फक्त मुलीच असणाऱ्या पालकांची काळजी मुली घेताना दिसत आहेतच, मात्र मुलगा असूनही आईवडिलांची काळजी घेणाऱ्याही अनेक जणी दिसू लागल्या आहेत. मुलगाच फक्त म्हातारपणची काठी, वंशाचा दिवा वगैरे, वगैरे गृहीतके आता काळाच्या आड जाऊ लागली आहेत. अशाच काही स्त्रियांचे अनुभव. गोड आणि खूपसे कडू..

मुलींना माहेरी मालमत्तेत भावांच्या बरोबरीने वाटा मिळत असेल तर माता-पित्यांची जबाबदारीदेखील त्यांनी भावांच्या बरोबरीने उचलायला हवी, हा झाला व्यवहार. मात्र सांपत्तिक वारसा हक्क मिळो न मिळो, भाऊ आईवडिलांची देखभाल करो न करो, अनेक तरुणी, स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा कमजोर असलेल्या आपल्या मातापित्यांचा सांभाळ करताना दिसत आहेत. आम्ही अशा काही मैत्रिणींशी संवाद साधला, तेव्हा बहुतांशी आढळल्या त्या नात्यांच्या चिरफळ्या, जबाबदारीची उणीव आणि अनेकदा तर केवळ स्वार्थ.
मूळची मुंबईची असलेली, पण हल्ली इंदौरला वास्तव्य असणाऱ्या ३६ वर्षीय दीप्तीची कथा ही घरोघरी आढळणारी! दीप्तीचे आई-वडील दोघेही सरकारी नोकरीत. त्यांना दोन अपत्ये. दीप्ती आणि तिचा भाऊ. दीप्तीचे लग्न एका आयटी इंजिनीयरशी झाले आहे, तर तिचा भाऊ परदेशात मोठय़ा पदावर नोकरीस आहे. दीप्तीचे आई-वडील ठाणे येथे स्वत:च्या फ्लॅटमध्ये राहात होते. तसेच बोरिवलीतही त्यांचा एक फ्लॅट होता. अचानक वडिलांना कर्करोगाने ग्रासले आणि त्यांची जमापुंजी आजारपणात मोठय़ा प्रमाणात खर्च झाली. या आजारपणात वडील वाचू शकले नाहीत. वडिलांचा आणि त्यांच्या पश्चात आईचा आर्थिक भार उचलण्यास दीप्तीच्या भावाने नकार दिला. दीप्तीची वहिनी दीप्तीच्या आईला काही काळ बोरिवली येथे घेऊन गेली.
अनेक वर्षांपासून असलेल्या तीव्र मधुमेहामुळे आईचे पाय निकामी झाले आणि तिचा हॉस्पिटलचा खर्च वाढू लागला, तसे आईला सांभाळण्यास वाहिनी व भावाने असमर्थता दर्शवली. हॉस्पिटलवर जवळजवळ १२ /१३ लाखांचा खर्च झाला असताना केवळ दोनेक लाख रुपये त्याने दीप्तीकडे दिले आणि बोरिवलीचे घर विकून तो परदेशी निघून गेला. त्या वेळेस मुंबईतच वास्तव्य असलेल्या दीप्तीने आईला आपल्या घरी आणले आणि गेली अनेक वर्षे ती आता इंदौरला आईची देखभाल करते आहे. ती सांगते, ‘‘पतीच्या सहकार्याशिवाय हे अशक्य आहे आणि होतं. कारण माझी स्वत:ची काहीही कमाई नाही. माझा भाऊ केवळ दर रविवारी फोन करण्यापुरते कर्तव्य नेमाने निभावतो. पण मुंबईत आल्यावरही आईला भेटून जावे असे त्याला कधी वाटले नाही.’’ आपला मुलगा आपल्याला म्हातारपणी कुठलाच आधार देऊ शकला नाही, ही खंत दीप्तीच्या वडिलांना शेवटपर्यंत लागून राहिली होती. आईला सर्वार्थाने सांभाळत असल्याबद्दल बहीण किंवा तिच्या नवऱ्याजवळ एका शब्दानेही कधी कृतज्ञता व्यक्त करू न इच्छिणाऱ्याला भाऊ तरी का म्हणावे, असे दीप्तीचे म्हणणे आहे.
नागपूरची ३७ वर्षीय सोनाली. दहा वर्षांपूर्वी लग्न होऊन अमरावतीत आली. तिचे वडील सरकारी नोकरीत होते व आई गृहिणी! सोनालीला एक भाऊ असून तो रायपूरला सरकारी नोकरीत मोठय़ा पदावर आहे. सोनाली आणि त्याच्यात जवळजवळ १२ वर्षांचे अंतर आहे. वडिलांची सतत बदली व्हायची म्हणून त्यांनी आपल्या मुलाला त्याच्या आजीआजोबांजवळ नागपूरला शिक्षणासाठी ठेवले. मुलगी सोनाली लहान असल्याने ती आई-वडिलांजवळ राहिली. पुढे मुलगा इंजिनीयर होऊन सरकारी नोकरीत स्थिरावला. विवाहानंतरदेखील आपल्या निवृत्त झालेल्या वडिलांना व आईला कधीही त्याने आपल्याकडे नेले नाही. सोनालीचे लग्न झाल्यानंतर ही दोघे अगदीच एकाकी पडली. त्यातल्या त्यात सोनाली अमरावतीला असल्याने त्यांच्या आजारपणात ती नागपूरला जाऊ शकत असे. तिच्या पतीनेही ही आपली जबाबदारी आहे हे मान्य केले होते. वडिलांच्या दीर्घकालीन आजारपणात सोनालीने व अंशत: तिच्या पतीने त्यांच्या हॉस्पिटलच्या वाऱ्या नीट पार पाडल्या. वडील आता केवळ काही दिवसांचेच सोबती आहेत हे कळवूनही सोनालीचा भाऊ वडिलांना भेटायला आला नाही. सून आणि नातवंडे तर दूरच! शेवटी वडिलांना व्हेंटिलेटरवर ठेवले गेले तेव्हा सोनालीच्या काकांनी भावाची चांगलीच कानउघाडणी केली. मग कसाबसा तो नागपूरला आला आणि लगेचच वडिलांचे निधन झाले. पुढील पंधरा दिवसांत होत्या-नव्हत्या त्या सर्व पैशांची, आईच्या दागिन्यांची तसेच बँकेतील सर्व गुंतवणुकीची व्यवस्था लावून म्हणजे स्वत:च्या ताब्यात घेऊन त्याने पंधराव्या दिवशी घरातील सर्व सामान विकून टाकले, काही दान करून टाकले आणि घराला कुलूप घालून आईला घेऊन रायपूरला निघून गेला. तिथे त्याच्या पत्नीचे सासूशी पटेना तेव्हा सोनालीने आईला आपल्याकडे घेऊन येण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीला आता वर्षभराहून अधिक काळ लोटला आहे. भावाचा साधा एक फोनही कधी येत नाही. आईला मिळणाऱ्या निवृत्तिवेतनाचीही त्याने आईकडून नॉमिनेशनवर सही घेऊन ठेवली असून केवळ तोच तिचे पैसे काढू शकतो. आता या माउलीला केवळ मुलगी आणि जावई यांचाच आधार आहे.
५० वर्षीय अनिताचा अनुभवही असाच सार्वत्रिक दिसून येणारा! माहेर टिकवून ठेवण्यासाठी आपल्या भावाने कसेही वागले, जबाबदाऱ्यांपासून पळ काढला तरी ते निमूट चालवून घ्यावे अशा संस्कारांत वाढलेल्या स्त्रियांची कुचंबणाच केवळ त्यातून व्यक्त होते. नाशिकला अनिताचे माहेर असून तिला एक बहीण व एक भाऊ आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत जे मोठय़ा मुलाचे होते तसेच तिच्या वडिलांचे झाले. सर्व कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना स्वत:साठी वेगळी काही आर्थिक व्यवस्था करून ठेवावी असे त्यांना वाटले नाही. कालांतराने सर्व कुटुंब विभक्त झाले तेव्हा वडिलांजवळ फारच कमी पुंजी राहिली होती. घरही खूप जुनाट झाले होते. अनिताला या सर्व परिस्थितीची जाणीव होती. शिक्षण होताच तिने बँकेत नोकरी धरली. सोबतच निरनिराळे क्लासेस वगैरे घेऊन काही पैसे व १० तोळे सोने स्वत:च्या लग्नासाठी जमवले. पण सासरच्यांनी हुंडा मागितला नाही म्हणून ते पैसे व सोने तिच्या माहेरी तिने तसेच ठेवून दिले. सासर सुदैवाने सुस्थितीतील आणि पुढारलेल्या विचारसरणीचे होते!
काही वर्षांनी माहेरचे कुटुंब विभक्त झाले आणि आई-वडील एकटेच जुन्या घरात राहू लागले. बहीण व भाऊ दोघांचेही आपापले संसार फुलले. भाऊ पालघरला राहू लागला. घर इतके मोडकळीस आले तरी कोणी त्याची दुरुस्ती करेनात! भावाने अंग काढले. वडिलांजवळ पैसा शिल्लक नव्हता. शेवटी अनिताने आपले पूर्वी घेतलेले सोने व स्वत:च्या कमाईतला पैसा घालून त्यांना एक छोटीशी सदनिका घेऊन दिली. तेव्हा भावाने एका शब्दानेही विचारले नाही की, ‘‘ताई, आई-बाबांसाठी जे घर तू घेतले त्यासाठी पैसा कोणी दिला?’’ वडिलांजवळ काहीही नाही हे त्याला माहिती होते. आई-वडील दोघेही वृद्ध आहेत आणि वयोमानाने येणाऱ्या व्याधींनी ग्रस्त आहेत. अनिता आणि कधी क्वचित तिची बहीण आई-वडिलांच्या सदनिकेचा मेंटेनन्स भरण्यापासून ते त्यांच्या खाणे-पिणे, औषधपाणी इतर सर्व काही करतात. मुलगा कधीमधी फोन करून विचारतो एवढेच त्याचे कर्तव्य! ‘‘आम्ही त्याच्याशी वाद घालत नाही. जबाबदारीचे भान हे सांगून समजावण्याची गोष्ट नाही. ते ज्याचे त्याला असायला हवे. आम्ही त्याला काही म्हणत नाही. कारण एकुलता एक भाऊ , तोही जर दुरावला तर आमचे माहेर तुटेल,’’ असे अनिताला वाटते.
ज्या भारतीय संस्कृतीचे व परंपरांचे गोडवे गाण्यात आपण धन्यता मानतो त्यातली ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव’ असली आदर्श वचने निव्वळ बेगडी आणि ढोंगी वाटू लागतात, जेव्हा मुले मातापित्यांशी कल्पनेपेक्षाही कठोर वर्तन करतानाचा अनुभव वारंवार येऊ लागतो. स्वातीची ही अशीच मन विदीर्ण करून टाकणारी कथा! ६९ वर्षीय स्वाती सध्या अमेरिकेत नर्स आहेत. वृद्धांची काळजी व सुखद मृत्यू (जेरियाट्रिक व होस्पीस) यात त्यांचे प्रावीण्य आहे. खरं तर स्वाती या सीपीए व त्यांचे पती एमबीए असून पूर्वी ते अकाउंट क्षेत्रात कार्यरत होते. निवृत्तीनंतर आवड म्हणून दोघांनीही नर्सिगचा पेशा स्वीकारला. स्वाती यांना एक भाऊ असून तो पूर्वीपासूनच थोडा लाडोबा, अभ्यासात मागे असा होता. कसाबसा डिप्लोमा होऊन तो नोकरीस लागला तसे त्याचे लग्न झाले. आई-वडिलांच्या सोबत एकाच घरात राहात असल्याने कुठलाही खर्चाचा भार न उचलता त्याचा संसार सुरू होता. एक मूल झाल्यावर आईवडिलांनी त्याने खर्चास हातभार लावावा असे अनेकदा सुचवले, तसा तो वेगळा झाला. दरम्यान, आई-वडील वृद्ध होत चालले होते. वडील निवृत्त झाले होते. त्यांच्याप्रती आपले काही कर्तव्य आहे हे भावाच्या खिजगणतीतही नव्हते. स्वाती अमेरिकेहून जेव्हा आईवडिलांना भेटायला येई तेव्हा त्यांची सर्व परिस्थिती तिच्या लक्षात येऊ लागली. त्यांच्या आजारपणात कधीही स्वातीच्या भावाने जबाबदारीने काही केले नाही. आई-वडील दोघेही मुलाच्या बाबतीत मूग गिळून असत. भाऊ सतत पैशावरून आई-वडिलांशी भांडणे करतो असे स्वातीला शेजाऱ्यांनी सांगितले. स्वाती यांनी नर्सिगचे प्रशिक्षण घेतल्यामुळे आई-वडिलांची काळजी त्या नीट घेऊ शकत होत्या. स्वाती यांनी वेळोवेळी अमेरिकेतून सुटीवर येऊन आपल्या आई-वडिलांची शेवटपर्यंत देखभाल केली. आई-वडील लहानपणापासून सतत मुलींना तिच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत असतात. मुलांना मात्र सूट दिली जाते. याचे परिणाम आई-वडिलांना वृद्धपणी दिसू लागतात. या समस्येचे मूळ मुलगा आणि मुलगी यांना वाढवताना केलेल्या भेदात आहे ,असे स्वाती यांना वाटते.
एकुलत्या एक किंवा दोन बहिणी असणाऱ्या मुलींची तर आता आणखी एक मागणी पुढे येताना दिसते आहे. अनेक ठिकाणी असेही दिसून येते की वृद्धपणी आई-वडिलांची आर्थिक जबाबदारी, दीर्घकाळ चालणारी आजारपणं, औषधपाणी, हॉस्पिटलचे खर्च असं सर्व काही मुलगी व जावई जबाबदारी म्हणून पार पाडतात. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांचे क्रियाकर्म करण्याचे अधिकार माहेरी कोण्यातरी नातेवाइकाला असतात. कारण तो त्या कुटुंबातील पुरुष असतो. आई-वडिलांचे सगळं काही जर आम्ही करत असू तर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार मुलगी म्हणून आम्हाला का नसावा? या उपटसुंभांना का? मुली व जावई वर्षांनुर्वष आपलं सगळं करत आहेत हे माहिती असूनही किती आई-वडील आमचे अंत्यसंस्कार मुलीला, जावयाला करू देत असे म्हणू शकतात?
मध्यप्रदेशातील एका गावात जन्मलेली आणि लग्न होऊन ठाण्यात आलेली प्रीती तिच्या या अधिकारासाठी मागणी करते. ती म्हणते, ‘‘माझ्या आई-वडिलांना मी एकुलतीच मुलगी! दहा वर्षांपूर्वी माझ्या आईला कर्करोगाने ग्रासले. तेव्हा तिला आम्ही उपचारांसाठी सतत मुंबईत आणत राहिलो. मी एकुलती असल्याने माझी जबाबदारी मी कधीही नाकारली नाही. माझा नवरा व सासरची मंडळीदेखील विवेकी असल्याने आम्ही हे सर्व केले ते योग्यच हीच भावना त्यांची होती. पुढे आईचे निधन झाले. एका वर्षांतच वडीलही कर्करोगाने आजारी झाले आणि पुढे पाच वर्षे त्यांचे सतत हॉस्पिटल, औषधोपाचार, पथ्यपाणी सारे काही मी व माझ्या पतीने पार पाडले. आधी आई व नंतर वडिलांचे आजारपण असे दहा वर्षे सतत सुरू राहिले. पण त्यांच्या मृत्यूनंतर मात्र जेव्हा आम्ही त्यांचे पार्थिव घेऊन आमच्या मध्यप्रदेशातील गावी गेलो तेव्हा आम्ही तिथे परके होतो. काका व चुलत भावंडांनी सर्व काही केले. लहानपणी जेव्हा माझ्या चुलत भावाला माझे वडील ‘माठय़ा’ असे लाडाने म्हणत तेव्हा मला तर खूप गंमत वाटायची. ‘माझ्या अंत्यसंस्काराच्या वेळी हाच मडके (माठ) घेऊन पुढे असेल,’ असे ते म्हणत आणि म्हणून त्याचे नाव ‘माठय़ा’ ठेवले होते. गेल्या दहा वर्षांत आई किंवा वडील यांच्या सोबत हा ‘माठय़ा’ कधीही भेटायला आला नाही वा हॉस्पिटलमध्ये राहिला नाही. पण क्रियाकर्माचे सारे हक्क त्याला होते. मला याचे खूपच वाईट वाटते.’’
मूळची कोल्हापूरची, परंतु गेल्या अनेक वर्षांत मुंबईत वास्तव्यास असलेली वीणा एक पत्रकार! तिच्या आईवडिलांच्या आजारपणात भावाने जबाबदारी घेतली नाही कारण त्याला त्याचे करिअर महत्त्वाचे होते. त्याला यासाठी वेळ नव्हता. परंतु आपले करिअर बाजूला ठेवून अनेक वर्षे आई-वडिलांची सेवा करणाऱ्या वीणाने वडिलांच्या अंत्यसंस्काराचा हक्क मागितला तेव्हा माहेरी सारे तिच्यावर अक्षरश: तुटून पडले. प्रतिष्ठित कुटुंबात अशी थेरं चालणार नाहीत असे तिला सुनावले गेले.
दीप्ती, गुरप्रीत, सोनाली, अनिता, प्रीती, वीणा ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणे! अशा कितीतरी स्त्रिया हे ओठावर येऊ न देता नेटाने कर्तव्य पार पाडत असतील. माता-पित्यांची जबाबदारी मुलींनीही घेण्याचा समाजात दिसून येत असलेला हा बदल स्वागतार्ह आहेच, पण याबरोबरच स्त्री म्हणून नव्हे तर एक अपत्य म्हणून असलेले तिचे धार्मिक अधिकारही आता तिला हवे आहेत. आपण सारेच यासाठी किती तयार आहोत हे आता दिसून यायला हवे. आणखी एक चांगला बदल म्हणजे जावईही आपल्या सासू-सासऱ्यांची जाणीवपूर्वक काळजी घेताना दिसत आहेत. केवळ मुलगा हाच ‘म्हातारपणची काठी’ हा आपल्या मनावर ठसवला गेलेला समज यामुळे दूर व्हायला मदत होईल आणि मुलाच्या जन्माइतकेच मुलीच्या जन्माचेही स्वागत आपल्या देशात होऊ लागेल असा विश्वास या स्त्रिया नक्कीच देऊ पाहात आहेत.

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Budh Vakri 2024
आजपासून ‘या’ ५ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? बुधदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ
Chaitra Navratri 2024 From Gudhi Padwa Lakshmi Blessing These Four Zodiac Signs
चैत्र नवरात्रीपासून ‘या’ ४ राशींच्या कुंडलीत राहील माता लक्ष्मी; १ वर्ष चहूबाजूंनी कमावतील धन, आरोग्यही सुधारणार

पालकांसाठी लग्नाविना
मुंबईत राहणारी ५१ वर्षीय गुरप्रीत आपल्या माता-पित्यांसोबत राहते. दोघेही वृद्ध आहेत आणि विविध व्याधींनी ग्रस्त आहेत. मुंबईतील एका विख्यात व्यवस्थापन महाविद्यालयातून एम.बी.ए. झालेली आणि वीस वर्षांच्या कालावधीत कॉपरेरेट क्षेत्रात उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेली मार्केट अ‍ॅनालिस्ट आहे. एकुलती असल्याने तिच्या अपंग असलेल्या वडिलांची जबाबदारी आपल्यावर येईल म्हणून तिच्याशी विवाह करायला कोणी तयार झाले नाही. आता तर तिची आईदेखील मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त असून अल्झायमरचा विकारही त्यांना जडला आहे. त्यांच्या आजारपणावर बराच खर्च होत असल्याने गुरप्रीत त्यांच्या देखभालीसाठी आपली नोकरी सोडून देणे शक्य नव्हते. ‘‘या दोघांनाही २४ तास मॉनिटिरगची गरज असल्याने मी यांच्यासाठी दोन शिफ्टमध्ये नर्स ठेवून आपली नोकरी सुरू ठेवली. पण त्या नर्सचा त्रासच अधिक होऊ लागला. ‘‘शेवटी मी माझे करिअर वगैरे बाजूला ठेवले आणि आता घरून कन्सल्टन्सी करते. मला त्यांची नीट देखभाल करता येते. आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मला पैसे कमावणे आणि माझ्याही पुढील आयुष्यासाठी नियोजन करणे भाग आहे,’’ असे गुरप्रीत म्हणते. अत्यंत निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने गुरप्रीत आपली जबाबदारी निभावते आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगण्याचे स्वातंत्र्य तिला होतेच, परंतु आर्थिक कुवत नसतानाही पै पै जोडून आपल्या उच्च शिक्षणासाठी जे आई-वडील एकेकाळी झटले, त्यांना आता एकटे सोडून देणे गुरप्रीतला पटत नाही. केवळ बायकोच्या आई-वडिलांची जबाबदारी नको म्हणून गुरप्रीतसारख्या मुलीचा विवाह होऊ शकला नाही. मुलींच्या माता-पित्यांची जबाबदारी आपली न मानण्याची सामाजिक रूढी मुलींच्या जन्माचे सुतक पाळण्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे.

त्या ‘माठय़ा’ही व्हाव्यात
अंत्यसंस्काराच्या वेळी मुलाने अग्नी दिला तर ‘स्वर्गप्राप्ती’ होते असा एक रूढ समज दुर्दैवाने आपल्याकडे आजही आहे. मुली जर आई-वडिलांना मुलांच्या बरोबरीने सांभाळत असतील तर त्यांच्या हस्ते होणाऱ्या अंतिम संस्कारांनाही मान्यता मिळायला हवी. ‘शेवटी अग्नी देणार म्हणून मुलगाच हवा’ ही मानसिकता मुलींना अंतिम संस्कार करण्याचा अधिकार मिळाला तर दूर होऊ शकेल. म्हणूनच आता मुली जशा म्हातारपणच्या काठय़ा होताना दिसून येताहेत, तसेच त्यांना ‘माठय़ा’ ही (अंत्यसंस्काराच्या वेळी मडके (माठ) घेऊन पुढे जाणाऱ्या) होऊ देत! मुलगा मुलगी हा भेद नष्ट होण्याच्या मार्गावरील हा सर्वात महत्त्वाचा पल्ला असेल!

शर्वरी जोशी
(लेखातील सर्व स्त्रियांची नावे व ठिकाणं त्यांच्या विनंतीनुसार बदलली आहेत.)

sharvarijoshi10@gmail.com