शास्त्रीय नृत्यांगना ही तिची खरी ओळख. ‘शक्ती’, ‘इंडिया’सारखे नृत्याविष्कार तिने घडवले. त्यातूनच सामाजिक भानही जपलं आणि जे जे खटकलं त्याचा तेवढय़ाच ठामपणे निषेधही ती करत आली. ‘द अ‍ॅक्टिंग हेल्दी प्रोजेक्ट’, ‘पीअर एज्युकेटर्स प्रोजेक्ट’, ‘आनंदशाळा प्रोजेक्ट’, ‘फतेपुरा मॉडेल व्हिलेज प्रोजेक्ट’, ‘रुरल हेल्थ प्रोजेक्ट’ यात ती सक्रिय सहभागी झाली. ती म्हणजे मल्लिका साराभाई, म्हणते, ‘मी कायमच स्त्रीवादी राहिलेली आहे. ‘स्त्रीवादी’ याचा अर्थ असा की, जो स्त्रियांबरोबर सर्वाच्याच समान हक्कांसाठी लढतो तो! त्या लढय़ाची मशाल खांद्यावर घेऊन मल्लिका अजून लढतेच आहे..

एकदा प्रख्यात नृत्यांगना, पद्मभूषण  मल्लिका साराभाई यांना एकाने प्रश्न विचारला की, ‘तुमची ओळख नक्की कशी करून दिलेली तुम्हाला आवडेल? – नृत्यांगना, कोरिओग्राफर, प्रकाशक, सामाजिक कार्यकर्ती, लेखिका की अभिनेत्री?’ त्यांनी जे उत्तर दिलं ते फार छान होतं. त्या म्हणाल्या, ‘‘मला माझी ओळख एक उत्तम संवादक, कम्युनिकेटर अशी करून दिलेली आवडेल. वर तुम्ही ज्यांचा उल्लेख केलात त्या सगळ्या मी संवादासाठी वापरत असलेल्या माझ्या भाषा किंवा माध्यमं आहेत. आज जग आनंदी नाही. पण ते आनंदी, निरामय बनविण्यासाठी जगभर असंख्य आशावादी लोक प्रयत्न करताहेत. त्यांना एकत्र आणून जनमत तयार करण्याची आज गरज आहे. मी या साऱ्या भाषांच्या माध्यमांतून तेच करू पाहते आहे. ‘इनफ ऑफ ऑल दॅट इज राँग’ हा मी माझ्या जीवनाचा मंत्र बनवला आहे आणि त्यासाठी जे जे करता येईल ते ते मी करते आहे.’

मल्लिका हे करते आहे यात आश्चर्य नाही.. ते तिच्या रक्तातच आहे. भारताच्या अवकाश कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवणारे शास्त्रज्ञ विक्रम साराभाई व प्रख्यात नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांची ही सुविद्य कन्या.. आई व वडील या दोघांकडूनही तेच संस्कार घेत वाढली. ते संस्कार तिने स्वत:च्या प्रतिभेने, कष्टाने आणखी फुलविले हे तिचं श्रेय!

खरं तर ‘कला हे सामाजिक बदलासाठीचं माध्यम आहे’ असं मानणारा एक फार मोठा वर्ग स्वातंत्र्यानंतर भारतात होता. आजही आहे. पण आज आपण अंगीकारलेल्या भौतिकताप्रधान संस्कृतीमुळे हा संस्कार मागे पडत गेला. आणि आज तर त्यात कमालीची व्यावसायिकताच दिसते आहे. मल्लिका मात्र त्याला अपवाद आहे. त्याचं बाळकडू तिच्यात रुजवलं ते मात्र तिच्या आईने. मृणालिनीजींनी.

मल्लिका सांगते, ‘‘माझी आई ही अभिजात नृत्याचा वापर सामाजिक बदलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे विषय मांडण्यासाठी करणारी पहिली शास्त्रीय नृत्यांगना होती. स्त्रियांवर होणारे अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, पर्यावरण असे अनेक विषय तिने नृत्याच्या माध्यमातून हाताळले. १९७६ मध्ये तिने ‘मीरा’ केलं. त्यात मी व ती अशा दोघीच जणी होतो. मीरेच्या जीवनात तिला जो अंतर्गत व बा असा संघर्ष जाणवला तो तिने त्यात मांडला होता. मीरेचा कृष्णाच्या दिशेने होणारा अंतर्गत संघर्ष यात तिने सादर केला होता आणि भौतिक जीवनातला संघर्ष मी सादर केला होता. या दोन्ही मीरा एकत्र आल्यावर मीराबाई बनते. या नृत्यनाटय़ाच्या सादरीकरणाच्या वेळेस मला पहिल्यांदा व एकमेव असा पारलौकिक अनुभव आला. तो मी विसरूच शकणार नाही. दोन शरीरं पण एक आत्मा असं मी उंचावरून तटस्थपणे पाहतेय असं मला दिसलं. त्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला.’’

मल्लिका ही भरतनाटय़म व कुचिपुडी या दोन्ही नृत्य शैलीतली नामांकित नृत्यांगना असली व आर. आचारेलू यांच्यासारख्या तज्ज्ञ गुरूच्या मार्गदर्शनाखाली तिने कुचिपुडीचे अनाघ्रात सौंदर्य व ऊर्जा नि किटप्पा पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाटय़मचं संपूर्ण ज्ञान घेतलं असलं तरी तिच्या करिअरची सुरुवात मात्र नृत्याने नाही झाली. ती झाली ती पपेटरी म्हणजे बोलक्या बाहुल्यांच्या खेळाने. मल्लिका सांगते, ‘‘आमच्या ‘दर्पण’मध्ये आचार्यानीच आंध्र प्रदेशातील श्ॉडो पपेटरी आणली होती. मी ती शिकले आणि त्याचा मला पुढच्या सर्वच करिअरमध्ये खूपच उपयोग झाला. मग पंधराव्या वर्षी तर मी समांतर चित्रपटांत कामच सुरू केलं. ‘मुठ्ठीभर चावल’, ‘हिमालय से उंचा’, ‘मेन’, ‘गुर्जरी’, ‘कथा’ अशा अनेक चित्रपटांतून मी कामं केली. या सगळ्यातून माझ्या सामाजिक जाणिवाही खूप प्रगल्भ होत गेल्या होत्या. त्यातच मला पीटर ब्रूकचे ‘महाभारत’ करायची संधी मिळाली. तब्बल पाच र्वष मी त्यात द्रौपदी साकारली. त्या काळात मी एकूणच रामायण-महाभारत, पौराणिक कथा यांचा खूप अभ्यास केला. माझ्या असं लक्षात आलं की, स्त्रीकडे प्रचंड शक्ती आहे. पण आपल्या पुरुषप्रधान, पितृसत्ताक पद्धतीत तिच्या या शक्तीचं पद्धतशीर खच्चीकरण केलं जातंय. त्यातूनच माझं ‘शक्ती’ हे गाजलेलं नृत्यनाटय़ अस्तित्वात आलं. माझं कलेच्या प्रांतातलं सर्वात मोठं योगदान माझ्या मते हे आहे की, मी नृत्य, नाटय़, कथाकथन, संगीत आदी विविध कला प्रकारांमध्ये इतक्या वर्षांत ज्या भिंती तयार झाल्या होत्या त्या मोडल्या. सर्वच कला वापरून र्सवकष असा एकजिनसी कलाविष्कार निर्माण करत आले. ‘शक्ती’ हे त्याचं पहिलं प्रतीक वा उदाहरण.

त्या नंतर मी ‘सीताज् डॉटर्स’ केलं.. खरं तर सीतेला कुठे मुली होत्या? पण ज्यांनी ज्यांनी सीतेप्रमाणेच प्रस्थापित चौकटीला आव्हान दिलंय त्या मला तिच्या लेकी वाटतात. यासाठी मी बलात्काराने व्यथित झालेल्या हजारच्या वर मुलींच्या मुलाखती घेतल्या. पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. अगदी ‘चिपको’सारख्या आंदोलनांचाही अभ्यास केला आणि त्यातून साकारलं ‘सीताज् डॉटर्स’. यात मी बलात्कार, लिंग निदान, गर्भपात, यापासून ते चिपको आंदोलनांपर्यंत सगळे विषय हाताळले. त्याचे आम्ही तब्बल १२ र्वष जगभर ६५० प्रयोग केले. कच्छमध्ये तर अगदी १२ बलात्कारित स्त्रियांसाठी मी त्याचा प्रयोग केला त्या ज्या तऱ्हेने त्याच्याशी पूर्ण एकरूप झाल्या तो माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता.’’

मल्लिका एवढय़ावरच थांबलेली नाही. हर्ष मान्देर्स यांचं ‘अनहर्ड व्हॉईसेस’ हे गाजलेलं पुस्तक. त्यात भीक मागणारी, ट्रॅफिक सिग्नलवरची मुलं, हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारी मुलं अशांच्या संघर्षांची आणि जिद्दीची कहाणी आहे. मल्लिकाने त्यावरही, त्याच नावाचं नृत्य नाटय़ बसवलं. तर तिच्या ‘इंडिया’ नावाच्या नृत्य नाटय़ात देशभरातल्या म्हणजे अगदी बॉलीवूडपासून ते मिझोराममधल्या आदिवासींपर्यंत सगळ्यांच्याच जीवनशैलीचं दर्शन तिने नृत्याच्या माध्यमातून घडवलं. मात्र जवळपास ३० चित्रपटांतून काम,  नृत्याचे विविध कार्यक्रम, द्रौपदीसारखं तब्बल पाच र्वष चाललेलं नृत्यनाटय़ या सगळ्या माध्यमांमधून अभिव्यक्त होत असतानाही मल्लिकाची अभिव्यक्त होण्याची आस पूर्ण होत नव्हती. ती त्यासाठी नवनवी माध्यमं शोधत होती. कोणी तरी तिला लिखाणाविषयी सुचवलं. आपल्याला लिहिता येतं हेच तिला माहीत नव्हतं. पण तिने प्रयत्न केला आणि तिला खूप मोकळं वाटलं. मग ती धडाधड लिहीत सुटली. मानवाधिकार, स्त्रीचे सबलीकरण, जातिवाद, कायदा व सुव्यवस्था, भ्रष्टाचार व इतर अनेक मुद्दय़ांवर तिने लिहिलं. अनेक विकासकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. विशेषत: गरीब वर्गातील स्त्रियांचे तसेच अर्भकांचे प्रसूतीदरम्यान होणारे मृत्यू हा भारतातला एक चिंतेचा विषय. त्यासाठी तिने ‘द अ‍ॅक्टिंग हेल्दी प्रोजेक्ट २००८’ हा प्रकल्प चालवला. युनिसेफच्या ‘पीअर एज्युकेटर्स प्रोजेक्ट’, ‘आनंदशाळा प्रोजेक्ट’, ‘फतेपुरा मॉडेल व्हिलेज प्रोजेक्ट’, ‘रुरल हेल्थ प्रोजेक्ट’ यात ती सक्रियदृष्टय़ा सहभागी होती. तिचा एकूणच बाणा लढाऊ . त्यामुळे गुजरातमधील भीषण दंगलीनंतर तिने गुजरातमधील तत्कालीन भाजप सरकारच्या विरुद्ध मुस्लीम हत्याकांडाला पाठिंबा दिल्याचा आरोप करणारी एक जनहित याचिकाही दाखल केली होती.

ती सांगते, ‘‘माझी आईही अन्यायाविरुद्ध कायम लढत आली. तिचा हा स्वभाव, निसर्गाबद्दलचं प्रेम माझ्यातही आलं. पण तिने माझ्याइतके लढे कधी थेट अंगावर घेतले नाहीत. तिचा पवित्रा सौम्य असायचा. माझा थेट भिडण्याचा, लढण्याचा स्वभाव बघून ती नेहमी म्हणायची की, या बाबतीत मी माझ्या दोन्ही लढाऊ  बाण्याच्या आत्या मृदुला व लक्ष्मी यांच्यावर गेलीय.’’

पण मल्लिकाचं आणखी एक वेगळेपण फार मनोज्ञ आहे. ती तात्कालिक लढे लढत आली. विषय हाताळत आली, विकास प्रकल्प राबवत आली. पण त्याचबरोबर तिने कायमस्वरूपी योगदान देण्याच्या दृष्टीनेही बरंच काही केलंय. तिच्या आईने स्थापन केलेल्या ‘दर्पण अ‍ॅकेडमी ऑफ परफॉर्मिग आर्ट्स’ची तर ती सहसंचालक आहेच. पण त्यात तिने ‘दर्पण फॉर डेव्हलपमेंट’ ही नवीन शाखा उघडली. कोणताही परफॉरमन्स हा बदलाची भाषा म्हणून कसा विकसित करता येईल यावर इथे लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. तसंच भारताचं आदिवासी संगीत, संस्कृती, अन्य कला यांच्या जतनासाठी तिने ‘जनवाक’ ही शाखा सुरू केली आहे. जनवाक म्हणजे लोकांची भाषा!

त्यानंतर दृक्-श्राव्य प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती घडवून आणण्यासाठी २००१ मध्ये तिने ‘दर्पण कम्युनिकेशन्स’ सुरू केलं. त्याद्वारे तिने गुजराती भाषेतून लैंगिक भेद, जातीय विद्वेष, पर्यावरण, भ्रष्टाचार, हिंसाचार आदी विषयांवर सुमारे २५०० तास भरतील इतके कार्यक्रम सदर केले. तेही खूप गाजले.

हे सगळंच तिने इतकं मनापासून केलंय.. अजून करतेय की खरोखरच तिची नेमकी ओळख काय म्हणून करून द्यायची हा प्रश्नच आहे, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमीपासून असंख्य पुरस्कार मिळवणारी ही कलावती आज वय वाढलं, मान-सन्मानांची मोरपिसं शिरपेचात खोवली गेली तरी तितकीच साधीही आहे आणि लढाऊही आहे. ‘इनफ ऑफ ऑल दॅट इज राँग’ हा मंत्र घेऊन लढते आहे. कला ही फक्त करमणुकीचं माध्यम नाही ती सामाजिक बदलाचं माध्यम आहे हे जनमानसावर व विशेषत: सत्ताधीशांच्या मनावर ठसवण्यासाठी झटते आहे. ‘यू हॅव ट्रीटेड द आर्टस् अ‍ॅज द चेरी ऑन द केक. इट नीडस् टू बी द यीस्ट’ हे तिचं वाक्य आज अनेकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करत आहे. ‘मी कायमच स्त्रीवादी राहिलेली आहे. आणि ‘स्त्रीवादी’ या शब्दाचा अर्थ असा आहे की जो स्त्रियांच्या आणि त्याच बरोबर सर्वाच्याच समान हक्कांसाठी लढतो. आता आपल्याकडे ज्यांचं शोषण होताना दिसतं त्यात ५५ टक्के स्त्रियाच आहेत. त्याला काय करायचं?’’ असं तिचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्या लढय़ाची मशाल खांद्यावर घेऊन मल्लिका अजून लढते आहे..

जयश्री देसाई  jayashreedesaii@gmail.com