स्पर्धकांच्या या भाऊगर्दीत मी कसा तग धरू शकेन? स्पर्धेला सामोरे जात यात मी यशस्वी होईन का? माझे योगदान कधी ग्राह्य़ धरले जाईल का?.. हे नोकरीच्या ठिकाणी, सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या मनात डोकावणारे प्रश्न आहेत. विक्री, विपणन, सल्लामसलत किंवा सेवा.. असे कामाचे क्षेत्र कुठल्याही प्रकारचे का असेना, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा ही असतेच! आणि आपण आपल्या कळत-नकळत तिथे स्पर्धक म्हणून उतरलेलो असतो. आपण करिअरमध्ये जसजशी प्रगती साधतो, तसतसा या स्पर्धेचा स्तरही उंचावू लागतो. या स्पर्धेच्या वातावरणामुळे तुमच्या करिअरच्या प्रगतीवर परिणाम होतो का, या प्रश्नाचे उत्तर बव्हंशी ‘हो’ असेच आहे. स्पर्धा ही असावी, मात्र त्यामुळे तुमच्यात दडून बसलेल्या सुप्त कौशल्यांना धार येऊन तुमची वाटचाल प्रगतीकडे व्हावी. पण जर या स्पर्धेमुळ तुमच्या करिअरची गाडी अडखळत चालू लागली किंवा गडगडत गेली तर मात्र तो तुमच्या करिअरसाठी मोठा धोका असू शकतो, याची जाणीव असू द्यावी.

सामोरे जाताना..
’तुमच्या कामाच्या वातावरणातील स्पर्धात्मक वास्तवाची कल्पना असू द्या. काही ठिकाणी ही स्पर्धात्मकता अधिक असते. उदा. जर तुम्ही विक्री आणि विपणन क्षेत्रात काम करत असाल तर तिथे काम करत असलेल्या व्यक्ती स्वभावत:च अथवा कामाच्या स्वरूपामुळे अधिक स्पर्धात्मक असतात याची जाणीव ठेवली तर ही वास्तव परिस्थिती स्वीकारणे सोपे होते. कामाच्या काही ठिकाणी स्पर्धात्मकता नावालाही नसते. अशा वेळी कामाच्या आणि भोवतालच्या वातावरणानुसार तुमचा दृष्टिकोन विकसित करणे उत्तम ठरते.
’स्पर्धात्मकतेला घाबरू नका. त्याऐवजी स्पर्धेला कसे तोंड द्यायचे याची तयारी करा.
’ स्पर्धात्मकतेमुळे तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करायला सरसावता.
’स्पर्धात्मकतेमुळे तुम्ही तुमच्या कामाचा वेग वाढवता. अधिक मेहनत घेता. कामाचा अधिक खोलवर विचार करता.
’स्पर्धात्मकतेमुळे मिळणाऱ्या यश-अपयशातून तुम्ही अधिक शिकता, हे नक्की. यामुळे काम अधिक स्वारस्यपूर्ण होते.
’यामुळेच स्पर्धेपासून पळ काढण्यापेक्षा त्याला आत्मविश्वासाने सामोरं कसं जाता येईल, ते लक्षात घ्या.
’स्पर्धेला कमी लेखू नका.

Rohit Sharma statement regarding the World Cup 2027 sport news
पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक! इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; रोहितचे वक्तव्य
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Eligibility in Zopu Yojana without human intervention
झोपु योजनेत यापुढे पात्रता मानवी हस्तक्षेपाशिवाय!
maharashtra animal husbandry commissioner kaustubh diwegaonkar talking about survival of the fittest
माझी स्पर्धा परीक्षा : समाज म्हणून यशाच्या व्याख्या बदलायला हव्यात

लाभ आणि त्रुटी
’स्पर्धात्मकतेबाबत केवळ नकारात्मक चित्र रेखाटणे चुकीचे आहे. स्पर्धात्मक वातावरणाच्या जर तुम्ही केवळ त्रुटी ध्यानात घेतल्यात तर त्याचा तुमच्यावर व्यक्तिगत परिणाम होतो. या स्पर्धात्मकतेचे तुमच्यावर, तुमच्या टीमवर संभाव्य चांगले परिणाम तुम्ही दृष्टिआड करू नका.
’स्पर्धात्मकतेमुळे इनोव्हेशन वाढते. विक्री आणि त्यातील नफ्याचे प्रमाण उंचावते. वातावरण प्रेरणादायी होते. मात्र जर खूपच स्पर्धा असेल तर कल्पनांची आणि कर्मचाऱ्यांची दमछाक होते. स्पर्धेत मागे पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना नैराश्य येते. कामाच्या ठिकाणचे सारे वातावरणच विषारी होऊन जाते. म्हणूनच कार्यालयात निकोप स्पर्धा असणे महत्त्वाचे!
’कामाच्या बहुतेक ठिकाणी सहकार्य आणि स्पर्धात्मकता अशा
दोन्ही गोष्टी असतात. मात्र जर आत्यंतिक प्रमाणात असलेल्या अंतर्गत स्पर्धात्मकतेकडे जर पुरेसे लक्ष पुरवले नाही तर समस्या उद्भवू शकते. महत्त्वाकांक्षेचा उर्मटपणाशी संबंध नसतो. निकोप स्पर्धक स्वत:चाच उत्तम परीक्षक असतो, जो सतत स्वत:मध्ये सुधार घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असतो. उर्मट व्यक्ती केवळ स्वत:ला इतरांहून वरचढ समजत असते. तुमचा स्पर्धक असलेल्या व्यक्तीला उत्तम कामाबाबत शाबासकी जरूर द्या. त्यामुळे त्यांना तुमच्याबाबत विश्वास वाटू शकेल.

सहकार्याला उत्तेजन द्या..
’कामाच्या ठिकाणचे सहकार्य वाढीला कसे लागेल, ते बघा. ही कठीण गोष्ट आहे. प्रकल्प, सांघिक भावना, कामाचा परिपाक या सगळ्यांबाबत मी ऐवजी आपण ही भाषा उपयोगात आणा.
’वरिष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव न करता सर्वाना समान पातळीवर कामाची संधी मिळणे आवश्यक असते.
’उर्मटपणा, द्वेषभावना यांसारख्या भावनांना जागा न मिळता प्रत्येकातील कौशल्ये लक्षात घेऊन त्यांची जोपासना कशी होईल याकडे लक्ष द्यायला हवे.
’नियम असावा की, संवादादरम्यान नकारात्मक टिप्पणी, उर्मट उत्तरांना थारा नको.
’असुरक्षित व्यक्तीच कार्यालयीन स्पर्धात्मकता वाढवतात. अशा वेळेस सहकाऱ्यांशी संवाद साधणे, त्यांना विश्वासात घेणे आवश्यक असते.
’लवचीक राहा- परिस्थितीनुसार काय केल्यास काम होईल आणि कुठली गोष्ट उपयुक्त ठरणार नाही, हे तुमच्या व्यक्तिगत अनुभवांवर लक्षात घेत वागा.
’बदलत्या परिस्थितीनुसार तुमचा दृष्टिकोन अ‍ॅडजस्ट करणे आवश्यक असते.
’स्पर्धक मानसिकता असलेल्या व्यक्तीशी कशा पद्धतीने वागायला हवे, याचे वारंवार पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक असते.

जुळवून घेताना..
’ वागणे अत्यंत मृदू आणि सुसंस्कृत असू द्या. स्पर्धात्मकतेने वागणाऱ्या सहकाऱ्यांशी संयमाने वागणे आवश्यक आहे. त्यांच्या वर्तनाला भावनिक होऊन प्रतिसादात्मक वागणे अयोग्य ठरेल.
’अतिमहत्त्वाकांक्षी सहकाऱ्यांशी खुलेपणाने वागा. इच्छा
आणि आकांक्षांना काटशह न देता ते एकत्रित नांदतील याची
काळजी घ्यावी.
’तुमच्यावर जी काही जबाबदारी सोपवलेली आहे आणि तुम्ही जे काही काम करत आहात, त्याचा बॅक-अप तुमच्यापाशी ठेवा.
त्यामुळे तुमच्या विरोधात जे षड्यंत्र सुरू असेल त्याला पायबंद घालणे सोपे होईल.
’तुम्ही करत असलेल्या कामांचा नियमित अहवाल तुमच्या वरिष्ठांना द्या. हा अहवाल सत्यता पडताळून पाहण्याजोगा आणि प्रामाणिकपणे मांडलेला असेल याची काळजी घ्या.
’जर एखादा सहकारी तुमच्या कामात लुडबुड करतो असे जर तुमच्या लक्षात आले तर त्याला रोखण्याचा प्रयत्न करा. तुमची कागदपत्रे, व्यक्तिगत माहिती सुरक्षित ठेवा.
’तुमच्या कामात लुडबुड करणाऱ्या सहकाऱ्याशी थेट बोला, अथवा वरिष्ठांच्या कानावर या गोष्टी अधिकृतरीत्या घाला.
’तुम्हांला तुमच्या स्पर्धात्मक सहकाऱ्यांना संपूर्ण टाळणे शक्य नसते. मात्र रागीट, नकारात्मक आणि आक्रस्ताळेपणा करणाऱ्या सहकाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा अथवा वाद घालण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांना शक्य असल्यास टाळा.
’कामाच्या ठिकाणी निकोप स्पर्धा व्हावी याकरता प्रत्येकाला कामाच्या आणि प्रगतीच्या सारख्याच संधी मिळतील याकडे कटाक्षाने लक्ष द्या.
’कामाच्या ठिकाणचे वातावरण अत्यंत कलुषित असेल तर
उच्चस्तरीय व्यवस्थापनाशी अथवा मनुष्यबळ विकास विभागाशी त्याविषयी बोला.

स्पर्धात्मकता आणि तुम्ही
’स्वत:च्या क्षमतांवर विश्वास हवा- कुठलंही क्षेत्र असो, तुमच्या अवतीभवती स्पर्धात्मकता बाळगणारी किती तरी डोकी तुम्हाला दिसतील. अशा वेळी तुमचा स्वत:वर विश्वास हवा. तुमच्यात नक्कीच अशा काही क्षमता आहेत, ज्याचा कंपनीला लाभ होऊ शकतो, म्हणून तर त्यांनी तुम्हाला नोकरीत सामावून घेतले आहे, हे ध्यानात ठेवा.
’ही स्पर्धात्मकता व्यक्तिश: घेऊ नका- समोरच्या व्यक्तीच्या आपल्याविषयीच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे आपलेच काही तरी चुकतेय असे वाटू शकते. काही वेळी सहकाऱ्यांच्या आक्रमकतेला तोंड द्यावे लागते. अशा वेळी लक्षात घ्यायला हवे की, तुमच्या क्षमतांमुळे त्यांना असुरक्षित वाटते आणि ते धोक्यात येऊ शकतात. म्हणूनच अशा आक्रमकतेला ते सुरुवात करतात.
’तुमच्या व्यक्तिमत्त्वात खरोखरीच किती स्पर्धात्मकता आहे याकडे लक्ष पुरवा. तुमच्यातील स्पर्धात्मकतेचा स्तर ध्यानात घ्या. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातील स्पर्धात्मकता लक्षात घेऊन आणि भोवतालच्या स्पर्धात्मक वातावरणातील गुंतागुंत ध्यानात घेऊन त्या विषयीचा दृष्टिकोन विकसित करायला हवा. इतर स्पर्धक आहेत, अशी आपली भावनाच अनेकदा आपल्यातील स्पर्धात्मकतेला खतपाणी घालते.
’जर तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तर त्या असुरक्षिततेचा स्रोत जाणा. तुम्हाला कदाचित अधिक प्रशिक्षणाची अथवा व्यक्तिगत विकासाची गरज असेल. कशा पद्धतीने प्रशिक्षण घेता येईल ते बघा.