२०१७ या वर्षीचा ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून ‘द सायलन्स ब्रेकर्स’ ठरलेल्या सहा जणींची निवड केली गेली आणि त्यातूनच आपल्यावरील लैंगिक अत्याचाराविरोधात गप्प बसण्याचे दिवस गेले. आता त्याच्याविरोधात आवाज उठवून समोरच्याला कायदेशीर शिक्षा करण्याचे प्रभावी अस्त्र स्त्रियांच्या हाती आल्याचा खणखणीत संदेश यातून दिला गेला. त्या मासिकाविषयी..

गेल्या वर्षी म्हणजे २०१७ च्या डिसेंबर महिन्यात माझे अमेरिकेत वास्तव्य असताना, जगप्रसिद्ध ‘टाइम’ नियतकालिकाचा १८ डिसेंबर २०१७ चा अंक हातात पडला. त्याच्या मुखपृष्ठावर ‘पर्सन ऑफ द इयर’ असे मोठय़ा आणि ठळक अक्षरात लिहिले होते. त्याचबरोबर पाच अमेरिकन स्त्रियांचे छायाचित्र आणि त्याच्या डाव्या बाजूस ‘द सायलन्स ब्रेकर्स – द व्हाइसेस दॅट लाँच्ड ए मूव्हमेंट’ असे छोटय़ा अक्षरात लिहिले होते. माझे कुतूहल साहजिकच जागे झाले. कारण दरवर्षी याच सुमारास ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणजे त्या वर्षांतील ‘सर्वाधिक प्रभावी व्यक्ती’ची निवड ‘टाइम’ मासिकाकडून होत असते. हा मानाचा ‘किताब २०१७’ मध्ये कुणाला मिळतो याकडे त्यावेळी साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते.

दरवर्षी सप्टेंबर महिन्यापासून ‘पर्सन ऑफ द इयर’च्या निवड प्रक्रियेला सुरुवात होते. नामांकन प्रसिद्ध करून त्यावर जनतेचा मिळालेला प्रतिसाद, संपादक मंडळाची चर्चासत्रे, मासिकाच्या पत्रकारांशी केलेला विचारविनिमय या सर्व प्रक्रियेतून पार पडल्यावर डिसेंबरमध्ये हा निकाल जाहीर करण्यात येतो. २०१७ ला मानांकन मिळणाऱ्यात परत एकदा अमेरिकेचे वादळी व्यक्तिमत्त्व अध्यक्ष ट्रम्प, अमेरिकेला सतत आव्हान देणाऱ्या शक्तिशाली चीनचे सर्वेसर्वा झी जिनपिंग, प्रत्यक्ष ट्रम्पनाच धारेवर धरणारे एफबीआय या अमेरिकी गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख रॉबर्ट मुल्लर, अण्वस्त्रांचा विकास करून साऱ्या जगास वेठीस धरणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन व कोलिन कायपर्णीक हा आदर्शवादी, पॅटी जेनकिन्स ही स्त्रीमुक्तीवादी आणि याबरोबरच सायलन्स ब्रेकर म्हणजे ‘मौन सोडून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांचा समावेश होता. अखेरीस नामांकन मिळालेल्या या सर्व तगडय़ा, खंद्या व्यक्तींच्या पुढे जाऊन, २०१७ चा मानाचा ‘सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व’ किताब सायलेन्स ब्रेकर्स नावाने संबोधल्या गेलेल्या सहा स्त्रियांना प्रातिनिधिक स्वरूपात दिला गेला.

कोण आहेत या स्त्रिया? या अंकाच्या मुखपृष्ठावर ज्यांची छायाचित्रे आहेत, त्या आहेत, -अ‍ॅशले जड्, सुसान फॉवलेर, आडमा नेऊ , टेलर स्विफ्ट आणि इसाबेल पासकल. त्याशिवाय मासिकाच्या आतल्या पानावर ६१ जणांचे फोटो आहेत. (यात काही पुरुषदेखील आहेत.) या सगळ्यांनी अमेरिकेसारख्या प्रगत देशातदेखील कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक, मानसिक, शारीरिक अत्याचारावर प्रकाश टाकून एक विदारक सत्य जागतिक पातळीवर उघडे केले आहे. मासिकाच्या मुखपृष्ठावरील सहाही जणी (सहाव्या स्त्रीचा चेहेरा न दाखवता आतमध्ये तिच्या नावाचा उल्लेख आहे) वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करीत असून त्यातील काही जणी तर यशाच्या अत्युच्च शिखरावर पोचल्या आहेत. परंतु लैंगिक अत्याचाराचा अनुभव केवळ स्त्री असल्यामुळे त्यांनादेखील आला आहे. फरक इतकाच की याबद्दल न बोलता ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ असे म्हणत रडणाऱ्या, कुढणाऱ्या स्त्रियांचा भेदरट पवित्रा भिरकावून देत स्वत:चे वैयक्तिक अनुभव सांगत या अत्याचारांचे भयानक स्वरूप आणि त्याची व्याप्ती किती प्रचंड आहे हे प्रथमच त्यांनी जगाला दाखवून दिले. त्या प्रतिनिधित्व करतात त्या आहेत नोकरी करणाऱ्या, करियरची स्वप्ने पाहणाऱ्या, आपल्या बुद्धिमत्तेच्या, शिक्षणाच्या, अनुभवाच्या बळावर समाजात नाव कमावण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रिया. चित्रपट, माध्यमे, कला, अर्थ, शिक्षण, क्रीडा आणि कॉर्पोरेट जगत अशा सर्वच क्षेत्रांत लीलया वावरणाऱ्या स्त्रिया. पंचविशीच्या आसपासच्या, पन्नाशी पार केलेल्या, कुमारिका, विवाहिता, अगदी आई असलेल्या एका प्रगत देशातील कर्तबगार स्त्रिया. पण या स्त्रियांना आपल्या कामाच्या ठिकाणी लैंगिक, मानसिक, शारीरिक छळाला तोंड द्यावे लागले. कारण एकच. स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून बघण्याचा पुरुषी दृष्टिकोन. पण या स्त्रिया बधल्या नाहीत. कामाच्या ठिकाणी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांना प्रथमच प्रचंड मोठय़ा प्रमाणात निर्भीडपणे वाचा फोडत, ‘मी टू’ नावाने समाजमाध्यमांवर त्यांनी चळवळ सुरू केली. लाखो स्त्रियांचा आक्रोश त्यातून व्यक्त झाला. या चळवळीच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे टाइमचे ‘पर्सन ऑफ द इयर’चे नामांकन मिळाले आणि या स्त्रियांना ‘सायलेन्स ब्रेकर्स’ संबोधण्यात आले.

अ‍ॅशले जड् या हॉलीवूडमधील चित्रपट तारकेने हॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांचा निर्माता हार्वे वाईन्स्टीन याने तिच्यावर १९९७ मध्ये केलेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध केला होता. आपल्या वडिलांकडेदेखील तिने आपले दु:ख बोलून दाखवले होते. पण त्याचे स्वरूप दबलेले, भेदरलेले असेच राहिले. भक्कम पुराव्याअभावी कायदेशीर मार्गाचा अवलंबसुद्धा करता येत नाही हे तिच्या लक्षात आले. शेवटी २०१७ च्या ऑक्टोबर महिन्यात ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या प्रसिद्ध वर्तमानपत्रास तिने यासंबंधी सविस्तर मुलाखत दिली. तिची ती कहाणी अमेरिकेत लाखो पीडित स्त्रियांनी ऐकली. त्यापासून प्रेरित होऊन स्ट्रॉबेरीच्या मळ्यात काम करणाऱ्या ‘इसाबेल पासकल’सारख्या गरीब स्त्रीपासून ते इंजिनीअर्स, प्राध्यापक आणि विविध क्षेत्रातील सगळ्याच कर्तबगार पण लैंगिक अत्याचाराने पीडित अशा स्त्रियांनी आवाज उठवला.

अंकाची पाने वाचता वाचता जशी उलटत गेले तसतशी स्त्रियांवर होणारे लैंगिक, मानसिक अत्याचारदेखील किती विविध प्रकारचे आणि किती विविध पुरुषी मानसिकतेतून आलेले असतात हे वाचून मन अगदी सुन्न झाले. ‘सिलिकॉन व्हॅली’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कॅलिफोर्नियातील माहिती तंत्रज्ञानाच्या नंदनवनातदेखील मुलींना लैंगिक अत्याचारांना कसे तोंड द्यावे लागते, त्याचा चीड आणणारा अनुभव सुसान फॉवलेर या तरुण इंजिनीअर मुलीने सोशल मीडियावर आपला ब्लॉग लिहून चव्हाटय़ावर आणला आहे. ती ज्या स्टार्ट अप कंपनीत काम करीत होती त्या कंपनीचा एक संस्थापकच आणि त्या कंपनीतील त्याचे मित्रमंडळ या सर्वानी मिळून तिचा सामूहिक विकृत असा मानसिक, लैंगिक छळ केला. ब्लॉगवर आपल्या दु:खाला वाचा फोडल्यानंतर मात्र त्याची लगेच दखल घेण्यात आली व संस्थापकासह कंपनीतील २० जणांची तडकाफडकी हकालपट्टी झाली. तिच्यासाठी तिच्या करियरमधला हा एक मानबिंदूच म्हटला पाहिजे. त्याच कॅलिफोर्नियात राजकारणात करियर करणारी आदाम नेऊ  ही आणखी एक महिला. कामाच्या ठिकाणी पुरुषवर्गाने येता-जाता गलिच्छ, सूचक बोलणे, शेरे मारणे, प्रसंगी नको तिथे हात लावणे यामुळे त्रस्त होऊन तिने एक निषेधपत्रकच तयार केले. त्यावर तिच्यासारख्याच पीडित स्त्रियांची स्वाक्षरी घेण्याची मोहीम सुरू केली. १४० जणींनी तिला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि कॅलिफोर्निया राज्यशासनाला त्याची दाखल घ्यावीच लागली.

टेलर स्विफ्ट या गायिकेची कहाणी थोडी वेगळी पण प्रेरणादायी आहे. एका रेडिओ स्टेशनवर काम करताना तिथल्या पुरुष रेडिओ डीजेने एका फोटो सेशनच्या वेळी तिच्याशी अतिशय अश्लाघ्य चाळे केले. तिने लगेच त्याचा निषेध नोंदवून तक्रार केल्यावर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. पण पुरुषी अहंकार ठेचला गेल्याने त्याने तिलाच बदनामी केल्याच्या आरोपावरून कोर्टात खेचले. टेलरनेदेखील खचून न जाता उलट फिर्याद करून न्याय तर मिळवलाच वरून डॉलर्सची घसघशीत भरपाईदेखील मिळवली. या आणि अशा अनेक स्त्रियांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या स्त्रियांना, हा ‘सायलन्स ब्रेकर्स’चा मान मिळाल्यामुळे एका नव्या युगाची नांदीच सुरू झाली असावी असे खुद्द टाइम मासिकाचे संपादकमहोदयच म्हणतात.

‘टाइम’ मासिक वाचून हातावेगळे केले. पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी सुखद भावना निर्माण झाली. आशेचा किरण दिसू लागला. हेही कळून चुकले की स्त्रियांवरचे अत्याचार कमी होण्यासाठी कायद्याचे हात अपुरेच आहेत. पुरुषांना सुसंस्कारित बनवून त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे म्हणजे एक अत्यंत जिकिरीचे कामच आहे. पण ‘तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार’ हे तत्त्व ध्यानात ठेवून स्त्रियांनाच आत्मभान आले पाहिजे. आपल्यावरती होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध मोठय़ा संख्येने, निर्भीडपणे आवाज उठवणे हेच प्रभावी हत्यार आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर करून सत्ता व अधिकाराने मदांध झालेल्या पुरुषांची सर्व समाजात, त्यांच्याच कर्माने जेव्हा छीथू होईल, समाजात तोंड दाखवणे जेव्हा त्यांचे त्यांनाच मुश्किल होईल, तेव्हाच ही ‘सायलन्स ब्रेकर्स’ची चळवळ खऱ्या अर्थाने यशस्वी होईल.

– चित्रा वैद्य

chitraanov@gmail.com