer-ink.com अशा ई-मेल आयडीद्वारे मी काम करावं. आजवर माझ्याशी संपर्क साधलेल्यांपैकी बरीच मुलं परदेशी शिकत असून त्यांचे आईबाप मुंबईत राहतात. परंतु छोटय़ा गावांतून शिक्षणासाठी मुंबई-पुण्यात आलेल्या, मानसिक गोंधळ व निराशा यांनी ग्रस्त असलेल्या समलैंगिक मुलांची संख्या अधिक असते. त्यांनी आईबापांना स्वत:बद्दल खरं सांगावं, यासाठी मी प्रोत्साहन देते, पण ‘हे कर ते कर’ असे सल्ले देत नाही. मी समुपदेशक नाही, हे सुरुवातीलाच स्पष्ट करते. मात्र ‘आत्महत्या करावीशी वाटते’, ‘घरच्यांकडून मारहाण होते’, अशा प्रकारचे उल्लेख इमेलमध्ये आढळल्यास लगेच ‘हमसफर’चा पत्ता, फोन नंबर इत्यादी देऊन त्यांच्याशी तातडीने संपर्क साधण्याचा सल्ला देते. जेव्हा पालक भेटायला तयार असल्याचं एखादा मुलगा कळवतो, तेव्हा त्या आईवडिलांना भेटून त्यांचं सर्व म्हणणं आधी ऐकून घेते. मग स्वत:चे अनुभव सांगत त्यांच्या शंकांचे निरसन करते. शेवटी एकच प्रश्न विचारते – ‘‘आपल्याला अधिक महत्त्वाचं काय वाटतं? इतर माणसं म्हणतील ते, की आपल्या मुलांवरचं प्रेम?’’ एखाद्या पालकाच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह लुप्त होऊन तिथे फक्त प्रेम उरतं, तेव्हा मी खरोखर आनंदाने, समाधानाने फुलून येते.

आईबापांनी मुलांना स्वीकारावं यासाठी आज खूप काम चाललं आहे. ‘हमसफर’ने समुपदेशकांसाठी ‘स्ट्रेंग्दनिंग ब्रिजेस’ नावाची सूचिका तयार केली आहे. पुण्यात बिंदूमाधव खिरेंचा ‘समपथिक ट्रस्ट’ समुपदेशनाचं काम करतो, तसंच समलैंगिक विषयांवरील माहिती देणारी पुस्तकं मराठीत प्रकाशित करतो. समलैंगिक मुलं व पालक यांच्यात अनुभवांची देवाणघेवाण व्हावी, यासाठी ‘गे बॉम्बे’ हा ग्रुप मुंबईत दरवर्षी मेळावा भरवतो. पण सर्व कार्यक्रमांत एक विरोधाभास मला सतत जाणवतो.. मी लेस्बियन मुलीची आई या नात्याने या समाजात वावरत असते, पण आजतागायत एकाही समलैंगिक मुलीने ई-मेलवर माझ्याशी संपर्क साधलेला नाही. कुठल्याही कार्यक्रमात ‘लेस्बियन’ मुलींचा सहभाग ‘गे’ मुलांच्या मानाने फार कमी असतो. अगदी खासगी, सुरक्षित ठिकाणीदेखील या मुलींचे पालक अपवादानेच सहभागी होतात.

तरीही मी मानते की, समाज मुंगीच्या पावलानं का होईना बदलत चाललाय.. निदान पुण्या-मुंबईसारख्या शहरात! दरवर्षी जानेवारीमध्ये मुंबईत ‘एलजीबीटीक्यू’ची ‘प्राइड परेड’ होते. या अभिमान-मिरवणुकीसाठी केवळ इतर शहरांतलेच नाही तर दूरदूरच्या छोटय़ा गावांतूनदेखील समलैंगिक माणसं येतात.. मुखवटय़ांमागे चेहरे न लपवता, अभिमानाने रस्त्यावरून चालतात. त्यांची चेष्टा-टवाळी न करता, शांतपणे त्यांना पहात, लोक रस्त्याच्या बाजूला उभे असतात. २०१३ च्या निकालानंतर स्त्रिया, कामगार, वकील इत्यादीं घटकांनी ‘परेड’मध्ये भाग घेत आपला पाठिंबा जाहीर केला. समलैंगिक मुलांचे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांचा सहभाग वाढत चालला आहे. सर्वात महत्त्वाचं, हल्ली कित्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संस्था ‘एलजीबीटीक्यू’ माणसांना न्याय व समान हक्क मिळावेत यासाठी मिरवणुकीत सहभागी होत आहेत.

मे महिन्यात श्रीधर रंगायन ‘काशिश’ नावाच्या आंतरराष्ट्रीय’ क्वींर’ चित्रपट महोत्सवाचं आयोजन करतो. २०१०त खूप छोटय़ा प्रमाणावर सुरू झालेला ‘काशिश’ आता आशियातला सर्वात मोठा ‘क्वींर’ चित्रपट महोत्सव मानला जातो. देशोदेशीचे उत्कृष्ट चित्रपट यात दाखवले जातात व तेही ‘लिबर्टी’सारख्या भव्य, प्रतिष्ठित चित्रपटगृहात! चार-पाच दिवस या वास्तूत व तिच्या परिसरात उत्साह ओसंडून वाहतो. इथे जमलेल्यांत, ‘एलजीबीटीक्यू’ समाजातले तसंच या समाजाचा भाग नसलेले, असे सर्व तऱ्हेचे चित्रपटप्रेमी दिसतात. सर्वजण एकमेकांचे वेगळेपण सहज सामावून घेत असतात.

‘प्राइड परेड’ व ‘काशिश’ अनुभवताना माझ्या मनात एकच गाणं घुमत राहतं..

हम चलेंगे साथ साथ.. डाले हाथो में हाथ..

हम चलेंगे साथ साथ एक दिन..

मन में है विश्वास.. पूरा है विश्वास..

हम होंगे कामयाब एक दिन..

चित्रा पालेकर chaturang@expressindia.com

 

First Published on August 5, 2017 2:04 am

Web Title: article on lgbtq pride parade
टॅग LGBTQ Pride Parade