News Flash

अंत:प्रेरणा महत्त्वाची!

प्राण्यांचे अस्तित्व बऱ्याच प्रमाणावर अंत:प्रेरणेवर अवलंबून असतं. मानवालाही अंत:प्रेरणा असतात. मात्र आपल्याला त्या तंतोतंत उमगतात का? अंत:प्रेरणेचं भान आपल्याला कसं येऊ शकेल?

| March 18, 2015 08:08 am

* अंत:प्रेरणा म्हणा किंवा ‘सिक्स्थ सेन्स’ म्हणा, हा एक तर नसíगक असतो किंवा तो प्राप्त करावा लागतो. या अंत:प्रेरणेमुळे वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करणं सोपं जातं. एखादा अवघड निर्णय घेणंही यामुळे शक्य होतं. नातेसंबंधांमध्ये योग्य ती भूमिका घेण्यास मदत होते आणि अर्थातच करिअरचा मोठा पल्ला गाठायलाही याचा उपयोग होतो. 

* अंत:प्रेरणा म्हणजे कुठल्याही व्यक्ती अथवा परिस्थितीला दिलेली पहिली प्रतिक्षिप्त क्रिया असते. आपली अंत:प्रेरणा ही त्या संदर्भातल्या इतर अनुभवांशी कळत-नकळत केलेल्या तुलनेवर अवलंबून असते. भूतकाळावर आधारित आणि वर्तमान-भविष्य काळावर त्या गोष्टीचा कसा परिणाम होईल, यावर आपली प्रतिक्रिया अवलंबून असते.
* लहानपणी आपले पालक आपल्याला योग्य-अयोग्य, चांगलं-वाईट, काय स्वीकारावं-काय नाकारावं याबद्दल शिकवतात. त्यानंतर मेंदूत या माहितीवर प्रक्रिया होते आणि ही मूल्यं आठवण म्हणून मेंदूत साठवली जाते. आपल्या पालकांची मूल्यव्यवस्था जशी असेल तशीच आपली बनते. ही गोष्ट एका परीने योग्य तर एका दृष्टीने अयोग्यही आहे.
* आपण भय वाटेल, असे चित्रपट बघतो. आपण भुताखेतांवर विश्वास ठेवतो. सासू-सुनेच्या मालिका पाहतो आणि त्यात आपलं कुटुंब आपण पाहतो. चित्रपटासारखं आपल्यालाही वाटतं की, चांगले लोक चांगले दिसतात आणि खलनायक वाईटच दिसतात. यामुळेच अनेकदा चांगला पेहराव करून मधाळ बोलत वाईट प्रवृत्तीचे लोक आपला विश्वास संपादन करत आपल्याला लुटतात.
* असं मूर्खासारखं वागल्याने आपल्या अंत:प्रेरणा कमकुवत बनतात. पण जर वास्तव, सकारात्मक विचार आणि कृती यामुळे तुमच्या अंत:प्रेरणाही सुधारतात. अर्थात आपणही चित्रपट बघावेत, फिक्शन वाचावं, गॉसिप करावं.. पण या सगळ्याबद्दल तुम्ही दक्ष असायला हवं आणि कशावर किती वेळ घालवायचा हेही तुम्हाला कळायला हवं.
* भूल पाडणारं व्यक्तिमत्त्व, एखाद्याचा धर्म, वर्ण अशा पूर्वग्रहदूषित, एककल्ली गोष्टींपासून तुम्ही स्वत:ला मुक्त केलंत तर तुमच्या अंत:प्रेरणाही योग्य राहतील. इतरांचा सल्ला आंधळेपणाने स्वीकारू नका. त्याऐवजी तुम्ही तुमचा आत्मविश्वास वृिद्धगत करा. तुमच्या अंत:प्रेरणेला स्वीकारून वाटचाल करत राहा. धीराने पुढे सरकत राहा. कारण तुमच्या अंत:प्रेरणा परंपरेच्या हुशारीच्या चौकटी ओलांडून पुढे जाणाऱ्या असतात. आपल्या अंत:प्रेरणा आपण जितक्या उपयोगात आणतो, तितक्या त्या उत्तम आणि योग्य ठरत असतात.
* योग्य रीतीने विकसित केलेली अंत:प्रेरणा फक्त आपलं अस्तित्व टिकवायला मदत करते असं नाही तर ती आपलं जगणं अधिक यशस्वी बनवते. यशस्वी व्यक्ती आपल्या अंतप्रेरणेबाबत सदैव जागरूक असतात. म्हणूनच यापुढे तुमच्या अंत:प्रेरणा तुम्हाला काही सांगत असतील तर त्यावर विश्वास ठेवा आणि निर्णय घ्या. तुम्ही समजता त्याहून अधिक भान तुमच्या मनाला असतं हे लक्षात ठेवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 8:08 am

Web Title: importance of internal feelings and sixth sense
टॅग : Learn It
Next Stories
1 अभिव्यक्ती क्षमता : पुढे जाण्याची गुरुकिल्ली
2 हस्तांदोलन करताना..
3 भावनांवर नियंत्रण कसं राखाल?
Just Now!
X