चित्रपट हे खरं तर सशक्त माध्यम. असंख्य दर्जेदार चित्रपट तेवढय़ाच दर्जेदार निर्माते, दिग्दर्शकांनी देऊन आपलं चित्रपटविश्व संपन्न केलं. मात्र याच माध्यमाचा वापर स्त्रीला उपभोग्य वस्तू म्हणून सिद्ध करण्यातही झाला. चित्रपटातली जिथे अत्यावश्यक असेल तेथली नग्नता सर्वमान्य होतीच, पण ‘प्रेक्षकांना हवं’ या नावाखाली होत राहिलेलं तिच्या देहाचं प्रदर्शन या क्षेत्रातलं पुरुषवर्चस्वच सिद्ध करत राहिलं. नको असेल तिथे नाही म्हणण्याची ताकद आपले कलाकार कधी दाखवणार हाही ‘मी टू’च्या निमित्ताने एक प्रश्न..

‘‘मेल्या, मुडद्या, तुला आईबहिणी कुणी आहेत की नाहीत?’’ – हा प्रश्न पूर्वीच्या मराठी ग्रामीण चित्रपटांत बऱ्याचदा ऐकायला मिळायचा. तो खरं म्हणजे हिंदी चित्रपटातल्या बऱ्याच निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आणि नटांना विचारायला हवा. चित्रपटांमागून चित्रपटात हे रुपेरी, चंदेरी दु:शासन द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रयोग न कंटाळता इमानेइतबारे करत आले आहेत. स्त्रीचे अश्रू आणि अवयव, तर-तम भाव न करता दोन्ही त्यांनी एकसारख्या कौशल्यानं विकून तुडुंब गल्ला भरला आहे. इथे हिंदी चित्रपट व्यावसायिकांचं नाव घेतलं, कारण ते सर्वपरिचित आहेत; पण ‘एक रेप दाखवू, बाबा दोन रेप दाखवू’ हा खेळ लीलया करणारे ते एकटे नाहीत. त्यांचे दाक्षिणात्य आणि इतर भाषक व्यवसायबंधू या खेळात त्यांच्याइतकेच तरबेज आहेत. स्त्रीशोषण कार्यातही राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता दिसते ती अशी! आणि हॉलीवूडचे चित्रपट पाहिले की या खेळाचं जागतिकीकरण झाल्याचं अगाध ज्ञान होतं.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

एका ज्येष्ठ खलनायकाची आठवण या क्षणी होते. माझ्यासमोरच हा किस्सा घडला. एकदा एका स्टुडिओमध्ये त्यांच्या दोन चित्रपटांचं शूटिंग चालू होतं. ‘स्क्रिप्ट’ वगैरेचा प्रश्नच नव्हता. सेटवर गेल्यावर आयत्या वेळीच दृश्य अन् संवाद मिळणार, हे ठरलेलंच होतं. ‘‘आज तुम्हाला काही त्रास नाही!’’ दिग्दर्शक हसत हसत त्यांना म्हणाला. ‘‘रेप सीन तर करायचाय्!’’ शूटिंग पार पाडून ते दुसऱ्या चित्रपटाच्या शेजारच्या सेटवर गेले. ‘‘काय सीन आहे’’ म्हणून त्यांनी विचारणा करताच उत्तर मिळालं, ‘‘काहीच अवघड नाही; तुम्हाला फक्त ‘रेप’ करायचाय.’’ कंटाळून जांभई देत ते ‘कामाला’ सिद्ध झाले. दृश्यातली सहकलाकार कोण आहे म्हणून त्यांनी बघितलं आणि कपाळावर हात मारून घेतला. मघाशी त्यांच्याबरोबर काम करणारी अभिनेत्रीच आताही त्यांच्याबरोबर होती! उद्विग्न होऊन ते उद्गारले, ‘‘अहो, सीन बदलता येणार नाही, कबूल आहे, पण बाई तर बदलता आली असती ना!’’ त्यांनी हे उपहासाने म्हणत आपला वैताग जाहीर केला.  पण निर्माते – दिग्दर्शकांना कंटाळा नव्हता ना अजून आलेला. सच्चा कलावंताला तेच तेच करण्यात आणि अशा साचेबद्ध भूमिका करायला आवडत नाहीत; पण ते निर्मात्यांना कोण सांगणार?

‘थ्री इडियट’सारख्या महत्त्वपूर्ण(!), ‘कल्ट मुव्ही’ म्हणून गाजलेल्या चित्रपटात तर ‘बलात्कार’ आणि ‘स्तन’ या शब्दांचा वापर हास्यनिर्मितीसाठी करण्याचा अधमपणा दिसतो. इतर नटांपेक्षा आणि निर्मात्यांपेक्षा आपण वेगळे आहोत, सामाजिक जाणीव आपल्यापाशी आहे, असा टेंभा मिरवणाऱ्या आमिर खानच्या चित्रपटांमध्ये असे अश्लीलच नव्हे तर अभद्र आणि संवेदनशून्य प्रसंग दिसावेत हा योगायोग म्हणायचा का? नाही म्हणजे इतर निर्मात्यांच्या चित्रपटात पटकथेपासून प्रमोशनपर्यंत सगळ्या गोष्टींत सहभागी असण्याकरिता आमिरचा लौकिक आहे म्हणून विचारणा. हाच आमिर ‘फना’मध्ये ‘मैं टीचर के बम की चुटकी लेता था’ या शब्दांत आपला महापराक्रम आठ-दहा वर्षांच्या मुलाला हसत हसत सांगतो. ‘दिल’मध्ये तर हा पुरुषोत्तम प्रसाधनगृहांवरच्या पाटय़ा बदलून नायिकेला पुरुषांच्या प्रसाधनगृहात पाठवतो. दुसऱ्या एका प्रसंगात तिच्या पाठीवर ‘फॉर सेल’ ही चिठ्ठी लावतो. ही दृश्यं पाहून प्रेक्षकानं हसावं, अशी आमिरची आणि निर्माता-दिग्दर्शकाची अपेक्षा असते.

आमिर खानसारखा चोखंदळ आणि ‘परफेक्शनिस्ट’ कलाकारच नाही, तर ‘पा’सारख्या चित्रपटातला अमिताभ बच्चन यांनी रंगवलेला दहा वर्षांचा मुलगासुद्धा आजीला ‘बम’ या अवयववाचक नावानं हाक मारतो! तरुणच काय, वृद्ध स्त्रियांचीसुद्धा हिंदी चित्रपटातल्या पोस्टमार्टेममधून सुटका नाही. आईचं गुणगान करायचं, तर दुसरीकडे मातृत्वाचा अपमान करायचा, अशी हिंदी चित्रपट दिग्दर्शकाची सोयीस्कर, दुतोंडी प्रवृत्ती आहे. एरवी ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये नायिकेनं मुलाला दूध पाजण्याचं दृश्य येऊच कसं शकतं? इथे सोवळेपणाचा प्रश्न नाही. याच राज कपूरनं ‘मेरा नाम जोकर’मध्ये नायिकेची अनावृत्त मांडी दाखवली, त्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही, कारण त्या दृश्याला संदर्भ होता; कारण होतं. ‘राम तेरी..’मध्ये त्या दृश्याच्या अस्तित्वाला काहीच कारण नव्हतं. ‘जिस देश में गंगा बहती है’मधला चित्रपटकलेचा प्रेमपुजारी राज कपूर लुप्त झाला. त्याची जागा देहस्वी ‘शोमन’नं घेतली. तिथपासून सुरू झालेल्या अध:पाताचा उच्चांक ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये झाला.

या सवंग दृश्यांबरोबर आठवते ‘बॅन्डिट क्वीन’ या चित्रपटातलं नायिकेची नग्न धिंड काढली जाते ते भयानक दृश्य! तिथे तर नायिका कमरेच्या खाली वस्त्रच नाही. असं असूनही थिएटरमध्ये अजिबात शेरेबाजी होत नाही की शिट्टय़ा घुमत नाहीत. कारण ते नायिकेच्या शरीराचं नग्न दर्शन नाहीच. स्त्रीचं शोषण करणाऱ्या आणि पशूपेक्षाही खालच्या पातळीवरच्या उन्मत्त पुरुषाच्या क्रौर्याचं ते नग्न दर्शन आहे. ते बघताना माणूस सुन्न होऊन जातो. तिथे वावगा विचार मनात येऊच शकत नाही. माणसापासून दूर झालेलं ते माणुसकीचं फाटकं वस्त्र आहे. असा एखादाच दिग्दर्शक (शेखर कपूर) स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराची धारदार दखल घेतो. बाकीचे सगळे स्वत:चं पोट जाळण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत खाली उतरताना दिसतात आणि हे फक्त चित्रपटातच घडतं असं नाही. चित्रपट हे व्हिज्युअल मीडियम (दृश्य माध्यम) असल्यामुळे आणि अशी दृश्यं करणारी नायिका ही खरीखुरी स्त्री असल्यामुळे त्यातली अश्लीलता लगेच नजरेत भरते, इतकंच. इतर माध्यमांमध्येही स्त्रीच्या देहसौंदर्याचं भडक चित्रण आहेच.

पुरुषांनी स्त्रीच्या देहसौंदर्यावर कविता लिहिल्या, कथा-कादंबऱ्या लिहिल्या, तिची सुंदर चित्रं रेखाटली. कौतुक कुणाला आवडत नाही? विविध माध्यमांतून झालेल्या या स्तुतीला स्त्री भुलली, फशी पडली. पुरुष आपलं कौतुक करतोय, पण तो आपलं फक्त शरीर बघतोय; आपलं मन बघत नाहीये हे तिच्या लक्षातच आलं नाही. शब्दांनी असेल, रंगांनी असेल किंवा कॅमेऱ्यानं असेल, स्त्रीचं चित्रण करताना ती जशी आहे, तसं तिचं चित्रण करण्याऐवजी तिनं कसं असावं याचं चित्रण तो करत होता. ते करताना तो आपल्या अपेक्षा व्यक्त करत होता आणि त्यानुसार तिला ‘घडवत’ होता. पुरुषप्रधान समाजव्यवस्था असल्यामुळे हे ‘कार्य’ करणं त्याला सहज जमलं. तिनं कपडे कोणते, किती आणि कसे घालायचे हे तो ठरवत होता. कॅमेरा म्हणजे त्याच्या हातात पडलेलं कोलीतच होतं. चित्रपट, जाहिराती, कॅलेंडर सारं काही विकाऊ होतं आणि ते विकण्यासाठी स्त्रीचा चेहरा आणि एकंदरीतच तिचा देह हे उत्तम साधन होतं. भरपूर पैसा मोजून ते साधन घेतलं जात होतं, वापरलं जात होतं. अभिजात चित्रकलेबरोबर धंदेवाईक चित्रकलेनंही या साधनाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. कधी खऱ्याखुऱ्या गरजेसाठी, कधी पैशासाठी, तर कधी प्रसिद्धीसाठी स्त्रीदेखील या खेळात इच्छेनं वा अनिच्छेनं सामील झाली. शिक्षण आणि नोकरी यांच्याबरोबर नटी किंवा मॉडेल होण्यासाठी घराबाहेर पडू लागली.

पुरुष सौदागर असतो म्हणतात. ‘तो’ स्त्रीला पैसा आणि प्रसिद्धी थोडीच फुकट देणार होता? जोडीला मीच कर्ता, मीच करविता, मीच पोशिंदा, मीच दाता (मीच प्रायोजकसुद्धा!) हा अहंकार होताच. पैसा आणि बिछाना ही त्याची पुरुषार्थाची, पराक्रमाची ओळख बनली – म्हणजे त्यानंच बनवली. ही ओळख सिद्ध करण्यासाठी आणि जगजाहीर करण्यासाठी स्त्री हे साधन ठरली. स्त्रीला आदर देणारे, तिचा मान राखणारे, तिच्यावर खरोखर प्रेम करणारे आणि तिची काळजी घेणारे पुरुष समाजात होतेच; पण त्यांच्यापाशी पैसा नव्हता. तो असला तरी ग्लमर नव्हतं, प्रसिद्धी नव्हती आणि स्त्री सहवासाची संधीही नव्हती. सिनेमा आणि जाहिरात क्षेत्रांतल्या अनेक पुरुषांपाशी या तिन्ही गोष्टी मुबलक होत्या. त्यांनी या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतला आणि स्त्रीला ‘उपभोग्य वस्तू’ बनवलं. बाहेरून लेखक मंडळी या समजुतीला खतपाणी घालत होते. ‘स्त्रीचा नकार म्हणजे होकार’, ‘साली आधी घरवाली’ अशी मुक्ताफळं उधळून ते निरनिराळ्या स्त्रियांशी पुरुषाचा संबंध राहील असं वातावरण निर्माण करत होते. नर्स, सेक्रेटरी आणि कला क्षेत्रातल्या स्त्रिया सैल वर्तनाच्या असतात, त्या ‘उपलब्ध’ (अव्हेलेबल) असतात, काम मिळवण्यासाठी त्यांना ‘तडजोड’ करावीच लागते, असे गैरसमज त्यांनी पसरवले. त्याचबरोबर या क्षेत्रातल्या विवाहित पुरुषांची सोयही बघितली. श्रीमंत कलावंत पुरुषांना (अर्थात विवाहित) पत्नीबरोबरच मैत्रीण किंवा प्रेयसी असणार, हे गृहीतकही सिद्ध झालं. पत्नीला घटस्फोट न देता सिनेमा क्षेत्रातले पुरुष अभिनेत्रींशी पत्नीसारखे संबंध ठेवत होते. इतकं असून या पुरुषांच्या घरी दरवर्षी पाळणा हलत होता.

चित्रपटाची लोकप्रियता वाढत गेली, तशी त्या क्षेत्रातल्या स्त्री-पुरुषांबद्दल मसालेदार ‘गॉसिप’ छापलं जाऊ लागलं. कधी सिनेमा खपवण्यासाठी सिनेमावाले स्वत:होऊन स्वत:बद्दल ‘गॉसिप’ पसरवू लागले. पाचव्या-सहाव्या दशकात उदंड लोकप्रिय असलेल्या एका विनोदी नटाच्या निरनिराळ्या (साहाय्यक दर्जाच्या) अभिनेत्रींबरोबर जोडय़ा जमायच्या आणि गाजायच्यादेखील! काही निर्माते-दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये ठरावीक अभिनेत्री न चुकता दिसायच्या. अलीकडे तर उत्तम मागणी असलेल्या एका चरित्र नटानं एका चरित्र नटीशी जोडी जमवली आणि त्यांची मागणी कायम राहावी म्हणून हा बहाद्दर स्वत:च पत्रकारांना आपल्या प्रेम प्रकरणाचे सुरस तपशील पुरवायचा. काही दिवसांनी म्हणजे बहुधा घरात भांडय़ाला भांडं लागल्यानंतर – त्यानं स्वत:च ‘हे प्रेम प्रकरण बनावट होतं आणि काम मिळवण्यासाठी आम्ही दोघांनी ते रचलं होतं,’ असं मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं!

असे खुशीचे सौदे बऱ्याचदा पुढे नाखुशीचे होतात – आणि मग पत्रकारांना आणि पब्लिकला खमंग ‘गॉसिप’ मिळतं. अगदी थोडय़ाच वर्षांपूर्वी एका नवोदित अभिनेत्रीनं एका बऱ्यापैकी यशस्वी दिग्दर्शकावर खटला भरला होता. चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून तो तीन र्वष तिच्यावर बलात्कार करत होता, अशी तिची तक्रार होती. खटला तिच्याविरुद्ध गेला आणि आजतागायत ती पडद्यामागेच आहे. खटला ‘हिट’ झाला होता. म्हणजे गेला बाजार ती ‘बिग बॉस’मध्ये दिसायला हवी होती. दुर्दैव, मोठय़ा किंवा छोटय़ा, कोणत्याच पडद्यावर तिचं आगमन झालं नाही. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तिची तक्रार बलात्काराबद्दल नव्हती; काम न मिळण्याबद्दल होती आणि मला वाटतं, ती बरोबर होती. एकदा सौदा ठरल्यावर तो पूर्ण व्हायला हवा. ‘असा सौदा’ करणाऱ्यांनी या मंडळींकडून लिखापढी करून घ्यायला हवी. कदाचित त्या स्त्रीनं न्यायालयात धाव न घेता एखाद्या इंग्रजी फिल्म नियतकालिकाला या प्रकरणाची माहिती पुरवली असती, तर तिचं काम झालं असतं!

निर्माता/दिग्दर्शक नटीपेक्षा प्रसिद्ध असेल, तर बहुतेकदा खटल्यांचे निकाल स्त्रीच्या विरुद्ध लागतात. अशा बदनामीची चित्रपट व्यवसायातल्या पुरुषांना फिकीर नसते. त्यामुळे त्यांचं काही बिघडत नाही आणि प्रसिद्धी मिळते. पुरुषाच्या बाबतीत असे संबंध हा मर्दुमकीचाच पुरावा असतो ना! पंचाईत होते सिनेमे बघून त्याप्रमाणे वागायला जाणाऱ्यांची.  आपल्या चित्रपटातून हे तरुण प्रेमवीरांना काय काय शिकवत असतात! दोन जिवलग मित्रांचं एकाच स्त्रीवर प्रेम असेल, तर तो मैत्रीखातर प्रेमाला तिलांजली देतो आणि त्याचं म्हणणं स्त्रीला मान्य करावं लागतं. तिला मन आणि मत असण्याची मुभाच नाही. सहाव्या-सातव्या दशकापर्यंत असे चित्रपट बनत होते आणि चालत होते. एकविसाव्या शतकात येताना त्यांच्यात एवढाच बदल झालाय की, आता नायक आपली प्रेयसी दुसऱ्या पुरुषाला ‘सप्रेम भेट’ देत नाहीत, उलट त्याची ‘गर्लफ्रेंड’ हा पळवतो. आपलंच कसं तिच्यावर खरं प्रेम आहे, हे सिद्ध करून ऐन मंडपातून हा प्रेमवीर आपल्या प्रेयसीला घेऊन जातो.

शम्मी कपूरसारखा नायक असेल, तर पडद्यावरच्या स्त्रीची आणखीच पंचाईत होते. तो तिचा होकार/नकार लक्षात घेतच नाही. त्याच्या मनात भरलेल्या स्त्रीचा तो तिला जीव नकोसा होईपर्यंत पाठलाग करतो. शेवटी, बहुधा कंटाळून ती त्याचा ‘स्वीकार’ करते! एकतर्फी प्रेमातून स्त्रीचा मानसिक छळ करण्याचे धडे चित्रपटानं समाजाला दिले, की समाजानं चित्रपटाला रेडीमेड स्क्रिप्ट पुरवलं, सांगता येणार नाही. या बाबतीत त्या विकृत माणसाची बाजू समजून घेणारे चित्रपट निघतात, पण स्त्रीला नकाराचा अधिकार आहे, तिच्या मनाविरुद्ध जाऊ नका, असं सांगणारे चित्रपट निघत नाहीत. (‘पिंक’ सारखे चित्रपट अपवाद)कारण चित्रपट लिहिणाऱ्या आणि दिग्दर्शिणाऱ्या पुरुषांनाच तसं वाटत नाही. स्त्रीबद्दल अनादर, उपेक्षा, मालकी हक्काची भावना असते. त्यामुळेच पडद्यावरच्या स्त्रीला न्याय मिळत नाही.

अलीकडे तर शाळकरी पोरांच्या पहिल्यावहिल्या प्रेमाची कथा सांगणारे, त्याची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करणारे चित्रपट मराठीत झाले. त्यातली पोरं काही नवथर, बुजरी वाटली नाहीत. त्यांची प्रगती यथातथाच असली तरी स्त्री आणि तिचं शरीर यांच्याबद्दलचं त्यांचं ज्ञान आश्चर्यकारक होतं. त्या टीनएजर नायकाचे मित्र म्हणजे तर वासू नाक्यावरचे अनुभवी हिरो वाटत होते. राज कपूरनं ‘मेरा नाम जोकर’मध्ये वयात येणाऱ्या मुलाची मानसिकता ज्या तरलपणे दाखवली होती, त्याची सर या चित्रपटांना नव्हती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लेखकांना, दिग्दर्शकांना टीनएजर पोराची ‘सेक्शुअ‍ॅलिटी’ समजून घ्यावीशी वाटते, पण त्याच वयाच्या मुलीवर चित्रपट काढावा, तिची मानसिकता समजून घ्यावी असं वाटत नाही. तिची बाजू जगासमोर आली, तर पुष्कळ प्रेम प्रकरणं सुरळीतपणे मार्गी लागतील. यांचा नायक वेडसर असेल, तर नायिकेनं त्याच्यावर प्रेम करून त्याला सुधारायचं असतं. मग भले हे लग्न तिला त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती न सांगता झालेलं असो. (आठवा : ‘स्वयंसिद्धा’, ‘बहुरानी’, ‘ज्योती’ इ.इ.इ.) मात्र ती त्याच्यापेक्षा श्रीमंत आणि म्हणून घमेंडखोर असेल, याच्यापुढे नमत नसेल, स्वतंत्र बुद्धीची असेल, तर यांचा नायक तिच्यावर चाबूक नाही तर हात उगारणार. तिला साडी नेसायला आणि स्वयंपाक करायला लावणार. तिचा नक्षा उतरवून, नामोहरम करूनच तो दम घेणार.

एकाच गोष्टीबाबत पुरुषाला एक नियम आणि स्त्रीला भिन्न, हा समाजाचा दुटप्पी प्रकार चित्रपटांतही बघायला मिळतो. (आणि तरी काही जण म्हणतात, आपल्या चित्रपटात वास्तववाद नाही!) नव्या सहस्रकात जमाना किती पुढे गेला, कुठे गेला याची खबरबात आपल्या चित्रपटांना नाही. समाजात एकत्र कुटुंब पद्धती बंद झाल्यावरही टीव्ही मालिकांत तशी कुटुंबं दिसतात त्यातलाच प्रकार चित्रपटांचा! ते आता ‘मॉड’ स्त्रिया दाखवतात. पूर्वीप्रमाणे ओलेत्या स्त्रिया दाखवण्यावर त्यांना थांबावं लागत नाही. कारण आता नायिका फारसे कपडेच घालत नाहीत आणि पायी फिरत नाहीत. त्यामुळे ‘अंगे भिजली जलधारांनी’ हा एके काळी मिटक्या मारत बघितला जाणारा ‘सीन’ पाहावा लागत नाही. चुंबनाला सेन्सॉरची परवानगी मिळाल्यामुळे दोन फुलांचं किंवा पक्ष्यांच्या जोडीचं मीलन बघावं लागत नाही. सिगरेट आणि दारू पिण्यात बायकांची प्रगती झालेली दिसते; पण अधिकार म्हणाल तर नन्नाचा पाढा दिसतो. पूर्वीच्या नायिकांना निदान दहा-बारा रिळं, पाच-सहा गाणी मिळायची. आता टोळीवाले आणि दहशतवादी हे चित्रपटाचे नायक झाल्यामुळे नायिकांना बऱ्याच चित्रपटांत ‘नो एन्ट्री’ असते किंवा त्या असून नसल्यासारख्या असतात. त्यामुळे सध्या तरी स्त्रियांवर निदान पडद्यावर तरी अत्याचार होताना बघावे लागत नाहीत, त्यांचं शोषण आणि वस्त्रहरण होत नाही यातच समाधान मानावं का?

अर्थात हे आपलं गमतीत. मनापासूनची इच्छा ही की, ‘मी टू’ हे म्हणण्याची वेळ कोणत्याच अभिनेत्रीवर येऊ नये, हॉलीवूडच्या नको आणि बॉलीवूडच्याही नको! कलेचं जग पडद्यावर आणि पडद्यामागेही नितळ असावं. कास्टिंग काऊचचा कलंक त्याच्यावर असू नये. एकता कपूर म्हणते की, आमच्या जगात ‘कास्टिंग काऊच’ वगैरे प्रकरणच नाही आणि असलंच तर स्त्री ही घटना टाळू शकते. एका परीने हे खरं वाटतं. कारण आता छोटय़ा व मोठय़ा पडद्यावर  सुशिक्षित, क्वचित उच्चशिक्षितसुद्धा तरुण-तरुणी येत आहेत. निर्माते, दिग्दर्शक येत आहेत. संघटित होऊन ही पिढी या ‘कास्टिंक काऊच’ नामक शापापासून हा व्यवसाय मुक्त करील का? कलाकारांकडून अभिनयाखेरीज कसलीच अपेक्षा नसलेले अधिकाधिक निर्माते दिग्दर्शक या व्यवसायात दिसतील का? तसं झालं तर तो खरा आंतरराष्ट्रीय महिला दिन!

– अरुणा अन्तरकर

chaturang@expressindia.com