डॉ. सरोजा भाटे

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात समाजहिताला अनुकूल असे परिवर्तन घडवून आणण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या वाईच्या प्राज्ञपाठशाळा मंडळाचा १०१ वा वर्धापनदिन १२ डिसेंबरला साजरा होत आहे. त्यानिमित्ताने..

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
lakdi pool in Pune
VIDEO : पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तातडीने ‘लकडी पूल’ का बांधून घेतला? वाचा रंजक गोष्ट
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा

कृष्णाकाठचं वाई हे मराठेशाहीतलं एक महत्त्वाचं नगर. पेशव्यांनी रास्त्यांना इनाम म्हणून दिलेलं. रास्त्यांनी त्याचा कायापालट केला. विद्वान पंडितांच्या पिढय़ा तिथे नांदू लागल्या. वेदमंत्रांचे घोष दुमदूमू लागले. कृष्णशास्त्री परांजपे हे एक प्रखर पंडित. १८९१ साली वयाच्या ३५ व्या वर्षी संन्यास घेऊन ‘प्रज्ञानंद सरस्वती’ झाले. दर्जेदार शिक्षणाच्या ओढीनं नारायण मराठे नावाचा २१ वर्षांचा युवक १८९८ मध्ये हिंडत हिंडत वाईत दाखल झाला आणि प्रज्ञानंदांमध्ये त्याला आपला गुरू भेटला. त्या काळात वाई आणि आजूबाजूला प्लेगनं थैमान घातलं होतं. १९०४ मध्ये प्लेगची लागण होऊन प्रज्ञानंदांचं निर्वाण झालं. कुशाग्र बुद्धीच्या नारायणानं प्रज्ञानंदांकडे वेदान्तातील महत्त्वाच्या ग्रंथांचे अध्ययन पुरं केलं होतं. त्यांचं स्वाध्याय प्रवचनाचं काम पुढे चालू ठेवण्यासाठी त्यानं त्यांच्या समाधीवर बांधलेल्या जागेत ‘प्राज्ञ मठ’ स्थापन केला. प्राचीन गुरुकुल पद्धतीप्रमाणे अध्यापन सुरू केलं. इतर पाठशाळा आणि संस्थांमधले अभ्यासक्रम पाहून त्यावरून अभ्यासक्रमाची आखणी केली. २० – २५ विद्यार्थी नारायणशास्त्रींकडे प्राचीन शास्त्रांचे धडे घेऊ लागले. हळूहळू विद्यार्थिसंख्या वाढू लागली. १९१० साली इंग्रज सरकारने बंद केलेल्या राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या तळेगावच्या ‘समर्थ विद्यालया’चे विद्यार्थी आणि शिक्षक मठात दाखल झाले. राष्ट्रीय शिक्षणाचं नवीन वारं मठात वाहू लागलं. ६ ऑक्टोबर १९१६, विजयादशमीच्या दिवशी ‘प्राज्ञ मठा’ची ‘प्राज्ञ पाठशाळा’ झाली आणि ती २१ जुलै १९२० रोजी ‘प्राज्ञ पाठशाळा मंडळ’ अशी नोंदणीकृत संस्था झाली.

ही पाठशाळा अनेक अर्थानी आगळीवेगळी होती. कर्मठ सनातनी परंपरेत शिकल्यानंतरही आणि प्राच्यविद्येबद्दल मनात नितांत श्रद्धा असतानाही नारायणशास्त्रींची वृत्ती पुरोगामी होती. त्यांच्या मनात श्रद्धेइतकेच, किंबहुना अधिक स्थान सदसद्विवेकबुद्धीला, तर्कनिष्ठतेला होतं. त्यामुळे त्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमात बदल केले. पाठांतरावरचा भर कमी केला. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, इंग्रजी यांसारखे नवीन विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केले. ‘निबंधमाले’सारख्या मराठी ग्रंथांचाही समावेश केला.

या पाठशाळेतली अध्यापन पद्धतीही आगळीवेगळी होती. प्रारंभापासूनच स्वयंशिक्षणाचे धडे देणारी होती. गुरुजी ज्येष्ठ  विद्यार्थ्यांला पाठ वाचून अर्थ लावायला सांगत. गरज असेल तिथे अधिक स्पष्टीकरण करीत. पाठानंतर विद्यार्थी एकमेकांबरोबर शिकलेल्या पाठाची पुनरावृत्ती करीत. या ‘चिंतनिका’ पद्धतीमुळे विषयाचं आकलन पक्कं होई. शिवाय अधूनमधून सभा भरवून गुरुजी विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर मांडणी करायला सांगत. विद्यार्थी घडवताना त्यांच्यातला शिक्षक घडवणं आणि त्याचा आत्मविश्वास वाढवणं असं उद्दिष्ट जपणारे नारायणशास्त्री खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक होते. त्यांनी आयुष्यभर नैष्ठिक ब्रह्मचर्याचं पालन केलं. मृगचर्म, पाण्याचा गडवा, थाळी आणि पुस्तक यांपलीकडे आपला संसार वाढू दिला नाही. पण शिष्यांवर मुलासारखं प्रेम करीत त्यांच्या सर्वागीण विकासाची काळजी वाहिली. त्यांनी ज्ञानार्जनाइतकंच व्यायामाला आणि नीतिमूल्यांच्या वर्धनाला महत्त्व दिलं. ते स्वत: सूर्यनमस्कार व अन्य व्यायाम करीत आणि विद्यार्थ्यांना दंड, जोर, बैठका काढायला लावीत. कृष्णेच्या महापुरात त्यांना उडय़ा मारायला प्रवृत्त करीत आणि कुणी गटांगळ्या खाऊ लागला, की स्वत: उडी मारून त्याला काठावर आणीत. जागेच्या साफसफाईपासून आजारी विद्यार्थ्यांचं मलमूत्र साफ करण्यापर्यंत सर्व काही या विद्यार्थ्यांना करावं लागे. सभोवतीच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीचं भान येण्यासाठी सहलीला नेताना ते विद्यार्थ्यांना ४० – ५० मैल चालत नेत. पाठशाळेत चरखाही आला. स्वावलंबनाचे धडे मिळू लागले.

नारायणशास्त्रींचं शिष्यांवर जसं प्रेम होतं तशी जरबही होती. एकदा पुंडलिक कातगडे त्यांच्याकडे शिकत असता बाहेरून पुरणपोळीचे भरपेट जेवण करून पाठाला बसले. त्यांना डुलक्या घेताना पाहून गुरुजींनी विचारलं, ‘‘मी काय सांगतो ते कळतंय ना?’ ते ‘होय’ म्हणाले. पाठ संपल्यावर एक विद्यार्थी पुंडलिकजींकडे पाटी घेऊन आला. पाटीवर गुरुजींनी लिहिलं होतं- ‘तुम्हाला झोपेतही कळतं. उद्यापासून पाठाला यायची गरज नाही.’ क्षमायाचनेचा काही उपयोग झाला नाही. त्यांचं शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून ‘‘यापुढचं लक्ष्मण शिकवेल’’ म्हणाले.

लक्ष्मण जोशी हा धुळे जिल्ह्य़ातल्या पिंपळनेरहून १४ व्या वर्षी पाठशाळेत दाखल झालेला विद्यार्थी. आला तो जटा वाढवलेल्या अवतारात! नारायणशास्त्रींनी आधी त्याच्या जटा सोडवल्या. इतर विद्यार्थ्यांबरोबर पाठाला बसला आणि रडू लागला, काही समजेना म्हणून! गुरुजींनी त्याला जवळ घेऊन शांत केलं आणि नंतर त्याला एकटय़ालाच शिकवून इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीला आणलं. कुशाग्र बुद्धी आणि चौकस वृत्ती यामुळे तो लाडका शिष्योत्तम झाला. गुरूंच्या आदेशानुसार आपल्याहून ज्येष्ठ विद्यार्थ्यांचेही पाठ घेऊ लागला. पुढे न्यायशास्त्रात ‘तर्कतीर्थ’ ही पदवी मिळवून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आपल्या गुरूंचे उत्तराधिकारी बनले.

१९१७ साली विनोबा भावे पाठशाळेत शिकण्यासाठी वाईला आले. त्यांनी नारायणशास्त्रींना ‘‘अस्पृश्यांना वेद शिकवाल का?’’ असे विचारल्यावर ते ‘होय’ म्हणाले आणि विनोबांनी पाठशाळेत प्रवेश घेतला. तिथे आल्यावर अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे विनोबांनी सदरा- टोपी टाकून न शिवलेले कपडे वापरायला सुरुवात केली. त्यांच्यावरच्या एका लेखात तर्कतीर्थानी म्हटल्याप्रमाणे, विनोबांनी गांधीविचार पाठशाळेत आणला आणि पाठशाळेचा ‘ड्रेस कोड’ गांधी आश्रमात पोहचवला! त्या वेळी विद्यार्थिदशेत असलेल्या तर्कतीर्थावर विनोबांचा प्रभाव पडला. त्यांच्याबरोबर इंग्रजीचे धडे गिरवता गिरवता अधिक इंग्रजी वाचायची अनावर इच्छा झाली आणि एका रात्री त्यांनी गुपचूप विनोबांबरोबर बडोद्याला पलायन करून तिथे ती इच्छा पुरी केली. परंतु काही काळानं त्यांना गांधीजींकडे आश्रमात कार्यकर्ता म्हणून पाठवण्याचा विनोबांचा विचार लक्षात येताच तिथून रातोरात ते वाईला परतले. गुरुजींनी लाडक्या शिष्याला क्षमा केली आणि पुढचं शिक्षण सुरू झालं.

दरम्यान, पाठशाळेत माध्यमिक शाळांच्या बरोबरीनं विद्यार्थ्यांची तयारी व्हावी म्हणून माध्यमिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. १९२५ साली माध्यमिक शाखेत ७७, तर पारंपरिक शाखेत १५ विद्यार्थी शिकत होते. पाठशाळा तिच्या मूळ उद्दिष्टांपासून दूर जात असून तिची माध्यमिक शाळा बनते आहे, हे लक्षात येऊन नारायणशास्त्रींनी माध्यमिक शाखा चालू ठेवण्याला विरोध केला. परंतु अन्य सदस्य माध्यमिक शाखेला अनुकूल होते. अखेर १९३१ साली पाठशाळेकडे त्यागपत्र पाठवून नारायणशास्त्रींनी संन्यास घेतला. संन्यासानंतर ते ‘केवलानंद सरस्वती’ झाले. त्यांनी पाठशाळेत शिकवणं बंद केलं, तरी लिखाण आणि प्रबोधनाचं काम चालूच ठेवलं. विद्यार्थ्यांअभावी पाठशाळेतली माध्यमिक शाखा १९३५ साली आणि पारंपरिक शाखा १९५६ साली बंद पडून ती पाठशाळा राहिली नाही. तथापि लेखन, प्रवचन, समाजकारण, राजकारण अशा अनेक मार्गानी पाठशाळेचं काम चालू राहिलं.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढय़ात सहभागी होण्यापासून सामाजिक, धार्मिक सुधारणांसाठी प्रबोधन आणि प्रयत्न करण्यापर्यंत अनेक उपक्रमांत पाठशाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले. केवलानंदांवर लोकमान्य टिळकांच्या राजकीय विचारसरणीचा प्रभाव होता. पारतंत्र्याच्या स्थितीत प्रथम राष्ट्र म्हणून समाजानं संघटित व्हायला हवं, अशी त्यांची भावना होती. त्यातूनच त्यांचं धर्मचिंतन सुरू झालं. त्यांचे विचार मुळातच प्रागतिक दृष्टिकोन असलेल्या तर्कतीर्थाच्या मनातही रुजले. १९२० साली गांधीजी पाठशाळेला भेट देऊन गेले आणि त्यानंतर मिठाच्या सत्याग्रहात तर्कतीर्थासह अनेकांनी भाग घेतला. तर्कतीर्थानी नऊ महिन्यांचा कारावास भोगला. केवलानंद आणि तर्कतीर्थ हे दोघे गांधीजींच्या बोलावण्यावरून अस्पृश्यता निवारणासंबंधी चर्चा करण्यासाठी येरवडय़ाच्या तुरुंगात त्यांना भेटले. पुढे तर्कतीर्थानी अनेक वादसभांमधून ‘वेद पौरुषेय आहेत’, ‘हिंदू धर्मग्रथांत अस्पृश्याचा उल्लेख आला असला, तरी आजचा अस्पृश्य या स्मृतिग्रंथातल्या अस्पृश्याच्या व्याखेत बसत नाही. सबब ‘अस्पृश्य’च अस्तित्वात नाही’ असे परंपराविरोधी विचार ठामपणे मांडले. काँग्रेसच्या प्रचारसभेतही त्यांनी उद्बोधन केले. काही वेळा त्यांना भूमिगत व्हावं लागलं, मार खावा लागला. सोमनाथ येथील मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी मंदिर सर्व वर्ण-जातींच्या लोकांसाठी खुलं करण्याची घोषणा ऐकून सनातन्यांनी पौरोहित्य करण्याचं नाकारलं, तेव्हा केवलानंद आणि तर्कतीर्थ काही वैदिकांना घेऊन सोमनाथला गेले व सर्व धार्मिक अनुष्ठान करून सोमनाथाची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. १९५१ सालची ही घटना भारताच्या धार्मिक सुधारणांच्या इतिहासातली मैलाचा दगड ठरली आहे.

गांधीजींचे पुत्र आणि राजगोपालाचारींची कन्या यांचा वैश्यब्राह्मण आंतरजातीय विवाह तर्कतीर्थानी लावला. वाईत कर्मवीर शिंदे यांनी दलित मेळावा भरवला असता तर्कतीर्थानी पाठशाळेच्या आवारात दलितांच्या भोजनाची व्यवस्था केली. कांबळे नावाच्या एका दलिताला त्यांनी आपल्या घरी ठेवून शिकवलं. या गुरु-शिष्यांच्या जोडीनं ‘धर्मनिर्णय मंडळा’मार्फत आपलं धर्मसुधारणेचं काम चालूच ठेवलं. ‘धर्म’ या शब्दाचा संकुचित अर्थ समाजात रूढ झाला असून ती संकल्पना यथार्थपणे मांडावी आणि हिंदूू धर्माच्या इतिहासातच कालानुरूप समाजाच्या हितासाठी वेळोवेळी परिवर्तन झालेले आहे हेही समाजापुढे आणावे, या हेतूने केवलानंदांनी ‘धर्मकोश’ या महाप्रकल्पाची आखणी १९२५ सालीच करून ठेवली होती. प्रत्यक्ष कोशनिर्मितीची जबाबदारी १९३१ पासून तर्कतीर्थानी उचलली आणि ११ कांडांच्या या महाकोशापैकी चार कांडे अनेक खंडांत प्रकाशित (सुमारे तेरा हजार पृष्ठे) केली. आर्थिक साहाय्याअभावी आज हे काम रखडलं असलं, तरी दरवर्षी एका खंडाची त्यात भर पडत आहे. धर्म म्हणजे केवळ उपासना, कर्मकांड नव्हे, तर शांततापूर्ण सहजीवनाचं ध्येय समोर ठेवून जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी आदर्श आचारसंहिता आहे. ही संकल्पना धर्मकोशाच्या प्रकाशित खंडांमधून स्पष्ट होते. धर्मामध्ये राजनीती, शासन, कायदा या सर्वाचा समावेश होत असल्यामुळे ‘धर्मकोश’ हा गेल्या तीन हजार वर्षांतील भारतातील जीवनविषयक चिंतनाचा ऐतिहासिक दस्तावेज आहे.

याखेरीज केवलानंदांनी एकटय़ानं सिद्ध केलेला, साडेचार हजारांहून अधिक पृष्ठांचा, पाश्चात्त्य विद्वानांनी प्रशंसिलेला ‘मीमांसाकोश’, तर्कतीर्थाचं ‘वैदिक संस्कृतीचा विकास’, ‘इतिहासाचे तत्त्वज्ञान’ आदी सुमारे ३० प्रकाशित ग्रंथ ही पाठशाळेची आणखी एक ओळख. पाठशाळेतर्फे १९५७ पासून ‘नवभारत’ हे वैचारिक मासिक प्रकाशित होत असून सद्य:कालीन सामाजिक, राजकीय समस्यांवर सखोल चिंतन करणारे लेख हे या मासिकाचं ठळक वैशिष्टय़. याशिवाय वर्तमान सामाजिक व राजकीय समस्यांवर चर्चा करण्यासाठी तरुण अभ्यासकांची चिंतन शिबिरं पाठशाळेत वेळोवेळी आयोजित केली जातात.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात समाजहिताला अनुकूल असं परिवर्तन घडवून आणण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या या पाठशाळेतल्या विद्वानांनी हस्तिदंती मनोऱ्यात न राहता आपल्या विद्वत्तेचा उपयोग समाजहितासाठी केला आहे. शतकोत्तर वाटचालीच्या आरंभी पाठशाळेनं काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी काही पुस्तक स्वरूपात तयार झाले असून १२ डिसेंबरला होणाऱ्या आनंद सोहळ्यात विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. यामध्ये प्राज्ञ पाठशाळा मंडळाचा इतिहास सांगणारे ‘प्राज्ञप्रबोध’ ‘संस्कृती ऑलिम्पियाड’ आणि धर्मकोशाचा सारांश संकलित केलेले ‘धर्मसार’ या पुस्तकांचा समावेश आहे.