दिल्लीतील जेएनयुत घडलेल्या कन्हैया प्रकरणाने अनेकांना अरुण साधू यांच्या ‘पडघम’ नाटकाची आठवण झाली. त्यातील कथाविषयाला समांतर अशी ही घटना. साहजिकच या नाटकाचे पुन:स्मरण न होते तरच नवल. म्हणूनच या नाटकाच्या
आठवणींना उजाळा देणारा त्याच्या कर्त्यांचा खास लेख..
‘आझादी..जोर-जुलूम से आझादी..’
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कट्टय़ावरून पोलिसांच्या वेढय़ामध्ये नारे दिले जात होते. उत्फुल्ल चेहऱ्यांचे सुमारे तीन हजार नौजवान विद्यार्थी मोठय़ा आवेशाने व आवेगाने हाताच्या मुठी उंच करीत या घोषणा देत होते.. ‘भूक-दारिद्य््राापासून आझादी.. अन्याय-अत्याचारांपासून, भांडवलदारांच्या शोषणापासून, व्यवस्थेच्या (establishment) गळचेपीपासून आझादी..’ निषेध नव्हे; आझादी! एकामागून एक घोषणांचा पाऊस. भारतातील, परदेशातील कित्येक वाहिन्यांच्या पडद्यांवरून हे नारे निनादत होते. थोडय़ाच वेळात हे सारेच दृश्य व्हायरल झाले. सोशल मीडियावर एकच धमाल. आझादीचा ठेका धरून त्यावर कोणी रॅप संगीताचा ताल दिला. तोही व्हायरल झाला. कोलकात्याच्या जादवपूर विद्यापीठासह भारतात असंख्य ठिकाणी हा ठेका धरीत तरुण विद्यार्थ्यांच्या रस्तोरस्ती मिरवणुकी निघू लागल्या.
नाऱ्यांचा लीड देणारा होता कन्हैया कुमार. तसाच तारुण्याने सळसळणारा ‘जेएनयू’चा मुलगेलासा हसतमुख विद्यार्थी. दूर बिहारमधील बेगुसराय गावचा. दाढीचे केस अर्धवट वाढलेले. अंगात जॅकेट व जीन्स्. नुकताच तुरुंगातून जामीनावर सुटलेला. त्या तरुणांसमोर त्याने तीस मिनिटे उत्स्फूर्त भाषण केले. तेही व्हायरल झाले. त्यातही स्फूर्तीचा जोश व आवेग.. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने.. साधे-सोपे विचार.. हृदयातून उमटलेले. ऐकणाऱ्यांना आभाळात नेणारे.. गेल्या कित्येक वर्षांत अशा ठिणग्या पाहिल्या नव्हत्या. या मुलाने तर देशी-परदेशी इंटलेक्चुअल स्तंभलेखकांनादेखील हलवून सोडले. कित्येक वर्षांत असे विचार ऐकले नव्हते. एक नवा नेता उदयाला येत आहे? कोण हा कन्हैया मुरलीवाला? आपल्यामागे मुलामुलींच्या झुंडी झुलवणारा? हा कोण सांप्रति आला, नवतारा अवचित उदयाला?
ही गेल्या आठवडय़ातील हकीकत. तेव्हापासून पाच-सात तरी फोन आले. ही दृश्ये पाहून त्यांना आठवण झाली ती माझ्या ‘पडघम’ या धमाल संगीत नाटकाची. थिएटर अ‍ॅकेडमीसाठी डॉ. जब्बार पटेलांनी बसविलेले आणि आनंद मोडकांनी संगीत दिलेले. डोक्यात त्या ओळी घुमत होत्या.. विद्यापीठातील विद्यार्थ्यांची आंदोलने, पोलिसी खाक्या, मारामाऱ्या, लाठीमार व मिरवणुका. त्यातून एका नव्या तरुण नेतृत्वाचा उदय.. आणि तरुण-तरुणींची नृत्यांसह गाणी-
‘हा कोण.. हा कोण..। हा कोण सांप्रति आला॥
नवतारा अवचित उदयाला। जिंकित विश्व निघाला॥
तरुणांचे काळीज बनला॥.. हा कोण..।’
आजच्या तरुणांना हे नाटक आठवणार नाही. ते लिहिले होते १९८०-८१ साली. आणि मेगा नृत्यनाटय़ म्हणून ते रंगमंचावर आले ते १९८३ साली. त्यामुळे फोन आले ते वयस्कांचेच. नाटक लिहिले तेव्हा आणीबाणी संपून जनता सरकारची इतिश्री झाली होती. १९६५-६६ सालापासून सुरू झालेल्या ध्येयवादी तरुणांच्या चळवळी लयाला गेल्या होत्या. १९७१-७२ चे बांगलादेश मुक्तियुद्ध आणि इंदिरा गांधींमधील रणरागिणी दुग्रेचा उदय, नंतर १९७२-७३ च्या कराल दुष्काळापासून उग्र होऊ लागलेली विद्यार्थ्यांची आंदोलने (सुरुवात बिहारमध्ये), व्यवस्थेविरुद्धचे उठाव (गुजरातेतील ‘चिमण-चोर’ घोषणा), तरुण शांतीसेना, जयप्रकाश नारायणांचा पाठिंबा.. असा तो खळबळजनक कालखंड आणीबाणीपासून समाप्त झाला होता. जनता सरकारने तर घोर निराशा करून युवा पिढीला हतोत्साह करून टाकले. इंदिरा गांधी पुनश्च सत्तेवर आल्या. वातावरण थिजल्यासारखे झाले. एक प्रकारची मरगळ आसमंतात भिनू लागली होती. लोक अपेक्षित होते- भूतकाळापासून ब्रेक घेऊन नवे युग अवतरण्याची, उत्साहाची नवी ऊर्जा देऊ शकेल अशा नव्या नेत्याच्या उदयाची.. अशा पाश्र्वभूमीवर मी ‘पडघम’ हे नाटक लिहिले.
नाटक अनेकांच्या लक्षात राहिले त्यातील थीममुळे, तसेच थिएटर अ‍ॅकेडमीच्या भव्य सादरीकरणामुळे. त्यातील जीन्स्- टी-शर्टमधील ७५-८० युवक-युवती एकाच वेळी कोरस गात आनंद मोडकच्या धमाल संगीतावर पाश्चात्य पद्धतीने रंगसंचावर वेगवान, चपळ नृत्य करीत असत. समाजाच्या अस्वस्थ कोलाहलातून वाट काढण्यासाठी, विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक तरुण मुलगा पुढे येतो. (प्रवीण त्याचे नाव!) खरे तर परिस्थितीच त्याला पुढे आणते. प्रवीण बुद्धिमान आहे. राज्यशास्त्रामध्ये डॉक्टरेट करतो आहे. उजव्या-डाव्या वगैरे विचारसरणींचा त्याचा अभ्यास आणि विस्तृत वाचन आहे. पण कुठल्याही राजकीय गटाला तो बांधलेला नाही. तरीही ‘पोटेन्शियल डेंजरस कॅरेक्टर’ म्हणून त्याच्या मागावर गुप्त पोलीस आहेत. तो पकडला जातो. पोलीस कोठडीत त्याला मारहाण होते. बाहेर येतो तेव्हा चळवळ्ये तरुण त्याला साथ देतात. आणि बघता बघता त्याला नेतृत्वाचे वलय लाभते. विद्यापीठाच्या भ्रष्ट प्रशासनाविरुद्ध लढा, मोच्रे, मारामाऱ्या, अन्यायी शासनव्यवस्थेविरुद्ध चळवळी.. गाणी व नाच यांचा थिएटर दुमदुमून टाकणारा एकच कल्लोळ..
‘विद्यापीठाच्या उंच उंच भितींभवती।
विद्यार्थ्यांची एकच दाटी॥
काळे झेंडे, लाल झेंडे। हिरवे, भगवे, तिरंगी झेंडे॥
सांगाडे, सांगाडे..।
विद्यापीठाच्या उंच उंच भितींमध्ये॥
किडे-माकडे सांगाडे॥
विद्यापीठाच्या लांब लाब रस्त्यांवरती।
पोलिसांची तुंबळ दाटी॥
लाठय़ाकाठय़ा अन् अश्रूधूर।
दगड-विटांचा एकच पूर॥’
अशी गद्य गाणी व थिरकते पाय..
राजकारणात- प्रत्यक्ष व्यवस्थेमध्ये शिरल्याशिवाय जनतेला न्याय मिळवून देता येणार नाही, या ईष्र्येने प्रवीण आपोआप सत्तेच्या राजकारणात शिरतो. त्याचे समाजवादी गुरू प्रोफेसर हष्रे हे विद्यादानाचा पवित्र व्यवसाय सोडून सत्ताकारणात शिरून निवडणूक लढवतात.. मंत्री होतात. कशासाठी? तर अर्थातच वंचितांवरील, गोरगरीबांवरील अन्याय दूर करण्यासाठी, विषमता दूर करण्यासाठी! पाहता पाहता ते स्वत:च व्यवस्थेत सुखेनव मिसळून जातात. पुढच्या निवडणुकीत प्रवीण त्यांना मागे टाकून स्वत: मंत्री बनतो. अर्थात् त्यासाठी आवश्यक त्या तडजोडीही त्याला कराव्या लागतात. कालांतराने नकळत तोही व्यवस्थेचा- सिस्टीमचा भाग बनतो आणि त्याचे पतन सुरू होते. तोवर त्याचाच एक शिष्य-साथीदार चळवळींमध्ये पुढे येऊ लागलेला असतो. हा आता पुढे येऊन नेमका प्रवीणची जागा घेणार आहे, हे आपल्याला दिसू लागते. नव्या युद्धाचे नवे पडघम वाजू लागले आहेत.. अशी ही सनातन सत्ताचक्राच्या फिरत्या वर्तुळाची कथा!
कन्हैया कुमार हा जेएनयु विद्यार्थी संघटनेचा आधीच अध्यक्ष होता. जेएनयु विचारसरणींच्या जोरदार घुसळणीसाठी प्रसिद्ध. राजकारणातील वादावादी, दोन देणे, दोन घेणे त्याला ठाऊक नव्हते असे म्हणता येणार नाही. शिवाय तो कम्युनिस्टांच्या पाठिंब्याने अध्यक्ष झालेला. तो स्वत: कम्युनिस्ट नाही, असे त्यानेच जाहीरपणे सांगितले आहे. तो उजवा असणे शक्यच नव्हते. गेली कित्येक वष्रे जेएनयुची विद्यार्थी संघटना डाव्यांच्या ताब्यात होती. अभाविपने खूप प्रयत्न केला तेव्हा मधे अल्पकाळ त्यांच्या हाती संघटना आली आणि लवकरच निसटूनही गेली. आता केंद्रात सत्ता भाजपच्या ताब्यात असल्याने त्या पक्षाला नतद्रष्ट सेक्युलर, डाव्या विचारांना हद्दपार करून आपल्या खास हिदू छापाच्या पवित्र भारतीय संस्कृतीचे देशात संवर्धन करायचे आहे. त्यासाठी शाळांचे अभ्यासक्रम बदलून उच्च शिक्षणसंस्था आणि सांस्कृतिक अड्डय़ांमधे ‘आपली’ माणसे नेमायची आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कन्हैयाला लक्ष्य करण्यात आले. पण स्ट्रॅटेजी फुसकट निघाली. हे सगळे बिग प्रत्यक्ष चित्रवाणी माध्यमावरच फुटले. पोलिसांनी कन्हैयाला अटक केली. हडेलहप्पी वागणूक दिली. रुंद छातीच्या पलवान-टाईप बाउन्सरसारखे दिसणाऱ्या काळ्या कोटातील वकिलांनी न्यायालयाच्या परिसरातच कन्हैयाला पोलिसांच्या साक्षीने मारहाण केली. कन्हैयाला गोळीने खतम करण्याच्या, त्याची जीभ कापण्याच्या जाहीर धमक्या दिल्या गेल्या. आणि जामीनावर सुटल्यावर त्याने विद्यापीठाच्या तरुणाईसमोर केलेले व वयस्कर बुद्धिवाद्यांनाही मंत्रमुग्ध करणारे ते भाषण..
हे सगळे वास्तवातील नाटक शेकडो वृत्तवाहिन्यांवरून कोटय़वधी लोकांनी चकित होऊन पाहिले. सगळीकडे एकच चर्चा- हा कोण..? कोण हा नवा तारा अवचित उदयाला येत आहे? ‘पडघम’चे या पर्वाशी असलेले कथा-समांतरत्व मर्यादित आहे. पण जे आहे, तेवढे त्यावेळी नाटक पाहिलेल्या व आज चाळिशी-पन्नाशीच्या वर असलेल्या प्रेक्षकांच्या स्मृती जागृत करणारे निश्चितच असावे. त्याचबरोबरीने आजचे सत्ताकारण, राजकारण, विविध निवडणुकांचे सतत चालू असणारे रणकंदन यांचा घनघोर कल्लोळ या नाटकाच्या बिनधास्त सादरीकरणातून आणि कधी अ‍ॅब्सर्ड, तर कधी बटबटीत गीतांमधून, प्रसंगांमधून प्रत्ययास येत असावा (पोलीस ठाण्यात प्रवीणची तपासणी होत असतानाचे संवाद). बारा-पंधरा पोलिसांना पूर्ण गणवेशात संगीताच्या तालावर कवायत व सांघिक नृत्य करताना मराठी रंगभूमीने तरी प्रथमच पाहिले असणार. तसेच लपतछपत प्रवीणच्या मागावर असलेले दोन गुप्त पोलीस सूत्रधारांचेही काम करतात. कथासूत्र पुढे नेतात. दोन प्रवेश जोडण्यासाठी छद्मी डायलॉग्जही टाकतात. नाटकात राजकारणातील पुष्कळ खाचाखोचा असूनही त्यात दीर्घ संभाषणे नाहीत की गंभीर तात्त्विक चर्चा नाहीत. राजकारण, निवडणुकांचे अर्थकारण तसेच राज्यशास्त्रीय विचारांचा घोळ यांचे गीतांमधून काहीसे विडंबनात्मक चित्रण आहे, टीका आहे. डावे-उजवे गट प्रवीणला पारखून घेताना त्याच्या जातीपासून तो विचारांपर्यंत कशी थिल्लर चर्चा करतात ते आहे. राजकारणासारखा गंभीर विषय प्रत्यक्ष व्यवहारात ताíककतेच्या पलीकडे जाऊ लागला की मार्क्‍स, गोळवलकर, गांधी यांचाही सहज हलकासा झोंबरा उपहास होऊ शकतो. त्यामुळे नाटकावर उजवे-डावे-मधले-खालचे-वरचे अशी सर्व बाजूंनी बरीच टीका झाली. काहींनी ‘सवंग पथनाटय़’ असा शिक्का मारत नाटक निकालात काढले.
पण प्रेक्षक येत राहिले. नाटक गाजले. दिल्ली-कोलकात्यापर्यंत प्रयोग झाले. प्रत्येक निवडणुकीच्या काळात ‘पडघम’ची आठवण काढणारे दोन-तीन तरी फोन येत राहिले. (‘इलेक्शन, इलेक्षन।’ — किंवा ‘रिव्होल्युशन, रिव्होल्युशन। डायलेक्टिक मटेरियालिझम’ अशा गाण्यांच्या आठवणी जाग्या करणारे!) पण नाटकाचा रंगमंचावरील पसारा खूपच मोठा होता. मंचावर येणारे आणि मंचामागची बाजू, ध्वनिव्यवस्था वगरे सांभाळणारे (प्री-रेकॉर्डेड संगीतावर समूहगाणी दरवेळी नव्याने गाणे- हेही प्रथमच!) अशा शे-सव्वाशे कलाकारांचा ताफा घेऊन दौरे करणे म्हणजे दिव्यच होते. थिएटर अ‍ॅकेडमीला चांगलाच फटका बसला असणार. शिवाय बहुतेक कलाकार सोळा ते पंचवीस-सव्वीस वर्षांचे तरुण. त्यांचे शिक्षण, परीक्षा, नोकऱ्यांसाठी परदेशी जाणे, मुलींची लग्ने यामुळे बदली कलाकार शोधणे कठीण झाले. नाटकाचा शेवटचा प्रयोग १९८७ साली झाला. त्यानंतर छोटे-मोठे हौशी गट अधूनमधून स्पर्धामध्ये त्याचे प्रयोग करीत राहिले. पण त्यातील पदे गद्य काव्यवाचनाप्रमाणे. लेखकाची मूळ अपेक्षा तीच होती. जब्बारने त्याचे मेगा नृत्यनाटय़ कल्पून ते दिमाखात सादर केले. कन्हैयाच्या निमित्ताने ‘पडघम’ची पुनश्च एकदा आठवण काढली गेली, म्हणून हा लेखप्रपंच.

अरुण साधू
sadhu.arun@gmail.com