|| डॉ. स्नेहा जोशी

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आणि भविष्याच्या दृष्टीने दहावी हा महत्त्वाचा टप्पा असतो. दहावीचं वर्ष म्हणजे दडपण, गोंधळ, तणाव आणि भीती यांची विद्यार्थ्यांशी (आणि पालकांचीही) जणू मैत्रीच असते. मात्र, या पुढे ही परिस्थिती बदलेल. आजच्या बदललेल्या शिक्षण प्रणालींचे मुख्य सूत्रच तणावरहित मूल्यमापन पद्धती, आनंददायी अध्ययन, प्रेरक आणि संवेदनशील माणूस घडवणारे शिक्षण आहे. विद्यार्थी हा ज्ञानाचा निर्माता आहे, यावर ज्ञानरचनावादाचा विश्वास आहे. ज्ञानरचनावाद आणि कृतियुक्त अध्ययन पद्धती हे या प्रक्रियेमागील अधिष्ठान आहे. विद्यार्थ्यांच्या स्वत:च्या कल्पना, भावना, विचार आणि अनुभव यांच्या सृजनशील अभिव्यक्तीला पूर्ण संधी देणे, हा या बदलत्या भूमिकेचा पाया आहे.

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

इयत्ता दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिकेकडून कृतिपत्रिकेकडे, ज्ञानाकडून आकलनाकडे, आशयाच्या आकलनाकडून भाषिक समृद्धीकडे आणि पाठांतराकडून स्वविचाराच्या अभिव्यक्तीकडे ही चार प्रमुख वैशिष्टय़े आहेत. पारंपरिक पाठांतर पद्धतीला फाटा देऊन विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती क्षमतेला संधी देणं हे या अभ्यासक्रमाचं वेगळेपण आहे. हा अभ्यासक्रम जितका विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक आहे, तितकाच शिक्षकांसाठी आणि परीक्षकांसाठीही आहे. कारण त्यांना या बदलासाठी जाणीवपूर्वक परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

पूर्वीचा अभ्यासक्रमही ज्ञानरचनावादावरच आधारित होता. मात्र, त्यावरील स्वाध्यायांची मांडणी ही बव्हंशी पाठांतरावर असल्यानं भाषा, अभिव्यक्ती विकासात अडसर ठरत होती. आता पाठय़पुस्तकातील स्वाध्यायात आकलन, व्याकरण, भाषा सौंदर्य, स्वमत आणि अभिव्यक्ती यांचा समावेश केला आहे. हे मूल्यमापन पद्धतीस अनुसरून, आकलन आणि अभिव्यक्ती क्षमतेस पूरक आहेत. पाठय़घटकांच्या आकलनानंतर विद्यार्थ्यांनी स्वत:चे वाचन, निरीक्षण, विचार, भावना, कल्पना व अनुभव याबाबत चिंतन करून, स्वत:चे मत तार्किक विचारानं परखडपणे मांडणं, अभिव्यक्त होणं हे पायाभूत सूत्र मानून त्यासाठी पोषक असे पाठय़घटक आणि स्वाध्याय, उपयोजित लेखन यांचा पाठय़पुस्तकात अंतर्भाव केला आहे. क्षमताक्षेत्रं, क्षमताविधानं, अध्ययननिष्पत्ती यांचा विचार आणि नेमकेपणानं मांडणी, पाठय़घटकांसह भाषिक विकास आणि भाषा समृद्धीचा विचार, आजच्या पिढीला भावेल, आपला वाटेल अशा पाठांचा अंतर्भाव, विद्यार्थ्यांचा वयोगट, भावविश्व, जीवनकौशल्ये, मूल्यांना घटकनिवडीत प्राधान्य, व्यावहारिक भाषा आणि भाषेचा व्यावहारिक उपयोग अशा विविध पद्धतीनं नव्या अभ्यासक्रमातील पाठय़पुस्तकांची मांडणी करण्यात आली आहे.

इयत्ता दहावीच्या पुनर्रचित मूल्यमापन पद्धतीत पाठय़घटकाच्या आशयाच्या आकलनावर भर देण्यात आला आहे. उत्तरं पाठ करून लिहिण्याऐवजी विद्यार्थ्यांना विषयाची समज किती आहे, स्वत: विचार करून ते उत्तरे कशी मांडतात याला प्राधान्य देण्यात आलं आहे. मुलांनी त्यांच्या कल्पना, स्वत:च्या भाषेत मांडणं अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, सर्जनशीलता, तार्किक विचार या उच्च बोधात्मक क्षमता विकसन हे प्रमुख उद्दिष्ट आहे. नव्या शिक्षण प्रणालीचा विचार हा वर्तमानकाळाशी जोडलेला आणि भविष्याचा वेध घेणारा आहे. याबाबतचं उदाहरणच द्यायचं, तर गणित विषयामध्ये वस्तू आणि सेवा कराचा समावेश करण्यात आला आहे. सर्व विषयांसाठी भाषिक विकास पायाभूत मानला जायला हवा. स्वमतामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे उत्तर वेगळे असल्यामुळे साचेबद्ध उत्तरं लिहिली जाऊ नयेत. वस्तुनिष्ठ प्रश्नांवर भर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दीर्घ लेखन करावं लागणार नाही. विद्यार्थ्यांच्या आकलनावर आणि अभिव्यक्तीवर भर असल्याने कोणत्याही प्रश्नासाठी रेडिमेड उत्तर मिळूच शकणार नाही. एक प्रश्न आणि अनेक उत्तरं अशा बहुदिश विचार प्रक्रियेला चालना देणाऱ्या मुक्तोत्तरी आणि बहुपर्यायी कृतींचा समावेश कृतिपत्रिकेत करण्यात आला आहे.

नव्या अभ्यासक्रमात परीक्षक आणि शिक्षकांचं कामही आव्हानात्मक झालं आहे.  प्रत्येक विद्यार्थ्यांच्या उत्तरामागील विचार त्यांना समजून घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि परीक्षकांनीही बहुदिशीय विचारक्षमता विकसित करण्याची गरज आहे. थिकिंग प्रोसेस इज इम्परटट दॅन प्रॉडक्ट हे त्याचं कारण आहे. अजून महत्त्वाचा मुद्दा इथे मांडावासा वाटतो, आता नव्या काळात शिक्षक या शब्दाची व्याख्याच बदलली पाहिजे. शिक्षक म्हणजे, जो शिकवतो तो, एवढय़ापुरताच शिक्षक या शब्दाचा अर्थ मर्यादित नाही, तर त्यांनी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, विचार करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. सहकार्यातून अध्ययन, सर्जनशील विचार, चिकित्सक वृत्ती, जीवनाभिमुखता ही नव्या शिक्षण पद्धतीची वैशिष्टय़ं सांगता येतील. मी आहे; कारण तुम्ही आहात ही एकत्वाची, माणूसपणाची जाण निर्माण करणं, चिकित्सक, सृजनशील विचारांच्या अभिव्यक्तीला पूर्ण संधी देणं, शिक्षणाची जीवनाशी आणि शाळेबाहेरील अनुभवांशी सांगड घालणं या तत्त्वांचा स्वीकार हा प्रमुख विचार आहे. आताच्या विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानाशी मैत्री आहे. त्यामुळे आशयाच्या अधिक संदर्भाच्या अभ्यासासाठी क्युआर कोड तंत्रज्ञानाचाही अंतर्भाव करण्यात आला आहे.

एकुणात, विद्यार्थी केवळ परीक्षार्थी नाही, तर ज्ञानार्थी व्हावा हे पुनर्रचित अभ्यासक्रम आणि पाठय़पुस्तक निर्मितीमागील मध्यवर्ती सूत्र आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या वैचारिक, भावनिक आणि कार्यकुशलतेच्या दृष्टीने स्वत:च्या पायावर उभा करणारा बदल हा शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शिक्षकांनीही या वाटेवरून प्रवास करत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत, यशात, शिक्षणात योगदान द्यावे ही अपेक्षा आहे. तसंच अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन बोलायचं झालं, तर विद्यार्थी पुढे जाऊन संवेदनशील माणूस व्हावा हा विचार आहे. त्याच्यासाठी शिक्षण आनंददायी व्हावं. संत ज्ञानेश्वरांपासून सर्वच संतांनी वेगवेगळ्या शब्दांत माणसातील संवेदनशीलतेची गरज अधोरेखित केली आहे. दहावीनंतरच्या आयुष्यात विद्यार्थ्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक माणसं भेटतील. या माणसांशी त्याचं एक नातं निर्माण व्हावं. त्यासाठी नव्या शैक्षणिक वर्षांत दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना, त्यांच्यातील सर्जनशीलतेला हार्दिक शुभेच्छा!

snevijoshi@gmail.com