20 February 2019

News Flash

निसर्गस्नेही सहजीवनाचे अनुभव

आजकाल अनेक दाम्पत्यं आपल्या सहजीवनाची पंचविशी, पन्नाशी मोठय़ा धूमधडाक्यात साजरी करतात.

(संग्रहित छायाचित्र)

मनस्विनी प्रभुणे

आजकाल अनेक दाम्पत्यं आपल्या सहजीवनाची पंचविशी, पन्नाशी मोठय़ा धूमधडाक्यात साजरी करतात. या पार्श्वभूमीवर पर्यावरणस्नेही दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी यांच्या आगळय़ावेगळय़ा सहजीवनाची गोष्ट नुकतीच वाचायला मिळाली. दिलीप आणि पौर्णिमा या दोघांनी मिळून सुरू केलेली ‘गतिमान संतुलन’ नावाची पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करणारी मासिक पत्रिका अनेक वर्ष वाचनात होती. या ‘गतिमान संतुलन’च्या माध्यमातून त्यांचं सहजीवन कशा पद्धतीचं आहे, याची झलकही वाचायला मिळायची. आपल्या सहजीवनाची पंचवीस वर्ष पूर्ण करत असताना अतिशय प्रांजळपणे आणि पारदर्शक पद्धतीनं दोघांनी मिळून केलेलं लेखन पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ‘स्वप्नामधील गावां.. निसर्गस्नेही जीवनशैलीकडे’ हे ते पुस्तक!

हे पुस्तक म्हणजे दिलीप आणि पौर्णिमा यांच्या सहजीवनाचं आत्मकथन आहे. हे आत्मकथन नवरा-बायको, आई-वडील यांच्या भूमिकेतून तर आहेच; परंतु त्याहीपेक्षा निसर्गस्नेही जीवन जगणाऱ्या, दोन स्वतंत्र तरीही एकमेकांना अतिशय पूरक असलेल्या व्यक्तिमत्त्वांचं ते कथन आहे. स्वत:बद्दल लिहिणं तसं सोपं नसतं. सहजीवनाचा आणि तोदेखील जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या ‘निसर्गस्नेही’ सहजीवनाचा प्रवास आपल्याला दिलीप आणि पौर्णिमा यांच्या ‘स्वप्नातील गावा’त घेऊन जातो.

कसं आहे हे स्वप्नामधलं गाव? झुळुझुळु वाहणारी नदी असावी, त्या काठी सुंदरसं कौलारू घर असावं, घराभोवती सुंदरशी बाग- आखीवरेखीव अंगण असावं.. असं स्वप्न प्रत्येक जण बघत असतो. काळाप्रमाणे अशा स्वप्नांनीदेखील आता कात टाकलीय. झुळुझुळु वाहणारी नदी नसली तरी चालेल; पण ‘फाऊंटन’ हवं, ‘थ्री बेडरूम’ असाव्यात, अंगण नाही तर किमान ‘टेरेस’ असावं, टेरेसवर छान ‘गार्डन’ करता यावं.. आताच्या पिढीचं हे ‘ड्रीम हाऊस’ आहे!

पंचवीस वर्षांपूर्वी दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी यांनी सत्यात उतरवता येईल असं स्वप्न बघितलं. ते फक्त कोणत्या तरी खेडय़ात जाऊन घर बांधायचं एवढय़ापुरतं मर्यादित नव्हतं, तर ‘निसर्गस्नेही जीवनशैली’ दोघांनी मिळून जगायची हे त्यांनी पक्कं केलं होतं. पर्यावरणासंबंधित जागरूकता तयार व्हावी म्हणून दिलीप कुलकर्णी वेगवेगळी व्याख्यानं आणि अनुषंगाने लेखन करतच होते. शिवाय श्री. ग. माजगावकर यांच्या ‘ग्रामायन’ आणि ‘ग्राहक पंचायत’चं ते स्वयंप्रेरणेनं काम करत होते. त्यामुळे जगाला बदलण्यापेक्षा, आधी आपण किती बदललो आहोत? आपण स्वत: निसर्गस्नेही जीवनशैली आत्मसात करू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अशा एका गावात जाऊन राहण्याची आवश्यकता या दाम्पत्याला वाटू लागली.

मात्र, एक दिवस डोक्यात आलं आणि थेट गावात जाऊन राहिले असं काही झालं नाही. त्यासाठी विचारपूर्वक आणि नियोजन करून त्यांनी पावलं उचलली. सहजीवनात एकाच्या मतावर सगळ्या गोष्टी कधीच जमून येत नसतात. दिलीप कुलकर्णी लिहितात, ‘घर-संसार उभं राहण्यासाठी फक्त मतक्य असून पुरत नाही. भावनिक, व्यावहारिक अशा सर्वच बाबतींत जुळावं लागतं. आणि हे जुळणंही आतून असावं लागतं. पौर्णिमा अशी असेल असं मला वाटलं आणि म्हणूनच मी तिच्याकडे लग्नाचा विषय काढला. तिचं व्यक्तिमत्त्व, स्वभाव मला जितका आवडला होता, तितकीच तिची मॅच्युरिटीही. आमच्याइतकी सहमती, एकवाक्यता किती पती-पत्नींमध्ये असेल, याची मला शंकाच आहे.’

स्वप्नातल्या गावाची शोधमोहीम कोकणातल्या ‘कुडावळे’ गावी संपली. या गावात राहून आपण निसर्गस्नेही जीवनशैली आचरणात आणू शकतो याची दोघांनाही खात्री पटली होती. जवळच वाहणारी नदी, नदीच्या पलीकडची समृद्ध वारसा सांगणारी देवराई हे सगळं अगदी पूरक असं वातावरण होतं. कुडावळे गावानं या दोघांना त्यांच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग दाखवला. दिलीप आणि पौर्णिमा यांचा या गावात आल्यानंतरचा सहप्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. पर्यावरणीय सजगता बाळगून दैनंदिन जीवनात खूप मोठी तडजोड न करतादेखील कसं छान जगता येतं, याची अनेक उदाहरणं हे दोघेही आपल्या सोप्या, संवादिक भाषेतून उलगडत जातात.

आपलं अनुभवविश्व मांडत असताना सुरुवातीलाच पौर्णिमा यांनी ‘चूल’ या आपल्या कथनात अगदी मोकळेपणाने चुलीविषयी लिहिले आहे. चुलींबाबतचा अनुभव, त्यासाठी केलेले असंख्य प्रयोग खूप बोलके आहेत. पुढे दिलीप यांनीदेखील ‘अक्कल गेली चुलीत’ या लेखात आणखी सविस्तरपणे या विषयावर लिहिलं आहे. इथे एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे, की हे सगळं वाचताना आपल्या पर्यावरणविषयक अनेक गैरसमजुती गळून पडतात. गोव्यात अनेक घरांमध्ये गॅस शेगडी असूनही आजही दैनंदिन स्वयंपाकात चूल वापरली जाते हे मी बघितलं होतं. जळणासाठी लाकूडफाटा गोळा करायला महिलावर्गाला खूप मेहनत घ्यावी लागते. घरोघरी साठवून ठेवलेला लाकूडफाटा बघून मला कायम वाटायचं, की गॅस शेगडी असताना या महिला का वृक्षतोड करतात. चूल म्हणजे वृक्षतोडीला आमंत्रण आहे. थोडक्यात, चूल ही निसर्गस्नेही नाही. परंतु दिलीप आणि पौर्णिमा आपला हा गैरसमज व्यवस्थितपणे दूर करतात.

दिलीप आणि पौर्णिमा यांचे निसर्गस्नेही सहजीवनाचे अनुभव वाचताना आपण नकळतपणे आपल्या जीवनशैलीशी त्याची तुलना करू लागतो. या दाम्पत्यानं आत्मसात केली आहे तशी जीवनशैली आपण स्वीकारू शकतो का, असा विचार मनात सुरू होतो. मात्र, आपल्याला यातलं सर्व नाही जमलं तरी दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींमध्ये निसर्गस्नेही निश्चितच बनता येईल असा विश्वासही वाटू लागतो. या आत्मकथनाकडे ‘सामाजिक दस्तावेज’ म्हणूनही पाहता येईल. विचारपूर्वक सुरू केलेल्या सहजीवनाची पंचविशी लिहितं होऊन साजरी करणं अर्थपूर्ण बनते.

‘स्वप्नामधील गावां.. निसर्गस्नेही जीवनशैलीकडे’

– दिलीप कुलकर्णी / पौर्णिमा कुलकर्णी,

राजहंस प्रकाशन, पुणे,

पृष्ठे- २११, मूल्य- २०० रुपये.

First Published on October 7, 2018 12:15 am

Web Title: dilip and purnima kulkarni marathi book review