‘शेतमालाला रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमाने देशभरात शेतकरी आंदोलनाचा झंझावात निर्माण करणारे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे ‘अंगारवाटा’ हे चरित्र अलीकडेच प्रकाशित झाले. शेतक ऱ्यांचा कर्जबाजारीपणा, त्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि कर्जमाफीच्या मागणीमुळे तापलेल्या राजकीय वातावरणात ‘भीक नको, हवे घामाचे दाम’ अशी सुस्पष्ट वैचारिक मांडणी करणारे शरद जोशी व त्यांचे चरित्र यांचे समकालीन संदर्भातील महत्त्व आपातत:च अधोरेखित होते. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न जोशींनीच प्रथम ऐरणीवर आणला. १९८० ते २०१० या तीन दशकांत जोशींच्या नेतृत्वाखाली झालेल्या उग्र शेतकरी आंदोलनांनी कृषी अर्थशास्त्राचे चर्चाविश्व व्यापून टाकले होते. शेतीचे वास्तवदर्शी अर्थशास्त्र मांडणारा तो पहिला योद्धा शेतकरी नेता होता. तीन उपोषणे, सोळा तुरुंगवास, चार हजारांवर सभा, लक्षावधी शेतक ऱ्यांचा सहभाग, कांदा, ऊस, तंबाखू, दूध आणि कापूस यांच्यासाठी महाराष्ट्रभर केलेली वादळी आंदोलने.. शरद जोशींची अशी अनेक वैशिष्टय़े. या सर्व लढायांमध्ये सूत्र मात्र समान. ते असे- ‘आपल्यापुढील बहुतेक प्रश्नांचे मूळ दारिद्रय़ात आहे. दारिद्रय़ाचे मूळ शेतक ऱ्याच्या शोषणात आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित वाजवी दाम मिळेल अशी व्यवस्था केल्याशिवाय हे दारिद्रय़ कधीही दूर होणार नाही.’

‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ या त्यांच्या धारदार मांडणीत शेतक ऱ्यांच्या वर्षांनुवर्षे होत आलेल्या शोषणाचीच कथा आहे. हे शोषण जाणीवपूर्वक आखलेल्या अधिकृत धोरणाचा गाभा आहे. एका गरीब व विकसनशील देशात भांडवल संचय करण्याचा राजरोस मार्ग म्हणून अर्थकारण्यांनी त्याची भलामण केली आहे. या प्रस्थापित अर्थकारणाला वैचारिक व आंदोलनात्मक आव्हान निर्माण केले ते जोशींनी. शेती-प्रश्नातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी शरद जोशी यांच्या चरित्रासारखे साधन उपलब्ध होणे ही काळाची निकड होती. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने, कष्टसाध्य संशोधनाने, सहानुभूतीपूर्वक आणि तरीही निरपेक्ष बुद्धीने भानू काळे यांनी जोशी यांचे समग्र चरित्र आपल्यासमोर मांडून एक महत्त्वाची गरज भागवली आहे. शरद जोशी यांच्यासारख्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाच्या लोकनेत्याचे चरित्र लिहिण्यासाठी भानू काळे हा चरित्रकार लाभला यातच या पुस्तकाचे अर्धे यश आहे. ‘अंतर्नाद’सारख्या ललित-वैचारिक मासिकाचे संपादक म्हणून काळे सुपरिचित आहेत. ‘बदलता भारत’ आणि ‘अंतरीचे धावे’ यांसारख्या त्यांच्या लेखनातून समकालीन वास्तवाचे आकलन करून घेण्याच्या त्यांच्या क्षमतांचा प्रत्यय आला आहे. उदारमतवादी मूल्यांशी असलेली त्यांची बांधिलकी आणि अनाग्रही भूमिका यामुळे शरद जोशींसारख्या उक्ती आणि कृतीत काही प्रमाणात वादग्रस्त म्हणता येईल अशा चरित्रनायकाला ते प्रामाणिकपणे न्याय देतील अशी खात्री बाळगता येते. भानू काळे यांनी या पुस्तकावर पाच वर्षे काम केले. जोशी यांच्याबरोबर झालेला सातत्यपूर्ण संवाद, त्यांच्यासोबत केलेला प्रवास, त्यांच्याकडे उपलब्ध असलेली असंख्य कागदपत्रे आणि पत्रव्यवहार, जोशींचे सर्व प्रकाशित लेखन, जोशींच्या निकटवर्तीयांकडून मिळविलेली माहिती, त्यांच्या देशभरातील व स्वित्र्झलडमधील सहकाऱ्यांच्या मुलाखती अशी प्रचंड साधनसामग्री जमवून भानू काळेंनी हा लेखनप्रकल्प आकाराला आणला आहे. जोशी यांनी शेतक ऱ्यांच्या प्रश्नांवर मूलभूत, महत्त्वाची मांडणी करून आणि देशपातळीवर सातत्याने त्याचा पाठपुरावा करूनही त्यांच्या या योगदानाबद्दल अभ्यासकांनी आणि विचारवंतांनी पुरेशी दखल घेतली नाही, त्यांना त्यांचे श्रेय दिले नाही, याबद्दल वाटणारी खंत म्हणूनही हे चरित्रलेखन झाले आहे. परंतु त्यात अभिनिवेश नाही किंवा चरित्रनायकाची अस्थानी प्रशंसाही नाही. भारतीय समाजजीवनातील एका धगधगत्या कालखंडाचा आणि त्यात घडलेल्या एका अभूतपूर्व शेतकरी आंदोलनाचा दस्तावेज असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. जोशी यांचं अंतरंग उलगडण्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा, त्यांच्या विचारव्यूहाची साद्यंत मांडणी करण्याचा, शेतकरी नेता म्हणून त्यांचं मूल्यमापन करण्याचा आणि कालपटावर त्यांची स्थाननिश्चिती करण्याचा हा  निराग्रही, परंतु सर्वागीण प्रयत्न आहे. भानू काळे यांच्या निष्कर्षांशी सर्वच सहमत होतील असे नाही, परंतु त्यांच्यावर हेत्वारोप करता येणार नाही, एवढय़ा पारदर्शकतेने त्यांनी हा चरित्रलेखनाचा घाट तडीस नेला आहे.

Ranajagjitsinha Patil - Om Rajenimbalkar
“…तर राजकारण सोडून देईन”, ओमराजेंनी तेरणा महाविद्यालयावरून केलेल्या आरोपांवर राणा पाटलाचं उत्तर
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

शरद जोशींचं सार्वजनिक जीवन सुरू होतं १९७८ च्या आसपास. मार्च१९७८ मध्ये चाकण येथे पहिलं कांदा आंदोलन उभं राहिलं आणि त्याच्या पुढच्याच वर्षी ऑगस्टमध्ये शेतकरी संघटनेची स्थापना झाली. स्वित्र्झलडमधील मोठय़ा पगाराची नोकरी सोडून या माणसाने भारतात परत यायचा निर्णय घेतला आणि केवळ तेवढेच नव्हे तर चाकणजवळ कोरडवाहू शेती करण्यासाठी हातात कुदळ आणि घमेलं घेतलं. यामुळे त्यांच्याबद्दल आसपास अपार कुतूहल होतं. पण ते शमवण्याचा जोशींनी कधी प्रयत्न केला नाही. आपलं खासगीपण ते जपत राहिले. ‘अंगारवाटा’ या चरित्राचं एक वेगळेपण हे, की जोशींचं बालपण, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण, भारतातील नोकरी, स्वित्र्झलडमधील दहा वर्षांचं वास्तव्य असा त्यांचा पहिल्या ४० वर्षांचा जीवनपट यात पहिल्यांदाच समोर आला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, त्याला कारणीभूत ठरलेल्या व्यक्ती आणि प्रवाह, त्यांची स्वभाववैशिष्टय़े यांचं सम्यक आकलन यात होतं. शेतीक्षेत्रात जोशी आकाशातून पडले नाहीत. त्यांच्या मनात याविषयी झालेलं बीजारोपण आणि त्यातून घरात कुणालाही मान्य नसलेला भारतात परतून शेती करण्याचा निर्णय यातील सुसंगतीची उकल होते. पुढे ते शेतक ऱ्यांचे पंचप्राण झाले ते त्यांच्याशी जोडलेल्या सहवेदनेने. दिवस-रात्र कष्ट हा त्यातील समान धागा. त्यांच्या विद्यार्थिदशेवरील पहिल्या प्रकरणाचा शेवट करताना लेखक भानू काळे नोंदवतात : ‘प्रखर बुद्धिनिष्ठा आणि तीव्र आत्मभान ही पूर्वायुष्यात जाणवणारी जोशींची दोन ठळक व्यक्तिवैशिष्टय़े.’ याचं प्रत्यंतर त्यांच्या उत्तरायुष्यात वारंवार येत राहिलं.

ते विद्यार्थी असताना मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एका निबंध स्पर्धेत जोशींनी भाग घेतला आणि त्यासाठी अभ्यास करून ‘नदीखोरे प्रकल्प आणि भारतीय शेतीच्या विकासातील त्याचे स्थान’ हा शोधनिबंध लिहिला. त्याला पहिले पारितोषिक मिळाले. या प्रकल्पामुळे शेतक ऱ्यांचा फारसा आर्थिक लाभ झालेला नाही, उलट जे शेतकरी विस्थापित होऊन मुंबईसारख्या शहरात येऊन नोकरी-व्यवसायात पडले त्यांची आर्थिक स्थिती सुधारली, असा त्यांचा निष्कर्ष होता. लेखक काळे इथे अनुमान काढतात, ‘शेती क्षेत्रातील त्यांचे हे पहिले वैचारिक पदार्पण होते. शेतीविषयक आनुषंगिक सुधारणांपेक्षा शेतीमालाला चांगला भाव मिळणे हे शेतक ऱ्यांसाठी अधिक गरजेचे आहे, या मांडणीची सुरुवात इथून होते.’

एम. कॉम. झाल्यानंतर वर्षभर जोशींनी कोल्हापूरच्या कॉमर्स कॉलेजमध्ये नोकरी केली. त्याचवेळी आयएएस या स्पर्धापरीक्षेची तयारी सुरू होती. त्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पण त्यांचे गुण कमी असल्यामुळे त्यांना ‘इंडियन पोस्टल सव्‍‌र्हिस’ या केडरमधील जागेवर समाधान मानावे लागले. दहा वर्षांच्या भारतातील नोकरीनंतर त्यांना स्वित्र्झलडमध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन या संयुक्त राष्ट्रसंघाच्या घटक संस्थेत प्रवेश मिळाला. आठ वर्षे जोशींनी तिथे नोकरी केली. सुरुवातीला खूप मानाच्या आणि महत्त्वाच्या वाटलेल्या या नोकरीतील फोलपणा नंतर त्यांच्या लक्षात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या संस्थांतील बौद्धिक भ्रष्टाचाराचा त्यांना उबग आला. या संस्थांचे अहवाल उथळ आणि शाब्दिक फुलोऱ्यात अडकलेले. दारिद्रय़ाच्या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा खराखुरा प्रयत्न कुणी केलेलाच नाही. जोशींचे उद्धृत सांगतं, ‘‘१९७२ च्या सुमारास भारतात परतायचा माझा विचार पक्का झाला. जाऊन काय करायचं, तर कोरडवाहू शेती- हेदेखील मी पक्कं ठरवलं. देशातील दारिद्रय़ाचं मूळ हे कोरडवाहू शेतीमध्ये आहे ही माझ्या मनाची खात्री पटली होती.’’ १ मे १९७६ रोजी जोशी भारतात परतले. पण त्याआधी कोरडवाहू शेतीतील प्रयोगासाठी त्यांनी केलेले नियोजन आणि त्यासाठी कृषी विद्यापीठापासून प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत त्यांनी केलेला पत्रव्यवहार पाहिला की या निर्णयावर ते किती ठाम होते याचा अंदाज येतो. स्वित्र्झलड सोडून भारतात येण्याचा त्यांचा निर्णय पत्नी आणि दोन्ही मुलींना मान्य नव्हता. त्यांची समजूत पटवून त्यांना भारतात आणणे हे एक दिव्यच होते. जोशींनी ते केलं. भारतातील शेती आणि शेतकरी यांच्या अवनत अवस्थेशी त्यांची नाळ किती खोलवर जोडलेली होती आणि दारिद्रय़ाविरुद्धच्या त्यांच्या लढाईशी त्यांची बांधिलकी किती अस्सल होती, याचे दर्शन जोशींच्या या मनोव्यापारातून घडते. जोशी नंतर शेतक ऱ्यांचे खऱ्या अर्थाने नेते झाले, त्यांची जात आणि आर्थिक स्तर बेदखल झाले त्याचे कारण इथे स्पष्ट होते.

शरद जोशींनी शेतकरी आंदोलनांना सुरुवात केली ती चाकणच्या कांदा आंदोलनापासून. दोन आंदोलनं झाली. ‘रास्ता रोको’ व उपोषणाचा प्रथमच वापर या आंदोलनात झाला. शेतकरी सरकारविरुद्ध संघर्ष करायला तयार नसत. पोलीस बळाचा पाशवी वापर होत असे. तुरुंगवारी, जामीन, खटले यांचे शुक्लकाष्ट मागे लागत असे. पण शेतकरी संघटनेच्या छत्राखाली शेतकरी त्यांच्या पोटातील आगीमुळे आणि शोषणामुळे, आपल्यावर होणाऱ्या अन्यायामुळे आक्रमक झाले. त्याने कांद्याला वाढीव दर मिळाला, निर्यातीवरील बंदी सरकारने मागे घेतली, हे तात्कालिक उद्दिष्ट साध्य झाले. पण या आंदोलनामुळे शेतक ऱ्यांच्या असंतोषाला वाट मिळाली आणि त्यानंतरचे प्रत्येक आंदोलन हे अधिक व्यापक होत गेले आणि शेतीमालाच्या किमतीचा आणि कृषी-अर्थकारणाचा प्रश्न देशपातळीवर राजकीय पटलावर गंभीरपणे आसनस्थ झाला. प्रत्येक आंदोलनाने आपापली किंमत चुकवली. अनेकांना तुरुंगवास घडला आणि काहींना हौतात्म्यही पत्करावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात शेतकरी आंदोलनांएवढी तीव्र, आग ओकणारी आंदोलनं दुसरी झाली नाहीत, असं लेखक भानू काळे म्हणतात. सरकारची दडपशाही मात्र तीच होती. गोरा साहेब जाऊन काळा साहेब आल्याने सरकार नावाच्या दडपशाही यंत्रणेत आणि वास्तवात काही फरक पडला नव्हता. या आंदोलनाने नंतर महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या. दिल्ली व पंजाबपर्यंत ते जाऊन पोहोचले. प्रादेशिक अस्मिता गळून पडल्या. जोशी देशपातळीवरील एक बलाढय़ शेतकरी नेते म्हणून उदयास आले. राजकारण्यांशी ते फटकून वागत असत. आता जोशींना टाळणे सत्तारूढ व विरोधी पक्षांनाही अशक्य झाले.

या पुस्तकात अनेक छायाचित्रे आहेत. एका चित्रात शरद जोशींच्या समवेत एकाच व्यासपीठावर चंद्रशेखर, विश्वनाथ प्रतापसिंग आणि अटलबिहारी वाजपेयी हास्यविनोदात गर्क असलेले दिसतात. नंतर हे तिघेही देशाचे पंतप्रधान झाले. शरद जोशींच्या वाढत्या राजकीय प्रभावाचे प्रतीकात्मक चित्र म्हणून त्याकडे पाहता येते.

सुरुवातीची काही वर्षे राजकारणापासून दूर राहिलेल्या, किंवा खरे तर घृणास्पद म्हणून राजकारण टाळणाऱ्या शरद जोशींनी- शेतक ऱ्यांना न्याय मिळवायचा असेल तर व्यवस्थेतच प्रवेश केला पाहिजे, इथपर्यंत प्रवास केला आणि स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. त्यामुळे समाजातील अंतर्विरोध प्रकर्षांने पुढे आले. जोशींना पाठिंबा असूनही या पक्षाला मात्र फारसे यश मिळाले नाही. स्वत: शरद जोशी एकदाही निवडून आले नाहीत. वाजपेयींच्या आग्रहामुळे त्यांनी राज्यसभेची खासदारकी स्वीकारली. त्यावरून त्यांना टीकेचा भडिमार सहन करावा लागला. या आणि अशा अनेक घटना-प्रसंगांना या चरित्रात स्थान मिळाले आहे आणि त्याचे साधकबाधक विवेचनही काळे यांनी केले आहे. स्त्रियांचा संघटनेतील सहभाग, सातबाराच्या उताऱ्यावर पत्नीचे नाव लावण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचे केलेले प्रबोधन आणि लक्ष्मीमुक्तीचे आंदोलन ही प्रकरणे जोशींच्या वेगळ्या दृष्टिकोनावर यथोचित प्रकाश टाकतात हे खरेच; पण या चरित्रग्रंथाचे वैशिष्टय़ म्हणजे लेखकाने सातत्याने घेतलेला जोशी यांच्या वैचारिक भूमिकेचा, त्यांच्या मूल्यधारणेचा शोध!

जोशी यांच्या वैचारिक व्यूहाच्या केंद्रस्थानी आहे ती त्यांची अर्थवादी भूमिका. शेती हा एक व्यवसाय आहे, त्यातून पुरेशी आर्थिक प्राप्ती व्हायलाच हवी, याविषयी ते ठाम होते. त्यांनी सातत्याने खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. प्रत्येक गोष्टीचं कारण आर्थिक असतं. खुल्या अर्थव्यवस्थेत अभिप्रेत असलेल्या स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी सातत्याने केला. त्यांच्या स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना म्हणजे राजाजींच्या स्वतंत्र पक्षाचे पुनरुज्जीवनच होते. लोकांना खूश करण्यासाठी किंवा राजकीयदृष्टय़ा सोयीची म्हणून डावी किंवा समाजवादी परिभाषा त्यांनी कधी वापरली नाही. डंकेल प्रस्तावाचे इतके उघड समर्थन भारतात तरी त्यांच्याशिवाय दुसरे कोणी केले नाही. भारतीय शेतक ऱ्याची लूट थांबविण्यासाठी त्याशिवाय पर्याय नाही, ही त्यांची खात्री होती. डंकेलमुळे शेतीमालाची सबसिडी जाईल, या आक्षेपाला त्यांचे उत्तर होते- की मुळातच भारतात शेतीला उणे अनुदान असल्याने ती कमी व्हायचा काही प्रश्नच नाही. ‘उलटी पट्टी’ हा त्यांनी लोकप्रिय केलेला शब्द हे भारतीय शेतीचे नेहमीचे वास्तव होते. जागतिकीकरणाच्या जमान्यात खुली अर्थव्यवस्था अपरिहार्य आहे आणि ती सर्वसामान्य ग्राहकाच्या भल्याचीच आहे, ही त्यांची भूमिका मतदारांनी स्वीकारली नाही, यातच जोशींचे राजकीय अपयश दडले आहे. पण त्यापलीकडेही जोशी उरतातच. याचे कारण शेतक ऱ्यांमध्ये त्यांनी जागविलेला स्वाभिमान व आत्मसन्मान. शेतकऱ्यांच्या जीवनात घडलेल्या या क्रांतीचे अग्रदूत होते शरद जोशी!

‘अंगारवाटा..शोध शरद जोशींचा’- भानू काळे

उर्मी प्रकाशन,

पृष्ठे- ५१०, मूल्य- ५०० रुपये.

सदा डुम्बरे sadadumbre@gmail.com