News Flash

विजयाचा ध्वज ‘उंच’ धरा रे ‘उंच’ धरा रे

भारत-नेपाळ मधील स्त्रियांची १९९३ मधली एव्हरेस्ट मोहीम फत्ते झाली त्याला २५ वर्ष पूर्ण झाली.

|| स्नेहा दामले

भारत-नेपाळ मधील स्त्रियांची १९९३ मधली एव्हरेस्ट मोहीम फत्ते झाली त्याला २५ वर्ष पूर्ण झाली. फक्त स्त्रियांनी एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणं ही घटनाच अत्यंत महत्त्वाची होती. या मोहिमेचा रौप्य महोत्सव ‘माऊंट मणिरंग’ या शिखरावर जाऊन नुकताच साजरा करण्यात आला. या मोहिमेचं नेतृत्व बिमला नेगी देऊस्कर यांनी केलं होतं, तर दीपू शर्मा, रिता मारवाह, अनिता देवी, चौला जागीरदार, सविता धापवळ, राधा देवी, डिकी डोल्मा या सगळ्या भारतातील अत्यंत कुशल आणि अनुभवी गिर्यारोहक यात सहभागी झाल्या होत्या. विविध मोहिमांमधले बिमला नेगी देऊस्कर यांचे अनुभव..

अनेक वर्षांनंतर भेटणाऱ्या मित्रमत्रिणींचा आनंद सोहळा, अर्थात ‘रियुनियन’. या शब्दाला आपण सगळेच सरावलो आहोत. ही स्नेहभेट गतकाळातील आठवणींना उजाळा देणारी. अर्थात बहुतेक सगळ्यांच्याच ‘रियुनियन’मध्ये जुन्या सगळ्या आठवणी निघतात. चेष्टा-मस्करी, गाणी-गप्पा, खाणं-पिणं आणि खूप सारे व्हॉट्सअ‍ॅप, फोटो हे असतंच. पण यापेक्षा एक हटके ‘रियुनियन’ नुकतंच पार पडलं. निमित्त होतं, ‘इंडियन माऊंटेनियिरग फेडरेशन’च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या पहिल्या ‘ऑल वुमन्स इंडो-नेपाल एव्हरेस्ट मोहिमेत’ सहभागी आठ गिर्यारोहक स्त्रियांनी आपल्या मोहिमेची सिल्व्हर जुबली ‘माऊंट मणिरंग’ या शिखरावर जाऊन साजरी केली. या मोहिमेचं नेतृत्व बिमला नेगी देऊस्कर यांनी केलं होतं, तर दीपू शर्मा, रिता मारवाह, अनिता देवी, चौला जागीरदार, सविता धापवळ, राधा देवी, डिकी डोल्मा या सगळ्या भारतातील अत्यंत कुशल आणि अनुभवी गिर्यारोहक यात सहभागी झाल्या होत्या.

सर्व स्त्रिया असलेली भारत-नेपाळ स्त्रियांची १९९३ मधली एव्हरेस्ट मोहीम, भारतीय गिर्यारोहण संघाने राबवली होती. २१ सदस्यांच्या या मोहिमेचं नेतृत्व त्या वेळी बचेंद्रीपाल यांनी केलं होतं. या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाली. गिर्यारोहण हे क्षेत्र अत्यंत जोखमीचं. यामध्ये येणारे लोक खूपच कमी आणि त्यातील स्त्रियांचा सहभाग फारच कमी. त्यामुळे २५ वर्षांपूर्वी फक्त स्त्रियांनी एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणं ही घटनाच अत्यंत महत्त्वाची होती. या ऐतिहासिक मोहिमेने त्या वेळी अनेक विक्रमांची नोंद केली होती. ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर करण्याच्या एकाच मोहिमेत सर्वाधिक १८ सदस्यांचा समावेश, एव्हरेस्टवर चढणाऱ्या एकाच देशातील सर्वाधिक सहा स्त्रिया, पथकातील संतोष यादव दुसऱ्यांदा एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली स्त्री ठरली, तर १९ वर्षीय डिकी डोल्मा एव्हरेस्ट सर करणारी सगळ्यात तरुण स्त्री होती.

म्हणूनच ऐतिहासिक अशा त्या ‘एव्हरेस्ट’ मोहिमेला २५ वर्ष पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ निघालेली मोहीम, ‘माऊंट मणिरंग’ या शिखरावर आयोजित केली गेली होती. १९ सदस्य असलेल्या या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं गिर्यारोहण या क्षेत्रात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या बिमला नेगी देऊस्कर यांनी. योगायोग म्हणजे, बिमला देऊस्कर यांची स्वत:चीदेखील ही ‘रौप्य महोत्सवी’ मोहीम होती. बिमला देऊस्कर या मूळच्या उत्तरकाशीच्या. लहानपणापासून पर्वतांच्या अंगाखांद्यावर वाढल्याने पहाड चढणं-उतरणं यात काही वेगळं करतोय असं वाटायचंच नाही. पण मग पुढे गिर्यारोहणाचा बेसिक आणि अ‍ॅडव्हान्स कोर्स केला आणि त्यांना त्यातील क्षमतांची जाणीव झाली. दुर्गम शिखर चढण्यासाठी एक वेगळंच ‘झपाटलेपण’ आणि ‘वेडा’ची गरज असते, ते गुण त्यांच्यात होते. सुदैवाने त्यांना अविनाश देऊस्करांच्या रूपाने मिळालेला जीवनसाथीही असाच होता; गिर्यारोहणाच्या वेडाने झपाटलेला! त्यामुळे पुढे गिर्यारोहण हा केवळ छंद नाही राहिला, तर पुढील सर्व आयुष्यच त्याने व्यापलं. एखाद्या स्त्रीसाठी कुटुंब, मुलं, घर-संसार सांभाळून इतकी वर्ष सातत्याने या क्षेत्रात कार्यरत राहणं हेच खरं तर कठीण. त्यातही वैयक्तिक कामगिरीसोबतच अनेकदा त्यांना वेगवेगळ्या मोहिमांचं नेतृत्व करण्यासाठी निवडलं जाणं हे त्यांच्यातलं कौशल्य आणि गिर्यारोहणाप्रति असलेली बांधिलकी, निस्सीम प्रेम याला मिळालेली पावती आहे, असं म्हणायला हरकत नाही.

स्त्रियांच्या आयुष्यातील साधारण ४५ ते ५० वर्ष वयाचा कालखंड म्हणजे  गुंतागुंतीचा काळ मानला जातो. शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे त्यांच्या शारीरिक- मानसिक स्थितीवर परिणाम होतो. मूड बदलणं, एकटेपणाची भावना, आपण असमर्थ आहोत, आपण काहीच करू शकत नाही, असे टोकाचे विचार येणं ही याची लक्षणं. अगदी भरभरून आयुष्य जगलेल्या स्त्रियांच्याही मनात असे विचार येत राहतात. मात्र ५१ व्या वर्षी आपल्या गिर्यारोहण मोहिमांचाही रजत महोत्सव साजरा करणाऱ्या बिमला नेगी देऊस्कर यांच्यासारखी एखादीच स्त्री आगळीवेगळी असते.

गिर्यारोहण म्हणजे अत्यंत जोखमीचं काम. इथं धर्य, संयम, चिकाटी, सतर्कता आणि उत्तम शारीरिक-मानसिक क्षमतेशिवाय निभाव लागणं कठीणच. असं असूनही ‘माऊंट मणिरंग’ या मोहिमेतील नऊ गिर्यारोहक स्त्रिया या ५० ते ६० वर्ष या वयोगटातील होत्या. तर १० तरुणी नव्या दमाच्या पण गिर्यारोहणाचा अनुभव नसलेल्या होत्या. नव्या-जुन्याची छान सांगड या मोहिमेत घातली गेली. पथकामध्ये उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, मणिपूर आणि हिमाचल प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांतील तरुणींचा समावेश होता.

माऊंट मणिरंग (२१६३१ फूट) हे हिमाचल प्रदेशातील ७ व्या क्रमांकाचं उंचीचं शिखर. ऑगस्ट महिना हा खरं तर पावसाळी हवामानाचा. पण हा सगळा तिबेटीयन प्लॅटूचा भाग असल्याने त्या मानाने इथं पाऊस कमी पडतो. पण दरड कोसळण्याचं प्रमाण इथं जास्त आहे. त्यामुळे गिर्यारोहकांना केव्हाही पडणाऱ्या दरडींमुळे इजा होण्याची शक्यता खूप जास्त असते. ग्रुप लीडर म्हणून बिमला देऊस्कर यांना या सगळ्याचा विचार करणं आवश्यक होतं. सुदैवाने संपूर्ण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. महत्त्वाचं म्हणजे टीममधील सर्व सदस्य शिखरावर पोहोचू शकले, यापेक्षा वेगळा आनंद टीम लीडरसाठी कोणता असू शकेल?

यश कशाला म्हणायचं? प्रत्येकाची यशाची आपली वेगळी व्याख्या असते. एखाद्या गिर्यारोहकासाठी शिखरावर पाऊल ठेवणं हे यश असू शकेल. पण बिमला देऊस्करसारख्या गिर्यारोहक आणि टीम लीडरसाठी दरवेळी शिखरावर पोहोचणं हे यशाचं परिमाण ठरत नाही. आपल्या मोहिमेमध्ये सहभागी जास्तीत जास्त सदस्यांनी शिखरावर पोहोचणं यासारखा दुसरा आनंद नसतो टीम लीडरला. पण काही वेळा निसर्गाचं असं काही रौद्र रूप दिसतं की मानवी इच्छाशक्ती आणि शारीरिक क्षमता असूनही त्यापुढे नतमस्तक होणं एवढाच पर्याय शिल्लक उरतो आणि त्या वेळी समूहातील प्रत्येक व्यक्ती बेस कॅम्पपर्यंत सुरक्षित परत येणं हेदेखील यश आहे असं समजावं लागतं.

म्हणूनच २०१४ मधील ‘माऊंट भागीरथी दोन’ या शिखरावर बिमला देऊस्कर यांच्या नेतृत्वाखाली गेलेली मोहीम त्यांना विसरता येणं शक्य नाही. देशभरातून १२ मुली या मोहिमेसाठी त्यांनी निवडल्या होत्या. मोहिमेचं यशापयश अनेकदा या निवडीवर अवलंबून असतं. म्हणून काही अनुभवी तर काही नवीन मुली या मोहिमेत होत्या. उत्तरकाशीवरून भूजबास, गोमुख आणि पुढे नंदनवन इथं बेस कॅम्पला सगळे पोहोचले. पहिला गट १६ तारखेला शिखरावर पोहोचणार होता. दोन गट मागून वाटचाल करीत होते. आणि अचानक १५ तारखेला ‘न भूतो न भविष्यति’ असा हिमवर्षांव सुरू झाला. केदारनाथवर झालेली ती ढगफुटी होती. अर्थात संपर्काची सगळी व्यवस्था कोलमडल्यामुळे तिकडे खाली झालेल्या प्रलयाबद्दल सर्व टीम अनभिज्ञ होती. बिमला देऊस्कर म्हणतात, ‘‘आमच्यावर होत असलेला हिमवर्षांव काळजीत टाकणारा आणि नेहमीपेक्षा काही तरी वेगळाच आहे हे माझा २०-२५ वर्षांचा अनुभव सांगत होता. माझ्या दृष्टीने सगळ्यांची सुरक्षितता ही त्या वेळी सगळ्यात जास्त महत्त्वाची होती. अत्यंत कठोरपणे, पुढे गेलेल्या टीमला मी मागे फिरण्याचा निर्णय कळवला.’’ दृष्टिपथात आलेलं टोक न गाठता मागे फिरणं हे किती कठीण असेल हे त्यांच्यासारख्या गिर्यारोहकालाच कळू शकेल. पण येथे निसर्गाशी दोन हात करायचे नसतात. त्याचा कौल मानायचा असतो. ताज्या बर्फावरून चालणं हे अत्यंत अवघड असतं. कशाबशा मुली खाली उतरल्या. आता सर्व टीम डोळ्यासमोर होती तेवढाच दिलासा. मात्र यापुढे खाली उतरणं हे भयंकरच कठीण झालं होतं. वादळाचा वेग खूप जास्त होता. त्या रात्री तर संपूर्ण टीमने तंबू उडून जाऊ नये म्हणून रात्रभर तो धरून ठेवला होता. त्या सांगतात, ‘‘शेवटी निर्णय घेतला. स्लीपिंग बॅग, गरम कपडे व इतर सर्व समान, अत्यंत महाग अशी ‘इक्विपमेंट्स’ तिथंच टाकून परतीचा रस्ता धरला. पण रस्ता उरलाच कुठे होता? हिमनदी, नाले, दरी काहीच दिसत नव्हतं. त्यात दोन मुली नदीत पडल्या. चेहरा काळाठिक्कर पडला, आतून-बाहेरून ओल्या. कसं तरी त्यांना सावरलं. मात्र आता पुढे प्रत्येकानी स्वत:च स्वत:ची काळजी घेणं आवश्यक होतं. कुणी कुणीला मदत करण्याच्या परिस्थितीतही नव्हतं. कुठल्या मार्गाने जायचं? कोपऱ्याकोपऱ्याने जायचं तर दरड कोसळण्याची भीती आणि मधून गेलं तर हिमदरीत पडण्याची भीती. अत्यंत सावधतेने कसं तरी शेर्पाच्या मदतीने टीम भूजबासला पोहोचली. हायसं वाटलं, देवाचे आभार मानले. पण हे सर्व क्षणिक ठरलं. इथं पोहोचल्यावर मात्र या नैसर्गिक आपत्तीची भीषणता लक्षात आली. तिथल्या लोकांचे हाल पाहून मन विदीर्ण झालं. म्हातारेकोतारे, लहान मुलं, बाया माणसं अंगावरील फक्त एका कपडय़ावर. जवळ सामान नाही, अन्न-पाण्याची सोय नाही, त्यात भयंकर गारठा! प्रत्येकाची फक्त स्वत:चा जीव वाचवण्यासाठी चाललेली धडपड. त्या मानाने आम्ही मानसिकदृष्टय़ा काटक. आम्ही संपूर्ण टीमने त्याही परिस्थितीत लष्करासोबत अनेकांना मदतीचा हात दिला. अनेक अग्निदिव्यांतून जात अखेर कसे तरी हृषिकेश गाठलं. संपूर्ण टीम सुखरूप पोहोचली हे शिखर गाठल्यासारखं नव्हतं का? मग माझी ती मोहीम यशस्वी म्हणायची? की अयशस्वी?’’

माऊंट कॉमेट (२५४४७ फूट) या शिखरावर पोहोचणं असंच थोडक्याने राहून गेलं. जवळजवळ २०-२२ जणांचा ग्रुप होता. शिखरावर पोहोचायला जेमतेम १०० फूट अंतर उरलं असेल-नसेल, पण वातावरण बदललं, ढग आले. इतके ढग आले की पुढचं काहीच दिसेना. किती वेळ थांबायचं कळत नव्हतं. शेवटी सर्वानुमते परतायचा निर्णय झाला. दुसऱ्या दिवशी वातावरण अगदी स्वच्छ झालं. केवळ १०० फूट अंतर राहिलं असताना परतावं लागल्याने सगळ्यांनाच हळहळ वाटत राहिली.

असंच निसर्गाचं भयंकर रूप पुन्हा एकदा अनुभवलं त्यांनी. आता ही मोहीम त्यांची वैयक्तिक होती. प्रत्येक गिर्यारोहकाचं जे स्वप्न असतं, सर्वोच्च असा ‘सागरमाथा’ अर्थात ‘एव्हरेस्ट’ला गवसणी घालण्याचं, ते त्यांचंही होतं.. १९९३च्या मोहिमेत त्या सहभागी होत्या. त्या वेळी एव्हरेस्टवर चढणाऱ्या त्यांच्या पथकातील सहा जणींनी जरी शिखर गाठलं तरी त्यांना मात्र शरीराने साथ दिली नव्हती. २२००० फूटपर्यंत चढल्यावर त्यांना परत माघारी यावं लागलं होतं. अध्र्यातूनच मोहीम सोडावी लागली, ते शल्य मनात होतंच. त्या म्हणतात, ‘‘अर्थात हिमालयाच्या हाका याआधी वेगवेगळ्या वेळी आल्या. त्याला त्या त्या वेळी मी प्रतिसादही दिला. यामध्ये उल्लेखनीय होते ते, मामोस्तांग कांगरी (२४६५९ फूट), अबी गमी (२४१३१ फूट), सतोपंथ (२३२११ फूट), कालानाग (२०९५५ फूट), स्वर्गारोहिणी-१ (२०५१२ फूट), आफ्रिकेतील सगळ्यात उंच शिखर माऊंट कालीमांजारो (१९३४१ फूट) इत्यादी, याव्यतिरिक्त कोलकाता ते कन्याकुमारी असा ३००० किमी केलेले सायकल एक्स्पिडिशन. मात्र एव्हरेस्ट अजून दूरच होतं. वयाच्या ४९ वर्षी एवढा धोका नको असं एक मन म्हणत होतं. दुसरं मन मात्र ग्वाही देत होतं की, वय हा फक्त आकडा आहे. शेवटी ठरवलं की आता तरी नक्की माथा गाठायचाच. इतक्या वर्षांची तपश्चर्या, मानसिक कणखरता पणाला लावायची. कसून तयारी सुरू केली. मानसिक-शारीरिक सुदृढतेसोबत आर्थिक जुळवाजुळव करायची होती. एव्हरेस्ट मोहीम ही अत्यंत खर्चीक बाब. पती अविनाश यांनीही त्यासाठी कंबर कसली आणि सर्व तयारीनिशी २०१५ला स्वप्नपूर्तीच्या वाटेवरचा प्रवास सुरू केला. लक्ष एकच.. ‘सागरमाथा’!

अनेकांच्या शुभेच्छा सोबत घेऊन ‘एव्हरेस्ट’ सर करण्याच्या त्यांच्या वैयक्तिक प्रयत्नाला सुरुवात झाली. २१५०० फुटांपर्यंत त्या पोहोचलेल्या. मात्र या वेळीही पुन्हा एकदा निसर्गाच्या मनात काही वेगळंच गणित चाललेलं होतं. नेपाळमध्ये त्या वेळी भूकंपाच्या रूपाने निसर्गाने आपलं आक्राळविक्राळ रूप दाखवलं. मोहीम अध्र्यातच सोडावी लागली. आर्थिक नुकसान झालंच, पण मानसिक श्रमही खूप झाले. पुढे वर्षभर मणक्याच्या दुखण्याने जोर पकडला. गिर्यारोहण कायमचं सोडावं लागतंय की काय असं वाटू लागलं. पण कसलं काय, पहाडी रक्त ते, सहजासहजी हार मानणार थोडीच होतं! ‘एव्हरेस्ट मोहिमेचं’ वैयक्तिक अपयश विसरण्याची पुन्हा एक वेगळी संधी ‘मिशन शौर्य’च्या रूपाने त्यांना लगेचच मिळाली. चंद्रपूर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाचा आदिवासी विकास विभाग आणि अविनाश आणि बिमला देऊस्कर यांची अ‍ॅडव्हेंचर ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी, यांनी मिळून आदिवासी भागातील मुला-मुलींना एव्हरेस्टसाठी तयार करण्याची योजना आखली. त्यासाठी सुरुवातीला चंद्रपूरच्या प्रमुख आदिवासी आश्रमशाळांना भेटी देऊन पहिल्या टप्प्यात ४५ मुलामुलींची निवड केली. या ४५ मुलांचं खडतर प्रशिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वातावरणात झालं. चपळता, शिस्त, इच्छाशक्ती, काटकपणा, लवचीकता, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण इत्यादी वेगवेगळ्या निकषांवर ४५ मुलांपकी ७ मुलं आणि ३ मुलींची निवड करण्यात आली. चंद्रपूरसारख्या ४५ अंश सेल्सियसमध्ये राहणाऱ्या मुलांना आता उणे २० किंवा ३० अंश तापमानात बर्फाळ प्रदेशात चढाई करायची असल्याने पुढे त्यांना जवळजवळ २२ दिवस दार्जिलिंग येथे अ‍ॅडव्हान्स प्रशिक्षणासाठी नेण्यात आलं. सर्व प्रशिक्षणादरम्यान बिमला देऊस्कर कायम या मुलांच्या सहवासात होत्या. जी मुलं कधी आपली गावाची सीमा ओलांडून बाहेर गेली नव्हती, रेल्वेने कधी त्यांनी प्रवास केला नव्हता, ज्यांनी कधी डोंगर पहिला नव्हता, अशा मुलांना जगातील सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई करायची होती. त्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा तयारीसोबतच, आहारविषयक शिस्त, थोडंबहुत हिंदी बोलता येण्यासाठी सराव, सगळ्या नव्या वातावरणाशी, लोकांशी जुळवून घ्यायला या मुलांना त्या सर्वतोपरी मदत करीत होत्या. जवळपास वर्षभराचं खडतर प्रशिक्षण आणि आता ही मुलं निघाली होती, एव्हरेस्ट सर करायला. ५० दिवस ही मोहीम चालली व अनेक कठीण परिस्थिती आणि संकटांचा सामना करीत आपल्या पहिल्याच प्रयत्नात १० पकी ५ मुलांनी एव्हरेस्टला गवसणी घालण्यात यश मिळविलं. बिमला यांनी बघितलेलं ‘एव्हरेस्ट’चं स्वप्न या मुलांच्या रूपाने पूर्ण झालं होतं. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या, प्रतिकूल आíथक-सामाजिक परिस्थितीत आणि निसर्गाशी सतत जोडलेले असल्याने या मुलांच्या गरजा मुळातच कमी, पण वृत्तीने काटक आणि जगण्याची जिद्द प्रचंड. चंद्रपूर जिल्ह्य़ातल्या आश्रमशाळेत शिकणारी ही आदिवासी मुलं आज ‘एव्हरेस्टवीर’ झाली आहेत. १७-१८ वर्षांच्या या मुलांकडे आज ‘बदलाचे दूत’ म्हणून पाहिलं जात आहे. किती तरी मुलांसाठी आता ते प्रेरणादायी ठरणार आहेत. मात्र आश्रमशाळा ते एव्हरेस्ट हा त्यांचा प्रवास ज्या अविनाश आणि बिमला नेगी देऊस्कर यांच्यामुळे शक्य झाला त्यांच्या दूरदृष्टीला, सातत्याला, त्यांच्या प्रशिक्षण आणि एकंदरच सगळ्या पातळीवर केलेल्या नियोजनाला सलाम करावा लागेल.

आपण करतोय त्या कामावरचं प्रेम, त्यावरील निष्ठा, शिस्त, सातत्य, त्यासाठी काहीही करण्याची तयारी या गुणांमुळेच आज ३० वर्षांपासून बिमला देऊस्कर गिर्यारोहणासारख्या क्षेत्रात आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकल्या आहेत. स्वत:च्या वैयक्तिक कामगिरीसोबतच हजारो तरुणांमध्ये या साहसी खेळाची आवड निर्माण केली, प्रशिक्षण दिलं आहे. त्यातल्या अनेकांसाठी आता तो निव्वळ छंद उरला नाही, तर करिअर म्हणून ते त्याकडे बघत आहेत. भविष्यात करायच्या अजूनही किती तरी कल्पना, योजना आहेत. त्या प्रत्यक्षात येण्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!

damlesneha@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2018 12:11 am

Web Title: mount everest trekking 2
Next Stories
1 हे चित्र बदलणार कधी?
2 दुष्काळ हीच संधी
3 किशोरी स्नेही आरोग्य सेवा
Just Now!
X