04 August 2020

News Flash

नादिया

उत्तर इराक प्रांतात याझिदी लोकांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणात बघायला मिळते.

मानसी होळेहोन्नूर manasi.holehonnur@gmail.com

नादिया याचा अर्थ आशा. यंदाची शांतता नोबेल पुरस्कारप्राप्त नादिया मुराद आपल्यावरील अत्याचार हेच शस्त्र बनवून आयसिसने सेक्सस्लेव्हम्हणून तिच्यावर केलेल्या अनन्वित अत्याचाराला वाचा फोडते आहे. यापुढे कुठलीही स्त्री अशी लैंगिक अत्याचाराला बळी पडू नये, तिच्या आत्मचरित्रात, ‘द लास्ट गर्लमध्ये म्हटल्याप्रमाणे ती शेवटची बळी ठरावी म्हणून प्रयत्न करते आहे.. तिची ही आशा निष्फळ न जावो..

‘‘जोवर युद्ध आपल्या दारापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची तीव्रता कळत नाही. जेव्हा ते संकट आपल्यावर येतं तेव्हा जाणीव होते, हा त्रास, ही वेदना सार्वकालिक असल्याची. जेव्हा मी युद्धकैदी होऊन, गुलाम म्हणून अनुभव घेतले, तेव्हा मला रवांडाच्या युद्धकैदी बायकांच्या दु:खाची तीव्रता कळली. तोपर्यंत मला रवांडा हा देशही माहीत नव्हता, किंवा युद्धकैदी असणे, लोकांच्या लैंगिक गरजा पूर्ण करणारे गुलाम असणे म्हणजे काय असणे हेदेखील माहीत नव्हते. २०१४च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत माझे जग केवळ माझे घर मी जिथे वाढले तेवढाच भाग होतं. पण एका घटनेने माझे आयुष्य, माझ्या जाणिवा सगळं काही बदलून गेलं.’’ या वर्षीचे शांततेचे नोबेल पुरस्कार मिळालेल्या नादिया मुराद यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

उत्तर इराक प्रांतात याझिदी लोकांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणात बघायला मिळते. हे लोक त्यांच्या याझिदी धर्माचे पालन करतात. हा धर्म इस्लामपेक्षा थोडा वेगळा आहे. कदाचित याच कारणामुळे आयसिसने या लोकांना त्यांचे लक्ष्य केले असणार. डोंगर दऱ्यांमधले हे लोक तसे कधीही कोणाच्याही अध्यात मध्यात नसणारे. यांच्या चालीरीती इस्लामहून वेगळ्या आहेत, पण त्यांनी त्याचा गवगवा केला नाही. ऑगस्ट २०१४मध्ये सिंजरमध्ये आयसिसने मोठा हल्ला केला. याझिदी लोकांचे समूळ उच्चाटन करायचे केवळ याच एका उदेशाने त्यांनी हा हल्ला केला होता. विनाकारण हजारो लोकांची हत्या केली गेली. मुलींना पकडून घेऊन गेले. अनेक तरुण मुली, लहान मुलींना मोसुलमध्ये आणले गेले. मग सुरूझाला या मुलींच्या दुर्दैवाचा फेरा.

एका खोलीमध्ये सगळ्या मुलींना बंद केलेलं असायचं. एका रजिस्टरमध्ये त्यांची नावे लिहिली जायची. मग आयसिसचे लोक तिथे येऊन एखाद्या दुकानात  खरेदीला जावं तसे तिथे येत. खुश्शाल ‘हा माल व्हर्जनि आहे ना’ असं विचारत. काहीजण आवडलेल्या मुलीच्या शरीराच्या कोणत्याही भागाला हात लावून, दाबून बघत. क्षणोक्षणी त्या मुलींना तुम्ही केवळ एक वस्तू आहात याचाही जाणीव करून दिली देत. आमच्या लैंगिक गरजा शमवणाऱ्या, आमच्या विकृती सहन करू शकणाऱ्या, मार खाऊनही डोळ्यात पाणी न काढणाऱ्या गुलाम आहात हे येणारे जाणारे त्यांच्या नजरेतून, स्पर्शातून सांगत जायचे.

नादियादेखील अशाच एका खोलीत होती. काही दिवसांपूर्वी आई हे तिचे सर्वस्व होते, त्याच आईच्या मरणाचे, सहा भावांच्या मरणाचे दु:ख करायलाही तिच्याकडे वेळ नव्हता. आता पुढे आपले काय होणार याची तिला वेगळी काळजी होती. त्या खोलीत एक आडदांड पुरुष आला, त्याच्याकडे बघून त्याला माणूस म्हणण्यापेक्षाही राक्षस म्हणलं तर बरं होईल हा विचार तिने मनातच दाबला आणि ती दुसरा कोणी येतोय का याची

वाट बघत राहिली. आयसिसमध्ये लोकांना येण्यासाठी जी आमिषे दाखवली जातात त्यात एक आमिष असते, सुंदर स्त्री उपभोगण्याचे. ‘सेक्सस्लेव्ह’ म्हणूनच या मुलींना ओळखलं जातं. तिथे एक जरा नाजूक पुरुषी पाय दिसला त्यालाच मग नादियाने पकडलं, आणि त्या राक्षसापेक्षा हा परवडला म्हणत मला तूच घरी घेऊन जा म्हणाली. दगडापेक्षा वीट मऊमधला प्रकार हा. तो इसम होता हाजी सुलतान. मग एका रजिस्टरवर नादिया हाजी सुलतान अशी नोंद झाली आणि तो तिला त्याच्या घरी घेऊन गेला.

रोज असंख्य वेळा होणाऱ्या बलात्कारांना काय म्हणायचं? एकदा तर नादियाने पळून जायचा प्रयत्न केला तेव्हा तिला एका खोलीत ठेवलं आणि तिथे असणाऱ्या सगळ्यांनीच तिला उपभोगलं. किती दिवस हा प्रकार चालला होता हेसुद्धा तिला आता आठवत नाही. आपला जन्म केवळ चाबकाचे फटकारे खाण्यासाठी, सिगारेटचे चटके सहन करण्यासाठी, धर्माच्या नावाखाली अधर्म माजवणाऱ्या लोकांच्या लैंगिक विकृती शमवाण्यासाठीच झाला आहे हे तिथल्या प्रत्येक बाईला न सांगताही कळते. जवळपास एक वर्ष आणि काही महिन्यानंतर एक दिवस नादियाच्या मालकाने तिला सांगितले, आज तो तिला विकायला घेऊन जाणार आहे, तिच्यासाठी बरे कपडे खरेदी करायला म्हणून तो घराबाहेर पडला, दारं बंद न करता. हीच संधी साधून नादिया त्या घरातून पळाली. आयसिसला न मानणाऱ्या एका घरात तिने तात्पुरता आसरा घेतला आणि त्याच कुटुंबाने तिला इराक बाहेर पळून जायला मदत केली. त्यानंतर ती जर्मनीला गेली आणि आता तिथेच राहते.

जेव्हा तिची सगळ्यात पहिली मुलाखत घेतली गेली तेव्हा तिला विचारलं तिचे नाव गुप्त ठेवायचे आहे का? त्यावर नादिरा म्हणाली, ‘नाही बिलकुल नाही. माझे नाव लोकांना कळू देत. जगाला कळू देत आयसिसकडून बायकांवर कसे अन्याय होत आहेत. मी नशीबवान होते म्हणून तिथून पळून येऊ शकले. पण अजूनही हजारोने बायका, मुली तिथे अडकलेल्या आहेत. आम्ही याझिदी आहोत यात आमचा काय दोष आहे? ‘‘केवळ या धर्माचे पालन करतो म्हणून त्या धर्माच्या लोकांना मारून टाकणे, मुलींवर बलात्कार करणे, या आयसिसच्या दुष्कर्माचा पुनरुच्चार नादियाने तिच्या भाषणात वेळोवेळी केला आहे. आजही ती ‘नादियाज इनिशिएटिव्ह’ या तिच्या संस्थेमार्फत ती याझिदी लोकांवर होणारे अन्याय. ‘सेक्सस्लेव्ह’ म्हणून बायकांवर केलाय जाणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलते. सिंजर भागामध्ये स्थानिकांचे पुनर्वसन कसे करता येईल. या अल्पसंख्याक लोकांचे रक्षण कसे करता येईल, तिथे अडकलेल्या बायकांना परत कसे आणता येईल. किंवा नव्याने कोणाही मुलीला, बाईला पळवून नेलं जाऊ नये म्हणून काय करता येईल याबद्दल बोलत असते. नादियाने तिचे आत्मचरित्र लिहिले आहे, ‘द लास्ट गर्ल.’ त्यात ती म्हणते, ‘‘आयसिस आणि आयसिसला पाठिंबा देणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केलेला मला बघायचा आहे. सुलतानला शिक्षा झालेली बघायची आहे. माझ्यावर झालेले अन्याय असे धीटपणे जगासमोर मांडणारी मी शेवटची मुलगी असावी असे मला वाटते. असे भोग दुसऱ्या कोणत्याही मुलीला येऊ नये.’’

अन्याय सहन करत गप्प बसणे हीदेखील एक चूकच आहे. नादियाने तिच्यावर झालेला अन्याय जगासमोर मांडला, त्यामुळे ती म्हणते माझा अनुभव हेच माझे अस्त्र आहे. एखाद्या स्त्रीवर जेव्हा बलात्कार होतो तेव्हा तिची त्यात काय चूक असते, पण तरीही समाज तिला कायम खालच्या मानेने जगायला भाग पाडतो, नादिया मुरादने हा समजदेखील मोडीत काढला, आणि माझ्यावर बलात्कार झाला म्हणून मी दोषी, चुकीची ठरत नाही. हे ताठ मानेने जगाला सांगितले. तिने एका मुलाखतीत सांगितले होते, ‘दिवस रात्र वेळ काळ न बघता माझ्यावर बलात्कार होत होता, शारीरिक मानसिक अत्याचार होत होते, पण एक क्षणही मला माझे आयुष्य संपवून टाकावेसे वाटले नाही. हे अनुभवसुद्धा आयुष्याचा एक भाग आहेत असेच समजून मी घेत होते.’

अवघी २४-२५ वर्षांची इराकच्या उत्तर प्रांतातली, याझिदी समाजातली, स्वत:वरच्या अन्यायामुळे जागी झालेली नादिया आज तिच्याच नाही तर तिच्यासारख्या अनेकींसाठी न्यायाची लढाई लढत आहे. स्लाव्हिक भाषेत नादिया म्हणजे आशा, तर अरेबिकमध्ये नादिया म्हणजे नाजूक. दोन्ही भाषांमधल्या तिच्या नावाच्या अर्थाला जागत नादिया मुराद अनेकजणींना त्यांचा लढा लढण्यासाठी प्रेरणा देईल हे नक्की.

युद्धामध्ये फक्त सैनिक लढत नसतात,

युद्धामध्ये फक्त घरं पडत नसतात,

युद्धामध्ये फक्त शस्त्रांचा व्यापार होत नसतो.

युद्धामध्ये निष्पाप लोकदेखील मरतात,

युद्धामध्ये शाळा, शेतं नष्ट होतात,

युद्धामध्ये स्त्रियांचा व्यापार मांडला जातो.

स्त्री ही एखादी वस्तूसारखी वापरली जाते, विकली जाते.

अशा वेळी एखादी स्त्रीच उचलते पाऊल आणि हातात घेते शस्त्र,

कधी ते असते, तलवार, कधी ते असते लेखणी,

पण ती मांडत राहते लेखाजोखा, अन्यायाविरुद्ध राहते ती ठाम उभी.

तेव्हा दुर्गा तिच्यातही दिसतच असते.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2018 1:47 am

Web Title: article about peace nobel prize winner nadia murad
Next Stories
1 अंधश्रद्धेच्या जटेतून सुटका
2 वैयक्तिक परिघांतली सदसद्विवेकबुद्धी
3 समाधानाची ‘दुखरी’ बाजू..
Just Now!
X