29 September 2020

News Flash

संन्यस्त अटलजी!

अटलजी माझे हिरो होते. अटलजींच्या कविता, लेख व साहित्याने माझ्या मनावर गारु

(संग्रहित छायाचित्र)

अटलजींसोबत ५० वर्षे त्यांची सावली बनून राहिलेले स्वीय साहायक शिवकुमार पारीख यांनी त्यांच्या सान्निध्यातील काळाचे केलेले स्मरणरंजन..

अटलजी माझे हिरो होते. अटलजींच्या कविता, लेख व साहित्याने माझ्या मनावर गारुड केले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने मी प्रचंड प्रभावित झालो होतो. त्यावेळी जयपूर विद्यापीठात विधी शाखेचा अभ्यास करत असताना मी विद्यार्थी संघटनेत सक्रिय होतो. एका कार्यक्रमात मी अटलजींना वक्ता म्हणून आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. दिवंगत भरोसिंह शेखावत यांच्या संपर्कातून मात्र हा प्रयत्न यशस्वी ठरला. पुढे  विधी शाखेची पदवी घेऊन नोकरीसाठी मी दिल्लीत आलो. सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. मी तेव्हा जनसंघाचा कार्यकर्ताही होतो. याच काळात जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची हत्या झाली आणि जनसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अटलजींवर सोपविण्यात आली. मात्र त्यावेळी मला फार भीती वाटत होती. ग्रह नीट नसल्याने जनसंघाच्या अध्यक्षांचा अकाली मृत्यू होतो असा माझा ठाम समज झाला. १९५३ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, नंतर डॉ. वीर आणि आता पं. दीनदयाळ उपाध्याय! अटलजींच्या बाबतीत असे काही होऊ नये, हा विचार मला सारखा सतावीत असे. माझी ही चिंता मी तेव्हाचे आमचे नेते नानाजी देशमुख आणि दिल्लीचे प्रांत प्रचारक सौमसिंह यांच्यासमोरही मांडली. त्यांनाही माझी चिंता सच्ची वाटली. अटलजींसोबत कोणीतरी असावे असे त्यांनाही वाटत होते. त्यानंतर मी अटलजींनाही हा विचार बोलून दाखवला. पण ‘मी संन्यासी माणूस!’ असं म्हणून त्यांनी तो विषय टाळला. अटलजी तेव्हा दिल्लीतील ‘३०, राजेंद्र प्रसाद रोड’ येथे वास्तव्यास होते. त्यावेळेस त्यांचा जयपूरला जाण्याचा कार्यक्रम ठरला. सौमसिंह यांनी अटलजींना सांगितले की, शिवकुमारसुद्धा जयपूरचेच आहेत, घेऊन जा त्यांना सोबत. अटलजींनी होकार भरला. अटलजींच्या स्वागतासाठी जयपूर स्टेशनवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. मी लोकांशी बोलत होतो तेवढय़ात भरोसिंह शेखावत यांच्यासोबत अटलजी गाडीत बसून निघून गेले. एक-दीड कि. मी. पुढे गेल्यावर अटलजींना माझी आठवण झाली. त्यांनी गाडी थांबवली. म्हणाले, ‘माझ्यासोबत दिल्लीहून एक कार्यकत्रे आले आहेत. ते कोठे आहेत? त्यांनाही घ्या सोबत.’

या प्रसंगानंतर मी दिल्लीत परत आलो. पुन्हा वकिली सुरू केली. पण तीत मन रमेना. मी पुन्हा अटलजींकडे गेलो आणि त्यांना म्हटले, ‘मला तुमची समíपतभावाने सेवा करण्याची इच्छा आहे. तेव्हा तुम्ही मला ही संधी द्या.’ अटलजींनी त्यावर मार्मिकउत्तर दिले, ‘माझी पार्टी आणि माझ्याकडे एवढा पसा नाही, की आम्ही तुम्हाला मानधन देऊ शकू! तुम्ही सर्वोच्च न्यायालयात नोकरी करता. तुम्हाला कुटुंब आहे. तेव्हा सोडा हा विचार आणि आपल्या कामात लक्ष द्या.’ पण मीही चंग बांधला होता. मी म्हटलं, ‘तुमची सुरक्षा महत्त्वाची. तुम्ही सुरक्षित, तर हजारो कुटुंबं जगतील. मला पक्षात किंवा राजकारणात कोणतेही पद नको. मला फक्त तुमची सेवा करायची आहे. सावलीप्रमाणे मी सदैव तुमच्यासोबत राहू इच्छितो.’ तेव्हा मात्र त्यांनी माझ्या विनंतीस होकार दिला. आणि मी अटलजींचा स्वीय सहाय्यक म्हणून मुंबई आणि कोलकात्याला पहिला दौरा केला. नानाजी देशमुख, सौमसिंह, केदारनाथ साहनी हेही आमच्यासोबत होते. मुंबई दौऱ्यावर असताना गोिवदभाई श्रॉफ (जे तेव्हा जनसंघाचे विधी सल्लागार होते.) यांनी माझी विचारपूस केली आणि ‘अटलजींसोबत राहण्याचा तुमचा निर्णय म्हणजे पुण्याचे काम’ असल्याची प्रतिक्रिया देऊन मला आशीर्वाद दिला. तेथून सुरू झालेला अटलजींसोबतचा प्रवास त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिला, यात मी माझ्या आयुष्याची धन्यता मानतो.

.. आणि कवी संमेलन संपले!

अमोघ वाणी असलेले ताकदीचे कवी म्हणून अटलजी तमाम भारतीयांच्या मनावर राज्य करीत असत. त्यांच्या कवितेत देशप्रेम, व्यंग, हास्य आणि ज्वलंत प्रश्नांवर कटाक्ष असे. त्यांचे कविमन वडिलांकडून संस्कारित झाले होते. वडील श्रीकृष्ण बिहारी वाजपेयी हे भागवताचे जाणकार. ग्वाल्हेरच्या गोरख विद्यालयात प्रथम शिक्षक आणि नंतर प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. ते संस्कृत, हिंदी आणि फारसी भाषेत पारंगत होते. ग्वाल्हेरमध्ये राहत असल्याने त्यांना मराठी भाषाही अस्खलितपणे यायची. ग्वाल्हेर संस्थानाने त्यांच्याकडून एक प्रार्थना लिहून घेतली होती. ती पुढे सर्व शाळांमधून गायली जाऊ लागली. खडीबोलीत ते कविता सादर करायचे. त्यांना कविसंमेलनांसाठी सतत निमंत्रणे येत असत. लहानगे अटलजीही वडिलांसोबत कविसंमेलनांना हजेरी लावू लागले. अटलजींवर वडिलांच्या काव्याचे संस्कार झाले. शालेय जीवनात काव्यसंमेलने, वादविवाद स्पर्धा, विविध क्रीडास्पर्धामध्ये अटलजी हिरीरीने भाग घेत. शालेय जीवनातच अटलजी सर्वप्रथम आर्य कुमार समाजाचे सदस्य झाले. आर्य समाजाचे लोक गीत गात प्रभात फेऱ्या काढून लोकांचे प्रबोधन करीत. त्यातही अटलजी अग्रणी असत. ग्वाल्हेरमध्ये तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भरत असे. संघाच्या स्वयंसेवकांनी अटलजींना स्वयंसेवक बनवले. तेव्हापासून ते नियमितपणे शाखेत जाऊ लागले. तेव्हाचे ‘व्हिक्टोरिया’- आता नाव बदलून झालेल्या ‘जिवाजीराव महाविद्यालया’त अटलजींचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. या काळात ते महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचे सचिव होते. कविसंमेलने, वादविवाद स्पर्धा आदींच्या आयोजनात त्यांचा पुढाकार असे. नियोजित वेळ पाळण्याच्या बाबतीत ते काटेकोर असत. अशाच एका कविसंमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तेव्हाचे प्रसिद्ध कवी सुमंगलसिंह सुमन आणि त्यांचे समकालीन दिग्गज कवींना निमंत्रित करण्यात आले होते. कविसंमेलनाची वेळ रात्री आठची होती. प्रेक्षकांनी हॉल खचाखच भरला होता. मात्र, आमंत्रित कवी कार्यक्रमस्थळी पोहोचले ते रात्री १० वाजता! तेव्हा अटलजी मंचावर गेले आणि त्यांनी कविसंमेलन समाप्त झाल्याची घोषणा केली. कवी म्हणाले, ‘आम्ही आपल्या कविता ऐकवतो.’ मात्र, अटलजींनी एकाही कवीला कविता सादर न करू देता कवी संमेलन समाप्त झाल्याचे जाहीर करून ज्येष्ठ कवींनाही वेळेचे महत्त्व पटवून दिले.

अटलजी प्रथम श्रेणीत बी. ए.ची पदवी उत्तीर्ण झाले. त्यावेळी ग्वाल्हेर संस्थानच्या नियमाप्रमाणे बी. ए.मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांला पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येई. पण त्यासाठी उच्च शिक्षण पूर्ण करून राज्याच्या सेवेतच त्याने आपले जीवन व्यतीत करावे अशी अटही घालण्यात आली होती. अटलजींनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊनही ही शिष्यवृत्ती नाकारली व उच्च शिक्षणासाठी ते कानपूरला रवाना झाले. त्या काळात मध्य भारतातील लोक उच्च शिक्षणासाठी कानपूर वा लखनऊला जात असत. अटलजींनी कानपूरची निवड केली. त्या काळात एकाच वेळी दोन विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेता येत असे. म्हणून त्यांनी राज्यशास्त्र आणि विधी विषयात एम. ए.ला प्रवेश घेतला. अटलजींचे वडील त्याचवेळी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर तेही कानपूरला आले. अटलजी ज्या महाविद्यालयात शिकत होते त्याच महाविद्यालयात त्यांनी एलएल. बी.ला प्रवेश घेतला. बाप-लेक एकाच वर्गात आणि एकाच वसतिगृहात राहू लागले. तेव्हा प्रोफेसर व विद्यार्थी या बाप-लेकांची चेष्टामस्करी करत असत. म्हणता म्हणता दोघांनीही उत्तम गुणांनी विधी शाखेची पदव्युत्तर पदवी मिळवली.

खासदार अटलजी

ग्वाल्हेरमधील राजेशाही व ब्रिटिश शासनाचे चटके अटलजींनी भोगले. त्या काळात स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला होता. अटलजींनीही या आंदोलनात उडी घेतली. तेव्हा ब्रिटिशांविरोधात ‘फटीचर कांड’ झाले. यात तरुणांनी पोलीस चौक्या, पोस्ट ऑफिस जाळले. हे मोठे आंदोलन होते. या प्रकरणात अटलजींना अटक झाली. त्यांनी तुरुंगवास भोगला. कानपूरहून राज्यशास्त्र व विधी शाखेमध्ये प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी संपादित करून अटलजी लखनऊला आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत ते जुळलेलेच होते. आता त्यांनी संघाचे मुखपत्र ‘पांचजन्य’, ‘राष्ट्रधर्म’ आणि ‘तरुण भारत’मधून लिखाण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अनेक लेख व नंतर संपादकीयही ते लिहू लागले. त्यांचे लिखाण वेगळीच ऊर्जा निर्माण करीत असे. प्रभावी लेखनशैली व विविध विषयांची हातोटी यामुळे ते पत्रकारितेच्या क्षेत्रात लोकप्रिय झाले.

याच काळात गांधीजींची हत्या झाली व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली.  पुढे संघावरील बंदी उठली. इकडे पं. नेहरूंची विचारधारा पटली नाही म्हणून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडले. डॉ. मुखर्जीनी सरसंघचालकांची भेट घेऊन आपले स्वतंत्र मत लोकसभेत मांडू शकेल असा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या आपल्या भावना मांडल्या. खरे तर सरसंघचालक त्यावेळी राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या विचारात नव्हते. मात्र, डॉ. मुखर्जी यांचा आग्रह आणि काही विषयांवर या उभय नेत्यांमध्ये एकमत झाले. पुढे १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना करण्यात आली. संघाने तत्कालीन स्वयंसेवक पं. दीनदयाल उपाध्याय यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मदतीला दिले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी  ‘काश्मीर बचाव’ आंदोलन सुरू केले. ‘दो निशान, दो संविधान’ याविरोधात त्यांनी जोरदार आवाज उठवला. मोठे जनआंदोलन उभारले. अटलजीही त्यांच्यासोबत पत्रकार म्हणून या आंदोलनात सहभागी झाले. या काळात अटलजींनी काश्मीर प्रश्नाबाबत प्रसार माध्यमांमधून आवाज बुलंद केला. देशाच्या विविध भागांत जाऊन त्यांनी काश्मीर प्रश्नाबाबत जनजागृती केली. मात्र, या आंदोलनाचे अध्वर्यु असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना काश्मीरच्या सीमेवरच अटक करण्यात आली. यावेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आवाहन केले की, जनसंघाचा झेंडा उंचावण्यासाठी एका प्रभावी कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत अटलजींनी जनसंघात प्रवेश केला. जनसंघातील प्रवेशानंतर लगेचच अटलजींवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली. १९५३ मध्ये लखनऊहून सरोजिनी नायडू पोटनिवडणूक लढवणार, हे निश्चित झाले. जनसंघाचे उमेदवार म्हणून अटलजींना उमेदवारी देण्यात आली. साधनांचा अभाव आणि जनसंघाची तेवढी लोकप्रियता नसल्याने अटलजींना अपयशाचा सामना करावा लागला.

उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे संघ प्रचारक तिवारी हे संघाचे काम पाहत असत. तिथे संघाचे उत्तम काम असल्याने त्यांनी अटलजींना लोकसभेची निवडणूक लढविण्याची विनंती केली. त्यावेळी पराभवाच्या भीतीमुळे उमेदवार निवडणूक लढवण्यास धजावत नसत.  अटलजींनी १९५७ मध्ये बलरामपूर, लखनऊ आणि मथुरा अशा तीन ठिकाणांहून लोकसभेची निवडणूक लढविली. लखनऊमध्ये ते पराभूत झाले. तर मथुरेतून त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. मात्र, बलरामपूरमधून ते विजयी झाले. हा त्यांचा लोकसभा निवडणुकीतील पहिला विजय ठरला. जनसंघाचे खासदार म्हणून ते लोकसभेत गेले. यावेळी लोकसभेत जनसंघाचे चार खासदार निवडून आले होते. त्यांना पक्षाच्या अत्यल्प सदस्यसंख्येमुळे लोकसभेतील चच्रेत सहभागी होण्याची फार कमी संधी मिळत असे. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाच्या विषयावर चर्चा सुरू असताना अटलजींनी त्यात सहभाग घेतला व हिंदीत उत्तम भाषण केले. तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरूंनी अटलजींची त्याबद्दल तोंड भरून प्रशंसा करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना नेहरूंनी हिंदीतच उत्तर दिले. त्याकाळी केंद्रात कोणाचेही सरकार सत्तेत असले तरी अटलजींनाच ‘युनो’मध्ये पाठवीत असत. युनोत परराष्ट्रमंत्री म्हणून हिंदीत भाषण करण्याची अटलजींना तीव्र इच्छा होती. जनता पक्षाच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असताना त्यांची ही इच्छा पूर्ण झाली.

नेहरूंचा प्रभाव

अटलजी नेहमी म्हणत, ‘संसदेत आम्ही एकमेकांचे विरोधक असू, पण संसदेबाहेर सर्व राजकारणी माझे सहोदर आहेत.’ त्यांनी कधीही कुणावर राग वा वचपा काढला नाही. त्यामुळे ते विरोधकांमध्येही लोकप्रिय होते. एकदा अटलजींची संसदेतील चच्रेत पं. नेहरूंसोबत वैचारिक खडाजंगी उडाली. त्याच दरम्यान राष्ट्रपती भवनामध्ये स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. अटलजीही त्यास उपस्थित होते. नेहरूंशी संसदेत उडालेल्या खडाजंगीमुळे या पार्टीमध्ये अटलजी नेहरूंची नजर चुकवून दूर दूर राहू पाहत होते. नेहरू त्यावेळी विदेशी नेत्यांसोबत गप्पा मारत होते. त्यांची नजर अटलजींकडे जाताच त्यांनी अटलजींना बोलावून घेतले आणि त्यांनी अटलजींची विदेशी नेत्यांशी ओळख करून दिली.. ‘हे आमचे विरोधी पक्षातील नेते आहेत. तरुण व बुद्धिमान आहेत. भविष्यातील भारताचे लोकप्रिय नेते आहेत.’ नेहरूजींचे ते शब्द पुढे खरे ठरले. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वावर नेहरूंचा व्यवहार, अभ्यास, साधनशुचिता आणि त्याग यांचा विशेष प्रभाव होता. बांगलादेशच्या फाळणीनंतर अटलजींनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेही तोंड भरून कौतुक केले. त्यानंतर चच्रेत सहभाग घेणाऱ्या एका खासदाराने इंदिरा गांधी यांची तुलना दुर्गादेवीशी केली. मात्र, अटलजींनीच इंदिराजींना दुग्रेचा अवतार म्हटल्याच्या बातम्या तेव्हा प्रसार माध्यमांमधून प्रसृत झाल्या होत्या. संसदपटलावर मात्र संबंधित खासदारानेच हे वक्तव्य केल्याची नोंद आहे.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेस प्रचंड बहुमताने सत्तेत आली. भाजपला लोकसभेत केवळ दोन जागा मिळाल्या. अटलजींचाही ग्वाल्हेरमधून पराभव झाला. राजीव गांधी पंतप्रधान झाले. विरोधक आणि परपक्ष भावना यापलीकडे जाऊन राजीव गांधी यांनी अटलजींना युनोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सांगितले. त्यावर अटलजी म्हणाले, ‘मी तर संसदेचा सदस्यही नाही. मला का पाठवता युनोत?’ त्यावर राजीवजींनी मार्मिक उत्तर दिले, ‘या बठकीच्या निमित्ताने तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना तब्येतही दाखवून या.’ त्यावेळी अटलजींची किडनी काढण्यात आली होती. त्यासंदर्भात परदेशात वैद्यकीय तपासणी करून घेऊन त्यांना योग्य ते उपचार मिळावेत, हा राजीव गांधींचा युनोत त्यांना पाठविण्यामागचा हेतू होता.

रथयात्रेला विरोध

अटलजी मनाने स्वच्छ होते. ते द्वेषासाठी कधीच द्वेष करत नसत. इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र करण्यात वठवलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले; मात्र त्यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला अटलजींनी प्रखर विरोध केला. परिणामी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. दरम्यान, अटलजींना हाडाचा त्रास होऊ लागला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. सहा महिने इस्पितळात उपचार व आराम केल्यानंतर पॅरोलवर त्यांची सुटका झाली. यानंतर ते दिल्लीत थांबले नाहीत. त्यांनी आणीबाणीच्या विरोधात देशभर प्रचार केला. याच वेळेस निवडणुकीची घोषणा झाली. अटकेत असलेल्या जॉर्ज फर्नाडिस, मधु दंडवते, मधु लिमये, नानाजी देशमुख या सर्वानी निवडणुकीस विरोध करून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, अटलजींनी या नेत्यांना आपले म्हणणे पटवून दिले. आणीबाणीबद्दल देशभर जनतेमध्ये खदखद आणि पराकोटीचा रोष आहे, सत्ताधारी पक्षाविरोधात सर्व समविचारी पक्ष एकत्र उभे राहिल्यास जनता आपल्या बाजूने कौल देईल, हे त्यांनी सर्वाना पटवून दिले.

या निवडणुकीच्या वेळी मला हरियाणातील रोहतक तुरुंगात पाठविण्यात आले. तेथे मी नानाजी देशमुखांचा उत्तर प्रदेशातील बलरामपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरून घेतला. सर्व नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यातून देशभर एक उत्साहाचे वातावरण तयार झाले आणि परिणामस्वरूप काँग्रेसच्या विरोधात जनतेनं कौल दिला. समविचारी पक्षांचे जनता सरकार सत्तेत आले. परंतु अंतर्गत विसंवादामुळे हे सरकार फार काळ टिकू शकले नाही. त्यातून भाजपाचा जन्म झाला.

देशाच्या राजकारणाला संपूर्ण कलाटणी देणाऱ्या रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढण्याचा विचार मांडला. त्याला अटलजींनी तात्त्विक विरोध दर्शविला. सद्य:परिस्थितीत या रथयात्रेमुळे धर्मा-धर्मामध्ये वैमनस्य वाढेल व दंगली घडतील, भारतीय जनता पक्षाच्या सात्त्विक राजकारणाला गालबोट लागेल अशी भूमिका मांडत ही रथयात्रा काढू नये, असे स्पष्ट मत अटलजींनी पक्षासमोर मांडले. मात्र, पक्षाने अडवाणीजींच्या रथयात्रेला मंजुरी दिली. आपल्या मताला मुरड घालून त्यांनी पक्षाचा निर्णय शिरोधार्य मानला. अडवाणीजींच्या रथयात्रेचे लखनऊ येथे त्यांनी स्वागत केले. लालूप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये  रथयात्रा अडवली तेव्हा अटलजींनी केंद्रातील व्ही. पी. सिंह सरकारचे समर्थन काढून घेत राजकारणातील दृढतेचा परिचय दिला.

देशाच्या राजकारणात अटलजी व अडवाणीजी ही लोकप्रिय जोडगोळी होती. अटलजी खासदार असताना सुरुवातीच्या काळात लोकसभेत पक्ष कार्यालयात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारा एक सक्षम कार्यकर्ता असावा, हा विचार पुढे आला. अडवाणीजी हे उच्चविद्याविभूषित होते. तेव्हा ते जयपूरमध्ये संघाचे प्रचारक म्हणून कार्य पाहत असत. पक्षाज्ञेनुसार ते जनसंघात रुजू झाले. येथून अटलजी आणि अडवाणीजींनी पक्षाचा विस्तार करण्यात खांद्याला खांदा लावून एकदिलाने कार्य केले. या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी खूप प्रयत्न झाले, पण दोघांनी ते परतवून लावले.

निसर्गसौंदर्य अनुभवायला अटलीजींना खूप आवडायचे. ते दरवर्षी न चुकता मनाली व श्रीनगरला जात. तेथील निसर्गसौंदर्य, उंच पर्वतराजी यांचा आनंद मनात साठवीत. प्राण्यांवरही ते नितांत प्रेम करीत. मी अटलजींना एकदाच रडताना बघितले. तो प्रसंग म्हणजे जनसंघाचा जनता पार्टीत विलय झाला तेव्हा! या विलयानंतर अटलजी धाय मोकलून रडले व म्हणू लागले, ‘मी पं. दीनदयाल उपाध्याय यांना काय उत्तर देणार?’

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर १९८४ मध्ये देशात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचे केवळ दोन खासदार निवडून आले. अटलजींनाही ग्वाल्हेरमधून पराभवाला सामोरे जावे लागले. तेव्हा प्रेस क्लबशेजारील ६, रायसिना रोडवर अटलजी राहत असत. त्यामुळे निवडणूक निकाल लागला त्या दिवशी लगेच पत्रकारांचा मोठा घोळका थेट बंगल्यावरच आला. त्या सर्वाना मी बसवून घेतले. अटलजी दिवसभर कामांत व्यग्र होते. काही वेळापूर्वीच ते बंगल्यावर परतले असल्याने थोडे फ्रेश होऊन ते पत्रकारांसमोर आले. पत्रकारांनी एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. निवडणूक निकालाबद्दल, नवीन सरकार, राजीव गांधींचे नेतृत्व, भाजप अशा सर्व विषयांवर प्रश्न विचारून झाल्यावर एका पत्रकाराने मार्मिक प्रश्न केला, ‘तुमच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत केवळ दोन जागा मिळाल्या. काय भवितव्य आहे पक्षाचे?’ यावर अटलजींनी दिलेले उत्तरही तेवढेच मार्मिक व आत्मविश्वासपूर्ण होते. ते म्हणाले, ‘आमचा पक्ष पुढे जाईल. नव्हे, नव्हे- आम्ही सत्ता स्थापन करू. निसर्गनियमाप्रमाणे जो वर जातो तो खाली येतोच. आणि जो खाली आहे तो एक दिवस वर जाणारच.’ अशा दुर्दम्य आत्मविश्वासाचे धनी होते अटलजी. त्यांनी हे शब्द खरे करून दाखविले. १९८४ सालच्या दोन खासदारांवरून १९९३ मध्ये भाजपने लोकसभेत २६२ जागा जिंकल्या.

संघर्ष.. सत्ता व आजारांशी!

सत्ता आणि आजारांशी अटलजींना आयुष्यभर संघर्ष करावा लागला.  त्यांच्यावर फिशर, पाठीचा मणका व पोटाच्या शस्त्रक्रिया झाल्या. किडनीही काढावी लागली. एकीकडे पक्षाला सक्षम नेतृत्व प्रदान करून त्याचा विस्तार करण्याच्या कामात अडचणींचा सामना करत असतानाच आजारांशीही त्यांचा सामना सुरू होता. पंतप्रधान असताना मुंबईमध्ये त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मग दुसऱ्याही पायावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर कामांतील व्यग्रतेमुळे फिजिओथेरपी आणि आराम करण्यासाठी त्यांना वेळच मिळत नसे. त्यातून हळूहळू आजार बळावत गेले. आयुष्याच्या उत्तरार्धात शेवटची १३ र्वष त्यांनी सततच्या आजारांशी संघर्ष केला. २००५ मध्ये ते आजारी पडले तेव्हा त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. स्नानगृहात पाय घसरून ते पडले तेव्हा २२ दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यांच्या गळ्याभोवती एक यंत्रही बसविण्यात आले होते. त्यामुळे त्यांना बोलताना त्रास होऊ लागला. बऱ्याचदा भेटायला येणाऱ्या लोकांना आपण काय सांगतो हे कळत नसल्याचे पाहून अटलजींना त्रास होत असे. हळूहळू त्यांनी बोलणेच सोडून दिले. त्यांना संगीताची आवड होती. मराठी संगीत व नाटकं त्यांना फार आवडायची. आम्ही त्यांना टेलिव्हिजनवर गाणी, सिनेमा लावून देत असू. तसेच त्यांना खुर्चीत बसवून बागेची सरही घडवत असू. त्यांचा शेवटच्या श्वासापर्यंत आजारांशी संघर्ष सुरू होता.

मी अटलजींकडे स्वीय सहायक म्हणून काम करू लागलो त्यानंतर १५-२० दिवसांनीच अटलजींना पक्षाच्या कामासाठी बंगलोरला जायचे होते. हा प्रसंग आहे १९६९ सालचा. तेव्हा अटलजींचे १, फिरोजशाह रोडला वास्तव्य होते. अटलजी बाहेर जात-येत तेव्हा मी त्यांना विमानतळावर पोहोचवायला व घ्यायला जात असे. त्यावेळी दिल्लीहून बंगलोरला सकाळी एक विमान जात असे आणि तेच विमान रात्री १० वाजता परत येत असे. अटलजींना मी सकाळी विमानतळावर सोडून आलो. रात्रीही मीच घ्यायला जाणार होतो. दरम्यान, बंगल्यावर काही कागद चाळत असताना जनसंघाचे तत्कालीन सचिव जगदीश प्रताप माथूर अटलजींना भेटायला म्हणून आले. माझ्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी कॅनॉट प्लेस भागातील रिगल थिएटरमध्ये चित्रपट बघण्यासाठी चलण्याचा आग्रह केला. अटलजींना घ्यायला विमानतळावर जायचे असल्याने मी येऊ शकत नाही असे मी त्यांना सांगितले. ‘पण सिनेमा केवळ दीड तासाचाच आहे, तुम्ही लवकरच मोकळे व्हाल,’ असे सांगून त्यांनी खूपच आग्रह केला तेव्हा मला राहवले नाही. आम्ही चित्रपट बघायला गेलो. नेमके त्या दिवशी विमान लवकर आले व चित्रपटही दीड तासापेक्षा जास्त वेळ लांबला. चित्रपट संपताच मी विमानतळाकडे धाव घेतली. तेव्हा विमानतळावर आगमन झालेल्या प्रवाशांची यादी लागत असे. ती बघितली. त्यात बघतो तर अटलजींचेही नाव होते. तसाच तडक बंगल्यावर आलो आणि पाहतो तो अटलजींनी हातातली बॅग टेबलावर ठेवली होती आणि ते बंगल्यासमोर चकरा मारत होते. बंगल्याच्या चाव्या माझ्याजवळ असल्याने त्यांना ताटकळत उभे राहावे लागले होते. पण त्यांनी अवाक्षरानेही न रागावता विचारले, ‘शिवकुमारजी, कुठे होतात तुम्ही?’ मी त्यांना सांगितले, ‘चित्रपट बघायला गेलो होतो.’ त्यावर ते मिश्कीलपणे म्हणाले, ‘अरे, थोडा वेळ थांबायचे होते, मीसुद्धा तुमच्यासोबत चित्रपट बघायला आलो असतो. बरं, आता लवकर आवरा. आपल्याला राजमातांकडे एका बठकीसाठी जायचे आहे.’ हे ऐकून माझा जीव भांडय़ात पडला. यानंतर मात्र मी खूप खबरदारी घेऊ लागलो. कदाचित अनवधानाने काही चुका झाल्याही असतील माझ्याकडून; पण अटलजींनी उदार मनाने क्षमा केली मला.

स्वीय सहायक म्हणून रुजू झाल्यापासून अटलजी १३ दिवसांचे पंतप्रधान होईपर्यंत मी त्यांचा ड्रायव्हर, स्वयंपाकी, देखभाल करणारा अशा सर्व भूमिकांमध्ये वावरलो. ते पंतप्रधान झाले तेव्हा या कामांमधून मला थोडीशी सवड मिळाली. गेल्या ५० वर्षांच्या त्यांच्यासोबतच्या कार्यकाळात मी दिल्लीत असूनही कोणा नातेवाईकांकडे किंवा मित्राकडे एक दिवसही राहिलेलो नाही. समर्पणभावाने त्यांची सेवा केली. त्यांच्या जाण्याने मी आज अनाथ झालोय. अटलजींच्या शेवटच्या काळातील आजारपणातही मी त्यांच्या सोबत होतो. १६ ऑगस्टला नेहमीप्रमाणे आम्ही आयसीयूच्या बाहेर बसलो होतो. दुपारी १२ च्या सुमारास एकाएकी हालचालींना वेग आला. आम्हाला वाटून गेले की अटलजींना घरी जाऊ देण्यासाठी तर ही लगबग नसावी! म्हणून आम्ही मनोमन सुखावलो होतो. परंतु अटलजींवर उपचार करणारे डॉ. बुलेरिया आमच्याजवळ आले आणि त्यांनी आम्हाला सांगितले की, ‘अटलजींची तब्येत खूपच गंभीर आहे. तुम्ही सर्व त्यांना एकदा आयसीयूत भेटून या.’ तेव्हा मात्र आमचे अवसान गळाले. त्यावेळी ग्वाल्हेरहून त्यांचे आप्तही आले होते. सर्वानी त्यांची भेट घेतली. मीही आत गेलो. त्यांना लावलेली सर्व यंत्रं काढून घेण्यात आली होती. फक्त अटलजींची नाडी सुरू होती. त्यांचे हात-पाय थंड पडले होते. इतक्या वर्षांपासून बघत आलेला त्यांचा चेहरा मला अजूनही तसाच प्रसन्न वाटत होता. मी त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या पायावर चादर टाकली आणि बाहेर आलो. शेवटी सायंकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. अटलजी ज्या तत्त्वज्ञानाने जीवन जगले, त्या त्यांच्या ‘मौत से ठन गई’ या कवितेतल्या ओळी मला इथे स्मरतात..

‘जुझने का मेरा इरादा न था, मोड पर मिलेंगे इस का वादा न था!

रास्ता रोक कर वह खडी हो गई, यो लगा जिंदगी से बडी हो गई!

मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं, जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं!

मं जी भर जिया, मं मन से मरु, लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरु!’

शब्दांकन : रितेश भुयार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 2:07 am

Web Title: article about atal bihari vajpayee
Next Stories
1 वरदा :एक पत्रकल्लोळ
2 ‘राजहंसी’
3 २६/११ नंतरची जागरूकता..
Just Now!
X