ताणतणाव आणि पालकत्व

मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर आईबाबा खूप मोठी भूमिका बजावत असतात. वेळोवेळी झालेल्या शास्त्रीय अभ्यासांमधूनही हेच ठळकपणे समोर आलं आहे.

samajमुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर आईबाबा खूप मोठी भूमिका बजावत असतात. वेळोवेळी झालेल्या शास्त्रीय अभ्यासांमधूनही हेच ठळकपणे समोर आलं आहे. त्यामुळे पालकत्वावरच्या लिखाणात, व्याख्यानांमध्ये, कार्यशाळांमध्ये या सगळ्याचा खूप उच्चार होणं स्वाभाविकच आहे. त्यातून एकंदरच पालकत्वाबाबत बरीच जागरूकता निर्माणही झाली आहे, पण यातून काळजी वाटावी असे काही समजही सगळीकडे झिरपताना दिसताहेत. त्यातील एक म्हणजे ‘मुलांच्या विकासाची सर्वतोपरी जबाबदारी पालकांवर आहे, आपल्या हाताखाली मुलं वाढताहेत तोपर्यंतच त्यांचं व्यक्तिमत्त्व काय ते घडणार आहे’. जळीस्थळी, काष्ठीपाषाणी असे समज भरून राहिल्याने आणखी एक धोकादायक गोष्ट सगळीकडे दिसते आहे ती म्हणजे- आपलं मूल जरासं मागे पडलं, किंवा काही अन्य अडचणींमुळे मुलाकडे लक्ष देता आलं नाही, की पालकांच्या मनात येणारी प्रचंड अपराधी भावना.
मुळात एखाद-दुसऱ्या प्रसंगाने डळमळीत व्हावा इतका पालकत्वाचा आवाका अल्प-स्वल्प आहे का?
घरी काही आकस्मिक अडचणी आल्या की कुटुंबाची बरीच शक्ती त्यात खर्ची पडते. उदा. कुटुंबात एखाद्याचं दीर्घकाळ चालणारं आजारपण. अशा वेळी त्याला सामोरं जाणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे मुलांकडे हवं तितकं लक्ष न देता येणं अतिशय स्वाभाविक आहे. या मधल्या काळासाठी मुलांचा अभ्यास किंवा अन्य अ‍ॅक्टिव्हिटिज थोडय़ा दुय्यम झाल्या म्हणून खूप अपराधी वाटत राहणारे अनेक आईबाबा गेल्या काही वर्षांमध्ये मला पाहायला मिळालेत.
आईवडिलांपकी एकाचं निधन किंवा आईवडिलांचं विभक्त होणं, अशा खोल परिणाम करणाऱ्या घटनांना सामोरं जाताना तर या अपराधी भावनेचा कडेलोट होताना खूपदा पाहायला मिळतं. मुळात अशा प्रसंगांना सामोरं जाताना कुटुंबाची खूपच दमछाक होते. सगळ्या घराचीच बऱ्यापकी हेळसांड होत असते. अशा वेळेस दुख, ताण, काहीतरी गमावल्याची भावना, एकटेपणा- अशा अनेक अनुभवांमधून

अख्खं कुटुंब जात असतं. मुलांशी थेट काही शेअर केलं नाही तरी त्यांनाही या सगळ्याची झळ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पोहचतच असते. अनेक आईबाबा अपराधी भावनेतून ‘मुलांना कशाला टेन्शन द्यायचं?’ म्हणून अनेक ताणतणावांचे प्रसंग मुलांशी शेअरच करत नाहीत. ‘इतक्या लहान मुलांना काय कळणार?’ अशी सबब पुढे केली जाते. पण सांगितलं नाही, म्हणून मुलांना काहीच कळत नाही का? त्यांना अगदी सगळे संदर्भ अगदी नीट नाही कळले, तरी घर आणि घरातल्या व्यक्तींवरचा ताण नक्कीच जाणवत असतो. अशा परिस्थितीत आईवडिलांनी केलेली लपवालपवी तर मुलांना खासच कळते. आपले आईबाबा आपल्यापासून काहीतरी लपवताहेत या कल्पनेने मुलं गोंधळतात, त्यांना ताण येतो. मामला गंभीर असेल तर त्यांना अस्वस्थ, असुरक्षितही वाटू शकतं. याचे दृश्य परिणाम काही वेळा मुलांच्या रोजच्या वागण्यातही दिसू लागतात.
पालकत्वाचा आवाका असंख्य अशा छोटय़ामोठय़ा बाबींनी मिळून बनलेला असतो. त्यामुळे खरं तर असे प्रसंग आपण कुटुंब म्हणून कसे हाताळतो, यातून ताणतणावाचा सामना करता येण्याचा प्रत्यक्ष वस्तुपाठच मुलांना मिळत असतो. ‘ग्रॅण्ट स्टडी’ हा ह्युमन डेव्हलपमेंटमधला ७५ र्वषे इतका दीर्घकाळ चाललेला अभ्यास. ‘अन्य माणसांशी नातेसंबंध जोपासता येणं’ हा आयुष्यात समाधानी, आनंदी असण्यामागचा कणा आहे- हा या अभ्यासामागचा एक मोठा निष्कर्ष. यातले ‘नातेसंबंध जोपासणे’ म्हणजे सगळ्यांशी कायम छान छान गोड वागणं असं नाही. किंबहुना बऱ्या- वाईट कोणत्याही परिस्थतीत स्वत:च्या क्षमता आणि मर्यादांचं वास्तव भान असणं त्यातला फार मोठा भाग आहे. हे भान नसेल तर आवाक्याबाहेर जाऊन नातं राखायचे केलेले प्रयत्न सगळ्यांसाठीच फार ताणाचे होतात. हे मुलांबरोबरच्या नात्यांनाही तितकंच लागू पडतं. म्हणून आपलं मूल कायमच आनंदी असावं, त्याला टेन्शन नको – असं वाटणारे पालक मुळातच वास्तवाशी विसंगत अशी अपेक्षा बाळगत असतात. नकारात्मक भावना, तसे प्रसंग, हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे. त्यांना न झटकता योग्य न्याय देता येणं, ही स्वत:साठी आणि एकंदरच नातेसंबंध राखता येण्यासाठी फार कळीची बाब आहे. मुलांच्या बाबतीत तर ते फारच महत्त्वाचं आहे, कारण पालक म्हणून आपण नकारात्मक भावना कशा हाताळतो, याचे प्रारंभिक धडे मुलांना घरातून मिळत असतात. म्हणून त्याबद्दल पाहूया पुढच्या लेखात.
mithila.dalvi@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stress and parenting

ताज्या बातम्या