|| महेश सरलष्कर

मोदींच्या प्रचाराची दिशा राष्ट्रवाद, देशद्रोह आणि गांधी कुटुंबाचा भ्रष्टाचार अशी राहिली आहे. मोदींनी आक्रमक प्रचार करूनही काँग्रेसने कुठेही बचावात्मक पवित्रा घेतलेला नव्हता. मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर मात्र काँग्रेस हतबल झाल्याचे दिसत आहे.

दिल्लीमध्ये मतदान झालेले आहे आणि पंजाबमध्ये पुढील आठवडय़ात (१९ मे) होणार आहे. दोन्ही राज्यांच्या मिळून २० जागा आहेत. दिल्लीमध्ये सात, तर पंजाबमध्ये १३ लोकसभा मतदारसंघ आहेत. २०१४ मध्ये दिल्लीतील सातही जागा भाजपने जिंकल्या होत्या. तर पंजाबमध्ये भाजप आघाडीला सहा, ‘आप’ला चार आणि तीन जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. दोन्ही राज्यांमधील जागा कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबाविरोधात आक्रमक शाब्दिक हल्ला केल्याचे मानले जात आहे. दिल्ली आणि पंजाबमधील शीख मतदारांना डोळ्यासमोर ठेवून १९८४च्या शीखविरोधी दंगलीचा उल्लेख मोदी भाषणात करत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या प्रचाराची विभागणी तीन मुद्दय़ांमध्ये करता येईल. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मोदींनी पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून केलेली कारवाई या मुद्दय़ावर भर दिलेला होता. बालाकोटमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याचे राजकीय धाडस कसे केले गेले याची सविस्तर माहिती मोदी प्रचार सभेत देत होते. त्यांच्या सांगण्याचा उद्देश होता की, पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज होती. काँग्रेस सरकारच्या काळात नेतृत्व कमकुवत होते. काँग्रेसच्या काळात भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइक केलेही असतील पण, त्याची राजकीय जबाबदारी स्वीकारण्याची हिंमत काँग्रेसकडे नव्हती. ‘एनडीए’ सरकारने ती हिंमत दाखवली. मोदी जेव्हा ‘एनडीए’ सरकार म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ खुद्द मोदी असाच असतो! दहशतवादाचा धोका, त्याविरोधात दाखवलेली लष्करी ताकद, सैनिकांच्या धैर्याचे कौतुक या सगळ्या मुद्दय़ांचा आधार घेत मोदींनी ‘राष्ट्रवादा’चे बाळकडू मतदारांना पाजले.

मोदी प्रचारात ‘राष्ट्रवाद’ आणत राहिले तरी, विरोधी पक्षांनी बेरोजगारी, नोटाबंदी, गरिबांची मिळकत, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विकासाच्या मुद्दय़ाला धरून प्रचार केला. पुलवामा आणि बालाकोटच्या आधारे ‘राष्ट्रवादा’चा प्रचार सातत्याने करून ‘मत’ परिवर्तन होऊ शकत नाही हे भाजपच्या लक्षात आले. राष्ट्रवादाच्या जोडीला हिंदूुत्वाचा मुद्दा होताच. योगी आदित्यनाथ आणि इतर भाजपनेते ‘त्यांचा अली आणि आमचा बजरंगबली’ अशी विधाने जाणीवपूर्वक करून मतांचे ध्रुवीकरण करत होते. राष्ट्रवाद आणि हिंदुत्ववादातून हिंदूंची मते निश्चित करण्याचा प्रयत्न केला जात होता. पण काँग्रेसच्या ‘चौकीदार चोर है’ या नाऱ्याला प्रतिवाद करता येत नव्हता. या नाऱ्यामुळे काँग्रेसने मोदींची अडचण केलेली होती. त्याशिवाय, काँग्रेसने जाहीरनाम्यात ‘न्याय योजना’चा समावेश करून भाजपच्या विकास योजनांवर पाणी फेरले. सर्वात गरीब वीस टक्के कुटुंबांना वार्षिक ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये सत्ता मिळताच काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीही लागू केली आहे. एक प्रकारे काँग्रेसने विकासाच्या मुद्दय़ावर भाजपवर मात केल्याचे दिसले. त्यामुळे मोदींनी प्रचारात विकासाच्या मुद्दय़ाला बगल दिली असावी.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील कथित ‘राष्ट्रविरोधी’ मुद्दय़ांमुळे मोदींनाही प्रचाराचा नवा मुद्दा मिळाला. अफ्स्पा कायद्यात सुधारणा करण्याचे आणि राजद्रोहाचा कायदा रद्द करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिलेले आहे. या मुद्दय़ांच्या आधारावर मोदींनी काँग्रेसला देशद्रोही ठरवले. काँग्रेसने पाकिस्तानशी हातमिळवणी केलेली असून ही ‘टुकडे टुकडे गँग’ देशाची फाळणी करू शकेल असा ‘निष्कर्ष’ काढला गेला. याच निष्कर्षांच्या आधारावर मोदींनी प्रचाराची दिशा बदलली आणि मोदी काँग्रेसविरोधात अधिक आक्रमक झाले. काँग्रेसने राफेल प्रकरणावर मोदींवर दबाव वाढवल्यामुळे ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीतील कथित भ्रष्टाचाराभोवती मोदींनी प्रचार गुंफला. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणातील दलाल ख्रिश्चन मिशेलविरोधातील आरोपपत्र माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आले. या आरोपपत्रात ‘मिसेस गांधी’ असा उल्लेख असल्याने मोदींनी थेट गांधी कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ‘चौकीदार चोर है’ या नाऱ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणाचा उचित वापर केल्याचे पाहायला मिळाले. मोदींच्या प्रचाराची दिशा राष्ट्रवाद, देशद्रोह आणि गांधी कुटुंबाचा भ्रष्टाचार अशी राहिली आहे. मोदींनी आक्रमक प्रचार करूनही काँग्रेसने कुठेही बचावात्मक पवित्रा घेतल्याचे दिसले नाही. मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर मात्र काँग्रेस हतबल झाल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यांमध्ये मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप केलेले आहेत. मोदी थेट राजीव गांधींवर आरोप करतील याची यत्किंचितही कल्पना नसल्याने बेसावध काँग्रेसला स्वत:चा बचाव कसा करायचा हेच समजेनासे झाले आहे. त्यात सॅम पित्रोडा यांच्यासारखे बोलघेवडे नेते काँग्रेसच्या अडचणीत अधिक भर घालत आहेत. उत्तर प्रदेशात अमेठीच्या शेजारील प्रतापगढ लोकसभा मतदारसंघातील प्रचारसभेत मोदींनी बोफोर्सच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा उकरून काढला. या प्रकरणामुळे राजीव गांधी यांचे आयुष्य ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ या आरोपातच संपले, असा अत्यंत विखारी प्रचार करून मोदींनी गांधी कुटुंबाला नाउमेद करण्याचा प्रयत्न केला. मोदींनी सातत्याने राजीव गांधींना लक्ष्य बनवलेले आहे. राफेल प्रकरणाआधी मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नव्हते. राफेल विमान खरेदीत मोदींनी हस्तक्षेप केला आणि उद्योजकाचा आर्थिक लाभ करून दिल्याचा आरोप काँग्रेसने मोदींवर केल्यामुळे ‘स्वच्छ पंतप्रधान’ या मोदींच्या प्रतिमेला तडा गेला. राजीव गांधी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख करून राफेल प्रकरणाची परतफेड करण्याचा प्रयत्न मोदींनी केल्याचे दिसते.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलींचाही उल्लेख मोदींनी जाहीर भाषणांमधून केला. मोठा वृक्ष कोसळतो तेव्हा भूकंप होतोच, या विधानाचा आधार घेत मोदींनी शीखविरोधी दंगलींना अप्रत्यक्षपणे राजीव गांधी जबाबदार असल्याचा आरोप केला. यूपीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शीखविरोधी दंगलीबद्दल माफी मागितली असली तरी दंगलग्रस्तांना न्याय मिळाला नाही. एनडीए सरकारच्या प्रयत्नांमुळे काँग्रेसचे माजी मंत्री आणि दंगलीतील आरोपी सज्जनकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. काँग्रेस न्याय देण्याची भाषा करत असला तरी दंगलग्रस्तांना न्याय का देऊ शकला नाही, असा सवाल मोदींनी उपस्थित केला आहे. शीखविरोधी दंगलीत कमलनाथ यांचाही सहभाग असल्याचे मानले गेले होते. त्यानंतर पंजाबचे प्रभारीपद कमलनाथ यांच्याकडून काढून घेतले गेले. हेच कमलनाथ आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनले असल्याचा मुद्दाही मोदींनी उपस्थित केला आहे. कौटुंबिक सहलीसाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ‘आयएनएस विराट’ या देशाच्या युद्धनौकेचा वैैयक्तिक लाभासाठी वापर केल्याचा आरोप मोदींनी केला. मोदींनी राजीव गांधी आणि काँग्रेसवर एकामागून एक आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत पण, त्यापैकी कुठल्याच आरोपांना काँग्रेसला तगडे प्रत्युत्तर देता आलेले नाही.

भाजपला २०१४च्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करता येणार नाही असे आता मानले जाऊ लागले आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्येही भाजपच्या जागा मोठय़ा प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल या राज्यांमधील जागा टिकवून धरणे भाजपसाठी क्रमप्राप्त आहे. शीखविरोधी दंगलीमुळे आजही दिल्ली आणि पंजाबमधील शीख समुदाय राजीव गांधी आणि काँग्रेस विरोधात आहे. शीख मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी मोदींनी राजीव गांधी यांना प्रचारात ओढून आणलेले दिसते.

mahesh.sarlashkar@expressindia.com